यहेज्केल
३३ मग यहोवाकडून मला एक संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला, तू आपल्या लोकांशी बोल+ आणि त्यांना असं सांग,
“‘समजा मी देशाविरुद्ध तलवार आणली,+ आणि देशातल्या सगळ्या लोकांनी एका माणसाला घेऊन त्याला आपला पहारेकरी म्हणून नेमलं, ३ आणि देशाविरुद्ध तलवार येत असल्याची पाहून त्या पहारेकऱ्याने रणशिंग फुंकलं आणि लोकांना इशारा दिला.+ ४ आणि जर एखाद्या माणसाने रणशिंगाचा आवाज ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केलं+ आणि तलवारीने येऊन त्याचा जीव घेतला, तर त्याच्या मृत्यूसाठी तो स्वतःच जबाबदार असेल.+ ५ त्याने रणशिंगाचा आवाज ऐकूनही इशाऱ्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून त्याच्या मृत्यूसाठी तो स्वतःच जबाबदार असेल. त्याने इशाऱ्याकडे लक्ष दिलं असतं, तर त्याचा जीव वाचला असता.
६ पण जर देशाविरुद्ध तलवार येत असल्याची पाहूनही पहारेकऱ्याने रणशिंग फुंकलं नाही+ आणि त्यामुळे लोकांना इशारा मिळाला नाही, आणि तलवारीने येऊन त्यांच्यापैकी एखाद्याचा जीव घेतला, तर तो माणूस आपल्या अपराधामुळे नक्की मरेल, पण त्याच्या रक्ताचा हिशोब मी त्या पहारेकऱ्याकडून घेईन.’*+
७ हे मनुष्याच्या मुला! मी तुला इस्राएलच्या घराण्याचा पहारेकरी म्हणून नेमलंय. तुला माझ्याकडून संदेश मिळाला, की तो तू माझ्या वतीने त्यांना बजावून सांग.+ ८ मी जर एखाद्या दुष्ट माणसाला म्हणालो, ‘अरे दुष्ट माणसा, तू नक्की मरशील!’+ पण तू जर त्याच्याशी बोलला नाहीस आणि त्याने आपला वाईट मार्ग सोडून द्यावा, म्हणून त्याला ताकीद दिली नाहीस, तर तो दुष्ट माणूस आपल्या वाईट कामांमुळे तर मरेलच,+ पण त्याच्या रक्ताचा हिशोब मी तुझ्याकडून घेईन. ९ पण तू जर एखाद्या दुष्ट माणसाला ताकीद दिली, आणि तरीही तो आपल्या वाईट मार्गापासून मागे वळला नाही, तर तो आपल्या वाईट कामांमुळे तर मरेलच,+ पण तू मात्र स्वतःचा जीव वाचवशील.+
१० हे मनुष्याच्या मुला! इस्राएलच्या घराण्याला सांग, ‘तुम्ही असं म्हणालात: “आमच्या बंडखोर कृत्यांच्या आणि पापांच्या ओझ्याखाली आम्ही दबून गेलोय. त्यांच्या भारामुळे आमचा नाश होत चाललाय.+ मग आम्ही कसं वाचणार?”’+ ११ म्हणून त्यांना म्हण: ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, “मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, जेव्हा एखादा दुष्ट माणूस मरतो तेव्हा मला आनंद होत नाही.+ उलट, तो आपला दुष्ट मार्ग सोडतो+ आणि जिवंत राहतो तेव्हा मला आनंद होतो.+ म्हणून मागे वळा! आपल्या दुष्ट मार्गांपासून मागे फिरा!+ कारण हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! तुम्ही उगीचच आपला जीव का गमावता?”’+
१२ हे मनुष्याच्या मुला! तू आपल्या लोकांना असं सांग, ‘एखाद्या नीतिमान माणसाने जर बंड केलं, तर त्याने केलेली नीतिमान कामं त्याला वाचवू शकणार नाहीत.+ तसंच, एखाद्या दुष्ट माणसाने आपला दुष्टपणा सोडून दिला आणि तो मागे वळला, तर त्याने पूर्वी केलेल्या दुष्टपणामुळे त्याचा नाश होणार नाही.+ नीतिमान माणूस पाप करतो, तेव्हा त्याची नीतिमान कामं त्याला वाचवू शकत नाहीत.+ १३ मी जर एखाद्या नीतिमान माणसाला म्हणालो: “तू नक्की वाचशील,” पण त्याने जर आपल्या नीतिमत्त्वावर भरवसा ठेवून एखादं वाईट काम केलं,*+ तर त्याने केलेलं एकही नीतिमान काम आठवलं जाणार नाही. उलट, त्याने केलेल्या वाईट कामामुळे तो नक्की मरेल.+
१४ तसंच, मी जर एखाद्या दुष्ट माणसाला म्हणालो, की “तू नक्की मरशील.” पण तो जर आपल्या पापांपासून मागे फिरला आणि न्यायाने व नीतीने वागू लागला;+ १५ आणि त्याने लुबाडलेल्या व त्याच्याकडे गहाण ठेवलेल्या वस्तू त्याने परत केल्या,+ आणि आपली वाईट कामं सोडून तो जीवन वाचवणाऱ्या कायद्यांप्रमाणे चालला, तर तो नक्की वाचेल; तो मरणार नाही.+ १६ त्याने केलेल्या कोणत्याही पापांचा हिशोब ठेवला* जाणार नाही.+ न्यायाने आणि नीतीने वागल्यामुळे तो नक्कीच जिवंत राहील.’+
१७ तरी तुझे लोक म्हणाले: “यहोवा अन्यायाने वागतो.” पण खरंतर तेच अन्यायाने वागतात.
