शेवटले भोजन काय आहे?
“शेवटले भोजन” हे ऐकल्यावर तुमच्या मनात काय कल्पना येते? पुष्कळांना मिलान, इटली येथील चित्रकार लिअनार्डो दा विंची (१४५२-१५१९) यांचे सुप्रसिद्ध गिलावचित्र लक्षात येते. खरे तर, कलाकार, लेखक आणि संगीतकार यांच्याकरता कित्येक शतकांपासून शेवटले भोजन हा एक लोकप्रिय विषय ठरला आहे.
परंतु, शेवटले भोजन नेमके काय आहे आणि २१ व्या शतकात राहणाऱ्या लोकांसाठी त्याचे काय महत्त्व आहे? विश्वकोश आणि शब्दकोश यांमधून तुम्हाला कळेल की, शेवटले भोजन याला प्रभूचे भोजन असेही म्हटले जाते आणि हे भोजन येशू ख्रिस्ताने आपल्या बलिदानरूपी मृत्यूआधीच्या सायंकाळी आपल्या प्रेषितांसोबत केले होते. येशूने आपल्या विश्वासू अनुयायांसोबत केलेले हे अखेरचे सांज भोजन असल्यामुळे त्यास शेवटले भोजन असे नाव पडले आहे. शिवाय हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सुरू केल्यामुळे प्रभूचे भोजन हे नाव देखील योग्य आहे.
गेल्या कित्येक शतकांमध्ये, अनेकांनी वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी आपले प्राण अर्पण केले आहेत. काहींच्या मृत्यूमुळे विशिष्ट लोकांना काही काळ लाभ झाला. पण त्यांपैकीचे कोणतेही बलिदानरूपी मृत्यू, कितीही प्रशंसनीय असले तरी, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूइतके महत्त्वपूर्ण नाहीत. शिवाय, मानवजातीच्या क्लेशभरीत इतिहासात कोणत्याही मृत्यूमुळे इतके दूरगामी परिणाम होणार नाहीत. का?
या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्याकरता आणि प्रभूच्या भोजनाचे तुमच्याकरता काय महत्त्व आहे ते पाहण्याकरता पुढचा लेख वाचण्याची आम्ही आपल्याला विनंती करतो.