यहेज्केल
२९ मग दहाव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या १२ व्या दिवशी मला यहोवाकडून एक संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला, इजिप्तचा राजा फारो याच्याकडे आपलं तोंड करून त्याच्याविरुद्ध आणि संपूर्ण इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी कर.+ ३ तू असं म्हण: ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो:
“हे इजिप्तच्या फारो राजा!
आपल्या नाईलच्या* झऱ्यांमध्ये लोळत पडलेल्या महाकाय समुद्री प्राण्या!+
बघ, मी तुझ्या विरोधात उठलोय.+
तू म्हणालास, ‘नाईल नदी माझी आहे.
ती मी स्वतःसाठी बनवली आहे.’+
४ पण आता ऐक! मी तुझ्या जबड्यात गळ अडकवीन आणि तुझ्या नाईलमधल्या माशांना तुझ्या खवल्यांना चिकटायला लावीन.
मी तुला तुझ्या नाईलमधून खेचून बाहेर काढीन;
तुझ्या खवल्यांना चिकटलेल्या नाईलच्या सगळ्या माशांसकट, मी तुला ओढून बाहेर काढीन.
५ मी तुला आणि तुझ्या नाईलमधल्या सगळ्या माशांना वाळवंटात टाकून देईन.
तिथे तू खुल्या मैदानात पडून राहशील,
इथे-तिथे विखुरलेले तुझ्या मृतदेहाचे तुकडे कोणीही गोळा करणार नाही किंवा जमा करणार नाही.+
मी तुला आकाशातल्या पक्ष्यांना आणि जमिनीवरच्या प्राण्यांना अन्न म्हणून देईन.+
६ मग, इजिप्तमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना कळून येईल, की मी यहोवा आहे,
कारण इस्राएलच्या घराण्यासाठी त्यांचा आधार फक्त एखाद्या वाळलेल्या गवताच्या काडीसारखा* होता.+
७ इस्राएली लोकांनी तुझा हात धरला तेव्हा तू चिरडला गेलास,
आणि तुझ्यामुळे त्यांचे खांदे जखमी झाले.
आधारासाठी ते तुझ्यावर टेकले तेव्हा तू मोडला गेलास,
आणि तुझ्यामुळे त्यांचे पाय लटपटू लागले.”+
८ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “पाहा, मी तुझ्या विरोधात तलवार आणीन.+ आणि माणसांमधून व प्राण्यांमधून तुझं अस्तित्व मिटवून टाकीन. ९ संपूर्ण इजिप्त देश उद्ध्वस्त होईल आणि ओसाड पडून राहील.+ तेव्हा तिथल्या लोकांना कळून येईल, की मी यहोवा आहे. कारण तू म्हणालास, ‘नाईल नदी माझी आहे. आणि ती मी स्वतःसाठी बनवली आहे.’+ १० म्हणून बघ, मी तुझ्याविरुद्ध आणि तुझ्या नाईलविरुद्ध उठलोय. मी इजिप्तला उद्ध्वस्त करीन. मी त्याला कोरडा खडखडीत प्रदेश करून टाकीन.+ मिग्दोलपासून+ सवेनपर्यंत,+ थेट इथियोपियाच्या सीमेपर्यंत मी त्याला ओसाड करून टाकीन. ११ त्यातून एकही माणूस किंवा प्राणी ये-जा करणार नाही.+ आणि ४० वर्षांपर्यंत तिथे लोकवस्ती होणार नाही. १२ ओसाड झालेल्या देशांमध्ये मी इजिप्तला सगळ्यात जास्त ओसाड करून टाकीन. आणि ओसाड पडलेल्या शहरांच्या तुलनेत, त्याची शहरं ४० वर्षांपर्यंत सगळ्यात जास्त ओसाड पडून राहतील;+ मी इजिप्तच्या लोकांची अनेक राष्ट्रांमध्ये पांगापांग करीन आणि वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांना विखरून टाकीन.”+
१३ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “मग ४० वर्षं झाल्यावर, ज्या राष्ट्रांमध्ये इजिप्तच्या लोकांची पांगापांग झाली होती, तिथून मी त्यांना परत गोळा करीन.+ १४ मी इजिप्तच्या बंदिवानांना परत त्यांच्या जन्मभूमीत, पथ्रोसमध्ये+ आणीन आणि तिथे त्यांचं एक राज्य होईल; पण ते अगदी क्षुल्लक असेल. १५ इजिप्तचं महत्त्व इतर राज्यांपेक्षा अगदीच कमी होईल. इजिप्त परत कधीच इतर राष्ट्रांवर अधिकार गाजवणार नाही.+ मी तिथल्या लोकांची संख्या इतकी कमी करीन, की ते कधीच इतर राष्ट्रांना काबीज करू शकणार नाहीत.+ १६ त्यानंतर, इस्राएलच्या घराण्यातले लोक कधीच आधारासाठी इजिप्तकडे पाहणार नाहीत.+ उलट, मदतीसाठी इजिप्तकडे जाऊन आपण किती मोठी चूक केली होती, याचीच त्यांना आठवण होत राहील. तेव्हा त्यांना कळून येईल, की मी सर्वोच्च प्रभू यहोवा आहे.”’”
१७ मग, २७ व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, यहोवाकडून मला एक संदेश मिळाला. तो मला म्हणाला: १८ “मनुष्याच्या मुला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर+ याने सोरशी लढाई करताना आपल्या सैन्याकडून खूप कष्ट करून घेतले.+ त्याच्या सगळ्या सैनिकांच्या डोक्याला टक्कल पडलं आणि प्रत्येकाचा खांदा सोलून निघाला. पण, सोरशी लढताना त्याने आणि त्याच्या सैन्याने जी मेहनत घेतली त्यासाठी त्यांना काहीच मोबदला मिळाला नाही.
१९ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘पाहा! मी इजिप्त देश बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याला देतोय.+ तो त्या देशातली सगळी धनसंपत्ती आणि माल लुटून नेईल. आणि हाच त्याच्या सैन्यासाठी मोबदला ठरेल.’
२० ‘नबुखद्नेस्सरने तिच्याशी* लढायला जे श्रम घेतले, त्याच्या बदल्यात मी त्याला इजिप्त देश देईन. कारण त्यांनी माझ्यासाठी काम केलं,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
२१ त्या दिवशी मी इस्राएलच्या घराण्यासाठी एक शिंग उगायला लावीन.*+ आणि मी तुला त्यांच्यामध्ये बोलायची संधी देईन. तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.”