वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क ६:३५-४४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ आता दिवस मावळायची वेळ झाली होती. त्यामुळे त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “इथे आसपास कोणीही राहत नाही आणि खूप उशीरही झालाय.+ ३६ म्हणून लोकांना पाठवून दे म्हणजे ते जवळपासच्या खेड्यापाड्यांत जाऊन खायला काहीतरी विकत घेऊ शकतील.”+ ३७ पण तो त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.” तेव्हा ते म्हणाले: “आम्ही जाऊन २०० दिनारांच्या* भाकरी विकत आणून लोकांना खायला देऊ का?”+ ३८ तो त्यांना म्हणाला: “जा आणि तुमच्याजवळ किती भाकरी आहेत ते पाहा.” त्यांनी जाऊन पाहिलं आणि ते म्हणाले: “पाच भाकरी आणि दोन मासेही आहेत.”+ ३९ मग त्याने सगळ्या लोकांना लहानलहान गट करून गवतावर बसायला सांगितलं.+ ४० तेव्हा ते शंभर-शंभर आणि पन्‍नास-पन्‍नास लोकांचे गट करून बसले. ४१ त्यानंतर त्याने त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेतले आणि वर आकाशाकडे पाहून धन्यवाद दिला.+ मग त्याने भाकरी मोडून लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिल्या. तसंच, त्याने ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले. ४२ मग सगळे पोटभर जेवले ४३ आणि भाकरींच्या उरलेल्या तुकड्यांनी १२ टोपल्या भरल्या, शिवाय मासेही उरले होते.+ ४४ त्या दिवशी जेवणाऱ्‍या पुरुषांची संख्या ५,००० होती.

  • लूक ९:१२-१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ मग संध्याकाळ होऊ लागली, तेव्हा १२ प्रेषित त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “लोकांना पाठवून दे, म्हणजे ते जवळपासच्या खेड्यापाड्यांत जाऊन त्यांच्या राहायची आणि खायची-प्यायची सोय करू शकतील. कारण हे तर एकांत ठिकाण आहे.”+ १३ पण तो त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.”+ तेव्हा ते म्हणाले: “पाच भाकरी आणि दोन मासे यांशिवाय आमच्याजवळ काहीही नाही. आम्ही स्वतःच जाऊन या सगळ्या लोकांसाठी अन्‍न विकत आणू का?” १४ तिथे जवळजवळ ५,००० पुरुष होते. पण तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “सगळ्यांना पन्‍नास-पन्‍नासचे गट करून बसायला सांगा.” १५ त्यांनी तसंच केलं आणि सगळ्यांना खाली बसायला लावलं. १६ त्यानंतर, येशूने त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेतले आणि वर आकाशाकडे पाहून धन्यवाद दिला. मग त्याने भाकरी मोडून लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिल्या. १७ तेव्हा सगळे पोटभर जेवले आणि त्यांनी उरलेलं अन्‍न गोळा केलं तेव्हा १२ टोपल्या भरल्या.+

  • योहान ६:५-१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ येशूने नजर वर करून पाहिलं, तेव्हा त्याला एक मोठा लोकसमुदाय येताना दिसला. येशू फिलिप्पला म्हणाला: “या लोकांना खायला देण्यासाठी आपण भाकरी कुठून विकत घ्यायच्या?”+ ६ पण तो फक्‍त त्याची परीक्षा पाहायला असं बोलला. कारण थोड्याच वेळात आपण काय करणार आहोत हे त्याला माहीत होतं. ७ फिलिप्पने त्याला उत्तर दिलं: “आपण २०० दिनारांच्या* भाकरी आणल्या, तरी प्रत्येकाला थोडीथोडीही मिळणार नाही.” ८ त्याच्या शिष्यांपैकी एक असलेला, शिमोन पेत्रचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला: ९ “इथे एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. पण इतक्या लोकांना हे अन्‍न कसं पुरणार?”+

      १० येशू म्हणाला: “लोकांना खाली बसायला सांगा.” त्या ठिकाणी भरपूर गवत असल्यामुळे लोक त्यावर बसले. त्यांत पुरुषांची संख्या सुमारे ५,००० इतकी होती.+ ११ येशूने त्या भाकरी घेतल्या आणि देवाला धन्यवाद दिल्यावर तिथे बसलेल्या लोकांना त्या वाटून दिल्या. मग दोन लहान मासे घेऊन त्याने तसंच केलं आणि प्रत्येकाला पाहिजे तितकं दिलं. १२ तेव्हा सगळे पोटभर जेवल्यावर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला: “काहीही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” १३ तेव्हा त्यांनी ते गोळा केले आणि पाच जवाच्या भाकरींतून उरलेल्या तुकड्यांनी १२ टोपल्या भरल्या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा