८-१४ फेब्रुवारी, २०२७
गीत १४४ नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!
“न दिसणाऱ्या गोष्टींकडे” लक्ष लावा
“आपण मात्र दिसत असलेल्या गोष्टींकडे नाही, तर न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावतो.”—२ करिंथ. ४:१८.
या लेखात:
यहोवाच्या अभिवचनांवर मजबूत विश्वास असल्यामुळे आपल्याला आज कसा फायदा होतो ते पाहू या.
१-२. पहिल्या शतकातल्या भाऊबहिणींना “न दिसणाऱ्या गोष्टींवर” लक्ष लावल्यामुळे कसा फायदा होणार होता? (२ करिंथकर ४:१८)
प्रेषित पौलने पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना न दिसणाऱ्या गोष्टींवर लक्ष लावायला सांगितलं. (२ करिंथकर ४:१८ वाचा.) पण जी गोष्ट दिसत नाही तिच्यावर लक्ष लावणं आपल्याला अशक्य वाटू शकतं. मग पौलच्या शब्दांचा काय अर्थ होता?
२ पहिल्या शतकातले भाऊबहीण वाईट परिस्थितीतून जात होते. पौलने म्हटलं, की त्यांच्यावर “सगळ्या बाजूंनी दबाव” होता, ते “गोंधळलेले होते” आणि त्यांचा “छळ” होत होता. (२ करिंथ. ४:८, ९) असं असलं तरी पौलने त्यांना “दिसणाऱ्या गोष्टींकडे” म्हणजे परीक्षांकडे नाही, तर “न दिसणाऱ्या गोष्टींकडे” म्हणजेच त्यांच्या आशेकडे लक्ष लावायचं प्रोत्साहन दिलं. यामुळे त्या भाऊबहिणींना दोन फायदे होणार होते. पहिला, त्यांना त्यांच्या परिस्थितीचा आणखी चांगल्या प्रकारे सामना करता येणार होता. आणि दुसरा त्यांना योग्य निर्णय घेता येणार होते. यामुळे यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास आहे हे दिसून येणार होतं.—इब्री ११:१.
३. आपण नवीन जगावर लक्ष का लावलं पाहिजे?
३ आज आपलीही परिस्थिती त्यांच्यासारखीच आहे. आपल्यालाही दररोज वेगवेगळ्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं. कधीकधी आपण यांत इतकं गुरफटून जाऊ शकतो, की नवीन जगाची आशा धूसर होऊ शकते. (स्तो. ३७:१०, ११) म्हणून आपण सध्या नवीन जग पाहू शकत नसलो तरी त्याकडे लक्ष लावणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्या समस्या कितीही कठीण असल्या, मोठ्या वाटत असल्या तरी त्या तात्पुरत्या आहेत हे आपण कधीच विसरणार नाही.—२ करिंथ. ४:१७.
४. यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्यामुळे आज आपल्याला योग्य निर्णय घेता येतात, असं आपण का म्हणू शकतो? उदाहरण द्या.
४ आपण नवीन जगाकडे लक्ष लावलं, तर आपल्याला आज योग्य निर्णय घेता येतील. (यहू. २१) एका उदाहरणाचा विचार करा. एक गरोदर स्त्री, आई झाल्यावर आपलं जीवन कसं असेल याचा सहसा विचार करत असते. पण ती फक्त विचार करत बसत नाही. तर आपलं बाळ सुदृढ राहावं, आपली तब्येत चांगली राहावी यासाठी काही पावलंही उचलते. त्याचप्रमाणे आपणही नवीन जगात आपलं जीवन कसं असेल याचा सहसा विचार करतो. पण आपण फक्त विचार करत बसत नाही. याउलट तिथे जायला आपण आजच योग्य निर्णयसुद्धा घेतो. असं केल्यामुळे आपला यहोवाच्या अभिवचनांवर मजबूत विश्वास आहे हे आपण दाखवतो. आता आपण बायबलमधल्या देवाच्या काही सेवकांची उदाहरणं पाहू. यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा असल्यामुळे त्यांना योग्य निर्णय कसे घेता आले हे आपण पाहू. तसंच, आपल्यालाही योग्य निर्णय कसे घेता येतील आणि धीराने समस्यांचा सामना कसा करता येईल याचाही आपण विचार करू.
