एज्रा
६ यानंतर, दारयावेश राजाने फर्मान काढलं आणि त्याप्रमाणे बाबेलमध्ये खजिना ठेवण्याच्या संग्रहालयात शोध घेण्यात आला. २ तेव्हा मेदी प्रांतातल्या अखमथा इथल्या किल्ल्यात त्यांना एक गुंडाळी सापडली आणि त्या गुंडाळीत पुढील आदेश लिहिण्यात आला होता:
३ “कोरेश राजाने आपल्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षी, यरुशलेममधल्या देवाच्या मंदिराबद्दल अशी आज्ञा दिली:+ ‘मंदिराचा पाया मजबूत करावा आणि मंदिर पुन्हा बांधलं जावं, म्हणजे तिथे बलिदानं देता येतील. त्याची उंची ६० हात* आणि त्याची रुंदी ६० हात असावी.+ ४ बांधकामासाठी मोठमोठ्या दगडांचे तीन थर रचले जावेत, तसंच, लाकडांचा एक थर रचला जावा.+ याचा सर्व खर्च शाही खजिन्यातून दिला जावा.+ ५ शिवाय, नबुखद्नेस्सरने यरुशलेममधल्या देवाच्या मंदिरातून जी सोन्याचांदीची भांडी बाबेलला आणली होती,+ ती परत केली जावीत आणि ती यरुशलेममध्ये नेऊन देवाच्या मंदिरात योग्य ठिकाणी ठेवली जावीत.’+
६ म्हणून आता तुम्ही, म्हणजे नदीपलीकडच्या* प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, तसंच शथर-बोजनइ आणि तुमचे सोबती म्हणजे उपराज्यपाल,+ तुम्ही सगळे यहुद्यांपासून दूर राहा. ७ यहुदी राज्यपाल आणि यहुद्यांचे वडीलजन देवाचं मंदिर त्याच्या मूळ ठिकाणी पुन्हा बांधतील. देवाच्या मंदिराच्या कामात तुम्ही लुडबुड करू नका. ८ शिवाय मी असाही हुकूम देत आहे, की देवाचं मंदिर बांधणाऱ्या यहुद्यांच्या वडीलजनांसाठी तुम्ही पुढील गोष्टी कराव्यात: शाही खजिन्यात+ नदीपलीकडच्या प्रदेशातून जो कर गोळा केला जातो, त्यातून या माणसांना त्यांच्या कामासाठी लागणारा खर्च ताबडतोब दिला जावा, म्हणजे त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.+ ९ तसंच, त्यांना जे काही लागेल ते दररोज न चुकता दिलं जावं; म्हणजे यरुशलेममधले याजक सांगतात त्याप्रमाणे, स्वर्गाच्या देवाला होमार्पणं देण्यासाठी लागणारे बैल,+ मेंढे+ आणि कोकरं;+ शिवाय गहू,+ मीठ,+ द्राक्षारस+ आणि तेलही+ त्यांना दररोज न चुकता दिलं जावं. १० यामुळे ते सतत स्वर्गाच्या देवाला आवडणारी अर्पणं देऊ शकतील आणि राजाला व त्याच्या मुलांना मोठं आयुष्य लाभावं, म्हणून ते प्रार्थना करतील.+ ११ मी असाही हुकूम देत आहे, की जर कोणी या आदेशाचं पालन केलं नाही, तर त्याच्या घराचं लाकूड* काढून त्याला त्याच्यावर लटकवलं जाईल* आणि या अपराधासाठी त्याच्या घराला सार्वजनिक शौचालय* बनवलं जाईल. १२ आणि कोणत्याही राजाने किंवा राष्ट्राने हा आदेश मोडून यरुशलेममध्ये असलेल्या देवाच्या मंदिराचा नाश करण्याचा प्रयत्न केला, तर ज्या देवाने या मंदिराला आपलं नाव दिलं आहे,+ त्याने त्यांचा नाश करावा. मी, राजा दारयावेश हा हुकूम देत आहे आणि तो ताबडतोब लागू केला जावा.”
१३ मग नदीपलीकडच्या प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ+ आणि त्यांचे सोबती यांनी राजा दारयावेश याने हुकूम दिल्याप्रमाणे लगेच सर्व गोष्टी केल्या. १४ तेव्हा संदेष्टा हाग्गय+ आणि इद्दोचा नातू म्हणजे संदेष्टा जखऱ्या+ यांच्या संदेशांनी प्रोत्साहन मिळाल्यामुळे, यहुद्यांचे वडीलजन मंदिराच्या इमारतीचं बांधकाम वेगाने करत राहिले.+ त्यांनी इस्राएलच्या देवाच्या आज्ञेने, तसंच कोरेश,+ दारयावेश+ आणि पर्शियाचा राजा अर्तहशश्त+ यांच्या आज्ञेने इमारतीचं बांधकाम पूर्ण केलं.+ १५ राजा दारयावेश याच्या शासनकाळाच्या सहाव्या वर्षी, अदार* महिन्याच्या तिसऱ्या दिवशी, त्यांनी मंदिर बांधून पूर्ण केलं.
१६ मग इस्राएली लोक, याजक, लेवी+ आणि बंदिवासातून आलेले इतर लोक या सर्वांनी देवाच्या मंदिराचं आनंदाने उद्घाटन* केलं. १७ आणि त्यांनी देवाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी १०० बैल, २०० मेंढे, ४०० कोकरं; तसंच, सर्व इस्राएली लोकांसाठी पापार्पण म्हणून इस्राएलच्या १२ वंशांप्रमाणे १२ बकरेही दिले.+ १८ मग त्यांनी यरुशलेममध्ये देवाच्या सेवेसाठी, मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे,+ याजकांना आणि लेव्यांना आपापल्या गटांत नेमलं.+
१९ त्यानंतर, बंदिवासातून आलेल्यांनी पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी वल्हांडणाचा सण साजरा केला.+ २० याजक आणि लेवी यांपैकी प्रत्येकाने स्वतःचं शुद्धीकरण केलं असल्यामुळे,+ ते सर्व शुद्ध होते. मग त्यांनी बंदिवासातून आलेल्यांसाठी, सोबतच्या याजकांसाठी आणि स्वतःसाठी वल्हांडणाचा कोकरा कापला. २१ तेव्हा बंदिवासातून परत आलेल्या इस्राएली लोकांनी; तसंच जे इस्राएलचा देव यहोवा याची उपासना करण्यासाठी* आसपासच्या देशांच्या अशुद्धतेपासून स्वतःला वेगळं करून इस्राएली लोकांना येऊन मिळाले होते, त्या सर्वांनी वल्हांडणाच्या कोकऱ्याचं मांस खाल्लं.+ २२ यहोवाने अश्शूरच्या राजाचं मन इस्राएली लोकांच्या बाजूने वळवलं+ आणि राजाने त्यांना इस्राएलच्या देवाचं, म्हणजे खऱ्या देवाचं मंदिर बांधण्याच्या कामात मदत केली.* म्हणून त्यांनी मोठ्या उत्साहाने सात दिवस बेखमीर* भाकरींचा सण+ साजरा केला. देवाने त्यांच्यासाठी या गोष्टी केल्यामुळे त्यांना आनंद झाला होता.