येशूचे जीवन व उपाध्यपण
दाखल्याद्वारे शिक्षण देणे
येशूने परुश्यांना धमकावले तेव्हा तो कफर्णहूम येथे आहे हे कळते. त्या दिवशी काही वेळाने तो घराबाहेर पडून गालील समुद्रकिनारी जातो. तेथे लोकांचा मोठा समुदाय गोळा होतो. येशू तारवात जाऊन बसतो, ते थोडे आत घेतो आणि समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना स्वर्गाच्या राज्याविषयीचे शिक्षण देण्यास आरंभ करतो. यासाठी तो अनेक दाखले किंवा दृष्टांत यांचा वापर करतो. यातील प्रत्येक दाखल्यात सांगितलेली वस्तुस्थिती लोकांच्या परिचयाची आहे.
प्रथम येशू बी पेरणाऱ्याविषयी सांगतो. काही बी वाटेवर पडते व ते पाखरे खाऊन टाकतात. दुसरे बी खडकाळ भूमीवर पडते. येथे रुजलेल्या बीला मूळ धरण्यास माती मिळत नाही तेव्हा ते कडक उन्हात वाळून जाते. आणखी काही बी काटेरी झाडात पडतात आणि काटे त्याची वाढ खुंटवितात. शेवटी काही चांगल्या मातीत पडतात व ते काही शंभरपट तर काही साठपट व काही तीसपट पीक देतात.
दुसऱ्या एका दाखल्यात येशू सांगतो की, देवाचे राज्य हे कोणा माणसाने आपल्या शेतात बी पेरावे तसे आहे. दिवस जातात, त्या माणसाचा निजण्या उठण्याचा नित्यक्रम चालू राहतो, आणि बी मूळ धरते. पण ही क्रिया त्याला कळत नाही. बी रुजते, त्याला पालवी येते व ते वाढून पीक येते. मग पीक तयार झाल्यावर तो माणूस त्याची कापणी करतो.
येशू आणखी एक तिसरा दाखला देतो. यावेळी तो सांगतो की, एक माणूस चांगल्या प्रकारचे बी आपल्या शेतात पेरतो. पण तो झोपलेला असतो तेव्हा त्याचा वैरी शेतात येऊन गव्हामध्ये निदण पेरतो. पालवी येते तेव्हा या माणसाचे चाकर त्याला विचारतात की, त्यांनी निदण काढून टाकावे का? पण तो माणूस म्हणतोः ‘नाही, तुम्ही कदाचित निदणासोबत गहूदेखील उपटाल. तेव्हा कापणीपर्यंत दोघांना वाढू द्या. मग कापणीच्या वेळी मी कापणाऱ्यांना सांगेन की, निदण वेगळे जमा करा व त्यांना जाळून टाका आणि गहू माझ्या कोठारात जमा करा.’
किनाऱ्यावरील लोकसमुदायासोबत आपले संभाषण पुढे चालवून येशू आणखी दोन दाखले सांगतो. तो म्हणतो की, “स्वर्गाचे राज्य” हे एका माणसाने आपल्या शेतात लावलेल्या मोहरीच्या दाण्यासारखे आहे. हा जरी दाण्यात सर्वात बारीक आहे तरी, येशू म्हणतो की, तो वाढला म्हणजे सर्व भाज्यापेक्षा मोठा होतो. त्याचे असे झाड होते की, तेथे पाखरे येऊन फांद्यामध्ये वस्ती करतात.
आज काहीजण आक्षेप घेऊन म्हणतील की, मोहरीपेक्षाही लहान असणारा दाणा आहे. पण येथे आम्ही लक्षात घेतले पाहिजे की, येशू त्यावेळी वनस्पतीशास्त्राचे शिक्षण देत नव्हता. ज्या बियाणांसोबत येशूच्या काळातील गालीलकर परिचित होते त्यात मोहरीचा दाणा सर्वात बारीक होता. त्यामुळेच येशू या दाण्याच्या प्रचंड वाढीविषयीची जी माहिती सांगतो ती लोकांना आवडते.
शेवटी, येशू “स्वर्गाचे राज्य” खमीरासारखे आहे असे म्हणतो. हे खमीर एक स्त्री घेते व ती तीन माप पिठात त्याला मिसळवून त्याचा गोळा करते. काही वेळातच हे खमीर सगळ्या गोळ्यास आंबवून तो फुगविते.
हे पाच दाखले दिल्यानंतर येशू लोकांचा निरोप घेतो व तो राहत असलेल्या घरात येतो. लवकरच त्याचे बारा प्रेषित आणि इतर लोक तेथे येतात. मत्तय १३:१-९, २४-३६; मार्क ४:१-९, २६-३२; लूक ८:१-८.
◆ येशू लोकसमुदायासोबत केव्हा व कोठे दाखल्यांनी बोलला?
◆ येशूने कोणते पाच दाखले लोकांना सांगितले?
◆ मोहरीचा दाणा सर्व दाण्यांमध्ये बारीक असतो असे येशू का म्हणाला?