वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १२/१५ पृ. ११-१६
  • ‘यहोवाच्या दिवसातून’ बचावणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘यहोवाच्या दिवसातून’ बचावणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नोहाच्या दिवसात यहोवा कार्य करतो
  • सदोम आणि गमोरावर यहोवाने बजावलेली न्यायीक शिक्षा
  • इस्राएल “वावटळीची” कापणी करते
  • धर्मत्यागी यहूदाकडून यहोवा हिशेब मागतो
  • पहिल्या शतकातील “मोठे संकट”
  • मोठ्या संकटातून जिवंत वाचवलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तारणासाठी जाहीर घोषणा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुम्ही यहोवाच्या दिवसाकरता तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १२/१५ पृ. ११-१६

‘यहोवाच्या दिवसातून’ बचावणे

“परमेश्‍वराचा [“यहोवाचा,” NW] दिवस मोठा व फार भयंकर आहे; त्या वेळी कोण टिकेल?”—योएल २:११.

१. ‘यहोवाच्या भयंकर दिवसाबद्दल’ आपण आनंद का मानावा?

“भयंकर!” असे, देवाचा संदेष्टा योएल ‘यहोवाच्या मोठ्या दिवसाचे’ वर्णन करतो. पण, यहोवावर प्रीती करणारे आणि येशूच्या खंडणी अर्पणाच्या आधारावर त्याला समर्पण केलेले आपण यहोवाच्या जवळ येणाऱ्‍या दिवसाबद्दल गर्भगळीत होण्याची गरज नाही. तो दिवस भयजनक तर असेलच, शिवाय महान तारणाचा, हजारो वर्षांपासून मानवजातीला पीडित करणाऱ्‍या दुष्ट व्यवस्थीकरणापासून सुटका देणाराही दिवस असेल. तो दिवस लक्षात ठेवून योएल देवाच्या लोकांना ‘उल्लास कर, हर्ष कर, कारण परमेश्‍वर महत्कृत्ये करणार आहे,’ असे सांगतो व पुढे ही खात्री देतो: “तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्‍वराचा [“यहोवाचा”] धावा करील तो तरेल.” मग, देवाच्या राज्यव्यवस्थेत ‘यहोवाने म्हटल्याप्रमाणे निभावलेले असतील आणि यहोवाने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील.’—योएल २:११, २१, २२, ३२.

२. देवाचे उद्देश पूर्ण होत असताना (अ) ‘प्रभूच्या दिवसात’ (ब) ‘यहोवाच्या दिवशी’ काय घडते?

२ यहोवाच्या भयंकर दिवसाला, प्रकटीकरण १:१० मधील ‘प्रभूचा दिवस’ समजण्याची चूक आपण करू नये. प्रभूच्या दिवसात, प्रकटीकरण अध्याय १ ते २२ मध्ये वर्णन केलेल्या १६ दृष्टान्तांची पूर्णता समाविष्ट आहे. “ह्‍या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे [“उपस्थितीचे,” NW] व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” या येशूच्या शिष्यांनी त्याला विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्याने भाकीत केलेल्या सर्व घटनांच्या पूर्णतेचा समय प्रभूच्या दिवसात समाविष्ट आहे. पृथ्वीवरील भयजनक ‘लढाया, दुष्काळ, द्वेष, मऱ्‍या आणि अनीती’ यांनी येशूच्या स्वर्गीय उपस्थितीला चिन्हित केले आहे. हे दुःख वाढल्यामुळे येशूने आपल्या आधुनिक दिवसांतील शिष्यांना ‘सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवण्यासाठी’ पाठवण्याद्वारे देव-भीरू मानवांना सांत्वन पुरवले आहे. मग, प्रभूचा दिवस कळसास पोहंचतो तेव्हा, सद्य व्यवस्थीकरणाचा “शेवट” अर्थात यहोवाच्या भयंकर दिवसाचा उद्रेक होईल. (मत्तय २४:३-१४; लूक २१:११) सैतानाच्या भ्रष्ट जगावर त्वरित न्यायदंड बजावण्याकरता आलेला तो यहोवाचा दिवस असेल. “आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्‍वर आपल्या लोकांचा आश्रय आहे.”—योएल ३:१६.

