२ इतिहास
२४ यहोआश राजा बनला तेव्हा तो सात वर्षांचा होता.+ त्याने ४० वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव सिब्या असून ती बैर-शेबा+ इथली होती. २ यहोयादा याजक जिवंत होता तोपर्यंत यहोआश राजा यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ३ यहोयादाने त्याला दोन बायका करून दिल्या आणि त्याला मुलं व मुली झाल्या.
४ नंतर, यहोआशच्या मनात यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्याची इच्छा निर्माण झाली.+ ५ म्हणून त्याने सगळ्या याजकांना आणि लेव्यांना एकत्र बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “तुमच्या देवाच्या मंदिराची दरवर्षी दुरुस्ती करता यावी, म्हणून यहूदाच्या सर्व शहरांमध्ये जाऊन सगळ्या इस्राएली लोकांकडून पैसा गोळा करा.+ आणि हे काम लवकरात लवकर करा.” पण लेव्यांनी मात्र ते काम करायला उशीर लावला.+ ६ तेव्हा राजाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून विचारलं:+ “लेव्यांनी अजूनपर्यंत यहूदामधून आणि यरुशलेममधून पवित्र कर का गोळा केला नाही? आणि त्याबद्दल तुम्ही त्यांना का विचारलं नाही? यहोवाचा सेवक मोशे याने साक्षपेटीच्या मंडपासाठी+ जो पवित्र कर, म्हणजे इस्राएलच्या मंडळीचा पवित्र कर गोळा करण्याची आज्ञा दिली होती,+ तो अजूनपर्यंत का गोळा केलेला नाही? ७ तुम्हाला हे चांगलं माहीत आहे, की त्या दुष्ट बाईची, अथल्याची+ मुलं खऱ्या देवाच्या मंदिरात घुसली होती.+ आणि त्यांनी यहोवाच्या मंदिरातल्या सगळ्या पवित्र वस्तू बआलसाठी वापरल्या होत्या.” ८ मग, राजाच्या आज्ञेवरून एक पेटी+ बनवून ती बाहेर यहोवाच्या मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवण्यात आली.+ ९ त्यानंतर संपूर्ण यहूदा आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा करण्यात आली, की खऱ्या देवाचा सेवक मोशे याने ओसाड रानात इस्राएली लोकांवर जो पवित्र कर+ बसवला होता, तो लोकांनी यहोवासाठी आणावा. १० तेव्हा सगळे अधिकारी व लोक मोठ्या आनंदाने दान आणत राहिले+ आणि पेटी भरेपर्यंत* त्यात दान टाकत राहिले.
११ पेटीत भरपूर पैसा जमा झालेला दिसला, की लेवी ती पेटी राजाकडे घेऊन यायचे. मग राजाचा सचिव आणि मुख्य याजकाचा सहायक येऊन ती पेटी रिकामी करायचे+ आणि नंतर ती परत तिच्या जागेवर नेऊन ठेवायचे. असं ते दररोज करायचे आणि त्यामुळे त्यांनी भरपूर पैसा जमवला. १२ मग राजा आणि यहोयादा तो पैसा यहोवाच्या मंदिरातल्या कामाची देखरेख करणाऱ्या माणसांना द्यायचे. पुढे ही माणसं त्या पैशाचा वापर करून, यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कारागिरांना आणि दगड फोडणाऱ्यांना कामावर ठेवायची.+ तसंच, त्या पैशाने ती माणसं यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी लोहारांना आणि तांब्याची कामं करणाऱ्यांनाही कामावर ठेवायची. १३ मंदिराच्या कामाची देखरेख करणाऱ्यांनी मग कामाला सुरुवात केली, आणि त्यांच्या देखरेखीखाली काम होत गेलं. शेवटी, त्यांनी खऱ्या देवाच्या मंदिराची दुरुस्ती पूर्ण केली आणि ते मजबूत करून आधीसारखं बनवलं. १४ मग काम संपल्यावर त्यांनी उरलेला पैसा राजाला आणि यहोयादाला आणून दिला. त्यांनी तो पैसा यहोवाच्या मंदिरासाठी भांडी बनवायला; तसंच, सेवेत आणि अर्पणं देताना वापरली जाणारी भांडी, आणि सोन्या-चांदीची भांडी व प्याले+ बनवायला वापरला. यहोयादा जिवंत होता तोपर्यंत ते यहोवाच्या मंदिरात दररोज होमार्पणं द्यायचे.+
