यिर्मया
७ यहोवाकडून यिर्मयाला असा संदेश मिळाला: २ “यहोवाच्या मंदिराच्या दरवाजाजवळ उभा राहा आणि अशी घोषणा कर, ‘यहोवाची उपासना करायला या दरवाजांतून आत येणाऱ्या यहूदाच्या सगळ्या लोकांनो, यहोवा काय म्हणतो ते ऐका. ३ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “तुमचे मार्ग आणि तुमची वागणूक बदला, मगच मी तुम्हाला इथे राहू देईन.+ ४ फसव्या गोष्टींवर भरवसा ठेवू नका, आणि असं म्हणू नका, ‘हे* यहोवाचं मंदिर आहे, यहोवाचं मंदिर आहे, यहोवाचं मंदिर आहे!’+ ५ तुमचे मार्ग आणि तुमची वागणूक बदला; इतरांचा योग्य न्याय करा;+ ६ तुमच्यामध्ये राहणाऱ्या विदेशी लोकांवर, अनाथांवर* आणि विधवांवर जुलूम करू नका;+ निरपराध लोकांचा या देशात खून करू नका; आणि परक्या देवांच्या नादी लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका;+ ७ मगच मी तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे जो देश मी तुमच्या वाडवडिलांना कायमसाठी* दिला होता, त्यात राहू देईन.”’”
८ “तुम्ही मात्र फसव्या गोष्टींवर भरवसा ठेवत आहात.+ पण, त्यापासून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. ९ तुम्ही चोऱ्यामाऱ्या करता,+ खून करता, व्यभिचार करता, खोट्या शपथा घेता,+ बआलसाठी बलिदानं देता+ आणि ज्या देवांची तुम्हाला कधीच ओळख नव्हती, अशांच्या नादी लागता. १० तुम्हाला काय वाटतं, अशी सगळी घृणास्पद कामं करून, माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात तुम्ही येऊ शकता? आणि माझ्यासमोर उभं राहून ‘आमचा नक्कीच बचाव होईल,’ असं म्हणू शकता? ११ माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराला तुम्ही समजता तरी काय? ते काय लुटारूंची गुहा आहे?+ तुम्ही काय-काय करता ते सगळं मी पाहिलंय,” असं यहोवा म्हणतो.
१२ “‘जरा शिलोमध्ये+ जाऊन पाहा. माझ्या नावासाठी मी सगळ्यात आधी तेच ठिकाण निवडलं होतं.+ पण माझ्या इस्राएली लोकांच्या दुष्ट कामांमुळे मी त्या ठिकाणाचं काय केलं ते जरा जाऊन पाहा.+ १३ पण तुम्ही काही आपली वाईट कामं सोडली नाहीत,’ असं यहोवा म्हणतो. ‘तुम्हाला सारखं-सारखं सांगूनही तुम्ही माझं ऐकलं नाही.+ मी तुम्हाला हाक मारत राहिलो, पण तुम्ही उत्तर दिलं नाही.+ १४ म्हणून मी शिलोच्या बाबतीत जसं केलं, तसंच माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिराच्या बाबतीतही करीन.+ जे ठिकाण मी तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांना दिलं होतं आणि ज्यावर तुम्ही भरवसा ठेवता,+ त्याची मी शिलोसारखीच दशा करीन.+ १५ मी तुमच्या भाऊबंदांना, म्हणजे एफ्राईमच्या सगळ्या वंशजांना जसं घालवून दिलं, तसं तुम्हालाही माझ्या नजरेसमोरून घालवून देईन.’+
१६ पण हे यिर्मया, तू मात्र या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस. त्यांच्यासाठी माझा धावा करू नकोस. त्यांच्यासाठी माझ्याकडे याचना किंवा विनवणी करू नकोस.+ कारण मी तुझं ऐकणार नाही.+ १७ यहूदाच्या शहरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर ते काय करत आहेत, ते तुला दिसतंय ना? १८ ‘स्वर्गाच्या राणीसाठी’* पोळ्या बनवायला मुलं लाकडं गोळा करत आहेत, वडील आग पेटवत आहेत आणि बायका पीठ मळत आहेत.+ आणि ते इतर दैवतांपुढे पेयार्पणं ओतून माझा राग भडकवत आहेत.+ १९ यहोवा म्हणतो, ‘पण खरंतर असं करून ते मला दुःखी करत नाहीत,* तर उलट ते स्वतःवरच दुःख ओढवून घेत आहेत आणि स्वतःचाच अपमान करवून घेत आहेत.’+ २० म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो, ‘पाहा! मी या जागेवर माझा राग, माझा क्रोध ओतीन;+ माणसांवर आणि प्राण्यांवर, रानातल्या झाडांवर आणि जमिनीतून उगणाऱ्या सगळ्यावर मी माझा क्रोध ओतीन. माझ्या क्रोधाची आग पेटत राहील आणि ती विझणार नाही.’+
