यहेज्केल
४० आमच्या बंदिवासाच्या २५ व्या वर्षी,+ म्हणजे यरुशलेम शहराचा नाश झाल्यावर १४ व्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी+ यहोवाची शक्ती माझ्यावर कार्य करू लागली, आणि तो मला यरुशलेममध्ये घेऊन गेला.+ २ दृष्टान्तात देवाने मला इस्राएल देशात आणून एका अतिशय उंच डोंगरावर उभं केलं.+ त्या डोंगरावर दक्षिणेकडे मला शहरासारखं काहीतरी दिसलं.
३ त्याने मला तिथे आणलं, तेव्हा मला एक माणूस दिसला. त्याचं स्वरूप तांब्यासारखं चकाकत होतं.+ त्याच्या हातात जवसाची एक दोरी आणि मोजमापाची एक काठी* होती.+ आणि तो प्रवेशद्वाराजवळ उभा होता. ४ तो माणूस मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला! मी तुला दाखवीन ते सगळं लक्षपूर्वक बघ. मी सांगीन ते सगळं कान देऊन ऐक आणि त्याकडे लक्ष दे. कारण त्यासाठीच तुला इथे आणण्यात आलंय. आणि तू पाहशील त्या सगळ्या गोष्टी इस्राएलच्या घराण्याला जाऊन सांग.”+
५ मी पाहिलं की मंदिराच्या* चारही बाजूंना एक भिंत होती. आणि त्या माणसाच्या हातात मोजमाप करायची सहा हात लांबीची एक काठी होती (प्रत्येक हाताच्या लांबीत चार बोटं माप जोडण्यात आलं होतं).* मग तो माणूस भिंतीचं मोजमाप घेऊ लागला; भिंतीची जाडी एक काठी आणि उंची एक काठी होती.
६ मग तो, पूर्वेकडे तोंड असलेल्या प्रवेश-इमारतीकडे आला+ आणि पायऱ्या चढून वर गेला. त्याने इमारतीच्या प्रवेशाच्या उंबरठ्याचं माप घेतलं; त्याची रुंदी एक काठी होती. इमारतीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या प्रवेशाच्या उंबरठ्याची रुंदीही एक काठीच होती. ७ पहारेकऱ्याच्या प्रत्येक खोलीची लांबी एक काठी आणि रुंदी एक काठी होती. आणि दोन खोल्यांमध्ये पाच हातांचं अंतर होतं.+ इमारतीच्या ज्या भागाचं तोंड मंदिराकडे होतं त्याच्या उंबरठ्याचं, म्हणजे द्वारमंडपाच्या उंबरठ्याचं माप एक काठी इतकं होतं.
८ त्याने मंदिराकडे तोंड असलेल्या द्वारमंडपाचं माप घेतलं; ते एक काठी इतकं होतं. ९ मग त्याने द्वारमंडपाचं माप घेतलं आणि ते आठ हात इतकं होतं. तसंच, त्याने दोन्ही बाजूच्या स्तंभांचंही माप घेतलं; ते दोन हात इतकं होतं. आणि द्वारमंडपाचं तोंड मंदिराकडे होतं.
१० पूर्वेकडच्या या प्रवेश-इमारतीत दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांच्या तीन-तीन खोल्या असून त्या एकाच मापाच्या होत्या. तसंच, दोन्ही बाजूंच्या स्तंभांचं मापही सारखंच होतं.
११ मग त्याने त्या इमारतीच्या प्रवेशाची रुंदी मोजली; ती १० हात होती, आणि त्याची लांबी १३ हात होती.
१२ इमारतीच्या आत दोन्ही बाजूला असलेल्या पहारेकऱ्यांच्या प्रत्येक खोलीपुढे, छोटी भिंत बांधलेली एक हाताची जागा होती. पहारेकऱ्यांची प्रत्येक खोली सहा हात होती.
१३ मग त्याने प्रवेश-इमारतीचं माप घेतलं; ते २५ हात रुंद होतं. त्याने हे माप, पहारेकऱ्याच्या एका खोलीच्या छतापासून* समोर असलेल्या दुसऱ्या खोलीच्या छतापर्यंत घेतलं; खोल्यांचे प्रवेश समोरासमोर होते.+ १४ त्यानंतर त्याने स्तंभांचं माप घेतलं. त्यांची उंची ६० हात होती. शिवाय, त्याने अंगणातल्या बाकीच्या प्रवेश-इमारतींच्या स्तंभांचंही माप घेतलं. १५ त्या इमारतीच्या प्रवेशापासून मंदिराकडे तोंड असलेल्या द्वारमंडपाच्या समोरच्या भागापर्यंतची लांबी ५० हात होती.
