वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 २/१ पृ. १०-१४
  • येशूच्या पावलांना अनुसरणारे लोक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूच्या पावलांना अनुसरणारे लोक
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • रक्‍ताचे पावित्र्य
  • उत्तम नैतिकता
  • तटस्थता
  • घरामध्ये
  • प्रेमामुळे आज्ञाधारक
  • त्याच्या पावलास अनुसरण्याचे आव्हान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • रक्‍ताविषयीचा इश्‍वरी आदर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • देवाबरोबर चालणे—पहिली पावले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 २/१ पृ. १०-१४

येशूच्या पावलांना अनुसरणारे लोक

“आम्ही एकाच आत्म्याने सारख्याच पावलांनी चाललो नाही काय?”—२ करिंथकर १२:१८.

१. कोणा यहोवाच्या साक्षीदारास ओळखणे तितके कठीण सहसा का वाटत नाही?

“एक वर्ग या नात्याने ते सभ्य, जबाबदारीने वागणारे आहेत; ते शाळेतील अभ्यासात देखील चांगले आहेत. हे इतर गटाबद्दल म्हणता येणार नाही.” असे अमेरिकेच्या एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविले. पण, ते कोणाविषयी बोलत होते? यहोवाचे साक्षीदार असणाऱ्‍या मुलांबद्दल, जे त्यांच्या शाळेत विद्यार्थी होते. होय, पुष्कळांनी हे निरिक्षिले आहे की यहोवाचे साक्षीदार व त्यांची मुले इतर साक्षीदार आहेत त्याप्रमाणेच दिसून येतात. ते विश्‍वास व वागणूकीच्या बाबतीत अप्रतिम ऐक्य राखून आहेत हे गेल्या कित्येक वर्षांपासून अधिकपणे दिसून आले आहे. याच कारणास्तव आज साक्षीदारांची ओळख मिळणे कठीण नाही.

२. आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीचा लक्षवेधी गुण कोणता होता, आणि याविषयी पौलाला काय म्हणायचे होते?

२ या फुटीर जगतात यहोवाच्या साक्षीदारांत आढळणारे ऐक्य काहीसे असामान्य वाटते. पण जेव्हा आम्ही हे ध्यानात घेतो की या सर्वांचा येशूच्या पावलास अनुसरण्याचा प्रयत्न असतो तेव्हा ते समजणे तेवढे कठीण वाटणार नाही. (१ पेत्र २:२१) असे हे ऐक्य पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचा लक्षवेधी गुण होता. एके प्रसंगी पौलाने करिंथच्या मंडळीला असा सल्ला दिलाः “बंधुजनहो, आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्या नामाने मी तुम्हास विनंति करतो की तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे, म्हणजे तुम्हात फुटी होऊ नयेत. तुम्ही एकचित्ताने व एकमताने यथास्थित व्हावे.” (१ करिंथकर १:१०) याखेरीज, पौलाने, ख्रिस्ती ऐक्य राखण्याची इच्छा न धरणाऱ्‍या लोकांसोबत कसा व्यवहार राखावा याच्याबद्दल देखील प्रेरित सल्ला दिला.—पहा रोमकर १६:१७; २ थेस्सलनीकाकर ३:६.

३, ४. पौलाने, तो व तीत यांजमधील ऐक्याचे कसे वर्णन केले, आणि या ऐक्यामागील आधार कोणता होता?

३ इ. स. ५५ च्या सुमाराला पौलाने तीताला करिंथमध्ये पाठवून यहुदीयात राहणाऱ्‍या गरजवंत बांधवांना सहाय्य करता यावे म्हणून अनुदान गोळा करण्याकरता आणि तसेच हे करिंथमधील बांधव पौलाच्या सल्ल्यास अनुसरून कशी प्रतिक्रिया दाखवीत होते ते पाहण्यास लावले. नंतर करिंथकरांना पौलाने पत्र पाठविले तेव्हा तीताने दिलेल्या भेटीच्या संदर्भाचा उल्लेख करून त्याने त्यांना म्हटलेः “तीताने तुम्हापासून स्वार्थ साधला काय? आम्ही एकाच आत्म्याने सारख्याच पावलांनी चाललो नाही काय?” (२ करिंथकर १२:१८) तर मग, ते “एकाच आत्म्याने” व “सारख्याच पावलांनी” चालले या पौलाच्या म्हणण्याचा काय अर्थ होत होता बरे?

