हरार—ज्या शहरात तरस मुक्तपणे वावरत असतात
आमच्या केनियातील खास प्रतिनिधीकडून
केवळ शंभर वर्षांपूर्वी—हरार—हे “भयानक शहर” होते. तथापि १८५४ मध्ये रिचर्ड बर्टन नावाच्या अभ्यासक व संशोधकाने आत प्रवेश मिळवून तेथील शोध घेण्याचे धाडस केले. त्याच्या भक्कम वेशीचा अंदाज घेऊन आपण परत जिवंत बाहेर येऊ का ही शंका मनात डोकावून गेली. बर्टन अगदी चलाखीने, स्वतःस अरब व्यापाऱ्याच्या पेहरावात दडवून आत गेला. अनेक भाषा अवगत असण्याची असामान्य बुद्धी असल्यामुळे शहरातील मुस्लीमात सामावून जाण्याची जोखीम घेतली. युक्ति यशस्वी झाली व तिने बर्टनला पूर्व आफ्रिकेतील या शहराचा पहिला युरोपियन संशोधक बनविले.
आज हरार हे इथिओपियात आहे. बर्टनच्या दिवसासारखी जरी प्रवेशिका तितकीशी साहसी राहिलेली नाही तरी हे शहर अद्यापि पर्यटकांना लुब्ध करणारे व कुतुहुल निर्माण करणारे आहे—कारण, हरार हे शहर, जेथे तरस रात्रीचे मुक्तपणे वावरतात म्हणून प्रसिद्ध आहे.
हरार, आज जरी आधुनिक इमारती तसेच ७०,००० शहरवासीयांनी गजबजलेले स्थळ असले तरी दुहेरी शहर आहे. शहराचा जुना भाग हजारो वर्षे जुना आहे व त्यात काही शतकानंतर अगदी थोडासा बदल झालेला आहे.
जुन्या शहरापाशी आल्यावर व तेथील पुरातन दरवाजे व ते बुरुज पाहताच वाटते की आम्ही कोणत्या तरी वेगळ्याच जगात प्रवेश करीत आहोत. आदीस अबाबा ही इथीओपियाची सध्याची राजधानी वसविण्याआधी हरारला महत्त्व होते. या हरार मधून १६व्या शतकातील “डावखुरा” मुस्लीम लढवय्या, अहमद ग्रन, याने आपले बळ पणास लावून इथिओपिया सर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु त्याचा शेवट त्याच्या मृत्युत झाला. त्यानंतर शहराच्या भव्य वेशी उभारण्यात आल्या व आज चारशे पेक्षा अधीक वर्षे त्या टिकून आहेत.
पूर्वी जसे होते तसे आजही, हरार हे एक वादग्रस्त केंद्र आहे. आज फरक एवढाच की कोणाही छोट्या शहराच्या देवडीतून शांतपणे शहरात प्रवेश करता येतो. आपण आता, शहराच्या अरूंद रस्त्यावरून तसेच वेडीवाकडी वळणे घेणाऱ्या गल्ल्यातून चालत आहोत. दोहोबाजूस माळवदी घरे व काही रंगसफेदी केलेल्या इमारती तशाच मशिदी पण दिसतात.
तरस दृष्टीस पडण्यास अद्याप बराच वेळ आहे. मध्यंतरी आपण गाढवांच्या करामतीची मजा पाहू. जरी ते पूर्वी प्रमाणे मोठ्या संख्येत नाहीत तरी गाढवे अद्यापि हरारच्या रस्त्यावरील वाहतुक नियंत्रण चालवितात व तेही कोणा मानवी मार्गदर्शनाविना चालवितात. ते चढ उताराच्या रस्त्यांना ओलांडून, कोठेही ठेच न खाता, घसरून न पडता, सरळ मार्गी आपली कामे उरकतात. पाठीवर लादलेले पिण्याच्या पाण्याचे बोजे कोठे पोहंचवायचे हे ते बरोबर जाणतात. तेथे जाऊन पोहंचले की कोणीतरी ते उतरून घ्यावे म्हणून ती व्यक्ति येईपर्यंत शांत उभे राहतात व दुसऱ्या फेरीची भांडी नीट बांधीपर्यंत तेथून हलत नाही. होय, अद्याप जुन्या हरार शहरास या प्रकारे पाण्याचा पुरवठा होतो. अलिकडेच आफ्रिकेत जो दुष्काळ पडला होता त्याने या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम केला.
