वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ४/१५ पृ. १५-२०
  • यहोवाचा भयप्रद दिवस जवळ आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा भयप्रद दिवस जवळ आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “शेवटल्या काळी”
  • देव न्याय करण्यासाठी येतो
  • जीवनाच्या पुस्तकातील सचोटी रक्षक
  • यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • मलाखी पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • खरा प्रभु न्यायासाठी येतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • यहोवाच्या अपेक्षा पूर्ण केल्याने त्याचा महिमा होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ४/१५ पृ. १५-२०

यहोवाचा भयप्रद दिवस जवळ आहे

“परमेश्‍वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.”—मलाखी ३:१६.

१, २. मलाखी कोणत्या भयप्रद दिवसाविषयी आगाऊ सूचना देतो?

भयप्रद! ऑगस्ट ६, १९४५ चा दिवस उजडत असताना अल्पावधीतच एका मोठ्या शहराचा नाश झाला. अंदाजे ८०,००० लोक मृत्यूमुखी पडले. शेकडो लोक गंभीररित्या जखमी झाले! वाढतच जाणारी आग! अणूबॉम्बमुळे हे घडले. या विपत्तीच्या काळात यहोवाच्या साक्षीदारांचे काय झाले? हिरोशिमात त्यावेळी केवळ एकच साक्षीदार—त्याच्या ख्रिस्ती तटस्थतेमुळे सुरक्षित तुरुंगात बंद होता. तुरुंग पडून त्याचा ढिगारा झाला होता पण आपल्या बांधवाला काही इजा पोहंचली नव्हती. जसे की त्याने म्हटले, अणुबॉम्बने त्याला तुरुंगातून उडवले—कदाचित हीच एक चांगली गोष्ट बॉम्बने केली.

२ तो बॉम्ब स्फोट भयप्रद असला तरी, आपल्या पुढे असलेल्या ‘परमेश्‍वराच्या मोठ्या व भयंकर दिवसाच्या’ तुलनेत तो क्षुल्लक वाटतो. (मलाखी ४:५) होय, गतकाळात भयप्रद दिवस होते, पण यहोवाचा हा दिवस या सर्वांपेक्षाही वरचढ असेल.—मार्क १३:१९.

३. जलप्रलयाआधी ‘सर्व प्राणीमात्र’ आणि नोहाच्या कुटुंबात कोणती तफावत पाहिली जाऊ शकते?

३ नोहाच्या दिवसात “पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली होती.” यास्तव देवाने म्हटले: “त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे; पाहा मी पृथ्वीवर त्यांचा नाश करीन.” (उत्पत्ती ६:१२, १३) मत्तय २४:३९ मध्ये नमूद केल्यानुसार येशूने म्हटले की, “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत [लोकांस] समजले नाही.” परंतु त्या प्रलयातून “नीतिमत्त्वाचा उपदेशक” या विश्‍वासू नोहासोबत त्याचे देवभिरु कुटुंब बचावले.—२ पेत्र २:५.

४. सदोम आणि गमोराने कोणते इशारेवजा उदाहरण पुरवले?

४ यहुदा ७ सांगते, “त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्‍यांनी . . . जारकर्म करुन अन्यकोटीतील अंगाशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत.” त्या अभक्‍त लोकांचा त्यांच्या अमंगळ अशुद्ध जीवनशैलीमुळे नाश झाला. लैंगिकतेवर केंद्रित असणाऱ्‍या आधुनिक जगातील या समाजांना ईशारा मिळो! तथापि, याकडे लक्ष द्या की, त्या विपत्तीतून देवभिरु लोट व त्याच्या मुलींना वाचवण्यात आले होते. यहोवाच्या उपासकांनाही शीघ्रतेने येत असलेल्या मोठ्या संकटातून त्याप्रमाणेच संरक्षण देण्यात येईल.—२ पेत्र २:६-९.

५. जेरुसलेमवर बजावलेल्या न्यायदंडापासून आपण काय शिकू शकतो?