४ त्यावेळी पौल, त्याच्या व तीतामध्ये जे ऐक्य राखले गेले होते त्याचा उल्लेख करीत होता. तीत पौलाचा अधूनमधून यात्रेतील सहकारी राहिला होता आणि याला पौलाकडून याद्वारे बरेच काही शिकायला मिळाले होते यात काही संशय नाही. पण या दोघांमध्ये नांदत असणारे ऐक्य यापेक्षाहि अधिक महत्वपूर्ण गोष्टीवर आधारलेले होते. या दोघांनीही यहोवासोबत चांगले नातेसंबंध राखले होते आणि वस्तुतः दोघेही ख्रिस्ताच्या पावलास अनुसरीत होते हा त्यांच्या ऐक्यामागील आधार होता. तीताने पौलाचे अनुकरण केले आणि पौल ख्रिस्ताचे अनुकरण करीत होता. (लूक ६:४०; १ करिंथकर ११:१) तद्वत, ते येशूच्या आत्म्यात आणि त्याच्या पावलास अनुसरुन चालत होते.

५. पौल व तीत जसे “एकाच आत्म्याने” व “सारख्याच पावलांनी” चालले त्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करणाऱ्‍या आजच्या लोकांविषयी कोणती अपेक्षा धरता येईल?

५ या कारणास्तव आजच्या २० व्या शतकातील ख्रिस्तीजन हे पौल व तीत याजप्रमाणेच “एकाच आत्म्याने” व “सारख्याच पावलांनी” चालत राहून अप्रतिम ऐक्याचा आनंद घेत आहेत हे नवलाईचे नाही. पण तेच, नामधारी ख्रिस्तींमधील फुटीर वृत्ति त्यांना बनावट ख्रिस्ती असल्याचे आणि ते करीत असलेल्या दाव्याप्रमाणे त्यांच्या गुरुच्या पावलांस अनुसरत नसल्याचे स्पष्ट करते. (लूक ११:१७) खऱ्‍या व नामधारी ख्रिस्ती लोकातील हा ठळक फरक विविध मार्गांनी दाखवून देता येईल. पण यापैकी आपण चार प्रकारांची माहिती घेऊ.

रक्‍ताचे पावित्र्य

६, ७. (अ) येशूच्या पावलांना अनुसरण्यामध्ये रक्‍ताविषयीचा कोणता अचूक दृष्टीकोण समाविष्ट आहे? (ब) यहोवाचे साक्षीदार व जे रक्‍त घेण्याचे नाकारतात त्यांच्यामध्ये कोणता फरक आहे?

६ इ. स. ४९ च्या सुमारास पहिल्या शतकाच्या मंडळीच्या नियमन मंडळाने एक पत्र सर्व मंडळ्यांना पाठविले. या पत्रात, यहुद्देतर ख्रिस्तीजनांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करावे का, या प्रश्‍नाचे उत्तर होते. पत्रात म्हटले गेलेः “पुढील अगत्याच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त भार घालू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य दिसले; म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्‍त, गुदमरुन मेलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी.” (प्रे. कृत्ये १५:२८, २९) त्या “अगत्याच्या गोष्टीं”मध्ये रक्‍तापासून दूर राहाणे होते हे लक्षात घ्या. येशूच्या पावलास अनुसरणे याचा अर्थ आपल्या शरीरात मुखावाटे किंवा इतर कोणत्याहि प्रकाराने रक्‍त न घेणे हा होत होता.

७ तथापि, ख्रिस्ती धर्मराज्यात या तत्वाचा, रक्‍त संक्रमणाच्या सर्रास वापराने धडधडीत भंग केला जात आहे. आता काही अंशी हे खरे आहे की रक्‍त संक्रमणामुळे आरोग्यास धोका संभवत असतो हे काहींना कळू लागले आहे व त्यामुळे ते वैद्यकीय कारणास्तव ते स्विकारीत नाहीत. हे खरे आहे कारण संक्रमित होणाऱ्‍या रक्‍तामुळे एडस्‌ रोगाची लागण होत असते हे दिसून आले आहे. पण आज, देवाच्या नियमांना आदर दाखवून एक गट या अर्थी कोण रक्‍ताच्या पावित्र्यास उंचावून आहेत? कोणी रोगी रक्‍तसंक्रमण घेण्यास विरोध दर्शवितो तेव्हा तो कोण असल्याचे डॉक्टर सहसा अनुमान काढीत असतात बरे? डॉक्टर हेच बहुधा म्हणत नसतात काः ‘तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी आहात असे दिसते’?

