गलतीकर यांना पत्र
१ जो माणसांकडून किंवा कोणत्याही मानवाद्वारे नाही, तर येशू ख्रिस्ताद्वारे+ आणि ज्या देवपित्याने+ त्याला मेलेल्यांतून उठवलं त्याच्याद्वारे प्रेषित झाला, तो मी पौल, २ आणि माझ्यासोबत असलेले सगळे बांधव यांच्याकडून गलतीयातल्या मंडळ्यांना:
३ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू, त्यांची अपार कृपा आणि शांती तुमच्यावर असो. ४ ख्रिस्ताने सध्याच्या जगाच्या दुष्ट व्यवस्थेपासून* आपली सुटका व्हावी,+ म्हणून आपल्या पापांसाठी स्वतःला दिलं.+ हे आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे झालं.+ ५ त्याला सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन.
६ ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या अपार कृपेने बोलावलं, त्याच्याकडे इतक्या लवकर पाठ फिरवून* तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या आनंदाच्या संदेशाकडे वळत आहात, याचं मला नवल वाटतं.+ ७ खरंतर, दुसरा कोणताच आनंदाचा संदेश नाही. पण, काही जण तुमची दिशाभूल करायचा+ आणि ख्रिस्ताबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशात फेरफार करायचा प्रयत्न करत आहेत. ८ पण आम्ही तुम्हाला घोषित केलेल्या आनंदाच्या संदेशाशिवाय, आम्ही स्वतः किंवा एखाद्या स्वर्गदूतानेही तुम्हाला आनंदाचा संदेश म्हणून दुसरं काही सांगितलं, तर तो शापित ठरो. ९ आम्ही पूर्वी म्हटल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा म्हणतो, तुम्ही स्वीकारलेल्या आनंदाच्या संदेशाशिवाय, जर कोणी वेगळाच आनंदाचा संदेश सांगत असेल, तर तो शापित ठरो.
१० मी कोणाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे, माणसांचं की देवाचं? मी माणसांना खूश करायचा प्रयत्न करत आहे का? जर मी अजूनही माणसांना खूश करत असेन, तर मग मी ख्रिस्ताचा दास नाही. ११ कारण बांधवांनो, मी तुम्हाला घोषित केलेला आनंदाचा संदेश माणसांकडून नाही,+ हे तुम्ही समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. १२ कारण हा संदेश मला कोणा माणसाकडून मिळाला नाही आणि कोणी मला तो शिकवलाही नाही, तर स्वतः येशू ख्रिस्ताने तो मला प्रकट केला.
१३ पूर्वी यहुदी धर्मात असताना मी कसा वागलो याबद्दल तर तुम्ही ऐकलंच आहे.+ मी देवाच्या मंडळीचा खूप* छळ केला आणि तिचं भरपूर नुकसान केलं.+ १४ आणि माझ्या राष्ट्रातल्या माझ्याच वयाच्या इतर बऱ्याच जणांपेक्षा मी यहुदी धर्मात पुष्कळ प्रगती करत होतो. कारण माझ्या वाडवडिलांच्या रूढीपरंपरांबद्दल मी खूप आवेशी होतो.+ १५ पण ज्या देवाने मला माझ्या आईच्या पोटी जन्माला घातलं आणि त्याच्या अपार कृपेद्वारे मला बोलावलं,+ त्याला हे योग्य वाटलं, १६ की माझ्याद्वारे आपल्या मुलाला प्रकट करावं. हे यासाठी की मी विदेश्यांना त्याच्याबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करावा.+ त्याने मला या कार्यासाठी निवडलं, तेव्हा मी लगेच कोणा माणसाकडे* याबद्दल सल्ला घ्यायला गेलो नाही. १७ तसंच, जे माझ्याआधी प्रेषित होते त्यांच्याकडे मी यरुशलेमलाही गेलो नाही, तर मी अरबस्तानात गेलो आणि त्यानंतर दिमिष्कला परतलो.+
१८ मग तीन वर्षांनंतर मी केफाला*+ भेटायला यरुशलेमला गेलो+ आणि त्याच्याजवळ १५ दिवस राहिलो. १९ पण, मी प्रेषितांपैकी दुसऱ्या कोणालाही भेटलो नाही, फक्त प्रभूचा भाऊ याकोब+ यालाच भेटलो. २० आता, ज्या गोष्टी मी तुम्हाला लिहीत आहे, त्यांविषयी मी देवासमोर तुम्हाला ही खातरी देतो, की त्या अगदी खऱ्या आहेत.
२१ त्यानंतर मी सीरियाच्या आणि किलिकियाच्या प्रदेशांत गेलो.+ २२ पण ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या यहूदीयातल्या मंडळ्यांसाठी मी अनोळखी होतो. २३ त्यांनी माझ्याबद्दल फक्त इतकंच ऐकलं होतं, की “जो माणूस आधी आपला छळ करायचा,+ तो आता त्याच विश्वासाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत आहे, ज्याचं पूर्वी त्याने पुष्कळ नुकसान केलं.”+ २४ अशा रितीने, ते माझ्यामुळे देवाचा गौरव करू लागले.