दगडावर कोरलेला लेख: “कागावचा मुलगा कागाफ याला याव्हे शवियोट याचा शाप लागो”
तुम्हाला माहीत होतं का?
बायबलमध्ये देवाच्या नावाबद्दल जे सांगितलं आहे ते खरं आहे, हे प्राचीन काळातल्या एका कोरीव लेखावरून कसं दिसतं?
जेरुसलेमध्ये बायबल लॅन्ड्स म्यूझियम नावाच्या संग्रहालयात एक शिलालेख आहे. दगडावरचा तो लेख इ.स.पू. ७००-६०० च्या आसपास कोरण्यात आला होता. इस्राएलमधल्या हेब्रोन शहराजवळ असलेल्या एका गुहेत हा दगड सापडला होता. खरंतर, ही गुहा कबर म्हणून वापरली जायची. त्या दगडावर असं लिहिलं आहे: “कागावचा मुलगा कागाफ याला याव्हे शवियोट याचा शाप लागो.” पण या शिलालेखावरून कसं कळतं, की बायबलमध्ये देवाच्या नावाबद्दल जे सांगितलं आहे ते खरं आहे? त्या दगडावर देवाचं नाव यहोवा किंवा याव्हे (YHWH) हे प्राचीन हिब्रू अक्षरांत लिहिलेलं आहे. त्यावरून आपल्याला समजतं, की बायबलच्या काळात हे नाव खूप प्रचलित होतं आणि लोक रोजच्या जीवनात ते वापरायचे. खरंतर, अशा प्रकारच्या इतर गुहांमध्येसुद्धा बरेच शिलालेख सापडले. या गुहांमध्ये लपण्यासाठी किंवा भेटण्यासाठी आलेले लोक सहसा भिंतींवर देवाचं आणि स्वतःचं नाव लिहायचे. त्यांच्या नावांमध्ये बऱ्याचदा देवाचं नावही जोडलेलं असायचं.
दगडावर कोरलेल्या या लेखाबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया इथल्या डॉ. रेचल नेब्युल्सी असं म्हणतात: “या शिलालेखात YHWH हे नाव बऱ्याचदा पाहायला मिळतं. त्यावरून आपल्याला खूप काही कळतं. . . . [बायबलच्या] लिखाणांवरून आणि दगडावरच्या त्या लेखावरून आपल्याला समजतं, की इस्राएल आणि यहूदामधल्या लोकांच्या जीवनात YHWH या व्यक्तीला खूप महत्त्वाचं स्थान होतं.” यावरून बायबल किती खरं आहे हेच दिसून येतं. कारण, बायबलच्या मूळ हिब्रू लिखाणांतसुद्धा, हिब्रू अक्षरांत लिहिलेलं देवाचं नाव YHWH हजारो वेळा दिलं आहे. आणि लोकांच्या स्वतःच्या नावांमध्येही सहसा देवाचं नाव जोडलेलं असायचं.
“याव्हे शवियोट” असे जे शब्द त्या दगडावर कोरले आहेत त्यांचा अर्थ, “सैन्यांचा देव यहोवा,” असा होतो. यावरून कळतं, की बायबलच्या काळात लोक फक्त देवाचं नावच नाही, तर “सैन्यांचा देव यहोवा” हे शब्दही सर्रासपणे वापरायचे. आणि तेच आपल्याला बायबलमध्येही पाहायला मिळतं. बायबलच्या मूळ हिब्रू शास्त्रवचनांमध्ये “सैन्यांचा देव यहोवा,” हे शब्द २८३ वेळा वाचायला मिळतात; खासकरून यशया, यिर्मया आणि जखऱ्या या पुस्तकांमध्ये.