उत्पत्ती
४९ मग याकोब आपल्या मुलांना बोलावून म्हणाला: “सगळे एकत्र जमा म्हणजे पुढे तुमच्यासोबत काय होईल, हे मी तुम्हाला सांगीन. २ याकोबच्या मुलांनो, एकत्र जमा आणि तुमचा पिता इस्राएल काय सांगतो ते ऐका.
३ रऊबेन,+ तू माझा प्रथमपुत्र,+ माझं सामर्थ्य आणि माझ्या पुरुषत्वाचं प्रथमफळ आहेस. सन्मान आणि सामर्थ्य यांत तू अत्यंत श्रेष्ठ आहेस. ४ पुराच्या उसळत्या पाण्यासारखं तू स्वतःला आवरलं नाहीस, म्हणून तू श्रेष्ठ ठरणार नाहीस. तू तुझ्या वडिलांच्या पलंगावर चढलास+ आणि तू माझं अंथरूण भ्रष्ट* केलंस. खरंच, याने असं काम केलं!
५ शिमोन आणि लेवी भाऊ आहेत.+ ते आपल्या तलवारींनी हिंसाचार करतात.+ ६ माझ्या जिवा,* त्यांची संगत धरू नकोस. माझ्या मना,* त्यांच्या घोळक्यात जाऊ नकोस. कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांची हत्या केली+ आणि मौज म्हणून त्यांनी बैलांच्या पायांच्या शिरा कापल्या. ७ त्यांचा राग आणि त्यांचा क्रोध शापित असो, कारण त्यांचा राग क्रूर आणि त्यांचा क्रोध निर्दयी आहे.+ मी याकोबच्या देशात त्यांची पांगापांग करीन आणि इस्राएलच्या देशात त्यांना विखरून टाकीन.+
८ यहूदा,+ तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील.+ तुझा हात तुझ्या शत्रूंची मान धरेल.+ तुझ्या वडिलांची मुलं तुला वाकून नमन करतील.+ ९ यहूदा सिंहाचा छावा* आहे.+ माझ्या मुला, तू शिकार खाऊन उठशील. तो सिंहासारखा जमिनीवर लोळतो आणि आळोखेपिळोखे देतो. त्याला छेडण्याचं धैर्य कोणात? १० शिलो* येईपर्यंत+ राजदंड यहूदाच्या हातून जाणार नाही+ आणि अधिकाऱ्याची काठी त्याच्या पायांमधून हलणार नाही. सर्व लोक त्याच्या अधीन होतील.*+ ११ तो आपलं गाढव द्राक्षवेलीला बांधेल आणि गाढवीचं पिल्लू उत्तम द्राक्षवेलीला बांधेल. तो मद्यात* आपले कपडे आणि द्राक्षांच्या रसात आपला झगा धुईल. १२ द्राक्षारस पिऊन त्याचे डोळे लाल भडक झाले आहेत आणि दूध पिऊन त्याचे दात पांढरे झाले आहेत.
१३ जबुलून+ समुद्रकिनाऱ्याजवळ वस्ती करेल; जहाजं जिथे नांगर टाकतात,+ अशा किनाऱ्यावर तो राहील. त्याच्या प्रदेशाची सीमा सिदोनपर्यंत असेल.+
१४ इस्साखार+ दणकट गाढव आहे; तो खोगिराच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या गोणींसहित आराम करू शकतो. १५ विश्रांती घेण्याची जागा चांगली आहे आणि आपल्या वाट्याला आलेली जमीन उत्तम आहे, असं तो पाहील. तो ओझं वाहण्यासाठी आपला खांदा वाकवेल आणि दासासारखा मजुरी करायला तयार होईल.
१६ इस्राएलचा एक वंश या नात्याने दान+ आपल्या लोकांचा न्याय करेल.+ १७ दान रस्त्याच्या कडेला असलेला साप होईल. तो मार्गावरचा विषारी साप* होईल. तो घोड्याच्या टाचेला दंश करेल आणि घोड्यावरचा स्वार मागे उलटून पडेल.+ १८ हे यहोवा, मी तारणासाठी तुझी वाट पाहीन.