५ यहोवाने एके काळी “सर्व पृथ्वीचा आनंद” असणारे वैभवी शहर, जेरुसलेमचा विध्वंस करण्यासाठी स्वारी करणाऱ्‍या सैनिकांचा वापर केला तेव्हा पुरवलेल्या या ईशारेवजा उदाहरणांचा जरा विचार करा. (स्तोत्र ४८:२) देवाच्या तथाकथित लोकांनी खऱ्‍या उपासनेचा त्याग केल्यामुळे या दुःखद घटना प्रथम सा. यु. पू. ६०७ मध्ये आणि पुन्हा सा. यु. ७० मध्ये त्यांच्यावर ओढवल्या. देवाचे निष्ठावंत सेवक बचावले हे आनंदाचे आहे. सा. यु. ७० मधील संकटाचे वर्णन (पुढील पानांवर चित्रित केलेले) “जी उत्पत्ति देवाने अस्तित्त्वात आणली तिच्या प्रारंभापासून आतापर्यंत झाले नाही . . . असे ते संकट” होते, असे करण्यात आले आहे. त्याने धर्मत्यागी यहुदी व्यवस्थीकरणाला पूर्णपणे काढून टाकले आणि निश्‍चितच या अनुषंगाने ते “कधी होणारहि नाही.” (मार्क १३:१९, प. र. भाषांतर.) परंतु दैवी न्यायनिवाड्याची ही अंमलबजावणी देखील आता संपूर्ण जागतिक व्यवस्थीकरणाला धमकी देत असलेल्या ‘मोठ्या संकटाची’ केवळ पडछाया होती.—प्रकटीकरण ७:१४.

६. यहोवा विपत्तींना अनुमती का देतो?

६ देव अत्याधिक प्राणहानी करुन भयंकर विपत्तींना अनुमती का देईल बरे? नोहा, सदोम व गमोरा आणि जेरुसलेमच्या बाबतीत, ज्यांनी पृथ्वीवर आपली चालचलणूक बिघडवली होती, ज्यांनी खऱ्‍या प्रदुषणाने आणि नैतिक अवनतीने या सुंदर ग्रहाला खराब केले होते आणि ज्यांनी खऱ्‍या उपासनेपासून स्वतःला धर्मत्यागी बनवले, किंवा तिला नाकारले अशांवर यहोवा न्यायदंड बजावत होता. आज आपण, संपूर्ण जगावर ज्या न्यायदंडाची अंमलबजावणी होणार आहे त्या उंबरठ्यावर उभे आहोत.—२ थेस्सलनीकाकर १:६-९.

“शेवटल्या काळी”

७. (अ) प्राचीन ईश्‍वरी न्यायदंड कशाचे भविष्यसूचक होते? (ब) कोणती वैभवी आशा पुढे ठेवली आहे?

७ प्राचीन काळातील ते नाश २ पेत्र ३:३-१३ मध्ये वर्णन केलेल्या भयप्रद मोठ्या संकटाला भविष्यसूचक होते. प्रेषित सांगतो: ‘प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करतील.’ मग नोहाच्या दिवसाकडे लक्ष केंद्रित करुन पेत्र लिहितो: “तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.” सर्व संकटांपेक्षा अधिक मोठे असलेल्या या संकटानंतर प्रदीर्घ काळापासून थांबून असलेले मशीहाचे राज्य एक नवा आकार घेईल—“ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी.” किती हर्षदायक आशा!

८. जागतिक घटना कशाप्रकारे कळसाला पोहंचत आहेत?

८ आपल्या विसाव्या शतकात, जागतिक घटना प्रगतीशीलपणे कळसाला पोहंचल्या आहेत. हिरोशिमाचा विध्वंस ईश्‍वरी तपासणीचा दिवस नव्हता, तरी याचा समावेश येशूने अंत समयासाठी केलेल्या भविष्यवाणीत “भयंकर उत्पात” यात केला जाऊ शकतो. (लूक २१:११) यामुळे अणुशस्त्राच्या धोक्याची झालेली सुरवात अजूनही मानवजातीवर जणू वादळी ढगासारखी लटकलेली आहे. अशाप्रकारे, नोव्हेंबर २९, १९९३ च्या द न्यूयॉर्क टाईम्स मधील मथळा असा वाचला जातो: “बंदूकांना काही प्रमाणात गंज चढला असला तरी न्यूक्लियर हत्यारांना अजूनही तकाकी आणली जात आहे.” त्या दरम्यान, आंतरराष्ट्रीय, आंतरजातीय आणि आंतरजमातीय युद्धे भीतीदायक पिकाची कापणी करीत आहेत. गतकाळातील युद्धांमध्ये बळी पडलेल्यांची अधिक संख्या सैनिकांपैकी होती. आज युद्धामध्ये बळी पडलेले, ८० टक्के नागरिक असल्याचा अहवाल मिळत आहे शिवाय निर्वासितांप्रमाणे स्वतःचा मायदेश सोडून गेलेल्या इतर लाखो लोकांबद्दल सांगायलाच नको.

