अध्याय ३
खरा देव कोण आहे?
१. बायबलच्या आरंभीच्या शब्दांबद्दल पुष्कळजण का सहमत दर्शवतात?
एखाद्या निरभ्र रात्री आकाशात पाहिल्यावर अगणित तारे बघून तुम्हाला कधी आश्चर्य वाटले का? त्यांच्या अस्तित्वासंबंधाने तुम्हाला कोणते स्पष्टीकरण देता येईल? त्याचप्रमाणे पृथ्वीवर देखील आढळणाऱ्या जिवंत गोष्टी, जसे की, रंगीबेरंगी फुले, मंजूळ गाणी गाणारी गोड पांखरे, समुद्रात स्वच्छंद विहार करणारे देवमासे यांच्याबद्दल काय? ही यादी तर संपणारच नाही. या सर्व गोष्टी एकाएकी उद्भवल्या नसाव्यात. या कारणामुळेच, “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली” या बायबलच्या आरंभीच्या शब्दांबद्दल पुष्कळ जण आपले सहमत दाखवून आहेत यात काही आश्चर्य नाही!—उत्पत्ति १:१.
२. बायबल देवाबद्दल काय म्हणते आणि ते आपल्याला काय करण्याचे उत्तेजन देते?
२ देवाबद्दलच्या प्रश्नासंबंधाने मानवजातीचे विभिन्न ग्रह आहेत. काहींना वाटते की, देव ही व्यक्तिभावरहित शक्ती आहे. देव हा खूप दूरवर असून त्याच्याजवळ जाता येत नाही असे वाटून लाखो लोक मृत पूर्वजांची भक्ती करतात. परंतु बायबल प्रकट करते की, सत्य देव एक खरी व्यक्ती असून त्याला आम्हा वैयक्तिकामध्ये रस वाटतो. या कारणास्तव, ते आपल्याला “देवाचा शोध करावा” असे आर्जवून पुढे म्हणते: “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.”—प्रेषितांची कृत्ये १७:२७.
३. देवाची प्रतिमा घडवणे का शक्य नाही?
३ देव दिसायला कसा आहे? त्याच्या काही सेवकांनी त्याच्या वैभवी उपस्थितीचा दृष्टान्त बघितला. यामध्ये त्याने स्वतःला सिंहासनाधिष्ठ असल्याचे व त्याच्यापासून दैदिप्यमान तेज सर्वत्र पसरत असल्याचे दाखवले आहे. तथापि, ज्यांनी हे दृष्टान्त पाहिले त्यांनी त्याच्या चेहऱ्याचे कधीच वर्णन केले नाही. (दानीएल ७:९, १०; प्रकटीकरण ४:२, ३) याचे कारण हे की, “देव आत्मा आहे”; त्याला दैहिक शरीर नाही. (योहान ४:२४) खरे म्हणजे, आमच्या निर्माणकर्त्याची अचूक प्रतिमा घडवणे अशक्य आहे, कारण “देवाला कोणीहि कधीच पाहिले नाही.” (योहान १:१८; निर्गम ३३:२०) तरीही, बायबल आपल्याला देवाबद्दल बरेच काही शिकवते.
खऱ्या देवाला नाव आहे
४. बायबलमध्ये देवाला कोणत्या अर्थपूर्ण पदव्या देण्यात आल्या आहेत?
४ बायबलमध्ये खऱ्या देवाचे वर्णन “सर्वसमर्थ देव,” ‘परात्पर,’ ‘थोर निर्माता,’ ‘महान शिक्षक,’ “सार्वभौम प्रभु,” ‘सनातन राजा’ या पदव्यांनी केलेले आहे. (उत्पत्ति १७:१; स्तोत्र ५०:१४; उपदेशक १२:१; यशया ३०:२०; प्रेषितांची कृत्ये ४:२४; १ तीमथ्य १:१७) या पदव्यांबद्दल चिंतन केल्यास आपल्याला देवाविषयीच्या ज्ञानात वाढ होण्यास मदत मिळू शकते.
५. देवाचे नाव काय आहे व ते इब्री शास्त्रवचनांमध्ये किती वेळा आढळते?