१९ गादवर+ लुटारूंची टोळी हल्ला करेल, पण तो त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करेल.+
२० आशेरजवळ+ भरपूर* अन्न* असेल आणि तो राजासाठी योग्य असं अन्न पुरवेल.+
२१ नफताली+ एक नाजूक हरीण आहे. त्याचे शब्द मधुर आहेत.+
२२ योसेफ+ एका फलदायी झाडाची फांदी आहे. तो झऱ्याजवळ लावलेल्या अशा एका फलदायी झाडासारखा आहे, ज्याच्या फांद्या भिंत ओलांडून जातात. २३ पण तिरंदाज त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला करत राहिले. त्यांनी त्याला बाण मारले आणि ते मनोमन त्याचा द्वेष करत राहिले.+ २४ आणि तरीसुद्धा त्याचं धनुष्य स्थिर राहिलं+ आणि त्याचे हात मजबूत आणि चपळ राहिले.+ जो याकोबचा सामर्थ्यवान, त्याचा मेंढपाळ आणि त्याला आधार देणारा खडक आहे, त्याच्या हातून हे घडून आलं. २५ तो* तुला साहाय्य करणाऱ्या देवाचं वरदान आहे. तुला आशीर्वाद देणाऱ्या सर्वशक्तिमान देवाशी त्याची जवळीक आहे. देव तुला वरून आकाशाचा आणि खोलवर असलेल्या जलाशयाचा आशीर्वाद देईल.+ तो तुला भरपूर मुलंबाळं आणि गुरंढोरं देऊन आशीर्वाद* देईल. २६ तुझ्या पित्याचे आशीर्वाद सर्वकाळाच्या पर्वतांच्या आशीर्वादांपेक्षा श्रेष्ठ असतील, कायम टिकणाऱ्या टेकड्यांवरच्या सुंदर वस्तूंपेक्षा ते श्रेष्ठ असतील.+ हे आशीर्वाद नेहमीसाठी योसेफच्या डोक्यावर राहतील, आपल्या सर्व भावांमधून ज्याला निवडण्यात आलं, त्याच्या मस्तकावर ते राहतील.+
२७ बन्यामीन+ फाडणाऱ्या लांडग्यासारखा होईल.+ तो सकाळी आपली शिकार खाईल, आणि संध्याकाळी लुटीचे वाटे करेल.”+
२८ हे सर्व इस्राएलचे १२ वंश आहेत आणि त्यांना आशीर्वाद देताना त्यांच्या पित्याने बोललेले हे शब्द आहेत. त्याने त्यांच्यापैकी प्रत्येकाला योग्य असा आशीर्वाद दिला.+
२९ त्यानंतर त्याने त्यांना या आज्ञा दिल्या: “मी आता माझ्या पूर्वजांना जाऊन मिळेन.*+ मला हित्ती एफ्रोनच्या शेतातल्या गुहेत माझ्या वाडवडिलांसोबत पुरा.+ ३० ही गुहा कनान देशात मम्रेसमोरच्या मकपेला नावाच्या शेतात आहे. अब्राहामने हे शेत पुरण्यासाठी जमीन म्हणून हित्ती एफ्रोनकडून विकत घेतलं होतं. ३१ तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची बायको सारा हिला पुरलं होतं.+ तिथेच त्यांनी इसहाक+ आणि त्याची बायको रिबका हिला पुरलं आणि तिथेच मी लेआला पुरलं. ३२ ते शेत आणि त्यातली गुहा हेथच्या मुलांकडून विकत घेतलेली आहे.”+
३३ अशा रितीने, याकोबने आपल्या मुलांना या सर्व सूचना दिल्या. मग त्याने पलंगावर आपले पाय वर घेतले आणि प्राण सोडला आणि तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.*+