८. याविषयीच्या देवाच्या नियमाचे पालन करण्याचा दृढ निश्‍चय राखल्यामुळे इटलीतील एका साक्षीदाराला कसा आशीर्वाद मिळाला?

८ अँटोनिटा ही स्त्री इटलीत राहते. सुमारे आठ वर्षांआधी ती खूपच आजारी होती आणि तिच्या रक्‍ताची तपासणी इतकी क्षीण दिसली की डॉक्टरांनी म्हटले की जीव वाचविण्यासाठी तिला रक्‍त घेतलेच पाहिजे. तिने नकार दाखवला तेव्हा डॉक्टर व तिचे नातेवाईक तिच्या विरुद्ध झाले. तिच्या दोन लहान मुलांनी देखील तिला ही गळ घातलीः “मम्मा, तुझे आमच्यावर प्रेम आहे ना, तर मग रक्‍त घे बघू.” तरीपण अँटोनियाने विश्‍वासू राहण्याचा ठाम निश्‍चय धरला आणि खरेच तिला मृत्यु आला नाही. तरीपण तिची प्रकृति गंभीरच होती तेव्हा डॉक्टरांनी म्हटलेः “अद्याप ती जिवंत का आहे ते आम्हाला सांगता येणार नाही.” पण जेव्हा आक्षेप घेतला जाणार नाही असा उपचार अवलंबिला गेला तेव्हा तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. हे बघून दुसऱ्‍या डॉक्टरांनी म्हटलेः “मला तर विश्‍वासच बसत नाही—एवढ्या अल्प वेळात तुमची सुधारणा झालीच नसती, होय, आम्ही जरी दिवसभर रक्‍त संक्रमित केले असते तरीही हा परिणाम दिसला नसता.” आता ही स्त्री स्वतः नियमित पायनियर आहे आणि तिची १२ व १४ वयाची दोन मुले सत्यात चांगली प्रगति करीत आहेत. अँटोनियाने रक्‍ताच्या पावित्र्याविषयीच्या “अगत्याच्या गोष्टी” मोठ्या निर्भिडपणे संभाळल्या. हाच दृष्टीकोण सर्व यहोवाचे साक्षीदार येशूच्या पावलास अनुसरत असताना ग्रहण करून आहेत.

उत्तम नैतिकता

९. येशूच्या पावलास अनुसरण्यामध्ये आणखी कोणत्या ‘अगत्याच्या गोष्टी’चा समावेश आहे, आणि जे हा नियम पाळत नाहीत अशांचे काय होते?

९ पहिल्या शतकातील नियमन मंडळाच्या त्या पत्रात ज्या “अगत्याच्या गोष्टीं”विषयीचा उल्लेख करण्यात आला होता त्यात ‘तुम्ही जारकर्म वर्ज्य करावे’ असेही सांगण्यात आले होते. याविषयीचे अधिक स्पष्टीकरण पौलाने करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात केले. त्याने म्हटलेः “जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, चैनबाज, पुमैथुनकारी . . . यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) यहोवा देवाची सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे अशांनी या सवया आपणातून दूर कराव्या म्हणून ख्रिस्तीजन त्यांना मदत देतात. याच्या पाशात सापडलेल्या मंडळीतील सदस्यांनाहि, त्यांनी मागे वळाल्यावर व योग्य तो पश्‍चाताप व्यक्‍त केल्यावर स्वतःला शुद्ध करण्याची मदत करण्यात येते. (याकोब ५:१३-१५) पण तेच कोणी ख्रिस्ती या घाणेरड्या सवयात गढला आणि तो पश्‍चाताप करण्याचे नाकारतो अशाला सरळपणे पवित्र शास्त्राचा नियम लागू करण्यात येतो. पौलाला इश्‍वरी प्रेरणेने हे सांगण्याची चालना देण्यात आली की, “बंधु म्हटलेला असा कोणी जारकर्मी . . . असला तर तशाची संगत धरू नये. तुम्ही आपणामधून त्या दुष्टाला बाहेर घालवा.”—१ करिंथकर ५:११, १३.