५ तथापि, देवाला एक अद्वितीय नाव असून ते त्याच्या कोणत्याही पदवीपेक्षा अधिक वेळा, केवळ इब्री शास्त्रवचनांमध्ये जवळजवळ ७,००० वेळा आढळते. साधारण १,९०० वर्षांआधी, यहूद्यांनी अंधश्रद्धेमुळे ईश्वरी नामाचा उच्चार करण्याचे बंद केले. बायबलच्या काळात इब्री भाषा स्वराविना लिहीत. या कारणास्तव, मोशे, दावीद किंवा प्राचीन काळातील इतर लोक ईश्वरी नामाच्या चार व्यंजनांचा (יהוה) कसा उच्चार करीत ते सविस्तरपणे सांगण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. काही विद्वान म्हणतात की, देवाच्या नावाचा “याव्हे” असा उच्चार केला जात असावा, पण याची त्यांना तितकी खात्री वाटत नाही. इंग्रजीतील “जेहोवा” हा उच्चार बऱ्याच कालावधीपासून प्रचारात आहे आणि विविध भाषेतील त्याचे समांतर रूप सर्वत्र मान्य आहे.—पाहा निर्गम ६:३ आणि १५:३.
तुम्ही देवाचे नाव का उपयोगात आणावे
६. स्तोत्र ८३:१८ यहोवाबद्दल काय म्हणते आणि आपण त्याचे नाव का वापरावे?
६ देवाचे यहोवा हे अद्वितीय नाव त्याला इतर सर्व देवांपासून वेगळे करते. याच कारणासाठी हे नाव बायबलमध्ये खासपणे इब्री शास्त्रामध्ये इतक्या मुबलकपणे आढळते. पुष्कळ अनुवादक या ईश्वरी नावाचा उपयोग करण्याचे टाळतात, पण स्तोत्र ८३:१८ स्पष्टपणे म्हणते की, “तू केवळ तूच [यहोवा] या नामाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” यास्तव, आपण देवाबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या वैयक्तिक नावाचा उपयोग करणे उचित आहे.
७. यहोवा या नावाचा अर्थ आपल्याला देवाबद्दल काय शिकवतो?
७ यहोवा हे नाव इब्री क्रियापदाचे रूप असून त्याचा अर्थ, “बनणे” असा आहे. यामुळे देवाच्या नावाचा “तो व्हावयाला लावतो” असा अर्थ होतो. याद्वारे, यहोवा देव स्वतःला थोर संकल्पकर्ता असल्याची ओळख देतो. तो नेहमी त्याचे संकल्प खरेपणाने साकार करतो. हे नाव केवळ खऱ्या देवालाच साजेसे आहे, कारण मानवाला आपल्या योजना सफळ होतील याची काहीच खात्री देता येत नाही. (याकोब ४:१३, १४) यहोवाच केवळ असे म्हणू शकतो की, “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; . . . ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.
८. यहोवाने मोशेद्वारे कोणता संकल्प जाहीर केला?
८ अब्राहाम, इसहाक व याकोब या इब्री कुलपित्यांनी ‘यहोवाच्या नावाने प्रार्थना केली,’ पण ईश्वरी नामाची अर्थपूर्णता त्यांना माहीत नव्हती. (उत्पत्ति २१:३३; २६:२५; ३२:९; निर्गम ६:३) त्यांच्या संतानांना, इस्राएल लोकांना, नंतर यहोवाने इजिप्तच्या दास्यातून सोडवून “दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात” नेण्याचा त्याचा संकल्प प्रकटविला तेव्हा ते अशक्य आहे असे वाटले असावे. (निर्गम ३:१७) तरीसुद्धा, देवाने त्याचा संदेष्टा मोशेला असे म्हणून त्याच्या नावाच्या सार्वकालिक अर्थसूचकतेवर भर दिला: “तू इस्राएल लोकांस सांग, ‘तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव [यहोवा] याने मला तुम्हांकडे पाठविले आहे.’ हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यान्पिढ्या माझे स्मरण होईल.”—निर्गम ३:१५.
९. फारोला यहोवाबद्दल काय वाटले?