९. धार्मिक पुढाऱ्‍यांनी जगासोबतची मैत्री कशी प्रदर्शित केली आहे?

९ धार्मिक पुढाऱ्‍यांनी युद्धामध्ये तसेच रक्‍तलांच्छित क्रांत्यांमध्ये सक्रिय भाग घेऊन ‘जगाबरोबर मैत्री’ असल्याचे अनेकदा दाखवले आहे व दाखवत आहेत. (याकोब ४:४) काहींनी व्यापारी जगातील लोभिष्ट जहागिरदार शस्त्रास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत असताना किंवा मादक पदार्थांचे साम्राज्य निर्माण करताना त्यांच्यासोबत काम केले आहे. उदाहरणार्थ, दक्षिण अमेरिकेतील मादक पदार्थांच्या बादशहाचा विश्‍वासघात करुन ठार मारण्याबद्दल कळवताना द न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले: “तो कायदेशीर व्यापार संपत्ती व हितकर्त्याचे रुप दाखवून आपला मादक पदार्थांचा व्यापार लपवत असे. शिवाय त्याचा स्वतःचा रेडिओ कार्यक्रम होता तसेच त्याच्याबरोबर अनेकदा रोमन कॅथलिक पाळक असत.” द वॉल स्ट्रिट जर्नलने कळवले की, मादक पदार्थांची सवय जडलेल्या लाखो लोकांचे जीवन उद्‌ध्वस्त करण्याव्यतिरिक्‍त या मादक पदार्थांच्या बादशहाने हजारो लोकांची कत्तल करण्यास व्यक्‍तीशः निर्देशन केले होते. लंडनच्या द टाईम्सने कळवले: “बळी पडलेल्यांच्या अंत्यसंस्काराचा मास इतर ठिकाणी होत असतो त्याचवेळी . . . मारेकरी आभार प्रदर्शित करण्यासाठी अनेकदा विशेष मासला पैसे देतात.” केवढी दुष्टता!

१०. बिघडत चाललेल्या जागतिक परिस्थितींकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे?

१० दुरात्म्यांनी प्रेरित झालेले लोक पृथ्वीवर अजून कोणता अनर्थ लादतील, हे कोणाला माहीत आहे? १ योहान ५:१९ म्हणते त्याप्रमाणे, ‘सगळे जग त्या दुष्टाला, दियाबल सैतानाला वश झाले आहे.’ आज “पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” (प्रकटीकण १२:१२) तथापि, आनंदाची गोष्ट अशी आहे की, रोमकर १०:१३ आपल्याला शाश्‍वती देते “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”

देव न्याय करण्यासाठी येतो

११. इस्त्राएलातील कोणत्या परिस्थितीने मलाखीच्या भविष्यवाणीची गरज भासवली?

११ मानवजातीच्या नजीकच्या भवितव्यात काय घडेल यावर मलाखीची भविष्यवाणी प्रकाश टाकते. प्राचीन इब्री संदेष्ट्यांच्या मोठ्या यादीत मलाखीला शेवटी टाकले आहे. सा. यु. पू. ६०७ मध्ये इस्त्राएल लोकांनी जेरुसलेमच्या नाशाचा अनुभव घेतला. परंतु ७०  वर्षांनी यहोवाने त्या राष्ट्राचे पुनर्वसन त्यांच्या देशात करुन दयाळू प्रेमळदया प्रदर्शित केली. तथापि, शंभर वर्षांच्या आतच इस्त्राएल पुन्हा एकदा धर्मत्यागात व दुष्टपणात वाहवत गेले. लोक यहोवाच्या नावाचा अनादर करून त्याच्या धार्मिक नियमांकडे दुर्लक्ष करीत होते आणि यज्ञार्पणासाठी अंधळे, लंगडे व रोगी प्राणी आणून त्याच्या मंदिराला अशुद्ध करीत होते. विदेशी बायका करण्यासाठी ते आपल्या तारुण्याच्या बायकांना घटस्फोट देत होते.—मलाखी १:६-८; २:१३-१६.