१०, ११. (अ) ख्रिस्ती धर्मराज्यातील खालावलेल्या नैतिक दर्जाच्या बाबतीत कोण जबाबदार आहेत व का? (ब) यहोवाचे साक्षीदार, एक गट या नात्याने उच्च नैतिक दर्जांचे अवलंबन करून आहेत हे फिलिपाइन्स मधील एका माणसाच्या अनुभवावरुन कसे प्रदर्शित होते?

१० एवढे स्पष्ट रुपाचे शिक्षण असताना देखील ख्रिस्ती धर्मराज्याने स्वतःला अनैतिकतेने डागविले आहे. या परिस्थितीला, इश्‍वरी दर्जाला धाब्यावर बसविणारे धर्मपुढारीच जबाबदार आहेत. याचप्रमाणे, जे पवित्र शास्त्राच्या दर्जाचा नुसता तोंडपूजेपणा करतात पण आपल्या मंडळीत तो राबवीत नाहीत तेहि याला जबाबदार आहेत. तरीपण, याबाबतीत यहोवाचे साक्षीदार एक वर्ग या अर्थी येशूच्या पावलांचे अनुकरण करीत आहेत.

११ फिलिपाइन्समधील जोसचे उदाहरण घ्या. १७ वर्षांचा असताना त्याची गुंड आणि जुगारी अशी ख्याति झाली होती. तो खूपच दारु पीत असे, अनैतिक जीवन जगे आणि चोरीकरता तर कित्येकदा तुरुंगात गेला. नंतर त्याचा यहोवाच्या साक्षीदारांसोबत संपर्क आला. “पवित्र शास्त्राच्या अभ्यासाने माझे जीवन पूर्णपणे बदलले गेले,” असे तो म्हणतो. “आता मी मद्यपान व धुम्रपान करीत नाही आणि मी माझा राग काबूत ठेवण्यास शिकून घेतले आहे. माझा विवेक आता स्वच्छ आहे. माझी एकच बायको आहे. मी माझ्या शेजाऱ्‍याच्या आदरास पात्र बनलो आहे. मला ते पूर्वी म्हणत, ‘उनाडकी करणारा जोस.’ पण आता ते मला ‘यहोवाचा साक्षीदार बनलेला जोस’ असे म्हणतात. सध्या मी माझ्या मंडळीत वडील व नियमित पायनियर आहे आणि येथेच माझा मुलगा व भाचा उपाध्य सेवक आहेत.” हा जोस व असे लाखो यहोवाचे साक्षीदार नैतिकदृष्ट्या शुद्ध असणारे ख्रिस्ती असे येशूच्या पावलांस अनुसरत आहेत.

तटस्थता

१२. योहानाच्या १७ व्या अध्यायात लिखित असणाऱ्‍या येशूच्या प्रार्थनेत त्याने अस्सल ख्रिश्‍चनांच्या कोणत्या प्रवृत्तीचा उल्लेख केला?

१२ आपल्या शिष्यांसमवेत राहून येशूने आपल्या जीवनाच्या शेवटल्या संध्याकाळी जी दीर्घ प्रार्थना केली तिजमध्ये आपले अनुयायी ‘आपल्या पावलास अनुसरण्यात’ आणखी काय करतील ते त्याने स्पष्ट केले. या शिष्यांविषयी बोलताना तो म्हणालाः “जसा मी या जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) याचा अर्थ, ख्रिस्तीजन तटस्थ आहेत असा होतो. राजकारण व राष्ट्रीय झगडे यात भाग घेण्याऐवजी ते मानवजातीच्या समस्यांचा एकमात्र इलाज असणाऱ्‍या देवाच्या राज्याविषयी माहिती देतात.—मत्तय ६:९, १०; योहान १८:३६.

१३, १४. (अ) तटस्थतेच्या बाबतीत ख्रिस्ती धर्मराज्य यहोवाच्या साक्षीदारांपेक्षा कसा वेगळा दिसतो? (ब) जपानमध्ये राजकारणी गोष्टींच्या बाबतीत एका साक्षीदाराने तटस्थता राखल्यामुळे त्याचा सबंध बंधुवर्गास कसा फायदा मिळाला?