१८ तसंच, एखादा नीतिमान माणूस नीतीने वागायचं सोडून वाईट कामं करू लागला, तर तो आपल्या दुष्टपणामुळे मरेलच.+ १९ पण जर एखाद्या दुष्ट माणसाने आपली सगळी दुष्ट कामं सोडून दिली आणि तो नीतीने आणि न्यायाने वागू लागला, तर त्यामुळे तो नक्की जिवंत राहील.+
२० पण तुम्ही म्हणालात: “यहोवा अन्यायाने वागतो.”+ हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! मी तुमच्यापैकी प्रत्येकाचा न्याय त्याच्या कामांप्रमाणे करीन.
२१ त्यानंतर आमच्या बंदिवासाच्या १२ व्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, एक माणूस यरुशलेममधून निसटून माझ्याकडे आला+ आणि मला म्हणाला: “शहरावर कब्जा करण्यात आलाय!”+
२२ तो माणूस सकाळी माझ्याकडे आला, पण त्याच्या आदल्या संध्याकाळीच यहोवाची पवित्र शक्ती* माझ्यावर आली होती; तो माणूस माझ्याकडे यायच्या आधीच देवाने माझी वाचा मला परत दिली होती. म्हणून मी पुन्हा बोलू लागलो आणि त्यानंतर मुका राहिलो नाही.+
२३ मग यहोवाकडून मला एक संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २४ “मनुष्याच्या मुला, उद्ध्वस्त झालेल्या या शहरांतले रहिवासी+ इस्राएल देशाविषयी असं म्हणत आहेत, ‘अब्राहाम एकटा असताना त्याला हा देश देण्यात आला.+ आपण तर खूप आहोत, तेव्हा देश आपल्यालाच देण्यात आलाय.’
२५ म्हणून त्यांना सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “तुम्ही रक्तासकट मांस खाता,+ तुमच्या घृणास्पद मूर्तींकडे* आशेने पाहता आणि रक्तपात करत राहता.+ मग का म्हणून हा देश तुम्हाला मिळावा? २६ तुम्ही तुमच्या तलवारींवर भरवसा ठेवता,+ किळसवाणी कामं करता आणि तुमच्यातला प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्याच्या बायकोला भ्रष्ट करतो.+ मग का म्हणून हा देश तुम्हाला मिळावा?”’+
२७ तू त्यांना सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, उद्ध्वस्त झालेल्या शहरांत राहणारे सगळे लोक तलवारीने मारले जातील; मी खुल्या मैदानात असलेल्या माणसांना जंगली प्राण्यांसाठी अन्न म्हणून देईन; आणि मजबूत गडांमध्ये व गुहांमध्ये राहणारे रोगराईने मरतील.+ २८ मी देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त आणि ओसाड करून टाकीन.+ त्याच्या मगरुरीचा आणि गर्विष्ठपणाचा मी अंत करीन. इस्राएलचे डोंगर उजाड होतील+ आणि तिथून कोणीही ये-जा करणार नाही. २९ त्यांनी केलेल्या सगळ्या किळसवाण्या कामांमुळे+ मी जेव्हा देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त आणि ओसाड करून टाकीन,+ तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.”’
३० मनुष्याच्या मुला! तुझी माणसं भिंतींच्या आड आणि घरांच्या दरवाजांजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत.+ ते एकमेकांना म्हणत आहेत; प्रत्येक जण आपल्या भावाला असं म्हणत आहे: ‘चला, यहोवाकडून काय संदेश आहे तो ऐकू.’ ३१ ते मोठ्या संख्येने येतील आणि माझे लोक म्हणून तुझ्यासमोर बसतील. ते तुझा संदेश ऐकतील, पण त्याप्रमाणे वागणार नाहीत.+ कारण तोंडाने जरी ते तुझी खुशामत करत असले, तरी त्यांचं मन त्यांच्या बेइमानीच्या कमाईकडे लागलंय. ३२ बघ! तू त्यांच्यासाठी एखाद्या प्रेमगीतासारखा आहेस; मधुर आवाजात गायलेल्या आणि तंतुवाद्यावर कुशलपणे वाजवलेल्या प्रेमगीतासारखा तू आहेस. ते तुझे शब्द ऐकतील, पण त्यांच्यातला एकही जण त्याप्रमाणे वागणार नाही. ३३ तरी तू सांगितलेले शब्द नक्कीच पूर्ण होतील. आणि जेव्हा ते पूर्ण होतील तेव्हा त्यांना समजेल, की त्यांच्यामध्ये खरोखर एक संदेष्टा होता.”+