९ इस्राएल लोकांनी रानात जाऊन यहोवाची भक्ती करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे असे मोशेने इजिप्तचा राजा फारो याला सांगितले. परंतु, स्वतःला देव समजणाऱ्या आणि इजिप्तच्या इतर दैवतांची भक्ती करणाऱ्या फारोने उत्तर दिले: “हा कोण [यहोवा] की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या [यहोवाला] जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.”—निर्गम ५:१, २.
१०. प्राचीन इजिप्तमध्ये यहोवाने इस्राएल लोकांशी संबंधित असणारा त्याचा संकल्प पूर्ण करण्याकरता कोणती हालचाल केली?
१० यावर यहोवाने त्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रगतीशील पावले उचलली आणि स्वतःच्या नावाच्या अर्थाच्या एकवाक्यतेत कार्य केले. त्याने प्राचीन इजिप्तवर दहा पीडा आणल्या. शेवटल्या पीडेने गर्विष्ठ फारोच्या पुत्रासहित इजिप्तमधील सर्व ज्येष्ठ पुत्रांचा संहार घडवला. तेव्हा इस्राएल लोकांना जाऊ देण्यास इजिप्तमधील लोकांनी त्वरा केली. तथापि, काही इजिप्तमधील लोक यहोवाचे सामर्थ्य बघून इतके भारावले की, ते देखील इस्राएल लोक इजिप्त सोडताना त्यांना येऊन मिळाले.—निर्गम १२:३५-३८.
११. तांबड्या समुद्राकडे यहोवाने कोणता चमत्कार केला, आणि त्याच्या शत्रूंना काय कबूल करायला भाग पाडण्यात आले?
११ हट्टी फारो व ६०० युद्धरथांसहित त्याचे सैन्य त्याच्या दासांना परत पकडून आणावे म्हणून बाहेर पडले. इजिप्तचे लोक जवळ येत असता देवाने अद्भुतपणे तांबडा समुद्र दुभंगविला, त्यामुळे इस्राएल लोक कोरडी जमीन ओलांडू शकले. त्यांचा पाठलाग करणारे समुद्रात शिरले तेव्हा यहोवाने “त्यांच्या रथांची चाके काढून ते चालविणे कठीण केले.” इजिप्तचे सैन्य ओरडले: “आपण इस्राएलांपासून पळून जाऊ, कारण [यहोवा] त्यांच्या बाजूने मिसऱ्यांशी लढत आहे.” पण आता वेळ टळून गेली होती. पाण्याच्या प्रचंड भिंती खाली कोसळल्या व “रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना . . . त्यात गडप झाली.” (निर्गम १४:२२-२५, २८) अशाप्रकारे यहोवाने स्वतःचे नाव महान केले आणि ती घटना आजपर्यंत विसरण्यात आलेली नाही.—यहोशवा २:९-११.
१२, १३. (अ) देवाच्या नावाचा आज आमच्याकरता कोणता अर्थ आहे? (ब) लोकांनी कोणती गोष्ट तातडीने शिकून घेण्याची गरज आहे व का?
१२ देवाने स्वतःचे जे नाव मोठे केले त्याचा आज आम्हासाठी मोठा अर्थ आहे. त्याचे यहोवा हे नाव, ज्या सर्व गोष्टींचा त्याने संकल्प केला आहे त्या तो खऱ्या करून दाखवील याची हमी देते. यामध्ये, आमच्या पृथ्वीला परादीस बनवण्याचा त्याचा मूळ संकल्प साध्य करणे हे देखील आहे. (उत्पत्ति १:२८; २:८) त्याकरता, देव त्याच्या सार्वभौमत्त्वाला आज विरोध करणाऱ्या सर्वांना नष्ट करील, कारण त्याने म्हटले आहे की, “तेव्हा त्यास समजेल की, मी [यहोवा] आहे.” (यहेज्केल ३८:२३) त्यानंतर, देव त्याच्या भक्तांना धार्मिकतेच्या एका नव्या जगात मुक्त करून नेण्याच्या त्याच्या अभिवचनाची पूर्तता करील.—२ पेत्र ३:१३.
१३ ज्यांना देवाची कृपा मिळवावयाची आहे अशा सर्वांनी विश्वासाने त्याच्या नावाचा धावा केला पाहिजे. बायबल आम्हाला अभिवचन देते: “जो कोणी [यहोवाचे] नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” (रोमकर १०:१३) होय, यहोवाचे नाव अर्थभरीत आहे. तुमचा देव व उद्धारक म्हणून यहोवाचा धावा करणे तुम्हाला निरंतर आनंदाकडे निरवू शकते.