१३ तटस्थतेच्या या तत्वाचा ख्रिस्ती धर्मराज्यातील बहुतेक सदस्यांना विसर पडलेला दिसतो. यांना धार्मिक सदस्यत्वापेक्षा राष्ट्रीय उगम मोठ्या महत्वाचा वाटतो. व्यापारविषयक लिखाण करणारे स्तंभलेखक माईक रोयको दर्शवितात की, “ख्रिश्‍चनांनी” “इतर ख्रिश्‍चनांसोबत युद्ध करण्याच्या दृष्टीकोनाबाबत कधीही गंभीर विचार केलेला दिसत नाही,” व पुढे म्हणतातः “त्यांनी तो केला असता तर युरोपात जी युद्धे भडकली ती कधीच घडली नसती.” परंतु, यहोवाचे साक्षीदार युद्धकाळात ख्रिस्ती तटस्थता राखून आहेत ही जगजाहीर गोष्ट आहे. याशिवाय येशूच्या पावलास अनुसरणारे या अर्थी ते सामाजिक व राजकारणी वादविषयाच्या बाबतीत देखील तटस्थ आहेत. अशाप्रकारे त्यांची अप्रतिम जगव्याप्त एकता बिघडविली जात नाही.—१ पेत्र २:१७.

१४ तटस्थता राखल्यामुळे कधी कधी अनपेक्षित परिणामही प्राप्त होतात. उदाहरणार्थ, उत्तर जपानच्या सुगारु प्रांतात निवडणूकांकडे खूपच गंभीरतेने पाहिले जाते. तरीपण अर्थखात्याच्या एका स्थानिक सरकारी कार्यालयात काम करणाऱ्‍या तोशियो या उप-व्यवस्थापकांनी आपल्या विवेकाखातर, नगराध्यक्षाच्या पुनर्निवडणूकीच्या मोहिमेत सहभागी होण्याचे नाकारले. याचा परिणाम असा झाला की त्यांना कालवा प्रकल्पात अगदी खालच्या पातळीच्या दर्जावर स्थलांतरित केले गेले. पण एका वर्षातच नगराध्यक्षांना भ्रष्टाचाराच्या कारणामुळे अटक झाली व राजीनामा देण्यास प्रवृत्त केले गेले. नव्या नगराध्यक्षांची निवड झाली. यांना तोशियो यांच्या पदावरून कमी करण्याचे प्रकरण समजले तेव्हा त्यांनी त्यांना मोठ्या शासकीय पदावर आणले. यामुळे तोशियोच्या ख्रिस्ती बांधवांना मोठा आशीर्वाद मिळाला. तो कसा? तोशियो म्हणतात की व्यायामशाळा क्रिडांशिवाय इतर कारणासाठी वापरण्याची परवानगी मिळणे मोठे दुर्लभ आहे. पण त्यांच्या आताच्या पदामुळे, त्यांच्या शब्दात सांगायचे तर, “यहोवाने या व्यायामशाळा तीन प्रांतिय अधिवेशनांसाठी व चार विभागीय संमेलनांसाठी वापरण्याकरता माझा उपयोग करून घेतला.” शेवटी ते म्हणतातः “आम्ही विश्‍वासू राहिलो तर यहोवा आमचा उपयोग अनपेक्षित रितीने करुन घेण्यासाठी विविध मार्ग उघडे करतो.”

घरामध्ये

१५. कौटुंबिक नातेसंबंधाच्या बाबतीत आपल्या अनुयायांनी आपल्या पावलांस अनुसरावे म्हणून ख्रिस्ताने कोणता नमुना घालून दिला?

१५ ख्रिश्‍चनांनी ‘येशूच्या पावलास अनुसरण्याचे’ आणखी एक क्षेत्र आहे घर. घरगुती नातेसंबंधाच्या विषयीचा नमुना देताना पवित्र शास्त्र येशूचे उदाहरण देऊन म्हणतेः “ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. बायकांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या नवऱ्‍याच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे. . . . जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे बायकांनी सर्व गोष्टीत आपापल्या नवऱ्‍याच्या अधीन असावे. नवऱ्‍यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले तशी तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा.”—इफिसकर ५:२१-२५.