२१ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘तुमच्या इतर बलिदानांसोबत तुमची होमार्पणंही द्या आणि स्वतःच त्यांचं मांस खा.+ २२ कारण मी जेव्हा तुमच्या वाडवडिलांना इजिप्तमधून बाहेर आणलं, तेव्हा त्यांना होमार्पणांबद्दल किंवा बलिदानांबद्दल काहीच बोललो नाही किंवा कोणतीच आज्ञा दिली नाही.+ २३ पण मी त्यांना ही आज्ञा मात्र दिली होती: “माझं ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक व्हाल.+ मी सांगेन त्या मार्गाने चाला, म्हणजे तुमचं भलं होईल.”’+ २४ पण त्यांनी माझं ऐकलं नाही, माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही.+ ते स्वतःच्याच विचारांप्रमाणे चालत राहिले; ते हट्टी बनले आणि त्यांचं दुष्ट मन सांगेल तसं वागत राहिले.+ सुधारण्याऐवजी ते आणखीनच वाईट बनले. २५ तुमचे वाडवडील इजिप्तमधून बाहेर आले, तेव्हापासून आजपर्यंत ते असंच वागत राहिले.+ म्हणून मी माझ्या सगळ्या सेवकांना, माझ्या सगळ्या संदेष्ट्यांना तुमच्याकडे पाठवत राहिलो; मी त्यांना दररोज, वारंवार तुमच्याकडे पाठवत राहिलो.+ २६ पण कोणीही माझं ऐकलं नाही, माझ्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही.+ उलट, ते हट्टी बनले आणि त्यांच्या वाडवडिलांपेक्षाही वाईट वागले!
२७ तू या सगळ्या गोष्टी त्यांना सांगशील,+ तरीपण ते तुझं ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मारशील, पण ते तुला उत्तर देणार नाहीत. २८ तेव्हा तू त्यांना म्हणशील, ‘हे राष्ट्र आपला देव यहोवा याचं न ऐकणारं आणि त्याची शिस्त नाकारणारं राष्ट्र आहे. या राष्ट्रातल्या लोकांमधून विश्वासूपणा नाहीसा झालाय; त्याचा उल्लेखही केला जात नाही.’+
२९ तू तुझे लांब* केस कापून फेकून दे. उजाड टेकड्यांवर जाऊन मोठ्याने शोकगीत गा. कारण यहोवाचा क्रोध भडकवणाऱ्या या पिढीला त्याने नाकारलंय; त्याने तिला सोडून दिलंय. ३० ‘कारण यहूदाच्या लोकांनी माझ्या नजरेत जे वाईट ते केलंय,’ असं यहोवा म्हणतो. ‘माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात आपल्या घृणास्पद मूर्ती ठेवून त्यांनी ते अशुद्ध केलंय.+ ३१ त्यांनी ‘हिन्नोमच्या वंशजांच्या खोऱ्यात’*+ असलेल्या तोफेतमध्ये उपासनेची उच्च स्थानं बांधली आहेत. आपल्या मुला-मुलींचा आगीत होम करण्यासाठी त्यांनी ती बांधली आहेत.+ पण असं काही करायची आज्ञा मी त्यांना कधी दिली नव्हती, किंवा असला विचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नव्हता.’+
३२ यहोवा म्हणतो, ‘म्हणून पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा त्या ठिकाणाला ‘तोफेत’ किंवा ‘हिन्नोमच्या वंशजांचं खोरं’* असं म्हणणार नाहीत; तर त्याला ‘कत्तलीचं खोरं’ म्हटलं जाईल. आणि पुरायला जागा उरणार नाही इतकी प्रेतं ते तोफेतमध्ये पुरतील.+ ३३ आणि लोकांची प्रेतं आकाशाच्या पक्ष्यांसाठी आणि पृथ्वीवरच्या प्राण्यांसाठी अन्न होईल; कोणीही त्यांना हुसकावून लावणार नाही.+ ३४ मी यरुशलेमच्या रस्त्यांवरचा आणि यहूदाच्या शहरांमधल्या जल्लोषाचा आणि आनंदोत्सवाचा आवाज, तसंच वधू-वरासोबत आनंद साजरा करण्याचा आवाज बंद करून टाकीन.+ सगळा देश ओसाड होईल.’”+