विश्वासामुळे अब्राहामला आज्ञा पाळता आली
५-६. (क) यहोवाने अब्राहामला काय वचन दिलं? (ख) यहोवाच्या वचनावर विश्वास असल्यामुळे त्यांना योग्य निर्णय घ्यायला कशी मदत झाली? (उत्पत्ती १७:१, २, ६) (चित्रसुद्धा पाहा.)
५ यहोवाने अब्राहामला असं वचन दिलं, की मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र बनवीन. यामुळे अब्राहामचं जीवनच बदलणार होतं. (उत्प. १२:२) त्या वेळी अब्राहाम आणि सारा यांचं वय झालं होतं आणि त्यांना मूलबाळ नव्हतं. पण यहोवाने दिलेलं वचन तो नक्की पूर्ण करेल यावर त्यांचा पक्का विश्वास होता. आणि त्यांनी आपल्या निर्णयांवरून हे दाखवून दिलं. यहोवाने त्यांना म्हटलं होतं, “तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या वडिलांचं घर सोडून, मी दाखवीन त्या देशात जा.” आणि त्यांनी तसंच केलं.—उत्प. १२:१.
६ पण यासाठी त्यांना ऊर देशातलं आपलं घरदार आणि आरामदायी जीवन सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भटकावं लागणार होतं आणि तंबूंमध्ये राहावं लागणार होतं. (इब्री ११:८, ९) मग इतका मोठा निर्णय ते कसा घेऊ शकले? कारण त्यांना माहीत होतं, की यहोवा त्यांच्या मुलाद्वारे एक मोठं राष्ट्र बनवणार आहे. त्यांचं लक्ष या न दिसणाऱ्या गोष्टीकडे होतं. (उत्पत्ती १७:१, २, ६ वाचा; इब्री ११:११) ऊरमध्ये दिसणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी जितक्या खऱ्या होत्या, तितकंच यहोवाने दिलेलं वचनही त्यांच्यासाठी खरं होतं. काही काळाने त्यांना इसहाक झाला, तेव्हा यहोवाचं अभिवचन पूर्ण व्हायला सुरुवात झाली.
अब्राहाम आणि साराचं लक्ष न दिसणाऱ्या गोष्टींवर होतं म्हणून ते मोठमोठे त्याग करू शकले (परिच्छेद ५-६ पाहा)
७-८. अब्राहाम इसहाकचं बलिदान द्यायला का तयार झाला?
७ इसहाक जवळपास २५ वर्षांचा असताना, यहोवाने अब्राहामला त्याचं बलिदान द्यायला सांगितलं. अब्राहाम ही आज्ञा पाळायला तयार झाला. कारण त्याचा न दिसणाऱ्या गोष्टीवर मजबूत विश्वास होता. म्हणजेच ‘त्याची संतती इसहाकपासून येईल’ या यहोवाच्या अभिवचनावर त्याचा विश्वास होता. (उत्प. २१:१२) त्या वेळी इसहाकला मुलं नसली, तरी देव त्याला “मेलेल्यांतूनही उठवायला समर्थ आहे, असा निष्कर्ष [अब्राहामने] काढला.” (इब्री ११:१९) एक विशेष गोष्ट म्हणजे, तोपर्यंत कोणाचंही पुनरुत्थान झालं नव्हतं. तरीसुद्धा अब्राहामने यहोवाच्या शब्दांवर विश्वास असल्याचं दाखवलं. त्याच्यासाठी ते शब्द इतके खरे होते, की त्याच्या नजरेत इसहाकला मुलं झालीच होती.
८ अब्राहाम इसहाकचं अर्पण देणारच होता तेवढ्यात यहोवाने त्याला थांबवलं. (उत्प. २२:११, १२) पण त्याच्या नजरेत अब्राहामने ते अर्पण दिलंच होतं. (इब्री ११:१७, १८) यहोवाने दिलेलं वचन आता पूर्ण होताना दिसत नसलं, तरी ते भविष्यात नक्की पूर्ण होईल यावर पूर्ण विश्वास असल्याचं अब्राहामने आपल्या निर्णयांवरून दाखवून दिलं.
विश्वासामुळे मोशेला योग्य निर्णय घेता आले
९. (क) मोशे लहान होता तेव्हा इस्राएली लोकांची परिस्थिती कशी होती? (ख) मोशे कशा वातावरणात वाढला होता?