१६, १७. (अ) घरगुती नातेसंबंधाच्या बाबतीत ख्रिस्ती धर्मराज्यात केवढी वाईट परिस्थिती दिसते? (ब) घरातील नातेसंबंध केवळ कशाने सुधारता येतात आणि हे ब्राझिलमध्ये राहणाऱ्‍या एका विवाहीत जोडप्याच्या अनुभवाद्वारे कसे दिसून आले?

१६ ख्रिस्ती धर्मराज्याने बहुतांशी या सूचनेकडे दुर्लक्ष केले आहे व त्यामुळे त्याच्या कुटुंबांचे विभाजन झाल्याचे दिसत आहे. मोडकळलेली घरे सर्वसाधारण झाली आहेत आणि पालक-मुले यांच्यातील झगडा खोलवर गेलेला आहे. “कुटुंब अधोगतीला जात आहे,” असे काही वर्षांआधी एका मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी परिक्षिले होते. धोका संभवलेल्या कुटुंबांना एकत्र राखण्यात मुलांचे चिकित्सक, वैवाहिक सल्लागार आणि मानसरोग चिकित्सक यांना अल्प यश येत आहे. पण यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्रीय तत्वांचे अवलंबन करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात व त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध चांगले राखत असण्याविषयीची ख्याति त्यांनी मिळविली आहे.

१७ याचे एक उदाहरण पाहू जाता, आल्डमर हे ब्राझिलच्या लष्करी पोलिस दलात कॅप्टनच्या खालोखाल असणाऱ्‍या दर्जावर अधिकारी होते, पण त्यांना कौटुंबिक समस्या भेडसावत होत्या. बायकोने त्यांना सोडून दिले आणि कायदेशीर फारकत घेतली. ते खूपच मद्य घेऊ लागले आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. कालांतराने, यहोवाचे साक्षीदार असणाऱ्‍या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासोबत पवित्र शास्त्राविषयी बोलणी केली. त्यांना ते आवडले व त्यांनी अभ्यास सुरु केला. यहोवाच्या साक्षीदारांची ख्याति असलेल्या तटस्थतेच्या भूमिकेस अनुसरुन आपले जीवन आणण्यासाठी त्यांनी लष्करातून सेवानिवृत्तीची विनंति केली. आल्डमार व त्यांच्या बायकोने, आल्डमार शिकत असलेल्या पवित्र शास्त्र तत्वांच्या अनुषंगाने आपल्यातील वैवाहिक मतभेद संपुष्टात आणले. आज ते येशूच्या पावलास अनुसरीत आहेत आणि यहोवा देवाची नियमित पायनियर या नात्याने सेवा करीत आहेत.

प्रेमामुळे आज्ञाधारक

१८. (अ) यहोवाचे साक्षीदार आज आध्यात्मिकदृष्ट्या का आशीर्वादित आहेत? (ब) यशया २:२-४ ची सध्या कशी पूर्णता होत आहे?

१८ यहोवाचे साक्षीदार ख्रिस्त येशूच्या आत्म्यात आणि पावलास ऐक्याने अनुसरीत आहेत हे दृश्‍यमान आहे. यामुळे त्यांना वैयक्‍तिकपणे आणि सामूहिकपणे आशीर्वाद प्राप्त होत आहेत. (स्तोत्रसंहिता १३३:१-३) त्यांच्यावरील इश्‍वरी आशीर्वादांचा प्रत्यय पाहून अनेक प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना यशया २:२-४ मधील भविष्यवादाच्या अनुषंगाने हालचाल करण्याची चालना लाभली आहे. गेल्या पाच वर्षांत ९,८७,८२८ जणांनी समर्पणाकरता आवश्‍यक पावले उचलली आणि स्वतःला पाण्याच्या बाप्तिस्म्यासाठी सादर केले. “मोठे संकट” कोसळण्याआधी आणखी कितीजण अशी पावले उचलतील त्यांच्या संख्येवर यहोवाने बांध घातलेला नाही.—प्रकटीकरण ७:९, १४.

१९. (अ) यहोवाची सेवा करण्यामुळे कोणते लाभ दृष्टीस पडतात पण यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहण्यास हवे? (ब) यहोवाच्या आज्ञांचे पालन आम्ही कोणत्या मुलभूत कारणांमुळे करतो?

१९ वरील अनुभव दाखवितात त्यावरुन, देवाच्या लोकांना जे आध्यात्मिक आशीर्वाद अनुभवावयास मिळतात त्यासोबत त्याचे प्रत्यक्ष लाभही दिसतात. उदाहरणार्थ, धुम्रपान नाकारल्यामुळे, नैतिक जीवन व्यतित केल्यामुळे आणि रक्‍ताच्या पावित्र्याविषयी आदर दाखविल्यामुळे त्यांना विशिष्ठ आजार जडण्याचे भय राहात नाही. तसेच सत्याच्या अनुषंगाने जीवन व्यतित केल्यामुळे त्यांना आर्थिक, सामाजिक आणि घरगुतीरित्या लाभ मिळतो. असे हे दृश्‍य लाभ यहोवाकडिल आशीर्वाद आहेत व ते यहोवाचे कायदे केवढे व्यावहारिक आहेत ते दाखवतात. तरीपण, हे व्यावहारिक लाभ मिळविण्यासाठीच केवळ देवाच्या नियमांचे पालन करावे हे त्यामागील प्रमुख कारण नव्हे. खरे ख्रिस्ती यहोवाचे आज्ञापालन करतात ते त्याच्यावरील प्रीतीमुळे, तो त्यांच्या भक्‍तीचा हक्कदार आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करणे हीच योग्य गोष्ट आहे म्हणून करतात. (१ योहान ५:२, ३; प्रकटीकरण ४:११) लोक देवाची उपासना केवळ स्वार्थी कारणामुळे करीत आहे हा दावा सैतान करीत असतो.—पहा इयोब १:९-११; २:४, ५.

२०. प्राचीन काळच्या तीन इब्री विश्‍वासू साक्षीदारांनी प्रदर्शित केलेल्या आत्म्याप्रमाणेच आज यहोवाचे साक्षीदार कसे चालत आहेत?

२० दानीएलच्या काळी हयात राहिलेल्या तीन युवक इब्री साक्षीदारांप्रमाणेच आधुनिक काळातील यहोवाचे साक्षीदार तसा आत्मा प्रदर्शित करून आहेत. त्यांना पेटलेल्या भट्टीत टाकण्याची भीती घालण्यात आली तेव्हा यांनी म्हटलेः “ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे. महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडवील. ते कसेही असो, [म्हणजे, त्याने जरी आम्हावर मरण येऊ दिले तरी] पण महाराज, हे आपण पक्के समजा की, आम्ही आपल्या दैवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही.” (दानिएल ३:१७, १८) त्वरीत असे फायदे वा परिणाम दृश्‍यमान होत नसले तरीही यहोवाचे साक्षीदार येशूच्या पावलांस अनुसरण्याचे चालूच ठेवतील. कारण देवाच्या नव्या जगतात सार्वकालिक जीवन खात्रीचे आहे हे त्यांना ठाऊक आहे. काहीही झाले तरी एक संघटित लोक या अर्थी ते “एकाच आत्म्याने” आणि “सारख्याच पावलांनी” नित्याने चालत राहतील.

तुम्हाला विवेचीत करता येईल का—

◻ यहोवाचे साक्षीदार ऐक्यात का आहेत?

◻ यहोवाचे साक्षीदार नामधारी ख्रिश्‍चनांपेक्षा कोणकोणत्या बाबतीत वेगळे आहेत?

◻ खरे ख्रिस्ती यहोवाची सेवा का करतात त्याचे प्रमुख कारण कोणते आहे?

◻ यहोवाचे आज्ञापालन करण्यामुळे परिणामित होणाऱ्‍या फायद्यांविषयी देवाचे लोक कोणता दृष्टीकोण धरतात?

[१० पानांवरील चित्रं]

कोणी रुग्ण रक्‍तसंक्रमण घेण्याचे नाकारतो तेव्हा तो बहुधा यहोवाचा साक्षीदार आहे असेच समजले जाते

[१२ पानांवरील चित्रं]

युद्धास धर्मपुढाऱ्‍यांचा आशीर्वाद असतो या कारणामुळे ख्रिस्ती आहोत असा दावा करणारे युद्ध करण्याच्या दृष्टीकोनाबाबत कधीही गंभीर विचार करीत असलेले दिसत नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा