वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मी “देवाकडे आशा बाळगतो”
    टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१७ | डिसेंबर
    • १५. येशूला “प्रथमफळ” असं का म्हणण्यात आलं आहे?

      १५ येशूचं आत्मिक स्वरूपात पुनरुत्थान झालं. आणि अशा प्रकारचं हे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पुनरुत्थान होतं. (प्रे. कार्ये २६:२३) पण फक्‍त येशूचंच स्वर्गात जाण्यासाठी पुनरुत्थान झालं असं नाही. त्याने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना वचन दिलं होतं, की तेही स्वर्गात त्याच्यासोबत राज्य करतील. (लूक २२:२८-३०) अर्थात, हे बक्षीस त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांना मिळणार होतं. ख्रिस्ताप्रमाणेच त्यांचंही आत्मिक शरीरात पुनरुत्थान होणार होतं. याबद्दल पौलने लिहिलं: “ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आले आहे; तो मरण पावलेल्यांपैकी प्रथमफळ आहे.” त्याने सांगितलं की स्वर्गात जाण्यासाठी इतर काहींचंही पुनरुत्थान केलं जाईल. पुढे तो म्हणाला: “प्रत्येक जण आपल्या उचित क्रमानुसार: प्रथमफळ असलेला ख्रिस्त, आणि त्यानंतर जे ख्रिस्ताचे आहेत त्यांना त्याच्या उपस्थितीदरम्यान जिवंत केले जाईल.”—१ करिंथ. १५:२०, २३.

      १६. स्वर्गीय पुनरुत्थान केव्हा होईल याची कल्पना आपल्याला कशावरून येते?

      १६ स्वर्गीय पुनरुत्थान केव्हा होणार होतं, याची थोडीफार कल्पना आपल्याला पौलच्या शब्दांवरून येते. ते पुनरुत्थान ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान होणार होतं. ख्रिस्ताची उपस्थिती कधी सुरू झाली? यहोवाच्या साक्षीदारांनी अनेक वर्षांपूर्वी बायबलच्या आधारे हे सिद्ध केलं आहे, की ख्रिस्ताची उपस्थिती १९१४ मध्ये सुरू झाली. आज आपण त्याच्या ‘उपस्थितीच्या’ काळात जगत आहोत आणि या दुष्ट जगाचा अंत खूप जवळ आला आहे.

      १७, १८. ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान अभिषिक्‍त जणांच्या बाबतीत काय होईल?

      १७ स्वर्गीय पुनरुत्थानाबद्दल बायबलमध्ये आणखी माहिती दिली आहे. त्यात म्हटलं आहे: “जे मरण पावले आहेत त्यांच्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही, . . . कारण येशू मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला या गोष्टीवर जर आपला विश्‍वास असेल, तर मग जे येशूद्वारे मरण पावले आहेत, त्यांनाही देव त्याच्यासोबत असण्याकरता जिवंत करेल. . . . जिवंत असलेल्यांपैकी जे आपण प्रभूच्या उपस्थितीपर्यंत हयात असू, ते मरण पावलेल्यांच्या पुढे जाणारच नाही; कारण, प्रभू स्वतः . . . आज्ञा देत स्वर्गातून उतरेल, आणि ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्यांपैकी जे मेले आहेत ते आधी जिवंत होतील. त्यानंतर, जिवंत असलेल्यांपैकी जे आपण हयात असू त्यांना आकाशात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये उचलून घेतले जाईल आणि अशा रीतीने आपण सदासर्वदा प्रभूसोबत राहू.”—१ थेस्सलनी. ४:१३-१७.

      १८ या वचनात सांगितल्याप्रमाणे काही जण “आधी जिवंत होतील.” आधी होणारं हे पुनरुत्थान ख्रिस्ताच्या उपस्थितीची सुरुवात झाल्याच्या काही काळानंतर सुरू होणार होतं. पुढे, मोठ्या संकटाच्या काळादरम्यान पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्‍त लोकांना “ढगांमध्ये उचलून घेतले जाईल.” याचा काय अर्थ होतो? जे “ढगांमध्ये उचलून घेतले” जातील, ते “मृत्यूची झोप” घेणार नाहीत, म्हणजेच ते जास्त वेळ मृतावस्थेत राहणार नाहीत. तर त्यांच्या मृत्यूनंतर, “शेवटला कर्णा वाजण्याच्या वेळी, एका क्षणात, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच” ते बदलून जातील.—१ करिंथ. १५:५१, ५२; मत्त. २४:३१.

  • मी “देवाकडे आशा बाळगतो”
    टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१७ | डिसेंबर
    • २०. पुनरुत्थान हे क्रमाने किंवा सुव्यवस्थितपणे केलं जाईल याची आपण खात्री का बाळगू शकतो?

      २० स्वर्गीय पुनरुत्थानाबद्दल बायबल सांगतं, की “प्रत्येक जण आपल्या उचित क्रमानुसार” उठवला जाईल. (१ करिंथ. १५:२३) त्यामुळे, पृथ्वीवर होणारं पुनरुत्थानसुद्धा क्रमानुसार किंवा सुव्यवस्थितपणे होईल अशी आपण खात्री बाळगू शकतो. पण, काहींच्या मनात कदाचित असे प्रश्‍न येतील, की ‘अलीकडच्या काळात ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं पुनरुत्थान हजार वर्षांच्या सुरुवातीच्या काळात केलं जाईल का? आणि त्यांना ओळखणारे त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवार त्यांचं स्वागत करण्यासाठी तिथे असतील का? नवीन जगात देवाच्या लोकांची व्यवस्था पाहण्यासाठी, बायबलच्या काळात कुशलतेनं नेतृत्व केलेल्या विश्‍वासू पुरुषांचं लवकर पुनरुत्थान केलं जाईल का? यहोवाची कधीही सेवा न केलेल्या लोकांचं काय होईल? त्यांचं पुनरुत्थान केव्हा आणि कुठे होईल?’ असे कितीतरी प्रश्‍न आपल्याही मनात येऊ शकतात. पण, त्यांबद्दल आता विचार करत बसण्याची गरज नाही; पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी थांबून राहणंच योग्य राहील. या सर्व गोष्टी यहोवा कशा प्रकारे करेल हे पाहणं खरंच खूप रोमांचित करणारं असेल!

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा