२ इतिहास
३५ मग योशीयाने यरुशलेममध्ये यहोवासाठी वल्हांडण सण साजरा करण्याची व्यवस्था केली.+ आणि पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी+ त्यांनी वल्हांडणाचा पशू कापला.+ २ योशीयाने याजकांना यहोवाच्या मंदिरात सेवा करायला नेमलं आणि ती सेवा करण्याचं त्यांना प्रोत्साहन दिलं.+ ३ मग, सगळ्या इस्राएली लोकांना शिक्षण देणारे, म्हणजे यहोवासाठी पवित्र असलेले लेवी+ यांना योशीया म्हणाला: “यापुढे तुम्हाला कराराची पवित्र पेटी खांद्यांवर वाहून न्यावी लागणार नाही.+ तुम्ही ती इस्राएलचा राजा दावीद याच्या मुलाने, शलमोनने बांधलेल्या मंदिरात ठेवा.+ आणि तुमचा देव यहोवा व त्याचे इस्राएली लोक यांची सेवा करा. ४ इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा मुलगा शलमोन यांनी लिहून ठेवलेल्या सूचनांनुसार,+ तुम्ही आपापल्या घराण्यांप्रमाणे आणि आपापल्या गटांप्रमाणे सेवेसाठी तयार व्हा.+ ५ तुम्ही पवित्र ठिकाणी आपापल्या गटांप्रमाणे उभे राहा; आपल्या भाऊबंदांच्या प्रत्येक घराण्यासाठी लेव्यांच्या घराण्यातला एक गट असेल अशा प्रकारे तुम्ही उभे राहा. ६ मग वल्हांडणाचा पशू कापा,+ स्वतःला शुद्ध करा आणि यहोवाने मोशेद्वारे दिलेली आज्ञा तुमच्या भाऊबंदांना पाळता यावी, म्हणून त्यांच्यासाठी तयारी करा.”
७ त्यानंतर, तिथे हजर असलेल्या सगळ्या लोकांना वल्हांडणाची बलिदानं अर्पण करता यावीत, म्हणून योशीयाने त्यांना नर कोकरांचे आणि बकऱ्यांच्या नर पिल्लांचे कळप दिले; त्याने त्यांना एकूण ३०,००० जनावरं दिली. याशिवाय त्याने त्यांना ३,००० बैलसुद्धा दिले. ही सगळी जनावरं राजाने स्वतःच्या संपत्तीतून दिली.+ ८ तसंच अधिकाऱ्यांनीसुद्धा लोकांना, याजकांना आणि लेव्यांना स्वेच्छेने दान दिलं. खऱ्या देवाच्या मंदिराच्या कामाचं नेतृत्व करणाऱ्यांनी, म्हणजे हिल्कीया,+ जखऱ्या आणि यहीएल यांनीही याजकांना वल्हांडणाचे २,६०० पशू आणि ३०० बैल दिले. ९ कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल, तसंच लेव्यांचे प्रमुख हशब्याह, ईयेल आणि योजाबाद यांनीसुद्धा लेव्यांना वल्हांडणाचे ५,००० पशू आणि ५०० बैल दिले.
१० अशा प्रकारे सगळी तयारी पूर्ण झाली. मग राजाच्या आज्ञेनुसार याजक आपापल्या जागी आणि लेवी आपापल्या गटांप्रमाणे उभे राहिले.+ ११ मग त्यांनी वल्हांडणाचे पशू कापले.+ आणि याजकांनी लेव्यांकडून जनावरांचं रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडलं.+ त्या वेळी लेवी हे जनावरांची कातडी काढत होते.+ १२ मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे यहोवाला होमार्पणं देता यावीत, म्हणून लेव्यांनी होमार्पणांची तयारी केली आणि आपापल्या घराण्यांप्रमाणे उभे असलेल्या लोकांना ती दिली. त्यांनी बैलांच्या बाबतीतही हेच केलं. १३ मग, रिवाजाप्रमाणे त्यांनी वल्हांडणाच्या पशूचं मांस भाजलं.+ तसंच त्यांनी पातेली, हंड्या आणि कढया यांत पवित्र अर्पणं शिजवली. त्यानंतर त्यांनी ते सगळं लगेच लोकांकडे आणलं. १४ नंतर त्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी तयारी केली. कारण याजक, म्हणजे अहरोनचे वंशज हे रात्र होईपर्यंत होमार्पणं देण्यात आणि जनावरांची चरबी अर्पण करण्यात गुंतले होते. म्हणून लेव्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी, म्हणजे अहरोनच्या वंशजांसाठी सर्व तयारी केली.