९ यहोवाने अब्राहामला दिलेल्या वचनांबद्दल मोशेच्या आईवडिलांनी लहानपणी त्याला नक्कीच सांगितलं असेल. यहोवाने अब्राहामला असंही वचन दिलं होतं, की तो अब्राहामच्या संततीला कनान देश कायमचा वारसा म्हणून देईल. (उत्प. १३:१५) पण हे कसं शक्य होणार होतं? कारण अब्राहामचे वंशज, म्हणजेच इस्राएली लोक इजिप्त देशात गुलामगिरीत होते. पण त्यांना सोडवणाऱ्या मोशेला त्यांच्यासारखं हलाखीचं जीवन जगावं लागलं नव्हतं. कारण तो तर लहानपणापासून फारोच्या मुलीच्या घरात वाढला होता. आणि त्याला “इजिप्तच्या लोकांच्या सगळ्या विद्यांचं शिक्षण मिळालं” होतं. (प्रे. कार्यं ७:२२) असं असलं तरी, मोशे त्याला लहानपणी शिकवण्यात आलेल्या गोष्टी विसरला नव्हता.
१०. मोशेने कोणता निर्णय घेतला आणि का? (इब्री लोकांना ११:२४-२६) (चित्रसुद्धा पाहा.)
१० इब्री लोकांना ११:२४-२६ वाचा. ४० वर्षांचा असताना मोशेने आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला. “त्याने देवाच्या लोकांसोबत अत्याचार सहन करायचं निवडलं.” तो हा निर्णय का घेऊ शकला? कारण “त्याने आपली नजर प्रतिफळावर केंद्रित केली.” मोशेची नजर न दिसणाऱ्या गोष्टीवर होती. यहोवाने इस्राएली लोकांना कनान देश मिळवून द्यायचं जे अभिवचन दिलं होतं, त्यावर त्याची नजर होती. मोशे हवं तर इजिप्तमध्येच राहून मोठं नाव आणि धनदौलत कमवू शकला असता. पण यहोवाचं वचन पूर्ण करण्यात त्याचा वाटा असणं हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. पुढे यहोवाने त्याला सांगितलं: “तू माझ्या लोकांना, म्हणजे इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणशील.” (निर्ग. ३:१०)
४० वर्षांचा असताना मोशेने आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला. “त्याने देवाच्या लोकांसोबत अत्याचार सहन करायचं निवडलं.” (परिच्छेद १० पाहा)
११. यहोवाची अभिवचनं पूर्ण झाल्यासारखीच आहेत हे बायबलमधल्या इतर लोकांनी कसं दाखवलं? (इब्री लोकांना ११:३९, ४०)
११ बायबलमध्ये अब्राहाम आणि मोशेसारखी इतरही बऱ्याच लोकांची उदाहरणं आहेत. त्यांचा यहोवाच्या वचनांवर मजबूत विश्वास होता. (इब्री ११:३१, ३२) त्यांच्यासाठी जणू यहोवाची अभिवचनं पूर्ण झाल्यासारखीच होती. ते जिवंत असताना त्यांनी सगळीच अभिवचनं पूर्ण होताना पाहिली नसली, तरीसुद्धा नवीन जगात पुनरुत्थान झाल्यावर ते त्यांबद्दल शिकतील. (इब्री लोकांना ११:३९, ४० वाचा.) पण आजही आपण त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकतो. त्यांच्यासारखा मजबूत विश्वास असल्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करायला आणि योग्य निर्णय घ्यायला कशी मदत होऊ शकते, ते आता आपण पाहू या.
विश्वासामुळे आपल्याला समस्यांना तोंड देता येतं
१२. यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्यामुळे आजच्या समस्यांना तोंड द्यायला आपल्याला कशी मदत होते?
१२ यहोवाने आपल्याला वचन दिलंय, की आपण नवीन जगात कायमचं जीवन जगू. (२ पेत्र ३:१३) नवीन जग आपल्याला आता दिसत नसलं, तरी यहोवाच्या अभिवचनावर विश्वास असल्यामुळे सध्या येणाऱ्या समस्यांना आपल्याला तोंड देता येतं. जसं की, कदाचित आपल्याला जीवघेणा आजार झाला तर आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय असं आपल्याला वाटू शकतं. पण यहोवाने अभिवचन दिलंय, की तो नवीन जगात सगळे आजार काढून टाकेल आणि तिथे कोणीही “मी आजारी आहे,” असं म्हणणार नाही. (यश. ३३:२४) या वचनावर आपला पक्का विश्वास असेल, तर आपले विचार बदलू शकतात. तसंच अब्राहाम, सारा, मोशे आणि इतरांसारखंच यहोवाने दिलेली वचनं जणू आताच पूर्ण होत आहेत असं आपल्याला वाटेल.