नोहाच्या दिवसात यहोवा कार्य करतो

३. आजच्या आणि नोहाच्या दिवसांतील परिस्थिती सारखी कशी आहे?

३ आजची जागतिक परिस्थिती सुमारे ४,००० वर्षांपूर्वीच्या ‘नोहाच्या दिवसांसारखीच’ आहे. (लूक १७:२६, २७) उत्पत्ति ६:५ मध्ये आपण वाचतो: “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्‍वराने पाहिले.” आजच्या जगाशी किती समरूप! दुष्टाई, लोभ आणि क्रूरता सर्वत्र आहे. कधी कधी आपल्याला वाटेल की मानवजातीची नीतिभ्रष्टता रसातळाला पोहंचली आहे. पण ‘शेवटल्या काळाविषयी’ प्रेषित पौलाची भविष्यवाणी पूर्ण होतच राहते: “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.”—२ तीमथ्य ३:१, १३.

४. आरंभीच्या काळात खोट्या उपासनेचा कोणता परिणाम झाला?

४ नोहाच्या काळात धर्मामुळे मानवजातीला काही आराम मिळाला असावा का? उलट, तेव्हा अस्तित्वात असलेल्या धर्मत्यागी धर्माने तर विनाशकारक परिस्थितीत आणखीनच तेल ओतले असावे. आपले पहिले पालक “दियाबल व सैतान म्हटलेला . . . तो जुनाट साप” याच्या खोट्या शिकवणीला वश झाले होते. आदामाच्या दुसऱ्‍या पिढीपासून, ईशनिंदकपणे “परमेश्‍वराच्या [“यहोवाच्या”] नावाने प्रार्थना” करण्यास सुरवात झाली. (प्रकटीकरण १२:९; उत्पत्ति ३:३-६; ४:२६) नंतर, देवाची अनन्य भक्‍ती सोडून दिलेल्या बंडखोर देवदूतांनी देखण्या मानवकन्यांबरोबर निषिद्ध लैंगिक संबंध ठेवण्याकरता मानवी शरीरे धारण केली. या बायकांनी नेफिलीम अर्थात संकरित राक्षसांना जन्म दिला ज्यांनी मानवजातीवर जुलूम केले आणि त्यांना धमकावले. या दुरात्मिक प्रभावामुळे ‘पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांची चालचलणूक बिघडली.’—उत्पत्ति ६:१-१२.

५. नोहाच्या दिवसात घडलेल्या घटनांचा उल्लेख करून येशूने आपल्याला कोणता इशारेवजा आर्जव केला आहे?

५ परंतु एका कुटुंबाने मात्र यहोवाशी सचोटी राखली. म्हणूनच, देवाने “अभक्‍तांच्या जगावर जलप्रलय आणिला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्‍याचे सात जणांसह रक्षण केले.” (२ पेत्र २:५) तो जलप्रलय, ह्‍या युगाच्या अंताला चिन्हित करणाऱ्‍या यहोवाच्या भयंकर दिवसाचे पूर्वचिन्ह आहे ज्याच्याविषयी येशूने पुढीलप्रमाणे भाकीत केले होते: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.” (मत्तय २४:३६-३९) आज आपणही अशाच परिस्थितीत आहोत म्हणूनच येशू आपल्याला ‘होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहण्यास व सांभाळण्यास’ आर्जवतो.—लूक २१:३४-३६.

सदोम आणि गमोरावर यहोवाने बजावलेली न्यायीक शिक्षा

६, ७. (अ) लोटाच्या समयातील घटनांनी कशाला पूर्वचिन्हित केले? (ब) तो आपल्याला कोणता स्पष्ट इशारा देतो?

६ जलप्रलय येऊन शेकडो वर्ष उलटल्यावर नोहाची संतती पृथ्वीवर वाढली तेव्हा, विश्‍वासू अब्राहाम आणि त्याचा पुतण्या लोट यांनी यहोवाचा आणखी एक भयंकर दिवस पाहिला. लोट आणि त्याचे कुटुंब सदोम शहरात होते. त्याच्या शेजारील गमोरा शहराप्रमाणे तेही किळसवाण्या लैंगिक अनैतिकतेत गुरफटून गेले होते. भौतिकवाद तेथील लोकांच्या जीवनात केंद्र बनले होते; ज्याचा लोटाच्या बायकोवरही परिणाम झाला होता. यहोवाने अब्राहामाला सांगितले: “सदोम व गमोरा यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्याचे पाप फार भारी आहे.” (उत्पत्ति १८:२०) त्या शहरातील धार्मिक लोकांकरता त्याचा नाश करू नये अशी अब्राहामाने यहोवाला विनंती केली पण यहोवाने त्याला सांगितले की त्याला अवघे दहा लोकही धार्मिक असे आढळले नाहीत. देवाकडून आलेल्या देवदूतांनी लोट आणि त्याच्या दोन कन्यांना जवळच्या सोअर शहराकडे पळून जाण्यास मदत केली.