१२, १३. (अ) अभिषिक्‍त याजकीय वर्गासाठी कोणत्या शुद्धीकरणाची आवश्‍यकता होती? (ब) शुद्धीकरणामुळे मोठ्या समुदायाला देखील कसा फायदा होतो?

१२ शुद्धीकरणाच्या कार्याची आवश्‍यकता होती. तेच मलाखी ३:१-४ मध्ये वर्णित केले आहे. प्राचीन इस्राएलाप्रमाणे, यहोवाच्या आधुनिक दिवसातील साक्षीदारांना शुद्ध करण्याची आवश्‍यकता असल्यामुळे मलाखीने वर्णित केलेले शुद्धीकरणाचे कार्य यांना लागू होऊ शकते. पहिले महायुद्ध संपण्याच्या बेतात असताना त्यावेळी बायबल विद्यार्थी म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या काही साक्षीदारांनी जागतिक घडामोडीत स्पष्ट तटस्थता राखली नाही. यहोवाने १९१८ मध्ये जागतिक कलंकापासून आपल्या उपासकांच्या लहान समूहाला शुद्ध करण्यासाठी आपल्या आध्यात्मिक मंदिर व्यवस्थेत त्याच्या ‘करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्याला,’ ख्रिस्त येशूला पाठवले. भविष्यसूचकपणे यहोवाने विचारले होते: “[निरोप्याच्या] आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू गाळणाऱ्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे; रुपे गाळून शुद्ध करणाऱ्‍यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजास [अभिषिक्‍त याजकीय समूह] शुद्ध करील; त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्‍वराला बलि अर्पण करितील.” शुद्ध झालेले लोक या नात्याने त्यांनी तसेच केले!

१३ त्या अभिषिक्‍त याजकीय समूहाची संख्या केवळ १,४४,००० आहे. (प्रकटीकरण ७:४-८; १४:१, ३) तथापि, आज इतर समर्पित ख्रिश्‍चनांविषयी काय? आता त्यांची वृद्धी लाखोमध्ये होत आहे. यांचा मिळून “मोठा लोकसमुदाय” बनतो, यांनी देखील जगीक मार्गांपासून शुद्ध होण्यासाठी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र” करण्याची आवश्‍यकता आहे. (प्रकटीकरण ७:९, १४) अशारितीने ते कोकरा, ख्रिस्त येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्‍वास प्रदर्शित करुन यहोवासमोर शुद्ध भूमिका राखू शकतात. त्यांना संपूर्ण मोठ्या संकटातून, यहोवाच्या भयप्रद दिवसातून बचाव होण्याचे अभिवचन दिले आहे.—सफन्या २:२, ३.

१४. देवाचे लोक नवे व्यक्‍तित्त्व विकसित करतात तसे त्यांनी आज कोणत्या शब्दांना ऐकले पाहिजे?

१४ याजकीय शेषांसोबत या मोठ्या लोकसमुदायाने देवाचे पुढील शब्द ऐकले पाहिजेत: “मी न्याय करावयाला तुम्हाकडे येईन, आणि जादुगार, व्यभिचारी, खोटे साक्षी यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ यांजवर जुलूम करणारे आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू देणारे यांच्याविरूद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन. . . . कारण मी परमेश्‍वर बदलणारा नव्हे.” (मलाखी ३:५, ६) नाही, यहोवाचे दर्जे बदलत नाहीत, म्हणून यहोवाचे भय बाळगून त्याच्या लोकांनी आज सर्व प्रकारची मूर्तीपूजा टाळली पाहिजे व ख्रिस्ती व्यक्‍तित्त्व विकसित करत असताना सत्यशील, प्रामाणिक व उदार असले पाहिजे.—कलस्सैकर ३:९-१४.