१३. (क) नवीन जगाची कल्पना केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो? (ख) आपल्या विश्वासाचा पाया आणखी कोणत्या गोष्टींवर आधारित असला पाहिजे?
१३ यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास वाढवण्यासाठी आपण नवीन जगाची कल्पना करू शकतो. विचार करा, नवीन जगात आपण आजारी पडणार नाही, सगळीकडे शांती असेल आणि आपल्या प्रिय लोकांचं पुनरुत्थान होईल. आपल्या प्रकाशनांतल्या चित्रांमुळे आणि व्हिडिओमुळे आपल्याला या गोष्टींची कल्पना करता येते. पण खरंतर, आपल्या विश्वासाचा पाया फक्त या कल्पनेवरच नाही तर आणखीही गोष्टींवर आधारित असला पाहिजे. यासाठी, आपण स्वतःला विचारू शकतो: ‘बायबलच्या एखाद्या भविष्यवाणीमुळे किंवा अहवालामुळे देवाच्या अभिवचनांवरचा माझा विश्वास वाढला आहे का? किंवा बायबलची काही वचनं वाचल्यामुळे यहोवाचा उद्देश नक्की पूर्ण होईल याची मला खातरी पटते का?’ या गोष्टींवर मनन केल्यामुळे आपल्या विश्वासाचा पाया नक्कीच भक्कम होऊ शकतो.—इब्री ६:१७, १८.
विश्वासामुळे आपल्याला योग्य निर्णय घेता येतात
१४. यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्यामुळे मनोरंजनाच्या बाबतीत आपण कसे निर्णय घेतले पाहिजेत?
१४ देवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत योग्य निर्णय घेता येतात. मनोरंजनाचाच विचार करा. आज चित्रपटांमध्ये, गाण्यांमध्ये आणि टिव्ही सिरियलमध्ये खूप हिंसा, अनैतिकता आणि जादूटोणा यांसारख्या गोष्टी दाखवल्या जातात. या गोष्टी यहोवाला आवडत नाहीत आणि म्हणून त्या नक्कीच नवीन जगातही नसतील. (स्तो. ११:५; प्रकटी. २१:८) मग मनोरंजनासाठी आपण आज या गोष्टी पाहाव्यात का? आणि आपल्याला त्या आवडत असतील तर यहोवाच्या अभिवचनांवर आपला विश्वास आहे असं आपल्याला म्हणता येईल का?
१५. काही भाऊबहीण आपला फावला वेळ कसा वापरतात आणि का? (चित्रसुद्धा पाहा.)
१५ आपण आपला फावला वेळ कसा घालवणार हे प्रत्येक व्यक्तीने स्वतः ठरवलं पाहिजे. काही आईवडील फावल्या वेळेचा वापर आपल्या मुलांचं यहोवासोबतचं नातं मजबूत करायला आणि यहोवाच्या अभिवचनांवरचा विश्वास वाढवायला करतात. जसं की, तीन मुलींना सत्यात वाढवणारं एक जोडपं म्हणतं, “आम्ही सहसा बाहेर कुठे जायचो, तेव्हा तिथल्या सभांना नक्की जायचो आणि शाखा कार्यालयालाही भेट द्यायचो. यामुळे आम्हाला आमच्या मुलींच्या मनात भाऊबहिणींबद्दल कदर वाढवता आली.” आणखी एक जोडपं म्हणतं, “आम्हाला आमच्या मुलाबरोबर सृष्टीबद्दल शिकून घ्यायला खूप आवडायचं. त्यासाठी आम्ही प्राणी संग्रहालय आणि मत्स्यालय बघायला जायचो आणि इतर भाऊबहिणींनाही सोबत न्यायचो.” त्यांच्यासारखंच इतर बरीच कुटुंबसुद्धा आपल्या फावल्या वेळेचा वापर यहोवाच्या सृष्टीबद्दल शिकून घ्यायला आणि भाऊबहिणींसोबत चांगली मैत्री करायला करतात. यामुळे त्यांना न दिसणाऱ्या गोष्टींवर लक्ष लावता येतं.
माझ्या निर्णयांवरून, मी ज्या गोष्टींना महत्त्व देतो त्यावरून आणि आपला फावला वेळ कसा घालवतो त्यावरून यहोवाच्या अभिवचनांवर माझं लक्ष आहे हे दिसून येतं का? (परिच्छेद १५ पाहा)
१६. आपण पैशांबद्दल योग्य निर्णय कसे घेऊ शकतो? (१ करिंथकर ७:२९-३१) (चित्रसुद्धा पाहा.)
१६ १ करिंथकर ७:२९-३१ वाचा. यहोवाच्या अभिवचनांवर आपला विश्वास असेल तर आपल्याला पैशांबद्दल योग्य निर्णय घेता येतील. हे खरंय की आपल्याला पोटा-पाण्यासाठी पैशांची गरज आहे. पण आपण त्यालाच सगळ्यात जास्त महत्त्व देत नाही. कारण बायबल म्हणतं, “जग आणि त्याची वासना नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्वकाळ टिकून राहतो.” (१ योहा. २:१७) आपला या वचनावर विश्वास आहे हे आपण घेतलेल्या निर्णयांवरून दिसून येईल. आपण नवीन जगावर लक्ष लावलं असेल, तर आपण या जगाचा “पूर्णपणे उपयोग” करणार नाही. आणि देवाच्या राज्याला आपल्या जीवनात पहिली जागा देऊ.—मत्त. ६:३३.
मी ज्या गोष्टींना माझ्या जीवनात महत्त्व देतो त्यावरून यहोवाच्या अभिवचनांवर माझं लक्ष आहे हे दिसून येतं का? (परिच्छेद १६ पाहा)
१७. काही भाऊबहिणींनी आपल्या जीवनात कोणते निर्णय घेतले आहेत? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ आपला देवाच्या अभिवचनांवर भरवसा असेल, तर त्याचा परिणाम आपण भविष्याबद्दल कोणते निर्णय घेऊ यावरही होतो. जसं की काही तरुण कोणतं करियर निवडायचं, लग्न करायचं की नाही, मुलं होऊ द्यायची की नाही याचा विचार करतात. या बाबतीत आपल्या प्रत्येकाला स्वतः निर्णय घ्यावा लागतो. आणि आपल्या निर्णयांमुळे आपल्याला आशीर्वादही मिळतात आणि काही समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. (१ करिंथ. ७:२८, ३७, ३८) पण हे जग तात्पुरतं आहे आणि कायमचं जीवन यहोवाच आपल्याला देऊ शकतो यावर आपला भरवसा आहे, हे आपल्या निर्णयांवरून दिसलं पाहिजे. (१ तीम. ६:१९) आणि बऱ्याच तरुण भाऊबहिणींनी असेच निर्णय घेतले आहेत. त्यांनी पूर्ण वेळेची सेवा करायचं निवडलं आणि त्यांना याचा अजिबात पस्तावा नाही. उलट, “समाधानी राहून देवाची भक्ती करणं नक्कीच खूप फायदेकारक आहे” याची त्यांना खातरी पटली आहे.—१ तीम. ६:६.
माझ्या निर्णयांवरून यहोवाच्या अभिवचनांवर माझं लक्ष आहे हे दिसून येतं का? (परिच्छेद १७ पाहा)
१८. यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा असल्यामुळे आपल्याला आता कसे आशीर्वाद मिळू शकतात?
१८ यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा असल्यामुळे आपल्याला भविष्यात तर आशीर्वाद मिळतीलच पण त्यासोबत आजही आपल्याला बरेच आशीर्वाद मिळू शकतात. आपल्या विश्वासामुळे आपल्याला समस्यांचा सामना करता येतो. त्यासोबतच आपण आपला वेळ कसा वापरतो आणि आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला महत्त्व देतो या बाबतीतसुद्धा योग्य निर्णय घेता येतात. लवकरच यहोवा त्याची अभिवचनं पूर्ण करणार आहे. तोपर्यंत न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचा आपण निश्चय करू या.
गीत १५६ विश्वासाने ताकदवान!