यशया
५० यहोवा असं म्हणतो:
“मी जेव्हा तुमच्या आईला पाठवून दिलं, तेव्हा तिला सोडचिठ्ठी दिली का?+
किंवा, माझ्यावरचं एखादं कर्ज फेडण्यासाठी मी तुम्हाला विकलं का?
पाहा! तुम्ही स्वतःच्या चुकांमुळे+ विकला गेलात,
आणि तुमच्या स्वतःच्या अपराधांमुळेच तुमच्या आईला पाठवून देण्यात आलं.+
२ तर मग, मी आलो तेव्हा इथे कोणीच का नव्हतं?
मी आवाज दिला, तेव्हा कोणीही उत्तर का नाही दिलं?+
तुमची सुटका करता येणार नाही इतका माझा हात तोकडा आहे का?
किंवा माझ्याकडे तुम्हाला सोडवायची शक्ती नाही का?+
पाहा! माझ्या धमकावण्याने समुद्र कोरडा पडतो.+
३ मी आकाशांवर अंधाराचं पांघरूण घालतो,+
आणि त्यांना गोणपाटाने झाकून टाकतो.”
४ सर्वोच्च प्रभू यहोवा याने माझी जीभ प्रशिक्षित केली आहे,*+
म्हणजे योग्य शब्द वापरून थकलेल्यांशी कसं बोलावं* हे मला समजेल.+
तो रोज सकाळी मला उठवतो;
मी विद्यार्थ्यासारखं लक्षपूर्वक ऐकावं, म्हणून तो माझे कान उघडतो.+
मी वळून उलट दिशेला गेलो नाही.+
६ मला फटके मारणाऱ्यांपुढे मी आपली पाठ केली,
आणि दाढी उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले.
अपमान होत असताना आणि माझ्यावर थुंकलं जात असतानाही
मी माझं तोंड लपवलं नाही.+
७ पण सर्वोच्च प्रभू यहोवा मला मदत करेल.+
म्हणून मला अपमानित झाल्यासारखं वाटणार नाही.
मी माझा चेहरा गारगोटीच्या दगडासारखा कठीण केला आहे,+
आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे.
८ मला निर्दोष ठरवणारा माझ्या जवळ आहे.
मग माझ्यावर आरोप कोण लावू शकतो?+
चला, आपण समोरासमोर उभे राहू.
माझ्याविरुद्ध कोणाचा काही वाद असेल, तर त्याने पुढे यावं.
९ पाहा! सर्वोच्च प्रभू यहोवा मला मदत करेल.
मला कोण दोषी ठरवू शकतं?
पाहा! ते सगळे कापडासारखे जीर्ण होतील,
त्यांना किडे* खाऊन टाकतील.
१० तुमच्यापैकी असा कोण आहे जो यहोवाचं भय बाळगतो आणि त्याच्या सेवकाचं ऐकतो?+
असा कोण आहे जो गडद अंधारात चालतो आणि ज्याच्याकडे प्रकाश नाही?
त्याने यहोवाच्या नावावर भरवसा ठेवावा आणि आपल्या देवावर विसंबून राहावं.
११ “पाहा! आग पेटवणारे, आगीचा भडका करून ठिणग्या उडवणारे तुम्ही सगळे जण,
स्वतःच पेटवलेल्या आगीच्या प्रकाशात चाला,
स्वतःच भडकवलेल्या आगीच्या ठिणग्यांमधून चाला.
माझ्याकडून तुम्हाला ही शिक्षा मिळेल:
तुम्ही भयंकर वेदनेत पडून राहाल.