अध्याय ५
देव कोणाच्या भक्तीचा स्वीकार करतो?
१. एका शोमरोनी स्त्रीला भक्तीबद्दल काय जाणून घ्यायचे होते?
‘देव कोणाच्या भक्तीचा स्वीकार करतो?’ याचे तुम्हाला कधी नवल वाटले का? शोमरोनातील गेरिझिम पर्वताजवळ येशू ख्रिस्तासोबत बोलणाऱ्या त्या स्त्रीच्या मनात हाच प्रश्न असावा. शोमरोनी व यहूदी यांच्यात असणाऱ्या भक्तीच्या फरकाकडे लक्ष आकर्षून तिने असे म्हटले: “आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.” (योहान ४:२०) येशूने त्या शोमरोनी स्त्रीला, देव सर्वच भक्तींचा स्वीकार करतो असे म्हटले का? किंवा त्याने असे म्हटले का की, देवास संतुष्ट करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी करण्याची गरज आहे?
२. शोमरोनी स्त्रीला उत्तर देताना येशूने काय म्हटले?
२ आश्चर्याचा धक्का देणारे येशूचे उत्तर हे होते: “तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व जेरूसलेमेतहि करणार नाही अशी वेळ येत आहे.” (योहान ४:२१) शोमरोनी लोक बऱ्याच काळापासून यहोवाचे भय धरीत आणि गेरिझिम पर्वतावर इतर दैवतांची भक्ती करीत होते. (२ राजे १७:३३) पण, हे किंवा जेरुशलेम खऱ्या भक्तीचे उपासना केंद्र राहणार नव्हते असे आता येशू ख्रिस्ताने म्हटले होते.
आत्म्याने व खरेपणाने भक्ती
३. (अ) शोमरोन्यांना देवाची खरेपणाने ओळख का घडू शकली नाही? (ब) देवाला विश्वासू यहूदी व इतर कसे ओळखू शकत होते?
३ येशू पुढे त्या शोमरोनी स्त्रीला म्हणाला: “तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता; आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करितो; कारण यहूद्यातूनच तारण आहे.” (योहान ४:२२) शोमरोनी लोकांठायी खोट्या धार्मिक कल्पना होत्या व त्यांनी बायबलची केवळ पहिली पाच पुस्तके प्रेरित म्हणून स्वीकारली होती—व यांनाच ते पूर्णपणे शोमरोनी पेन्टेटॉच या सुधारलेल्या आवृत्तीच्या रूपात ओळखत होते. या कारणास्तव, त्यांना देवाची खरेपणाने ओळख घडली नव्हती. तथापि, यहूद्यांना शास्त्रवचनांची समज प्रदान करण्यात आली होती. (रोमकर ३:१, २) विश्वासू यहूद्यांना व जे इतर ऐकतील अशांना देवास ओळखण्यासाठी आवश्यक असणारी माहिती शास्त्रवचनांनी पुरवली.
४. देवाला स्वीकृत वाटणारी भक्ती द्यायची आहे तर यहूदी तसेच शोमरोनी लोकांना, येशूच्या मते, काय करावे लागणार होते?
४ खरे म्हणजे, यहूदी व शोमरोनी लोकांना देवाला संतुष्ट करण्यासाठी स्वतःच्या भक्तीमार्गात बदल करण्याची गरज होती हे येशूने दाखवले. त्याने म्हटले: “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे, आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२३, २४) आम्ही देवाची भक्ती “आत्म्याने” म्हणजे पूर्ण विश्वासाने व प्रेमाने भरलेल्या अंतःकरणापासून केली पाहिजे. देवाचे वचन, बायबलचा अभ्यास करून व त्याने प्रकट केलेल्या सत्यानुसार भक्ती करून त्याची भक्ती “खरेपणाने” करता येणे शक्य आहे. हे करण्यास तुम्ही उत्सुक आहात का?
५. (अ) “भक्ती” याचा काय अर्थ होतो? (ब) देवाने आमच्या भक्तीचा स्वीकार करावा अशी आपली इच्छा आहे तर आपण काय केले पाहिजे?