बाजारपेठेत, हरारच्या स्रिया, आमचे लक्ष प्रथम आकर्षित करतील. त्यांचे बोलणे, कपडे आणि इतर पद्धती तेथील पुरातन काळच्या मुस्लीम जगताची आठवण करून देतात. हरारच्या स्त्रिया दिसण्यास फार सुंदर व आकर्षक आहेत. लावण्य, रंगीत कपडे व तपकिरी किंवा नारंगी रंगाच्या शाली ओढलेल्या व सुंदर केश रचना करून, केसांच्या विभाजनांत वेण्या घातलेल्या आढळतील.
घरोघर जाऊन त्या काय विकतात? इथिओपियात चोहोकडे जाऊन पुरातन काळातील ज्या सर्व चिजवस्तु हाती येतात त्या गोळा करून, त्यांची साफ सफाई व दुरुस्ती करून व त्यांचेवर मुलामा किंवा आवरणे चढवून विक्रीस ठेवितात. यांत जर कलाकुसरी केलेली भांडी, थाळ्या, ट्र असल्या तर अधिक चांगला फायदा होतो. वेगवेगळ्या आकारातील, रंग व डिझाइनच्या ट्र, थाळ्या आज मेज व भिंतीना सजविण्यास लोक घेतात. विणकाम चढविलेली भांडी व तबके बाजारात असली तर इथिओपियाची खास खाद्ये भरून विकतात. हरारच्या टोपलीची बनावट तिच्या चांगल्या दर्जाबद्दल जगात चोहोकडे मशहूर आहे.
हरारे मधील चांदीच्या कलाकुसरीची कामे नेत्रदीपक असतात. हार, बांगड्या, पट्टे, शिरोभूषणे, रिंगा वगैरे—सर्व काही अगदी सफाईने बनविले जाते.
आम्हास कळण्याआधी सूर्य अस्तास कलला आहे. सूर्यास्ताच्या किरणात जुन्या शहराचे दर्शन घेण्यास आपण वेशीच्या बाहेरील बाजूला जाऊ. पूर्वीच्या दिवसात, हरारचे रहिवाशी रात्र होताच परदेशीयांना वेशीच्या दरवाजाबाहेर काढून दरवाजा लावून घेत. पण आता आम्हाला शहरात परत प्रवेश मिळाला म्हणून आनंद वाटतो—व तेही हरारचे रात्रीचे खास आकर्षण—तरस—पाहाण्यास.
एका अरूंद वाटेच्या शेवटी उघड्यावर पोहंचताच या अंधाऱ्या रात्री आपल्या डोळ्यांना ताणून आता आम्ही कोणत्या वाटेने पुढे जावे हे पहाण्याच्या शोधात असता, अकस्मात, समोरच्या काळोखात दोन डोळे चकाकतात. आम्ही जागीच थबकतो. समोरच सुमारे १६ फुटांपेक्षाही कमी (५ मि) अंतरावर दोन जंगली तरस उभे आहेत. ही काही पाळीव कुत्री नाहीत. तर ते एकाद्या जंगली रेड्यालाही तोंड देते व मनुष्यावरही हल्ला करते.
पण आम्हास हायसे वाटले—व सुटकेचा निश्वास सोडला की त्यांनी आम्हावर हल्ला केला नाही. तर त्यांनी आपले लक्ष जमिनीवर बसलेल्या एका मनुष्याकडे वळविले. त्याच्या बाजूला टोपलीत मटणाचे, व उरलेल्या भागांचे तुकडे ठेविलेले होते व तो मनुष्य आपल्या हातांनी ते तरसांना भरवीत होता. मग त्याला तरसवाला म्हणतात यात नवल ते काय? तरसांना भरविण्याची ही पद्धत कधीपासून सुरु झाली याची नक्की तारीख जरी ज्ञात नसली तरी ती बराच काळ चालू आहे. हरार मधील तरस सूर्यास्तानंतर जेव्हा आपआपल्या गुहेतून बाहेर पडतात, तरसवाले त्यांना भरविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी, वेशीपाशी तयार असतात. तेथे ही मनुष्ये त्यांच्याजवळचे मांस तसेच हाडे संपेपर्यंत, बहुतेक रात्रीचे नऊ वाजेपर्यंत बसून राहतात.
अंधारात आमचे डोळे स्थिर होईपर्यंत दुसरा तरस हळूंच पुढे सरकला. परत थबकला व विलक्षण आवाजात ओरडला व इतर तरसांना बोलावले. तरसवाला कृत्रिम भाषेत गाऊ लागतो व जंगली जनावरांना हाताने, डोक्याने खुणा करून जवळ बोलावतो. हळूहळू ती पुढे सरकू लागतात व त्या मनुष्याजवळ येऊन बसतात व वाटा मिळण्याची वाट पाहातात. हातात हाडाचा तुकडा घेऊन तो गात असतो व तरसांना त्यांच्या नावानी हाका मारतो—हॉय, हॉय, फिल्लिप ने! म्हणून ओरडतो. फिलिप होकार देतो व उठून पुढे येतो व हळूहळू त्या मनुष्याजवळ जातो. आपला वाटा घेऊन चटकन आपल्याजागी परत जातो. मग तेथे एक “बेबी” असते, छोटेस पिल्लू, जे त्या मनुष्याच्या हाकेस होकार देण्यात काहीच संकोच बाळगत नाही. “बुर्टुकान,” “कनुबीश” आणि इतरही पुढे होतात व त्यांचे बलिष्ठ जबडे त्यांचा घास मिळविण्यास आ वासून उभे राहतात.
कदाचित “बुर्रे” हा या मनुष्याचा आवडता तरस असावा. कारण तो त्याला “माझ्या मुला” म्हणून हाक मारतो. जेव्हा “बुर्रे” तेथे येतो तो मनुष्य आनंदाने ओरडू लागतो, “बुर्रे! हॉय-हॉय, ने.” हा मनुष्य आपला हात तरसाच्या गळयाभोवती टाकत आहे तोच तो त्याच्या हातातील मांसाचा तुकडा हिसकावतो. काही वेळा, तो मनुष्य हाडाचा तुकडा आपल्या समोरच्या दातात धरतो व बुर्रेस ते घेण्यास हांक देतो. बुर्रे त्याला निराश करीत नाही. चटकन त्याच्या तोंडातले हाड हिसकावून आपल्या जागी जाते व आपल्या भक्कम दातांनी हाडाचा चुरा करते.
दूर पल्ल्याचे प्रकाशझोत व मोटारीचे दिवे या दृश्यांना अधीक प्रज्वलीत करीत होते. काही पर्यटक या चित्तवेधक दृश्यांची चित्रे खेचीत होते. तर काही जण तरसवाल्यांना बक्षीस देत होते. हे भाग्य म्हणावे की हा सर्व लख्ख प्रकाश व गर्दीकडे ते सर्व दुर्लक्ष करीत होते. एवढेच नव्हे तर तरसवाले काहींना जवळ बोलावून व त्यांच्या हातात मांसाचे तुकडे देऊन ते तरसांना भरविण्याची मुभा देत होते. आम्ही पण उसने बळ आणून घाबरत घाबरत एक मांसाचा तुकडा समोर धरला तोच एका तरसाने झडप घालून तुकडा पळवला.
रात्री बिछान्यावर पडलो असता तरस चोहोकडे कचरा पेटयांत काही अधिक खाण्यास मिळते हे शोधत असल्याचा आवाज सारखा येत होता. काही वेळा घोडे तसेच गाढवे मरतात तेव्हा त्यांची प्रेते ओढून नेऊन ते मेजवानी साजरी करतात. मग सबंध वातावरण गुरगुरणे, किंचाळया आणि तरसाच्या आवाजाने दुमदुमून जाते. सकाळच्या समयापर्यंत काही हाडांचे छोट छोटे तुकडे इतस्ततः पसरलेले आढळतील. या वेळेपर्यंत तरस आपआपल्या वस्तीकडे—जी हरार पासून फार दूर नाही—परतलेले असणार.
तेथे ते रात्र पडेपर्यंत राहणार जी त्यांना परत त्याच आश्चर्यकारक शहरांकडे परतविणार—हरार, ज्या शहरांत, तरस मुक्तपणे वावरतात.
[पानांवरील संक्षिप्त आशय]
गाढवे अद्यापि हरारच्या रस्त्यावरील वाहतुक नियंत्रण चालवितात, तेही मानवी मार्गदर्शनाविना
[पानांवरील संक्षिप्त आशय]
चकाकणाऱ्या डोळ्यांची जोडी आम्हाकडे टक लावून पाहत होती. आम्ही जागीच थबकलो
[पानांवरील संक्षिप्त आशय]
आम्ही पण उसने बळ आणून, घाबरत घाबरत एक मासांचा तुकडा समोर धरला तोच एका तरसाने झडप घालून तुकडा पळविला