१५ यहोयादा समाधानी जीवन जगला आणि शेवटी वृद्ध होऊन मेला. त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो १३० वर्षांचा होता. १६ त्यांनी त्याला दावीदपुरात राजांच्या कबरेत दफन केलं.+ कारण, त्याने खरा देव आणि त्याचं मंदिर यांच्या बाबतीत इस्राएलमध्ये चांगली कामं केली होती.+
१७ यहोयादाचा मृत्यू झाल्यावर यहूदाचे प्रमुख राजाकडे आले. त्यांनी त्याला दंडवत घातला आणि राजाने त्यांचं म्हणणं ऐकलं. १८ त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याच्या मंदिराचा त्याग केला आणि ते पूजेच्या खांबांची* व मूर्तींची उपासना करू लागले. त्यांनी केलेल्या पापामुळे देवाचा क्रोध यहूदावर आणि यरुशलेमवर भडकला. १९ यहोवा त्यांना आपल्याकडे परत आणण्यासाठी संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवत राहिला. ते संदेष्टे त्यांना चेतावणी* देत राहिले, पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही.+
२० मग देवाची पवित्र शक्ती* यहोयादा+ याजकाच्या मुलावर, जखऱ्यावर आली. तेव्हा तो एका उंच जागी उभा राहून लोकांना म्हणाला: “खरा देव असं म्हणतो, की ‘तुम्ही यहोवाच्या आज्ञा का मोडत आहात? अशाने तुमचं कधीही चांगलं होणार नाही. तुम्ही यहोवाला सोडून दिलंय, म्हणून तोही तुम्हाला सोडून देईल.’”+ २१ पण त्यांनी जखऱ्याविरुद्ध कट रचला,+ आणि राजाच्या आज्ञेवरून यहोवाच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारलं.+ २२ अशा प्रकारे, त्याचे वडील* यहोयादा यांनी दाखवलेलं एकनिष्ठ प्रेम यहोआश राजा विसरून गेला. आणि त्याने त्याच्या मुलाला मारून टाकलं. मरता-मरता जखऱ्या म्हणाला: “यहोवाने हे पाहावं आणि तुझ्याकडून याचा हिशोब घ्यावा.”+
२३ मग, वर्षाच्या सुरुवातीला सीरियाचं सैन्य यहोआशसोबत लढाई करायला आलं आणि त्यांनी यहूदा व यरुशलेमवर हल्ला केला.+ त्यांनी लोकांच्या सर्व अधिकाऱ्यांना मारून टाकलं+ आणि लुटीचा सगळा माल दिमिष्कच्या राजाला पाठवून दिला. २४ लढाई करायला आलेल्या सीरियाच्या सैन्यात फार कमी माणसं होती. पण तरीसुद्धा यहोवाने यहूदाचं मोठं सैन्य त्यांच्या हाती दिलं.+ कारण यहूदाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचा देव यहोवा याला सोडून दिलं होतं. आणि म्हणून त्यांनी* यहोआशला शिक्षा केली. २५ सीरियाचं सैन्य निघून गेलं, त्या वेळी यहोआश जबर जखमी* होऊन पडला होता. तेव्हा त्याच्या सेवकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला, कारण त्याने यहोयादा याजकाच्या मुलांचं* रक्त सांडलं होतं.+ त्यांनी यहोआशला त्याच्याच पलंगावर ठार मारलं.+ आणि त्याला दावीदपुरात+ दफन केलं, पण राजांच्या कबरेत मात्र त्याला दफन केलं नाही.+
२६ यहोआशविरुद्ध कट रचणाऱ्यांची नावं ही:+ अम्मोनी स्त्री शिमाथ हिचा मुलगा जाबाद, आणि मवाबी स्त्री शिम्रिथ हिचा मुलगा यहोजाबाद. २७ यहोआशच्या मुलांबद्दलची माहिती, तसंच त्याच्याविरुद्ध सांगितलेल्या न्यायाच्या संदेशांबद्दलची+ आणि खऱ्या देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीबद्दलची सगळी माहिती+ राजांच्या पुस्तकाच्या लिखाणांत नमूद आहे. मग त्याच्या जागी त्याचा मुलगा अमस्या हा राजा बनला.