५ देव खरी भक्ती अपेक्षितो यावर येशूने भर दिला. याद्वारे असे कळते की, भक्तीचे असेही काही प्रकार आहेत जे यहोवाला स्वीकृत नाहीत. देवाची भक्ती करणे म्हणजे त्याला पूज्यबुद्धीने सन्मान देणे व पवित्र सेवा सादर करणे होय. एखाद्या प्रबळ सत्ताधीशाला सन्मान दाखवण्याची तुमची इच्छा असल्यास त्याची सेवा आणि त्याला जे आवडते ते करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. यास्तव, आमची देखील देवाला संतुष्ट करण्याची निश्चित इच्छा आहे. त्यामुळे ‘मला माझ्या पसंतीचा धर्म आहे’ असे म्हणण्यापेक्षा आमची भक्ती देवाने दिलेल्या गरजांनुरूप आहे की नाही याची आपण खात्री केली पाहिजे.
पित्याच्या इच्छेप्रमाणे करणे
६, ७. येशूचे शिष्य असण्याचा काही करीत असलेला दावा तो का ओळखत नाही?
६ आपण मत्तय ७:२१-२३ वाचू आणि सर्व प्रकारातील भक्ती देवास स्वीकृत आहे की काय ते ठरवण्याकरता एका निर्णायक मुद्याचा विचार करू या. येशूने म्हटले: “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते [दुष्ट दुरात्मे] घालविली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.”
७ येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून मान्यता दर्शवणे हे खऱ्या भक्तीमध्ये आवश्यक आहे. परंतु येशूचे शिष्य असण्याचा दावा करणाऱ्या बऱ्याच लोकांच्या भक्तीमध्ये काहीतरी चुकल्यासारखे असेल असे शास्त्रवचने दाखवतात. तो म्हणाला की, काही जण तथाकथित अद्भुत प्रकाराने रोगनिवारणासारखी “महत्कृत्ये” करतील. तथापि, जे महत्त्वपूर्ण असल्याचे येशूने म्हटले ते करण्यात हे लोक उणे पडतील. ते त्याच्या “पित्याच्या इच्छेप्रमाणे” करणार नाहीत. आपल्याला देवाला संतुष्ट करायची इच्छा आहे तर पित्याची इच्छा काय आहे ते जाणून त्याप्रमाणे केले पाहिजे.
अचूक ज्ञान—एक संरक्षण
८. आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचे आहे तर काय करणे जरूरीचे आहे आणि कोणते चुकीचे दृष्टिकोन आपण टाळण्यास हवेत?
८ देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याकरता यहोवा देव व येशू ख्रिस्त या दोघांबद्दल अचूक ज्ञान मिळवणे जरूरीचे आहे. हे ज्ञान सार्वकालिक जीवनाकडे नेते. तर मग, आपण सर्वांनी देवाचे वचन बायबलमधून अचूक ज्ञान मिळवण्याची गोष्ट गंभीरपणे घेतली पाहिजे. काहींचे म्हणणे असे आहे की, आपण जोपर्यंत आपल्या भक्तीमध्ये प्रांजळ व आवेशी आहोत तोपर्यंत काळजी करण्याचे काहीच कारण नाही. इतरांचे म्हणणे आहे: ‘तुम्हाला जितकी कमी माहिती, तितकी कमी अपेक्षा तुमच्याकडून केली जाते.’ तरीपण, बायबल आपल्याला देव व त्याच्या उद्देशांबद्दल आपले ज्ञान वाढवण्याचे उत्तेजन देते.—इफिसकर ४:१३; फिलिप्पैकर १:९; कलस्सैकर १:९.
९. अचूक ज्ञान आमचे कसे संरक्षण करते आणि अशा संरक्षणाची आपल्याला का गरज आहे?
९ अशाप्रकाराचे ज्ञान आमच्या उपासनेत भेसळ होऊ देण्यापासून आमचे रक्षण करते. प्रेषित पौलाने एका विशिष्ट आत्मिक प्राण्याबद्दल म्हटले, जो ‘तेजस्वी देवदूत’ असल्याचे भासवतो. (२ करिंथकर ११:१४) असा हा वेषांतर केलेला आत्मिक प्राणी—सैतान—आपल्याला देवाच्या इच्छेविरुद्ध हालचाल करण्यास ठकवतो. सैतानासोबत असणारे इतर आत्मिक प्राणी देखील लोकांच्या भक्तीमध्ये दूषितपणा भरत आले आहेत, कारण पौलाने म्हटले: “परराष्ट्रीय जे यज्ञ करितात ते देवाला नव्हे तर भुतांना करितात.” (१ करिंथकर १०:२०) या कारणामुळे, वस्तुतः देव ज्याची अपेक्षा धरून आहे त्याची पूर्तता ते करीत नसले तरी, पुष्कळांना वाटले की, ते योग्य मार्गानेच भक्ती करीत होते. अशा लोकांना अशुद्ध खोट्या भक्तीमध्ये फसवण्यात आलेले असते. आपण सैतान व दुरात्म्यांबद्दल नंतर अधिक शिकणार आहोत; पण देवाच्या या शत्रूंनी मानवजातीच्या भक्तीमध्ये दूषितपणा आणला आहे हे खरे.
१०. तुमची पाण्याची टाकी कोणी मुद्दाम दूषित केल्यास तुम्ही काय कराल आणि देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान आपल्याला काय करण्यासाठी तयार करते?
१० कोणीतरी तुमच्या टाकीतील पाणी मुद्दाम दूषित केले असल्याचे तुम्हाला कळाल्यास तुम्ही ते पाणी पीत राहणार का? तुम्ही तर निश्चितपणे त्वरित हालचाल करून सुरक्षित ठेवलेले, शुद्ध पाणी कोठून मिळते का ते शोधून काढाल. याचप्रमाणे, देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान, खरा धर्म ओळखण्यात व ज्यामुळे एखादी भक्ती देवाला अमान्य होते त्या सर्व अशुद्ध गोष्टी नाकारण्यात आपल्याला तयार करते.
शास्त्र असे मनुष्यांचे नियम
११. पुष्कळ यहूद्यांच्या भक्तीमध्ये काय चुकीचे होते?
११ येशू पृथ्वीवर होता तेव्हा पुष्कळ यहूद्यांनी देवाच्या अचूक ज्ञानानुरूप कृती आचरली नाही. या कारणामुळे, त्यांनी यहोवासमोर स्वच्छ भूमिकेत उभे राहण्याची संधी गमावली. त्यांच्याबद्दल पौलाने लिहिले: “मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला [अचूक ज्ञानाला] अनुसरून नाही.” (रोमकर १०:२) देवाची भक्ती कशी करावी याबद्दल, तो जे म्हणतो ते ऐकून घेण्याऐवजी त्यांनी स्वतःच ते ठरवून टाकले.
१२. इस्राएलाची भक्ती कशाने दूषित झाली व त्याचा काय परिणाम झाला?
१२ आरंभाला इस्राएल लोक देवाने दिलेला शुद्ध धर्म आचरत होते, पण नंतर तो मनुष्यांचे शिक्षण व तत्त्वज्ञान यामुळे दूषित झाला. (यिर्मया ८:८, ९; मलाखी २:८, ९; लूक ११:५२) परूशी या यहूदी धर्मनेत्यांना त्यांची भक्ती देवाला स्वीकृत आहे असे वाटत होते; तरी येशूने त्यांना म्हटले: “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे, त्याचा लेख असा: ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करितात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात, ते असतात मनुष्यांचे नियम.’”—मार्क ७:६, ७.
१३. परूश्यांप्रमाणे आपण देखील करण्याचा कसा संभव आहे?
१३ परुशांनी जे केले तेच आपल्याकडून देखील घडण्याची शक्यता आहे का? भक्तीबद्दल देवाने जे म्हटले आहे त्याचे परीक्षण करण्याऐवजी जे धर्मसंप्रदाय वंशपरंपरागत चालत आलेले आहेत त्याचे अनुसरण करीत राहिल्यास हे घडण्याची शक्यता आहे. या खऱ्या धोक्याबद्दल इशारा देताना पौलाने लिहिले: “आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. . . . ते फुसलाविणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.” (१ तीमथ्य ४:१, २) यास्तव, आपली भक्ती देवाला संतुष्ट करते असे निव्वळ मानणे पुरेसे नाही. येशूला भेटलेल्या शोमरोनी स्त्रीप्रमाणे आम्हीही आपली भक्तीची पद्धत आपल्या पालकांपासून उचलली असेल. परंतु, आपण जे करतो त्याला देवाची कृपापसंती आहे याची खात्री करून घेतली पाहिजे.
देवाला दुखवण्याविरुद्ध दक्षता बाळगा
१४, १५. देवाच्या इच्छेबद्दलचे काही ज्ञान आपल्याठायी असले तरी आपण दक्षता घेण्याची का गरज आहे?
१४ आपण काळजी घेतली नाही तर आमच्या हातून देवाला स्वीकृत नसणारे काहीही घडू शकते. उदाहरणार्थ, प्रेषित योहान देवदूताच्या पाया पडून त्याला “नमन करणार” होता. पण देवदूताने त्याला सावध केले: “असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर.” (प्रकटीकरण १९:१०) तर मग, तुमची भक्ती कोणा मूर्तिपूजेच्या प्रकाराने दूषित झालेली नाही याची खात्री करून पाहण्याची गरज आहे का?—१ करिंथकर १०:१४.