७ त्यानंतर काय? ‘शेवटल्या काळाची’ तुलना लोटाच्या दिवसांसोबत करून लूक १७:२८-३० असा अहवाल देते: “तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल; म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करीत होते, घरे बांधीत होते; परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नि व गंधक ह्‍यांची वृष्टि होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी असेच होईल.” यहोवाच्या भयजनक दिवशी सदोम आणि गमोराचा अनर्थावह परिणाम, येशूच्या उपस्थितीच्या या समयात आपल्याला स्पष्ट ताकीद देतो. मानवजातीच्या आधुनिक पिढीनेही “जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला” आहे. (यहूदा ७) शिवाय, आपल्या काळातील अनैतिक लैंगिक मनोवृत्ती, आपल्या दिवसांबद्दल येशूने ज्या ‘मऱ्‍यांबद्दल’ भाकीत केले त्यासाठी जबाबदार आहे.—लूक २१:११.

इस्राएल “वावटळीची” कापणी करते

८. इस्राएल कोठवर यहोवाशी केलेल्या करारानुसार वागले?

८ कालांतराने, यहोवाने इस्राएलला ‘सर्व लोकांपेक्षा खास निधी व याजकराज्य, पवित्र राष्ट्र’ होण्यासाठी निवडले. पण यासाठी त्यांना एक अट होती व ती म्हणजे त्यांनी, ‘त्याची वाणी ऐकून त्याचा करार पाळणे’ आवश्‍यक होते. (निर्गम १९:५, ६) या महान विशेषाधिकाराचा त्यांनी आदर केला का? मुळीच नाही! हे खरे की, त्या राष्ट्रातील विश्‍वासू लोकांनी जसे की मोशे, शमुवेल, दावीद, यहोशाफाट, हिज्कीया, योशीया आणि इतर भक्‍तिमान संदेष्टे आणि संदेष्ट्रींनी त्याची एकनिष्ठेने सेवा केली. तरीपण संपूर्ण राष्ट्रच अविश्‍वासू होते. कालांतराने, त्या राज्याचे दोन भाग झाले—इस्राएल आणि यहूदा. एकंदरीत, दोन्ही राष्ट्रे मूर्तिपूजेत आणि शेजारच्या राष्ट्रांच्या देवनिंदात्मक रूढींमध्ये गुरफटून गेले.—यहेज्केल २३:४९.

९. बंडखोर दहा वंशीय राज्याचा यहोवाने कसा न्याय केला?

९ यहोवाने त्यांचा न्याय कसा केला? नेहमीप्रमाणे त्याने आमोसने मांडलेल्या तत्त्वानुरूप इशारा दिला: “प्रभु परमेश्‍वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” स्वतः आमोसने इस्राएलच्या उत्तरेकडील राज्यावर अनर्थ उच्चारला: “परमेश्‍वराचा दिवस येण्याची तुम्ही का इच्छा करिता? तो अंधकारमय आहे, प्रकाशमय नव्हे.” (आमोस ३:७; ५:१८) पुढे, आमोसचा सहसंदेष्टा होशेय याने घोषित केले: “ते वाऱ्‍याची पेरणी करून वावटळीची कापणी करितात.” (होशेय ८:७) सा.यु.पू. ७४० मध्ये, यहोवाने इस्राएलाच्या उत्तरेकडील राज्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी अस्सेरियन सैन्याचा उपयोग केला.

धर्मत्यागी यहूदाकडून यहोवा हिशेब मागतो

१०, ११. (अ) यहूदाला क्षमा करण्यास यहोवा तयार का झाला नाही? (ब) कोणत्या घृणास्पद गोष्टींमुळे ते राष्ट्र भ्रष्ट झाले होते?

१० यहूदाच्या दक्षिणेकडील राज्यातही यहोवाने आपले संदेष्टे पाठवले. तरीसुद्धा मनश्‍शे आणि त्याचा उत्तराधिकारी आमोन यांसारख्या राजांनी यहोवाच्या दृष्टीने जे वाईट होते ते आचरले, ‘निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला, मूर्तींची सेवा व पूजा करीत राहिले.’ आमोनचा पुत्र योशीया याने यहोवाच्या दृष्टीने जे चांगले तेच केले असले तरी, त्याच्यानंतर आलेले राजे तसेच लोक पुन्हा एकदा दुष्टाई करण्यात बुडून गेले, इतके की त्यांना “परमेश्‍वर क्षमा करीना.”—२ राजे २१:१६-२१; २४:३, ४.

११ यहोवाने आपला संदेष्टा यिर्मया याच्याद्वारे असे घोषित केले: “चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे. संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवितात व माझ्या लोकासहि असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?” यहूदाचे राष्ट्र खूपच रक्‍तदोषी बनले होते, त्यातील लोक चोरी, खून, व्यभिचार करण्याद्वारे, खोट्या शपथा वाहण्याद्वारे, अन्य दैवतांची भक्‍ती करण्याद्वारे आणि इतर घृणास्पद गोष्टी आचरण्याद्वारे भ्रष्ट झाले होते. देवाचे मंदिर “लुटारूंची गुहा” झाले होते.—यिर्मया २:३४; ५:३०, ३१; ७:८-१२.

१२. तत्त्वभ्रष्ट जेरुसलेमला शिक्षा देण्यास यहोवाने कशी सुरवात केली?

१२ यहोवाने म्हटले: “मी उत्तरेकडून [खास्दी] अरिष्ट, मोठा नाश, आणीत आहे.” (यिर्मया ४:६) त्याने तत्त्वभ्रष्ट जेरुसलेम आणि त्यातील मंदिराचा चक्काचूर करण्यासाठी त्या काळचा “सर्व जगाचा हातोडा” असलेल्या बॅबिलोनी जागतिक सत्तेस चाल करू दिली. (यिर्मया ५०:२३) सा.यु.पू. ६०७ मध्ये, कडक वेढा घातल्यावर नबुखद्‌नेस्सराच्या शक्‍तिशाली सैन्यापुढे शहराने नमते घेतले. “रिब्ला येथे बाबेलच्या राजाने, [राजा] सिद्‌कीयाच्या डोळ्यांदेखत त्याचे पुत्र वधिले. त्याप्रमाणेच बाबेलच्या राजाने यहूदाचे सर्व मानकरी वधिले. आणखी त्याने सिद्‌कीयाचे डोळे फोडून त्याला बाबेलास रवाना करण्यासाठी बेड्यांनी जखडिले. खास्दी लोकांनी राजगृह व लोकांची घरे अग्नीने जाळिली व यरुशलेमेचा कोट मोडून टाकिला. तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांस कैद करून बाबेलास नेले.”—यिर्मया ३९:६-९.

१३. सा.यु.पू. ६०७ मधील यहोवाच्या दिवशी कोणाचा बचाव झाला व का?

१३ खरच किती भयंकर दिवस! पण, यहोवाच्या आज्ञेत राहणारे फार कमी लोक त्या ज्वालामय न्यायदंडापासून बचावले. यामध्ये, गैर-इस्राएली रेखाबवंशी होते ज्यांनी यहुद्यांच्या उलट म्हणजे नम्र आणि आज्ञाधारक आत्मा प्रदर्शित केला. तसेच, चिखल असलेल्या विहिरीतून यिर्मयाला वाचवणारा विश्‍वासू कुशी एबद-मलेख आणि यिर्मयाचा एकनिष्ठ शास्त्री बारुख त्या वाचलेल्यांपैकी होते. (यिर्मया ३५:१८, १९; ३८:७-१३; ३९:१५-१८; ४५:१-५) अशा लोकांबद्दलच यहोवाने म्हटले: “तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.” बॅबिलोनचा जेता, कुस्रू राजाने देव-भीरू यहुद्यांची सुटका केली आणि ते जेरुसलेमच्या शहराची आणि मंदिराची पुनर्बांधणी करण्याकरता वापस आले तेव्हा म्हणजे सा.यु.पू. ५३९ मध्ये या अभिवचनाची लहानशी पूर्णता झाली. तसेच, बॅबिलोनी धर्मांतून बाहेर येणारे व यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा चालू करणारे आज, यहोवाच्या पुनर्स्थापित परादीसमध्ये चिरकालिक शांती असलेल्या वैभवी भवितव्याची वाट पाहू शकतात.—यिर्मया २९:११; स्तोत्र ३७:३४; प्रकटीकरण १८:२, ४.

पहिल्या शतकातील “मोठे संकट”

१४. यहोवाने इस्राएलला कायमचेच का नाकारले?

१४ सा.यु. पहिल्या शतकाकडे आता आपण वळू या. आतापर्यंत पुनर्स्थापित यहुदी पुन्हा एकदा धर्मत्यागाकडे वळाले होते. यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपला अभिषिक्‍त जन किंवा मशीहा होण्याकरता पृथ्वीवर पाठवले. सा.यु. २९ ते ३३ च्या वर्षांदरम्यान, येशूने संपूर्ण इस्राएल राष्ट्रात प्रचार करीत म्हटले: “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्तय ४:१७) पुढे, त्याने त्याच्याबरोबर राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरता शिष्य गोळा करून त्यांना प्रशिक्षण दिले. यहुद्यांच्या शासकांनी कसा प्रतिसाद दिला? त्यांनी येशूचा उपहास केला आणि शेवटी तर त्याला एका वधस्तंभावर यातना देऊन मारून टाकून अघोरी गुन्हा केला. यहोवाने यहुद्यांना आपले लोक म्हणून नाकारले. आणि आता त्याने त्यांना कायमचे नाकारले होते.

१५. पश्‍चात्तापी यहुद्यांना काय साध्य करण्याचा विशेषाधिकार मिळाला?

१५ सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी, पुनरुत्थित येशूने पवित्र आत्मा ओतला ज्यामुळे त्याच्या शिष्यांना, तेथे चटकन जमलेल्या यहुदी व यहुदीमतानुसारींशी वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्याचे सामर्थ्य मिळाले. लोकसमूहाला उद्देशून प्रेषित पेत्र म्हणाला: “त्या येशूला देवाने उठविले ह्‍याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो. . . . म्हणून इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्‍चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभु व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” प्रामाणिक यहुद्यांची प्रतिक्रिया काय होती? “त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली,” त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला व बाप्तिस्मा घेतला. (प्रेषितांची कृत्ये २:३२-४१) राज्यप्रचाराचे कार्य वृद्धिंगत होत गेले आणि ३० वर्षांमध्ये ते ‘आकाशाखालच्या सर्व सृष्टीत’ पसरले.—कलस्सैकर १:२३.

१६. यहोवाने कशाप्रकारे घटना घडवून आणल्या ज्यामुळे स्वाभाविक इस्राएलवर त्याचा न्यायदंड बजावण्यात आला?

१६ यहोवाने नाकारलेल्या त्याच्या लोकांवर अर्थात स्वाभाविक इस्राएलवर न्यायदंड बजावण्याचा त्याचा नियुक्‍त समय आता जवळ आला होता. तेव्हा ज्ञात असलेल्या जगाच्या राष्ट्रांतून हजारो लोक ख्रिस्ती मंडळीत झुंडीने आले होते व ‘देवाचे आध्यात्मिक इस्राएल’ होण्याकरता त्यांचा अभिषेक करण्यात आला होता. (गलतीकर ६:१६) परंतु त्या काळचे यहुदी लोक, द्वेष आणि पंथीय हिंसेत पूर्ण बुडाले होते. “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन” असण्याबाबत पौलाने जे लिहिले होते त्याच्या उलट ते उघडपणे त्यांच्यावर शासन करणाऱ्‍या रोमी सत्तेविरुद्ध बंड करीत होते. (रोमकर १३:१) त्यानंतर झालेल्या घटना यहोवाने घडून आणल्या होत्या हे उघड आहे. सा.यु. ६६ या वर्षी, जनरल गॅलसच्या अधिकाराखालील रोमी फौज जेरुसलेमला वेढा घालण्याकरता चाल करून आले. हल्ला चढवणाऱ्‍या रोमनांनी शहरात प्रवेश केला, इतकेच नव्हे तर त्यांनी मंदिराची भिंत पोखरली. जोसेफसच्या इतिहासाच्या अहवालाप्रमाणे शहरावर आणि लोकांवर खरोखरच संकट कोसळले होते.a पण हल्ला चढवणाऱ्‍या सैनिकांनी अचानक माघार घेतली. यामुळे येशूच्या शिष्यांना मत्तय २४:१५, १६ मध्ये लिहून ठेवलेल्या भविष्यवाणीत बोध केल्याप्रमाणे “डोंगरात पळून” जाण्यास वाव मिळाला.

१७, १८. (अ) कोणत्या संकटाद्वारे यहोवाने यहूदी लोकांवर न्यायदंड बजावला? (ब) कोण लोक ‘तरले’ व हे कशाचे पूर्वचिन्ह होते?

१७ परंतु, हे संकट कळसास पोहंचण्याकरता यहोवाचा पूर्ण न्यायदंड अद्याप यायचा होता. सा.यु. ७० मध्ये, आता जनरल टायटसच्या अधिकाराखाली रोमी फौज पुन्हा आले. यावेळी युद्ध अटळ होते! आपआपसांत लढणारे यहुदी रोमनांच्या तुलनेत फार कमी होते. शहर आणि मंदिर भुईसपाट करण्यात आले. दहा लाखांपेक्षा अधिक दुर्बळ यहुद्यांचे हालहाल होऊन ते मरण पावले, काही ६,००,००० मुडदे शहराच्या फाटकांबाहेर फेकण्यात आले. शहराचा विध्वंस झाल्यावर, ९७,००० यहुद्यांना बंदिवान म्हणून नेण्यात आले ज्यांतील अनेकांचा नंतर ग्लॅडियेटर्सच्या खेळांत मृत्यू झाला. होय, जॉर्डनच्या पलीकडे असलेल्या डोंगरांमध्ये पळून गेलेले आज्ञाधारक ख्रिस्ती लोकच त्या संकटाच्या वर्षांतून वाचले होते.—मत्तय २४:२१, २२; लूक २१:२०-२२.

१८ अशाप्रकारे, ‘युगाच्या समाप्तीविषयी’ येशूच्या मोठ्या भविष्यवाणीची पहिली पूर्णता झाली, सा.यु. ६६-७० दरम्यान बंडखोर यहुदी राष्ट्रावर यहोवाने न्यायदंड बजावल्यावर ती कळसास पोहंचली. (मत्तय २४:३-२२) पण ही ‘यहोवाच्या महान व भयंकर दिवसाची’ केवळ एक पूर्वसूचना होती, अख्ख्या जगावर शेवटले संकट अजून यायचे आहे. (योएल २:३१) त्यातून तुम्ही कसे ‘तरू’ शकता? पुढील लेख तुम्हाला सांगेल.

[तळटीप]

a जोसेफस सांगतो, की हल्ला चढवणाऱ्‍या रोमनांनी शहराला वेढा घातला, भिंत पोखरली आणि ते यहोवाच्या मंदिराच्या फाटकाला आग लावण्याच्या बेतात होते. यामुळे आत अडकून राहिलेले अनेक यहुदी गांगरून गेले, कारण मृत्यूची टांगती तलवार त्यांच्यासमोर लटकत असलेली ते पाहत होते.—यहुद्यांच्या लढाया (इंग्रजी), पुस्तक ll, अध्याय १९.

उजळणीकरता प्रश्‍न

◻ ‘प्रभूच्या दिवसाचा’ ‘यहोवाच्या दिवसाशी’ कसा संबंध आहे?

◻ नोहाच्या दिवसावर मनन केल्यावर आपण कोणत्या इशाऱ्‍याकडे कान देणे आवश्‍यक आहे?

◻ कशाप्रकारे सदोम आणि गमोरा जोरदार धडा पुरवतात?

◻ पहिल्या शतकातील ‘मोठ्या संकटातून’ कोणाचा बचाव झाला होता?

[१५ पानांवरील चित्र]

यहोवाने नोहा आणि लोट यांच्या कुटुंबांना तसेच सा.यु.पू. ६०७ आणि सा.यु. ७० मध्ये बचावाची संधी पुरवली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा