निर्गम
१४ मग यहोवा मोशेला म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग की त्यांनी परत फिरून पीहहिरोथ याच्यापुढे, मिग्दोल आणि समुद्र यांच्या मध्ये तळ द्यावा.+ त्यांनी बालसफोनसमोर समुद्राच्या दिशेने तळ द्यावा. ३ मग फारो त्यांच्याबद्दल असं म्हणेल, ‘ते ओसाड रानात अडकले आहेत आणि गोंधळून इकडेतिकडे भटकत आहेत.’ ४ मी फारोचं मन कठोर होऊ देईन,+ आणि तो त्यांचा पाठलाग करेल. मग मी फारो आणि त्याच्या सगळ्या सैन्याकडून माझा गौरव करून घेईन.+ तेव्हा इजिप्तच्या लोकांना कळेल, की मी यहोवा आहे.”+ इस्राएली लोकांनी तसंच केलं.
५ नंतर, इस्राएली लोक निघून गेल्याची बातमी इजिप्तचा राजा फारो याला मिळाली. तेव्हा लगेच त्याचं आणि त्याच्या सेवकांचं मन बदललं+ आणि ते म्हणाले: “आपण हे काय केलं? आपली गुलामगिरी करणाऱ्या इस्राएली लोकांना आपण का जाऊ दिलं?” ६ म्हणून फारोने आपले युद्धाचे रथ तयार केले आणि आपल्या लोकांना सोबत घेतलं.+ ७ त्याने सर्वात चांगले असे ६०० रथ, तसंच इजिप्तमधले इतर सर्व रथ घेतले आणि प्रत्येक रथावर योद्धे होते. ८ अशा रितीने यहोवाने इजिप्तचा राजा फारो याचं मन कठोर होऊ दिलं आणि इस्राएली लोक निर्भयपणे* देशातून जात असताना,+ तो त्यांचा पाठलाग करायला निघाला. ९ इस्राएली लोकांनी समुद्राजवळ बालसफोनसमोर पीहहिरोथ इथे तळ दिला होता. तेव्हा इजिप्तचे लोक म्हणजेच फारोचे सर्व रथ, घोडेस्वार आणि सैनिक, इस्राएली लोकांचा पाठलाग करत त्यांच्या जवळ येऊन पोहोचले.+
१० मग फारो आणखी जवळ आला, तेव्हा इस्राएली लोकांनी समोर पाहिलं आणि इजिप्तचे लोक आपला पाठलाग करत आहेत असं त्यांना दिसलं. हे पाहून इस्राएली लोकांना खूप भीती वाटली आणि ते यहोवाकडे मदतीची याचना करू लागले.+ ११ ते मोशेला म्हणाले: “आम्हाला इथे ओसाड रानात मरायला का घेऊन आलास? इजिप्तमध्ये काय आम्हाला पुरायला जागा नव्हती?+ का आणलंस तू आम्हाला इजिप्तमधून बाहेर? १२ इजिप्तमध्ये असतानाच आम्ही तुला म्हणालो होतो, ‘उगाच मध्ये पडू नकोस. आम्हाला इजिप्तच्या लोकांची गुलामी करू दे.’ कारण ओसाड रानात मरण्यापेक्षा आम्ही इजिप्तच्या लोकांची गुलामी केलेली बरी!”+ १३ मग मोशे लोकांना म्हणाला: “घाबरू नका.+ स्थिर उभे राहा आणि आज यहोवा तुम्हाला कसं वाचवतो,* ते पाहा.+ ज्या इजिप्तच्या लोकांना तुम्ही आज पाहत आहात, ते तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाहीत.+ १४ यहोवा स्वतः तुमच्यासाठी लढेल;+ तुम्ही मात्र शांत राहा.”
१५ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू का सारखा मला मदतीची याचना करत आहेस? इस्राएली लोकांना तळ हलवायला सांग. १६ तू आपली काठी घेऊन समुद्रावर हात उगार आणि त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्राएली लोक समुद्रामध्ये सुक्या जमिनीवरून चालत जाऊ शकतील. १७ मी इजिप्तच्या लोकांचं मन कठोर होऊ दिलंय, म्हणून ते त्यांच्या मागोमाग जातील. अशा रितीने, फारो आणि त्याचं सगळं सैन्य, युद्धाचे रथ आणि घोडेस्वार यांच्याकडून मी माझा गौरव करून घेईन.+ १८ जेव्हा फारो आणि त्याचं सगळं सैन्य, युद्धाचे रथ आणि घोडेस्वार यांच्याकडून मी माझा गौरव करून घेईन, तेव्हा त्यांना कळेल की मी यहोवा आहे.”+
१९ मग इस्राएली लोकांच्या पुढे जात असलेला खऱ्या देवाचा दूत+ त्यांच्या मागे गेला. तसंच त्यांच्यासमोर असलेला ढगाचा खांबही त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला.+ २० अशा रितीने तो इजिप्तच्या सैन्याच्या आणि इस्राएली लोकांच्या मध्ये आला.+ तेव्हा त्या ढगामुळे एका बाजूला काळोख, तर दुसऱ्या बाजूला रात्र असूनही उजेड पसरला होता.+ त्यामुळे इजिप्तचं सैन्य रात्रभर इस्राएली लोकांच्या जवळ जाऊ शकलं नाही.
२१ मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला+ आणि यहोवाने रात्रभर पूर्वेकडचा जोरदार वारा वाहायला लावून, समुद्राचं पाणी मागे लोटलं. अशा रितीने समुद्रातली जमीन कोरडी झाली+ आणि पाण्याचे दोन भाग झाले.+ २२ तेव्हा इस्राएली लोकांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाण्याच्या भिंती तयार झाल्या+ आणि ते समुद्रामध्ये सुक्या जमिनीवरून चालत गेले.+ २३ मग इजिप्तचे लोक त्यांच्या मागोमाग गेले. फारोचे सर्व घोडे, युद्धाचे रथ आणि घोडेस्वार त्यांच्या मागोमाग समुद्रात जाऊ लागले.+ २४ सकाळच्या प्रहरी* यहोवाने आगीच्या आणि ढगाच्या खांबातून इजिप्तच्या सैन्याकडे पाहिलं+ आणि त्याने त्या सर्वांना गोंधळात टाकलं. २५ तो त्यांच्या रथांची चाकं काढू लागला आणि त्यांना रथ चालवणं कठीण होऊ लागलं. तेव्हा इजिप्तचे लोक म्हणू लागले: “चला, आपण इस्राएली लोकांपासून पळून जाऊ, कारण यहोवा त्यांच्या बाजूने आपल्याशी लढतोय!”+
२६ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे इजिप्तच्या लोकांवर, त्यांच्या युद्धाच्या रथांवर आणि त्यांच्या घोडेस्वारांवर पाणी परत येईल.” २७ तेव्हा मोशेने लगेच आपला हात समुद्रावर उगारला आणि सकाळ होत असताना, समुद्राचं पाणी पहिल्यासारखं झालं. इजिप्तचे लोक पाण्यापासून पळून जाऊ लागले तेव्हा यहोवाने त्यांना समुद्रामध्ये फेकून दिलं.+ २८ इस्राएली लोकांच्या मागे समुद्रात गेलेले फारोचे रथ, त्याचे घोडेस्वार आणि त्याचं सगळं सैन्य यांना परत येणाऱ्या पाण्याने बुडवून टाकलं.+ त्यांच्यापैकी एकही जण जिवंत वाचला नाही!+
२९ पण इस्राएली लोक समुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले+ आणि त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाण्याच्या भिंती तयार झाल्या.+ ३० अशा रितीने, त्या दिवशी यहोवाने इस्राएली लोकांना इजिप्तच्या लोकांच्या हातून सोडवलं+ आणि त्यांनी इजिप्तच्या लोकांना समुद्रकिनाऱ्यावर मेलेलं पाहिलं. ३१ यहोवाने इजिप्तच्या लोकांविरुद्ध आपलं सामर्थ्य* कसं वापरलं हेही इस्राएली लोकांनी पाहिलं आणि ते यहोवाचं भय मानू लागले आणि त्यांनी यहोवावर आणि त्याचा सेवक मोशे याच्यावर विश्वास ठेवला.+