१५ देवास संतुष्ट नसणाऱ्या काही धर्मांच्या प्रथांचा अवलंब काही ख्रिस्ती करू लागले तेव्हा पौलाने विचारले: “तर मग, दुर्बळ व निःसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करिता? वार, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित् व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीति वाटते.” (गलतीकर ४:८-११) त्या लोकांनी देवाविषयीचे ज्ञान संपादले होते; पण नंतर त्यांनी धर्मप्रथा व सणाचे काळ या देवाला अमान्य वाटणाऱ्या गोष्टींचे आचरण करण्यामुळे चूक केली होती. पौलाने म्हटले त्याप्रमाणे आपण “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून” घेतले पाहिजे.—इफिसकर ५:१०.
१६. सण व प्रथा देवाला संतुष्ट करतात का याबद्दलचा निर्णय घेण्यात योहान १७:१६ व १ पेत्र ४:३ आम्हास कशी मदत करतात?
१६ देवाच्या नियमांचे उल्लंघन करणारे धार्मिक सण व इतर प्रथांना आपण टाळत असल्याची खात्री करून घेण्यास हवी. (१ थेस्सलनीकाकर ५:२१) उदाहरणार्थ, येशूने त्याच्या अनुयायांबद्दल म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) या जगाच्या घडामोडीत तटस्थता राखण्याच्या नियमाचा भंग करणारे समारंभ व सणांमध्ये तुमचा धर्म समाविष्ट आहे का? किंवा तुमच्या धर्मातील लोक प्रथा व सणांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रेषित पेत्राने वर्णिलेल्या वागणूकीत कधी कधी समाविष्ट होतात? त्याने लिहिले: “परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ति, विषयवासना, मद्यासक्ति, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यात चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.”—१ पेत्र ४:३.
१७. जगाचा आत्मा परावर्तित करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला आपण का टाळले पाहिजे?
१७ आमच्या सभोवताली असणाऱ्या अभक्त जगाच्या आत्म्याला परावर्तित करणाऱ्या प्रथांना टाळण्याच्या गरजेवर प्रेषित योहानाने अधिक भर दिला. योहानाने लिहिले: “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीति करू नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत; आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१५-१७) “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा” सर्वकाळ राहील हे तुम्ही लक्षात घेतले का? होय, आपण देवाच्या इच्छेप्रमाणे करीत राहिलो आणि जगाचा आत्मा परावर्तित करणाऱ्या हालचाली टाळल्या तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्याची आशा राखता येऊ शकते!
देवाच्या उच्च दर्जांनुरूप राहा
१८. वागणूकीसंबंधाने करिंथमधील काहींनी कोणता चुकीचा विचार राखला होता आणि आपल्याला याकडून काय शिकता आले पाहिजे?
१८ देवाला त्याच्या उच्च नैतिक दर्जांना अनुसरणारे असे त्याचे उपासक हवे आहेत. प्राचीन करिंथमधील काहींनी, देव अनैतिक वागणूकीला वागवून घेईल असा चुकीचा ग्रह राखला होता. त्यांची ही विचारसरणी किती चुकीची होती हे आपल्याला १ करिंथकर ६:९, १० चे वाचन केल्याने कळू शकते. आपल्याला देवाची स्वीकृत पद्धतीने भक्ती करायची आहे तर उक्ती व कृती या दोहोंनी आपण त्याला संतुष्ट करावयास हवे. तुमच्या भक्तीचा प्रकार तुम्हाला हे करण्यास समर्थ करतो का?—मत्तय १५:८; २३:१-३.
१९. आम्ही इतरांना जी वागणूक देतो त्याच्यावर खरी भक्ती कशी परिणामित होते?
१९ इतर लोकांसोबत आपण राखलेल्या व्यवहारांमध्ये देखील देवाकडील दर्जे प्रवर्तित होण्यास हवे. आपल्याला लोकांनी जसे वागवावे असे स्वतःला वाटत असते तसेच आपण देखील इतरांना वागवावे असे उत्तेजन येशू ख्रिस्ताने दिले, कारण हा खऱ्या भक्तीचा एक भाग आहे. (मत्तय ७:१२) तसेच त्याने बंधुप्रेमाबद्दल जे म्हटले ते देखील लक्षात घ्या: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) येशूच्या शिष्यांनी एकमेकांवर प्रीती केली पाहिजे आणि सहउपासक व इतरांच्या बाबतीत चांगले तेच केले पाहिजे.—गलतीकर ६:१०.
पूर्ण जिवाची भक्ती
२०, २१. (अ) देव कोणत्या प्रकारच्या भक्तीची अपेक्षा धरतो? (ब) मलाखीच्या काळी इस्राएल लोकांनी केलेल्या भक्तीचा यहोवाने का धिक्कार केला?
२० तुमच्या अंतःकरणात तुम्हाला देवाची स्वीकृत मार्गाने भक्ती करण्याची इच्छा असेल. तर मग, भक्तीबद्दल यहोवाचा दृष्टिकोन तुम्ही ग्रहण केला पाहिजे. शिष्य याकोबाने यावर भर दिला की, आमचा नव्हे तर देवाचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. याकोबाने म्हटले: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथाचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.” (याकोब १:२७) देवाला संतुष्ट करण्याच्या इच्छेने आपण प्रत्येकाने आमची भक्ती ही अभक्त प्रथांनी डागाळलेली नाही किंवा त्याला महत्त्वपूर्ण वाटणारे असे काही आपण चुकवत नाही याची खात्री करण्यासाठी तिचे परीक्षण करून पाहण्याची गरज आहे.—याकोब १:२६.
२१ यहोवाला केवळ शुद्ध व पूर्ण जिवाची भक्ती आवडते. (मत्तय २२:३७; कलस्सैकर ३:२३) इस्राएल राष्ट्राने देवाला यापेक्षा कमी स्वरूपाची भक्ती दिली तेव्हा त्याने म्हटले: “मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करितो; मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे?” ते देवाला अंधळा, लंगडा व आजारी पशू अर्पण करून दुखवत होते; त्याने अशा भक्तीला धिक्कारले होते. (मलाखी १:६-८) यहोवा अत्यंत शुद्ध अशा भक्तीच्या पात्रतेचा आहे व तो सर्वस्वाच्या भक्तीपेक्षा इतर कशाचाही स्वीकार करीत नाही.—निर्गम २०:५; नीतिसूत्रे ३:९; प्रकटीकरण ४:११.
२२. देवाने आमच्या भक्तीचा स्वीकार करावा असे आपल्याला वाटते तर आपण काय करण्याचे टाळू व काय करू?
२२ येशूबरोबर बोलणाऱ्या शोमरोनी स्त्रीला देवाची भक्ती ईश्वरी संमतीच्या मार्गाने करण्याची आस्था वाटत होती असे दिसते. अशीच आमची इच्छा आहे तर आपण सर्व दूषित शिकवणींना व प्रथांना टाळू या. (२ करिंथकर ६:१४-१८) उलटपक्षी, आपण देवाचे अचूक ज्ञान मिळवण्यास व त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकरता झटू या. स्वीकृत भक्तीच्या त्याच्या गरजांना आपण चिकटून राहू या. (१ तीमथ्य २:३, ४) यहोवाचे साक्षीदार नेमके तेच करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि देवाची “आत्म्याने व खरेपणाने” भक्ती करण्यामध्ये तुम्हीही त्यांच्यासोबत सहभागी व्हावे असे ते तुम्हास उबदारपणे आर्जवत आहेत. (योहान ४:२४) येशूने म्हटले: “आपले उपासक असे असावेत याचा पिता शोध घेत आहे.” (योहान ४:२३, NW) तुम्ही अशा प्रकारातील व्यक्ती आहात अशी आशा आम्ही धरतो. शोमरोनी स्त्रीप्रमाणेच तुम्हाला देखील सार्वकालिक जीवन मिळवण्याची इच्छा निःसंशये असेल. (योहान ४:१३-१५) पण, लोक तर वृद्ध होऊन मरत आहेत हे तुम्हाला दिसते. याचे कारण काय ते आम्हाला पुढील अध्याय विवेचित करील.
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
योहान ४:२३, २४ मध्ये दाखवल्याप्रमाणे देव कोणत्या भक्तीचा स्वीकार करतो?
देव एखाद्या विशिष्ट प्रथा किंवा सणांबद्दल संतुष्ट आहे की नाही हे आपण कसे ठरवू शकतो?
भक्ती स्वीकृत होण्याकरता काही गरजा कोणत्या आहेत?
[Full-page picture on page 44]