१६ पहारेकऱ्यांच्या खोल्यांना, तसंच प्रवेश-इमारतीत त्यांच्या बाजूला असलेल्या प्रत्येक स्तंभाला खिडक्या होत्या;+ त्या आतून बाहेर निमुळत्या आकाराच्या होत्या. द्वारमंडपाच्या आत दोन्ही बाजूंनाही खिडक्या होत्या आणि त्याच्या बाजूच्या स्तंभांवर खजुराच्या झाडाच्या आकृत्या होत्या.+
१७ मग तो मला मंदिराच्या बाहेरच्या अंगणात घेऊन आला. तेव्हा मी पाहिलं, की अंगणाच्या चारही बाजूंना फरसबंदी* असून त्यांवर जेवणाच्या एकूण ३० खोल्या* होत्या.+ १८ प्रवेश-इमारतींना लागून असलेल्या फरसबंदीची रुंदी ही इमारतींच्या लांबीइतकीच होती; ही खालची फरसबंदी होती.
१९ मग त्याने खालच्या प्रवेश-इमारतीपासून आतल्या अंगणाकडे जाणाऱ्या प्रवेश-इमारतीपर्यंतचं अंतर मोजलं. ते १०० हात इतकं होतं; पूर्वेकडच्या आणि उत्तरेकडच्या प्रवेश-इमारतींपासूनही तितकंच अंतर होतं.
२० बाहेरच्या अंगणात उत्तरेकडे आणखी एक प्रवेश-इमारत असून तिचं तोंड उत्तरेकडे होतं. त्याने तिचीसुद्धा लांबी आणि रुंदी मोजली. २१ त्या इमारतीत दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांच्या तीन-तीन खोल्या होत्या. इमारतीच्या स्तंभांचं आणि द्वारमंडपाचं मोजमाप पहिल्या प्रवेश-इमारतीइतकंच होतं. ती इमारत ५० हात लांब आणि २५ हात रुंद होती. २२ तिच्या खिडक्यांचं, द्वारमंडपाचं आणि खजुराच्या झाडाच्या आकृत्यांचं+ मापही पूर्वेकडच्या प्रवेश-इमारतीसारखंच होतं. लोक जेव्हा सात पायऱ्या चढून इमारतीत प्रवेश करायचे, तेव्हा त्यांना समोर इमारतीचा द्वारमंडप दिसायचा.
२३ उत्तरेकडच्या आणि पूर्वेकडच्या प्रवेश-इमारतींसमोर आतल्या अंगणात एकेक प्रवेश-इमारत होती. त्याने समोरासमोर असलेल्या इमारतींमधलं अंतर मोजलं आणि ते १०० हात इतकं होतं.
२४ नंतर तो मला दक्षिणेकडे घेऊन आला. तिथे मला दक्षिणेकडे तोंड असलेली एक प्रवेश-इमारत दिसली.+ त्याने तिच्या स्तंभांचं आणि द्वारमंडपाचं मोजमाप घेतलं; ते बाकीच्या इमारतींइतकंच होतं. २५ त्या इमारतीच्या दोन्ही बाजूंना आणि द्वारमंडपाला असलेल्या खिडक्या या इतर इमारतींच्या खिडक्यांसारख्याच होत्या. ती इमारत ५० हात लांब आणि २५ हात रुंद होती. २६ लोक जेव्हा सात पायऱ्या चढून त्या इमारतीत प्रवेश करायचे,+ तेव्हा त्यांना समोर इमारतीचा द्वारमंडप दिसायचा. इमारतीच्या स्तंभांवर दोन्ही बाजूंना खजुराच्या झाडाच्या आकृत्या होत्या.
२७ आतल्या अंगणात दक्षिणेकडे एक प्रवेश-इमारत होती; त्याने त्या इमारतीपासून दक्षिणेकडे असलेल्या दुसऱ्या प्रवेश-इमारतीपर्यंतचं अंतर मोजलं; ते १०० हात इतकं होतं. २८ नंतर त्याने मला दक्षिणेकडच्या प्रवेश-इमारतीमधून आतल्या अंगणात आणलं. आणि त्याने त्या इमारतीचं मोजमाप घेतलं; ते बाकीच्या इमारतींइतकंच होतं. २९ तिच्यात असलेल्या पहारेकऱ्यांच्या खोल्यांचं, तिच्या स्तंभांचं आणि द्वारमंडपाचं मोजमाप इतर प्रवेश-इमारतींइतकंच होतं. तिच्या दोन्ही बाजूंना आणि द्वारमंडपाला खिडक्या होत्या. ती इमारत ५० हात लांब आणि २५ हात रुंद होती.+ ३० तिथे सभोवती द्वारमंडप होते; त्यांची लांबी २५ हात आणि रुंदी ५ हात होती. ३१ त्या इमारतीच्या द्वारमंडपाचं तोंड बाहेरच्या अंगणाकडे होतं. तिच्या बाजूच्या स्तंभांवर खजुराच्या झाडाच्या आकृत्या असून,+ इमारतीत जायला आठ पायऱ्या चढाव्या लागायच्या.+
३२ नंतर त्याने मला पूर्वेकडच्या प्रवेश-इमारतीमधून आतल्या अंगणात आणलं, आणि त्या इमारतीचंही मोजमाप घेतलं; ते इतर इमारतींइतकंच होतं. ३३ तिच्यात असलेल्या पहारेकऱ्यांच्या खोल्यांचं, तिच्या स्तंभांचं आणि द्वारमंडपाचं मोजमाप इतर प्रवेश-इमारतींइतकंच होतं. तिच्या दोन्ही बाजूंना आणि द्वारमंडपाला खिडक्या होत्या. ती इमारत ५० हात लांब आणि २५ हात रुंद होती. ३४ त्या इमारतीच्या द्वारमंडपाचं तोंड बाहेरच्या अंगणाकडे होतं. तिच्या दोन्ही बाजूच्या स्तंभांवर खजुराच्या झाडाच्या आकृत्या असून, इमारतीत जायला आठ पायऱ्या चढाव्या लागायच्या.
