वाचकांचे प्रश्न
◼ योहान ५:२-७ मध्ये सुचविल्याप्रमाणे आजारी व अपंग हे खरेच बेथेसदाजवळील तळ्यातील हलविलेल्या पाण्यात बुडी मारुन बरे होत होते का? जर होय, तर ते चमत्कार कोणत्या शक्तीने घडत असत?
प्रत्यक्षात, योहान ५:२-९ मध्ये, प्राचीन काळच्या यरुशलेमातील त्या तळ्यात बरे होण्याचे अनेक चमत्कार घडले होते हे सिद्ध करण्यात आले नाही. तरीपण जो एक चमत्कार खात्रीने तेथे घडला होता तो अडतीस वर्षे आजारी असलेला मनुष्य बरा होण्याचा चमत्कार होता व तो येशू ख्रिस्ताने घडवून आणला होता. या चमत्काराची कबुली आम्ही देऊ शकतो, कारण याचा अहवाल प्रेरित शास्त्रवचनात दिलेला आहे. (२ तीमथ्य ३:१६) पण, त्या स्थळी अशा प्रकारचे अनेक चमत्कार घडत असे त्या काळातील यरुशलेमातील अनेक रहिवाशी मानीत असत. हा तोच प्रकार आहे जसे की, आज कित्येक लोक मानतात की, मृतांच्या अवशेषांच्या थडग्यावर रोगपरिहरण होत असते.
आता, आपण पवित्र शास्त्र काय म्हणते व काय म्हणत नाही ते लक्षात घेऊ या. “यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात. त्याजजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, अंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे.—तेथे अडतीस वर्षे दुखणेकरी असलेला कोणी एक मनुष्य होता. येशूने त्याला पडलेले पाहिले, आणि त्याला तसे होऊन आता बहुत काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटलेः ‘तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?’ त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिलेः ‘महाराज, पाणी उसळले असता मला तळ्यात सोडावयास माझा कोणी मनुष्य नाही; आणि मी जात आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्यापुढे उतरतो.’ येशूने त्याला म्हटलेः ‘उठ, आपली बाज उचलून चालावयास लाग.’ तेव्हा तो मनुष्य तत्काळ बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला.”—योहान ५:२-९.
यात उल्लेखिण्यात आलेले तळे, “मेंढरे दरवाजाजवळ” होते, जे यरुशलेमाच्या ईशान्येकडे मंदिर पर्वताच्या जवळ असावे. (नेहम्या ३:१; १२:३९) अलिकडील उत्खननात दोन तळी त्यांच्यावरील पडव्यांसह त्यांच्या मूळ ठिकाणी सापडली. यावरुन हे सूचित झाले की, पडव्या असलेली इमारत, योहान ५:२ मधील उल्लेखानुसार हेरोदाच्या काळात तेथे असावी. पण तेथे काय घडत असावे असे त्या काळच्या लोकांना वाटे?
वर अवतरीत केलेल्या योहान ५:२-९ मधील वचनात असणारा डॅश लक्षात घ्या. काही पवित्र शास्त्र आवृत्तीत योहान ५:४ वचनाला अधिक मजकूर जोडलेला आढळतो. त्यात असे म्हटले आहेः “देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरुन पाणी हलवीत असे; आणि पाणी हलविल्यावर जो प्रथम त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.”
तथापि, अनेक आधुनिक पवित्र शास्त्र आवृत्त्या, त्याचप्रमाणे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स हे देखील तो मजकूर गाळते. का बरे? कारण बहुतेक तो योहानाच्या शुभवर्तमानात नसावा. द जरुसलेम बायबल आपल्या तळटिपेत म्हणते की, “बेस्ट विटनेसेस” ने हा भाग गाळलेला आहे. “बेस्ट विटनेसेस” म्हणजे कोडेक्स सायनाटिक्स आणि द व्हॅटिकन १२०९ (दोन्ही आवृत्ती ४थ्या शतकातील). याचप्रमाणे सिरियाक व लॅटिनमधील सुरवातीच्या आवृत्त्या देखील हा भाग गाळतात. ‘बेस्ट लिखाणात ४थे वचन नसल्याचा उल्लेख केल्यावर’ द एक्झपोझिटर्स बायबल कॉमेंट्री पुढे म्हणतेः “वेळोवेळी उसळणाऱ्या पाण्याबद्दलचा फसवा देखावा बनवून त्याला सर्वसाधारणपणे, त्यात बरे करण्याची शक्ती आहे असे भासविले जाई; व तेच विचार चोहोकडे पसरले.”
अशाप्रकारे, पवित्र शास्त्र प्रत्यक्षात असे म्हणतच नाही की, बेथेसदाजवळील तळ्यात अद्भूत चमत्कार करण्यास देवाचा दूत येत असे. बरे तर, पाणी जेव्हा हलत असे तेव्हा अद्भूतरित्या बरे करण्याचे प्रकार घडलेत का? नाही. व तसे आज कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. कदाचित, परंपरागत समज रुळलेली असावी की, तेथे आजारी किंवा अपंग बरे झाले असावेत. अशा आवया पसरल्यामुळे ज्या कोणाला आपल्या दुःखण्यापासून बरे व्हावेसे वाटत होते ते तेथे जमू लागत. हीच गोष्ट आजही आपल्या प्रत्ययास आलीच असेल की अनेक स्थळी, जरी दैवी परिहरणाचा कोणताही लेखी पुरावा नसला तरी असे घडते आहे.
तथापि, आम्ही बेथेसदाजवळच्या तळ्यावर देवाच्या पुत्राने जो चमत्कार केला त्याच्याबद्दल संशय बाळगण्याची गरज नाही. कारण, पाण्यात न उतरविता त्या माणसाला क्षणार्धात थोर वैद्याने बरे केले. जिच्याविषयीचे लिखाण करण्यात आले त्या त्याजठायी असलेली क्षमता, लवकरच स्थापित होणाऱ्या हजार वर्षांच्या राज्य कारकिर्दीत तो जी रोगनिवारक कृत्ये करणार आहे त्याविषयी आशादायी राहण्यास पुरेसे कारण पुरविते. विश्वासू मानवांना तो परत पूर्णत्वात पोहंचविण्यासाठी हरप्रकारचे इलाज व सहाय्य करील.—प्रकटीकरण २१:४, ५; २२:१, २.