खऱ्या देवाचे गुण
१४. बायबल देवाच्या कोणत्या मूलभूत गुणांना ठळकपणे मांडते?
१४ इस्राएल लोकांचा इजिप्तमधून घडलेल्या मुक्ततेचा अभ्यास, देवाठायी पूर्ण समतोलतेत वास करणाऱ्या चार मूलभूत गुणांना ठळकपणे सामोरा मांडतो. त्याने फारोशी राखलेल्या व्यवहाराद्वारे त्याचे प्रचंड सामर्थ्य दिसून आले. (निर्गम ९:१६) देवाने ती गुंतागुंतीची परिस्थिती ज्या कुशलतेने हाताळली त्याने त्याच्या अतुलनीय बुद्धीचे दर्शन घडवले. (रोमकर ११:३३) हट्टी विरोधकांना आणि त्याच्या लोकांना जाचणाऱ्यांना शिक्षा देऊन त्याने त्याचा न्याय प्रकटविला. (अनुवाद ३२:४) देवाचा सर्वश्रेष्ठ गुण प्रीती आहे. यहोवाने अब्राहामाच्या संतानाच्या बाबतीत आपले अभिवचन पूर्ण करून त्याचे त्यांजवरील अप्रतिम प्रेम दाखवले. (अनुवाद ७:८) त्याचप्रमाणे, काही इजिप्तच्या लोकांना खोट्या दैवतांचा त्याग करण्यास मुभा देऊन आणि एकाच खऱ्या देवाच्या बाजूने आपली भूमिका ग्रहण करून मोठे लाभ देण्याद्वारे आपली प्रीती व्यक्त केली.
१५, १६. देवाने कोणकोणत्या मार्गाने स्वतःची प्रीती दाखवली आहे?
१५ बायबल वाचत असताना तुमच्या लक्षात येईल की, प्रेम हा देवाचा प्रमुख गुण आहे व तो हा गुण पुष्कळ मार्गाने दाखवतो. उदाहरणार्थ, प्रेमामुळेच तो निर्माणकर्ता झाला आणि प्रथमतः त्याने जीवनाच्या आनंदाचा सहभाग आत्मिक प्राण्यांसोबत घेतला. ते कोटी देवदूत देवावर प्रीती करतात व त्याची स्तुती गातात. (ईयोब ३८:४, ७; दानीएल ७:१०) देवाने पृथ्वीची निर्मिती करून व तिची आनंदी मानवी वसाहतीसाठी तयारी करून आपले प्रेम प्रकट केले.—उत्पत्ति १:१, २६-२८; स्तोत्र ११५:१६.
१६ आपल्याला देवाच्या प्रीतीपासून लाभ मिळू शकतो असे कितीतरी मार्ग आहेत. एक गोष्ट म्हणजे, आपल्याला जीवनाचा आनंद मिळावा म्हणून देवाने आपल्या शरीराची घडण इतक्या अद्भूत रितीने केली आहे. (स्तोत्र १३९:१४) तो “आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु [देऊन] आणि अन्नाने व हर्षाने [आपले] मन भरून तृप्त” करतो यामध्ये त्याचे प्रेम दिसते. (प्रेषितांची कृत्ये १४:१७) देव ‘वाईटांवर व चांगल्यांवरही आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.’ (मत्तय ५:४५) हेच प्रेम निर्माणकर्त्याला, आम्ही देवाबद्दल ज्ञान मिळवावे व त्याची सेवा त्याचे उपासक या अर्थी आनंदाने करावी म्हणून मदत देण्यासाठी प्रवृत्त करते. खरेच, “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) परंतु त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणखी खूप पैलू आहेत.
“दयाळू व कृपाळू देव”
१७. निर्गम ३४:६, ७ मध्ये आपल्याला देवाबद्दल काय शिकायला मिळते?
१७ इस्राएल लोकांनी तांबडा समुद्र पार केल्यानंतर त्यांना देवाची आणखी चांगल्या मार्गाने ओळख होण्यास हवी होती. मोशेने याची गरज ओळखली व प्रार्थना केली: “आता माझ्यावर तुझी कृपादृष्टि असल्यास तुझे मार्ग मला दाखीव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल.” (निर्गम ३३:१३) देवाने स्वतःबद्दल घोषणा केल्यावर मोशेला देवाची चांगली ओळख मिळाली: “[यहोवा, यहोवा,] दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा.” (निर्गम ३४:६, ७) देव स्वतःच्या प्रेमाचा न्यायाशी तोल साधतो; तो जाणूनबुजून पाप करणाऱ्यांना त्यांच्या अपराधांची शिक्षा मिळण्यापासून रक्षण देत नाही.
१८. यहोवाने दयाळू असल्याचे कसे प्रदर्शित केले आहे?
१८ मोशेला शिकायला मिळाले त्याप्रमाणे यहोवा दया दाखवतो. जे अडचणीत सापडतात अशांची दयाळू व्यक्तीला कीव येते व तो त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करतो. याचप्रमाणे देवाने मानवजातीची त्रास, आजार व मृत्यूपासून कायमची सुटका करण्याची तरतूद पुरवून तिच्याबद्दल आपली करुणा दाखवली. (प्रकटीकरण २१:३-५) देवाच्या उपासकांना या दुष्ट जगातील परिस्थितींमुळे विनाशाचा अनुभव येऊ शकतो किंवा मूर्खपणाने वागून त्रासाला तोंड द्यावे लागेल. पण त्यांनी यहोवाकडे मदतीसाठी नम्रपणे याचना केली तर तो त्यांचे सांत्वन करून त्यांना मदत देईल. का बरे? कारण तो आपल्या भक्तांबद्दल दयाळूपणे कोमल भावना प्रदर्शित करतो.—स्तोत्र ८६:१५; १ पेत्र ५:६, ७.
१९. देव कृपाळू आहे असे आपल्याला का म्हणता येते?
१९ अधिकारावर असणारे पुष्कळ लोक इतरांना निर्दयीपणे वागवतात. पण याउलट, यहोवा त्याच्या दीन सेवकांबद्दल किती कृपाळू आहे! विश्वामध्ये सर्वोच्च पदावर असला तरी तो सबंध मानवजातीला सर्वसाधारणपणे अप्रतिम दयाळूपणा दाखवतो. (स्तोत्र ८:३, ४; लूक ६:३५) यहोवा वैयक्तिकांच्या बाबतीत देखील कृपाळू आहे व तो कृपा दाखवण्याच्या त्यांच्या विशिष्ट याचनेला उत्तर देतो. (निर्गम २२:२६, २७; लूक १८:१३, १४) अर्थात, देव कोणालाही दया किंवा कृपा दाखवण्यासाठी बांधील नाही. (निर्गम ३३:१९) या कारणास्तव, आपण देवाची दया व कृपा यांच्याबद्दल खोल कदर दाखवली पाहिजे.—स्तोत्र १४५:१, ८.
मंदक्रोध, निःपक्षपाती व नीतिमान
२०. यहोवा मंदक्रोध तसेच निःपक्षपाती आहे हे कसे दिसते?
२० यहोवा मंदक्रोध आहे. तरीपण याचा अर्थ, तो कारवाई करीत नाही असा होत नाही, कारण त्याने हट्टी फारो व त्याच्या सैन्याचा तांबड्या समुद्रात नाश करण्याद्वारे तेच करून दाखवले. यहोवा निःपक्षपाती देखील आहे. या कारणामुळेच, त्याच्या मर्जीचे इस्राएल लोक सतत चुकीच्या गोष्टी करीत राहिल्यामुळे त्याच्या मर्जीतून उतरले. देव सर्व राष्ट्रांतील लोकांना त्याचे उपासक म्हणून स्वीकारतो, पण त्यांनी त्याच्या नीतीमान मार्गांचा अवलंब करावयास हवा.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
२१. (अ) प्रकटीकरण १५:२-४ आपल्याला देवाबद्दल काय शिकवते? (ब) देव जे बरोबर आहे असे म्हणतो ते करण्यासाठी काय आपल्याला सुकर करील?
२१ बायबलमधील प्रकटीकरणाचे पुस्तक देवाची ‘नीतीमान कृत्ये’ शिकण्याच्या मोलावर भर देते. ते आपल्याला स्वर्गीय प्राणी असे गीत गात असल्याचे सांगते: “हे यहोवा देवा, सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे यहोवा, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र निष्ठावंत आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत, म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करितील.” (प्रकटीकरण १५:२-४, NW) तो जे बरोबर असल्याचे म्हणतो त्याच्या सहमतात राहिल्याने आपण यहोवाचे हितकारक भय राखत असतो किंवा त्याला सन्मान देत असतो. हे देवाची बुद्धी व प्रीती यांचे आपल्याला स्मरण देत राहिल्याने सुकर होते. त्याच्या सर्व आज्ञा आपल्या भल्यासाठीच आहेत.—यशया ४८:१७, १८.
“आपला देव यहोवा हा अनन्य आहे”
२२. बायबलचा स्वीकार करणारे लोक त्रैक्याची भक्ती का करत नाहीत?
२२ प्राचीन इजिप्तच्या लोकांनी अनेक देवांची भक्ती केली, पण यहोवा “सर्वस्वाची भक्ती अपेक्षिणारा” देव आहे. (निर्गम २०:५, NW) मोशेने इस्राएल लोकांना याचे स्मरण दिले की, “आपला देव यहोवा हा अनन्य यहोवा आहे.” (अनुवाद ६:४, NW) येशू ख्रिस्ताने देखील याच शब्दांची पुनरावृत्ती केली. (मार्क १२:२८, २९) या कारणामुळे, जे बायबलला देवाचे वचन म्हणून स्वीकारतात ते तीन व्यक्ती किंवा तीन देव मिळून बनलेल्या त्रैक्याची भक्ती करत नाहीत. खरे पाहता, “त्रैक्य” हा शब्दच बायबलमध्ये आढळत नाही. खरा देव एक व्यक्ती असून तो येशू ख्रिस्तापासून भिन्न आहे. (योहान १४:२८; १ करिंथकर १५:२८) देवाचा पवित्र आत्मा ही काही व्यक्ती नव्हे. ती यहोवाची कार्यकारी शक्ती असून तिचा उपयोग सर्वसमर्थ देव स्वतःच्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी करतो.—उत्पत्ति १:२; प्रेषितांची कृत्ये २:१-४, ३२, ३३; २ पेत्र १:२०, २१.
२३. (अ) तुमची देवाबद्दलची प्रीती कशी वाढू शकेल? (ब) देवावर प्रीती करण्यासंबंधाने येशूने काय म्हटले आणि ख्रिस्ताबद्दल आपण काय शिकण्याची गरज आहे?
२३ यहोवा हा केवढा विस्मयकारक देव आहे हे विचारात घेतल्यावर तो तुमच्या भक्तीच्या पात्रतेचा आहे याच्याशी तुम्ही सहमत होणार नाही का? तुम्ही त्याचे वचन, बायबल याचा अभ्यास करीत राहाल तसतसे तुम्हाला त्याची चांगली ओळख घडेल आणि तो तुमच्या चिरकाल कल्याणाकरता व आनंदाकरता तुम्हाकडून कशाची अपेक्षा धरून आहे ते कळू शकेल. (मत्तय ५:३, ६) याखेरीज, तुमची देवाबद्दलची प्रीती वाढत राहील. हे योग्यच आहे, कारण येशूने म्हटले: “तू आपला देव यहोवा ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीति कर.” (मार्क १२:३०, NW) येशूठायी देवाबद्दल अशीच प्रीती होती हे उघड आहे. पण, बायबल येशू ख्रिस्ताबद्दल काय प्रकटविते? यहोवाच्या संकल्पात त्याची कोणती भूमिका आहे?
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
देवाचे नाव काय आहे व बायबलमध्ये त्याचा किती वेळा वापर करण्यात आला आहे?
तुम्ही देवाच्या नावाचा वापर का करण्यास हवा?
यहोवा देवाचे कोणते गुण तुम्हाला अधिक आवडतात?
[२९ पानांवरील चित्र]
सर्व गोष्टींच्या निर्माणकर्त्याबद्दल तुम्हाला केवढी चांगली माहिती आहे?