१५ दावीद, आसाफ,+ हेमान आणि राजासाठी दृष्टान्त पाहणारा यदूथून+ यांनी देऊन ठेवलेल्या आज्ञेप्रमाणे, गायक असलेली आसाफची+ मुलं आपापल्या जागी उभी होती.+ तर द्वारपाल वेगवेगळ्या दरवाजांजवळ उभे होते.+ या सगळ्यांना आपलं काम सोडून जावं लागलं नाही. कारण त्यांच्या भाऊबंदांनी, म्हणजे लेव्यांनी त्यांच्यासाठी सगळी तयारी करून ठेवली होती. १६ अशा रितीने, त्या दिवशी वल्हांडण सण साजरा करण्यासाठी+ आणि यहोवाच्या वेदीवर होमार्पणं देण्यासाठी, योशीया राजाच्या आज्ञेवरून यहोवाच्या सेवेची सगळी तयारी करण्यात आली.+
१७ त्या वेळी तिथे हजर असलेल्या सगळ्या इस्राएली लोकांनी वल्हांडण सण साजरा केला, आणि सात दिवस बेखमीर* भाकरीचा सण साजरा केला.+ १८ शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून आतापर्यंत इस्राएलमध्ये कधीही असा वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता. तसंच योशीया राजा, याजक व लेवी यांनी आणि त्या वेळी हजर असलेल्या यहूदा, इस्राएल आणि यरुशलेम इथल्या सर्व लोकांनी जसा वल्हांडण सण साजरा केला, तसा इस्राएलच्या इतर कोणत्याही राजाने साजरा केला नव्हता.+ १९ हा वल्हांडण सण योशीया राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी साजरा करण्यात आला.
२० हे सगळं घडल्यावर, म्हणजे योशीयाने मंदिराविषयीची सगळी तयारी केल्यावर, इजिप्तचा राजा नखो+ हा फरात नदीजवळ असलेल्या कर्कमीश इथे युद्ध करायला आला. तेव्हा योशीया त्याच्याशी लढायला गेला.+ २१ म्हणून नखोने आपल्या दूतांच्या हातून त्याला असा निरोप पाठवला: “हे यहूदाच्या राजा! तू माझ्याशी लढायला का येतोस? आज मी तुझ्याशी नाही, तर दुसऱ्या राष्ट्राशी लढायला निघालोय. आणि देवाने मला लवकर जायला सांगितलंय. देव माझ्यासोबत आहे. तू देवाच्या विरोधात जाऊ नकोस, कारण यातच तुझं भलं आहे. नाहीतर तो तुझा नाश करेल.” २२ पण, योशीयाने माघार घेतली नाही. तो आपला वेष बदलून+ नखोशी लढायला गेला. देवाने नखोद्वारे जे सांगितलं होतं, ते योशीयाने ऐकलं नाही. आणि तो मगिद्दोच्या+ मैदानात त्याच्याशी लढायला गेला.
२३ मग तिरंदाजांनी योशीया राजाला बाण मारून जखमी केलं. तेव्हा तो आपल्या सेवकांना म्हणाला: “मी खूप जखमी झालोय, मला इथून घेऊन जा.” २४ म्हणून मग त्याच्या सेवकांनी त्याला रथातून उतरवलं आणि त्याच्या दुसऱ्या एका युद्ध-रथातून त्याला यरुशलेमला परत आणलं. अशा प्रकारे, योशीयाचा मृत्यू झाला आणि त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरेत दफन केलं.+ मग यहूदाच्या आणि यरुशलेमच्या सगळ्या लोकांनी त्याच्यासाठी शोक केला. २५ यिर्मयाने+ योशीयासाठी शोकगीत गायलं. आणि आजही सर्व गायक व गायिका+ त्यांच्या शोकगीतांत योशीयाचा उल्लेख करतात. तसंच, इस्राएलमध्ये शोकगीतं गायली जावीत असंही ठरवण्यात आलं. ही गीतं शोकगीतांच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहेत.
२६ योशीयाबद्दलची बाकीची माहिती आणि यहोवाच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याने एकनिष्ठ प्रेम दाखवणारी जी कामं केली त्यांबद्दलची माहिती; २७ तसंच, त्याने जे काही केलं त्याबद्दलची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, इस्राएलच्या आणि यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे.+