३५ नंतर त्याने मला उत्तरेकडच्या प्रवेश-इमारतीमध्ये आणलं+ आणि त्या इमारतीचंही मोजमाप घेतलं; ते इतर इमारतींइतकंच होतं. ३६ तिच्यात असलेल्या पहारेकऱ्यांच्या खोल्यांचं, तिच्या स्तंभांचं आणि द्वारमंडपाचं मोजमाप इतर प्रवेश-इमारतींइतकंच होतं. तिच्या दोन्ही बाजूंना खिडक्या होत्या. ती इमारत ५० हात लांब आणि २५ हात रुंद होती. ३७ तिचे बाजूचे दोन्ही स्तंभ बाहेरच्या अंगणाच्या दिशेला होते. त्यांवर खजुराच्या झाडाच्या आकृत्या असून, इमारतीत जायला आठ पायऱ्या चढाव्या लागायच्या.
३८ प्रवेश-इमारतींच्या बाजूच्या स्तंभांजवळ प्रवेशद्वार असलेली एक जेवणाची खोली होती. तिथे होमार्पणाची बलिदानं धुतली जायची.+
३९ प्रवेश-इमारतीच्या द्वारमंडपात दोन्ही बाजूंना दोन-दोन मेजं होती. त्यांवर होमार्पणांचे,+ पापार्पणांचे+ आणि दोषार्पणांचे प्राणी कापले जायचे.+ ४० उत्तरेकडच्या प्रवेश-इमारतीत वर चढून जाताना प्रवेशाबाहेर मेजं होती. द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंना दोन-दोन मेजं होती. ४१ त्या इमारतीच्या प्रत्येक बाजूला चार मेजं, अशी एकूण आठ मेजं होती. त्यांवर बलिदानाचे प्राणी कापले जायचे. ४२ होमार्पणासाठी असलेली मेजं घडवलेल्या दगडांची होती. त्यांची लांबी, रुंदी आणि उंची दीड-दीड हात होती. त्या मेजांवर होमार्पणांसाठी आणि बलिदानांसाठी वापरली जाणारी हत्यारं ठेवली जायची. ४३ वस्तू ठेवायला आतल्या भिंतींवर सगळीकडे चार बोटं रुंदीचे कप्पे बनवलेले होते; आणि भेट म्हणून आणलेल्या अर्पणांचं मांस मेजांवर ठेवलं जायचं.
४४ मंदिराच्या आतल्या अंगणात असलेल्या या इमारतीच्या बाहेर गायकांसाठी जेवणाच्या खोल्या होत्या.+ त्या उत्तरेकडच्या प्रवेश-इमारतीजवळ असून त्यांचं तोंड दक्षिणेकडे होतं. याशिवाय, पूर्वेकडच्या प्रवेश-इमारतीजवळही एक जेवणाची खोली होती, आणि तिचं तोंड उत्तरेकडे होतं.
४५ मग तो मला म्हणाला: “दक्षिणेकडे तोंड असलेली ही जेवणाची खोली, मंदिरातल्या सेवांसाठी जबाबदार असलेल्या याजकांकरता आहे.+ ४६ आणि उत्तरेकडे तोंड असलेली जेवणाची खोली, वेदीजवळ सेवा करायची जबाबदारी असलेल्या याजकांसाठी आहे.+ हे सादोकचे वंशज आहेत;+ ते लेवी घराण्यातले असून त्यांना यहोवाची सेवा करण्यासाठी त्याच्यासमोर जायला नेमलंय.”+
४७ त्यानंतर त्याने आतल्या अंगणाचं माप घेतलं. ते १०० हात लांब व १०० हात रुंद असून चौकोनी होतं. आणि वेदी मंदिराच्या समोर होती.
४८ मग त्याने मला मंदिराच्या द्वारमंडपात आणलं,+ आणि द्वारमंडपाच्या प्रवेशात डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या दोन स्तंभांचं माप घेतलं. ते स्तंभ प्रत्येकी पाच हात लांब आणि तीन हात रुंद होते.
४९ तो द्वारमंडप २० हात लांब आणि ११* हात रुंद होता. तिथे जायला लोकांना पायऱ्या चढाव्या लागायच्या. द्वारमंडपाच्या दोन्ही स्तंभांच्या बाजूला आणखी दोन खांब होते.+