१५. (अ) यहोवा कोणते दयाळू आमंत्रण देतो? (ब) यहोवाला “ठकविणे” आपण कसे टाळू शकतो?

१५ यहोवा त्याच्या धार्मिक मार्गांपासून कदाचित दूर गेलेल्यांना आमंत्रण देताना म्हणतो: “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.” या लोकांनी, “आम्ही कोणत्या बाबतीत वळावे?” असे विचारल्यास तो म्हणतो, ‘तुम्ही मला ठकवीत आहात.’ “आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे?” या पुढील प्रश्‍नाचे उत्तर देताना यहोवा सांगतो की, मंदिर सेवेसाठी अत्युत्तम भेट आणण्यात अपयशी ठरण्याद्वारे त्यांनी त्याला ठकविले आहे. (मलाखी ३:७, ८) यहोवाच्या लोकांचा भाग झाल्यामुळे, यहोवाच्या सेवेसाठी आपण शक्‍ती, क्षमता आणि भौतिक मिळकतीचा निश्‍चितच उत्तम भाग अर्पण केला पाहिजे. यारीतीने, देवाला ठकविण्याऐवजी आपण ‘प्रथम त्याचे राज्य आणि नीतिमत्त्व मिळवण्यास झटत राहू या.’—मत्तय ६:३३.

१६. मलाखी ३:१०-१२ मध्ये आपल्याला कोणते उत्तेजन मिळते?

१६ जगाच्या स्वसेवा आणि भौतिकवादी मार्गांचा त्याग करणाऱ्‍यांसाठी एक महान प्रतिफळ ठेवले आहे. मलाखी ३:१०-१२ असे सांगते: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्‍न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीति पाहा.” रसिकता बाळगणाऱ्‍या सर्वांना यहोवा आध्यात्मिक समृद्धता व फलद्रुपतेचे अभिवचन देतो. तो म्हणतो: “सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील; कारण तुमची भूमि मनोरम होईल.” आज संपूर्ण पृथ्वीभरातील देवाच्या लाखो कृतज्ञ लोकांच्याबाबतीत हे शाबीत झाले नाही का?

जीवनाच्या पुस्तकातील सचोटी रक्षक

१७-१९. (अ) र्‌वांडातील गोंधळाचा परिणाम तेथील आपल्या बांधवांवर कसा झाला? (ब) हे सर्व विश्‍वासू बांधव कोणत्या खात्रीने पुढे गेले?

१७ या प्रसंगी आपण र्‌वांडातील आपल्या बंधू व बहिणींच्या सचोटीबद्दल सांगू शकतो. त्यांनी यहोवाच्या उपासनेच्या आध्यात्मिक घरात नेहमीच उत्तम आध्यात्मिक अर्पणे आणली आहेत. उदाहरणार्थ, त्यांच्या २,०८० राज्य प्रचारकांना डिसेंबर १९९३ मधील “ईश्‍वरी शिक्षण” या प्रांतीय अधिवेशनात एकूण ४,०७५ उपस्थितीचे फळ मिळाले. तेथे २३० नवीन साक्षीदारांचा बाप्तिस्मा झाला. त्यानंतरच्या महिन्यात या नवोदितांपैकी सुमारे १५० जणांनी सहाय्यक पायनियर सेवेत आपले नाव दाखल केले.

१८ एप्रिल १९९४ मध्ये जातीय द्वेषाचा उद्रेक झाला तेव्हा राजधानी किगालीतील शहर पर्यवेक्षक व त्यांच्या कुटुंबासहित सुमारे १८० साक्षीदार मारले गेले. किगालीमधील वॉचटावर संस्थेच्या कार्यालयातील सहा अनुवादकांपैकी चार हुतू आणि दोन तुत्सी यांनी धोकेदायक परिस्थितीत काही आठवड्यांपर्यंत काम केले. शेवटी तुत्सींना तेथून पळ काढावा लागला व अंती तपासणी नाक्यावर त्यांना ठार मारण्यात आले. शेवटी संगणक उपकरणाच्या शिल्लक राहिलेल्या वस्तू घेऊन बाकीच्या चौघांनी ग्वामा, झाईरेमध्ये पलायन केले. तेथे त्यांनी एकनिष्ठेने द वॉचटावर नियतकालिकाचे किन्यारवांडा भाषेत भाषांतर चालू ठेवले.—यशया ५४:१७.

१९ हे निर्वासित साक्षीदार अतिशय भयानक परिस्थितीत होते, तरी त्यांनी भौतिक तरतूदींपेक्षा आध्यात्मिक आहार नेहमीच प्रथम मागितला. अनेक देशातील प्रेमळ बांधव मोठा त्याग पत्करुन त्यांना मदत देऊ शकले. या निर्वासितांनी आपल्या बोलण्याद्वारे आणि तणावपूर्ण परिस्थितीत सुव्यवस्थित राहण्याद्वारे आश्‍चर्यकारक साक्ष दिली. खरोखरच ते यहोवाच्या उपासनेत त्यांच्याकडील उत्तम देत राहिले. त्यांनी आपले मत पौलाने रोमकर १४:८ मध्ये व्यक्‍त केल्याप्रमाणे प्रदर्शित केले: “जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो.”

२०, २१. (अ) यहोवाच्या स्मरणवहीत कोणाची नावे लिहिली जात नाहीत? (ब) कोणाची नावे पुस्तकात दिसतात आणि का?

२० यहोवा सचोटी टिकवून सेवा करणाऱ्‍या सर्वांचा अहवाल ठेवतो. मलाखीची भविष्यवाणी पुढे म्हणते: “तेव्हा परमेश्‍वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले; ते परमेश्‍वराने कान देऊन ऐकले, व परमेश्‍वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.”—मलाखी ३:१६.

२१ आज यहोवाच्या नामाचा सन्मान करुन ईश्‍वरी भय दाखवणे किती महत्त्वपूर्ण आहे! असे केल्याने जगाच्या व्यवस्थीकरणाला पाठिंबा देणाऱ्‍यांवर येणारा प्रतिकूल न्यायदंड आपल्याला अनुभवावा लागणार नाही. प्रकटीकरण १७:८ सांगते की, ‘त्यांचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले नाही.’ तर्कसंगतपणे, यहोवाच्या जीवनी पुस्तकात सर्वप्रथम लिहिण्यात आलेले नाव, जीवनाचा प्रमुख प्रतिनिधी, देवाचा स्वतःचा पुत्र येशू ख्रिस्त याचे आहे. मत्तय १२:२१ सांगते: “परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.” येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांना ते सार्वकालिक जीवनाची हमी देते. त्या पुस्तकातील येशूच्या नावासहित आम्हा प्रत्येकाचे नाव घालण्याचा तो केवढा विशेषाधिकार!

२२. यहोवा न्यायदंड बजावतो तेव्हा कोणता फरक उघड असेल?

२२ न्यायदंडाच्यावेळी, देवाच्या सेवकांचे काय होईल? यहोवा मलाखी ३:१७, १८ मध्ये याचे उत्तर देतो: “जसा कोणी आपली सेवाचाकरी करणाऱ्‍या पुत्रावर दया करितो तसा मी त्याजवर दया करीन. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.” हे विभाजन सर्वांसाठी स्पष्ट असेल: दुष्टांना सार्वकालिक नाशासाठी वेगळे केले जाईल आणि नीतिमानांना राज्यात सार्वकालिक जीवनासाठी मान्यता दिली जाईल. (मत्तय २५:३१-४६) अशाप्रकारे, यहोवाच्या मोठ्या व भयप्रद दिवशी मेंढरासमान लोकांचा मोठा लोकसमुदाय बचावला जाईल.

तुम्हाला आठवते का?

◻ यहोवाने बायबल काळात कोणते न्यायदंड बजावले?

◻ आजच्या परिस्थिती प्राचीन काळातील परिस्थितींच्या समांतरतेत कशा आहेत?

◻ मलाखीच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत कोणते शुद्धीकरण घडले आहे?

◻ देवाच्या स्मरणवहीत कोणाची नावे लिहिलेली आहेत?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा