वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bt अध्या. २७ पृ. २११-२१७
  • “अगदी पूर्णपणे साक्ष” दिली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “अगदी पूर्णपणे साक्ष” दिली
  • देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला” (प्रे. कार्यं २८:१४, १५)
  • “सगळीकडे लोक या पंथाविरुद्ध बोलतात” (प्रे. कार्यं २८:१६-२२)
  • “अगदी पूर्णपणे साक्ष” देण्याबद्दल आपल्यासाठी उदाहरण (प्रे. कार्यं २८:२३-२९)
  • “देवाच्या राज्याचा प्रचार” (प्रे. कार्यं २८:३०, ३१)
  • रोममध्ये पौल
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • घाबरू नका—यहोवा तुम्हाला साहाय्य करेल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • यहोवाच्या राज्याची निर्भिडपणे घोषणा करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • “मी सगळ्या लोकांच्या रक्‍ताबद्दल निर्दोष आहे”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
bt अध्या. २७ पृ. २११-२१७

अध्याय २७

“अगदी पूर्णपणे साक्ष” दिली

रोममध्ये कैदेत असूनही पौल प्रचार करत राहतो

प्रे. कार्यं २८:११-३१ वर आधारित

१. पौल आणि त्याच्या साथीदारांना कोणती खातरी आहे, आणि का?

इ.स. ५९ च्या आसपास, धान्य वाहून नेणारं एक मोठं जहाज भूमध्य सागरातल्या मिलिता बेटावरून इटलीला जायला निघालं आहे. या जहाजावर “झ्यूसच्या मुलांचं” चिन्ह आहे. जहाजात, पौल आणि त्याच्यावर पाळत ठेवणारा सैनिक, तसंच लूक आणि अरिस्तार्ख हे बांधवही आहेत. (प्रे. कार्यं २७:२) झ्यूस या ग्रीक देवाची मुलं, म्हणजेच कॅस्टर आणि पोलक्स हे जुळे भाऊ आपलं संरक्षण करतील असा जहाजावरच्या लोकांचा विश्‍वास आहे. (अभ्यासासाठी माहिती-प्रे. कार्यं २८:११, nwtsty-E.) पण पौल, लूक आणि अरिस्तार्ख हे बांधव यहोवा देवाचे सेवक आहेत आणि तो आपलं संरक्षण करेल याची पूर्ण खातरी त्यांना आहे. कारण, यहोवाने आधीच सांगितलं आहे, की पौल रोममध्ये कैसरापुढे सत्याविषयी साक्ष देईल.​—प्रे. कार्यं २३:११; २७:२४.

२, ३. पौलचं जहाज कोणत्या मार्गाने जातं, आणि या संपूर्ण प्रवासात पौलला कोणी मदत केली आहे?

२ यानंतर, सुराकूस शहराच्या बंदरात तीन दिवस थांबल्यावर जहाज इटलीच्या टोकावर असलेल्या रेगियोन इथे आलं. सुराकूस हे अथेन्स आणि रोमइतकंच सुंदर शहर होतं. सुराकूसहून निघाल्यावर, दक्षिणेकडून वाहणाऱ्‍या वाऱ्‍याच्या मदतीने ते जहाज ३२० किलोमीटरचं अंतर कापून, अगदी कमी वेळात म्हणजे दुसऱ्‍याच दिवशी, पुत्युला (आजच्या नेपल्सजवळ) या इटलीच्या बंदर शहरात आलं.​—प्रे. कार्यं २८:१२, १३.

३ आता पौल रोमच्या प्रवासाच्या शेवटल्या टप्प्यात आहे. रोमला गेल्यावर तो सम्राट नीरोसमोर हजर होणार आहे. या संपूर्ण प्रवासात “सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव” त्याच्या पाठीशी होता. (२ करिंथ. १:३) आणि आपण पुढे पाहणार आहोत, की यानंतरही यहोवा त्याला मदत करत राहतो. शिवाय, मिशनरी म्हणून पौलचाही आवेश अजून कमी झालेला नाही.

“पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला” (प्रे. कार्यं २८:१४, १५)

४, ५. (क) पुत्युलामध्ये पौल आणि त्याच्या सोबत्यांना कोणतं प्रोत्साहन मिळालं, आणि पौलला इतकं स्वातंत्र्य का देण्यात आलं असावं? (ख) तुरुंगात असतानाही, ख्रिश्‍चनांना त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे कोणता फायदा होऊ शकतो?

४ पुत्युलामध्ये आल्यावर पौल आणि त्याच्या सोबत्यांची “बांधवांशी भेट झाली.” या बांधवांनी “आग्रह केल्यामुळे [त्यांनी] सात दिवस त्यांच्याकडे मुक्काम केला.” (प्रे. कार्यं २८:१४) ख्रिस्ती पाहुणचाराचं हे किती सुंदर उदाहरण! या बांधवांनी केलेल्या पाहुणचाराच्या मोबदल्यात त्यांना पौल आणि त्याच्या सोबत्यांकडून नक्कीच खूप आध्यात्मिक प्रोत्साहन मिळालं असेल. पण, पौल कैदेत असतानाही त्याला इतकं स्वातंत्र्य कसं देण्यात आलं? कदाचित, पौलच्या वागणुकीमुळे रोमन सैनिकांना त्याच्यावर पूर्ण भरवसा असेल आणि त्यामुळे त्यांनी त्याला इतकं स्वातंत्र्य दिलं असावं.

५ आधुनिक काळातही, तुरुंगांत आणि छळ छावण्यांमध्ये, यहोवाच्या अनेक सेवकांना त्यांच्या ख्रिस्ती वागणुकीमुळे खास स्वातंत्र्य आणि सवलती देण्यात आल्याची अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ, रुमानियामध्ये एका माणसाला चोरीच्या गुन्ह्यासाठी ७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पण, त्या माणसाने बायबलचा अभ्यास केला आणि त्याची वागणूक पूर्णपणे बदलली. त्यामुळे, तुरुंगाच्या अधिकाऱ्‍यांनी त्याला एकट्याला, कोणत्याही पहाऱ्‍याशिवाय शहरात जाऊन तुरुंगासाठी सामान खरेदी करण्याचं काम दिलं! पण, आपल्या चांगल्या वागणुकीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे, यामुळे यहोवाच्या नावाची स्तुती होते.​—१ पेत्र २:१२.

६, ७. रोमन बांधवांनी पौल आणि त्याच्या सोबत्यांबद्दल प्रेम कसं दाखवलं?

६ पुत्युलावरून कदाचित, पौल आणि त्याचे सोबती जवळजवळ ५० किलोमीटर चालून रोमला जाणाऱ्‍या अप्पिया मार्गाने कापुआ इथे आले असावेत. अप्पिया मार्ग हा सुप्रसिद्ध रस्ता मोठ्या दगडी लाद्यांपासून बनवलेला होता. या रस्त्याने प्रवास करताना, इटलीच्या ग्रामीण भागाची आणि काही ठिकाणी भूमध्य सागराची सुंदर दृश्‍यं दिसायची. मार्गात पॉन्टीन मार्शेस नावाचा दलदलीचा प्रदेश लागायचा. इथेच अप्पियाची बाजारपेठ होती. हे ठिकाण रोमपासून साधारण ६० किलोमीटर अंतरावर होतं. लूकने लिहिलं, की रोममधल्या बांधवांना “आम्ही आल्याची बातमी मिळाली” तेव्हा ते बाजारपेठेपर्यंत आले; तर, इतर जण रोमपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन धर्मशाळा या ठिकाणी थांबले. खरंच, या बांधवांनी पौल आणि त्याच्या सोबत्यांबद्दल किती प्रेम दाखवलं!​—प्रे. कार्यं २८:१५.

७ थकलेल्या प्रवाशांसाठी अप्पियाच्या बाजारपेठेत कोणत्याही सोयी नव्हत्या. रोमन कवी आणि लेखक होरस याने या बाजारपेठेबद्दल असं लिहिलं आहे, की तिथे सहसा “नाविकांची आणि धर्मशाळांच्या उद्धट मालकांची गर्दी असायची.” त्याने असंही लिहिलं, की इथलं “पाणी खूपच घाणेरडं” होतं. होरस त्या ठिकाणी जेवलासुद्धा नाही! या सर्व गैरसोयी असूनही, रोमहून आलेले बांधव, तिथे पौल आणि त्याच्या सोबत्यांची आनंदाने वाट पाहत थांबले. तिथून पुढे हे बांधव त्यांच्यासोबत रोमपर्यंत जाणार होते.

८. बांधवांना “पाहताच” पौलने देवाचे आभार का मानले?

८ अहवालात म्हटलं आहे, की बांधवांना “पाहताच पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला.” (प्रे. कार्यं २८:१५) या प्रिय बांधवांना नुसतं पाहूनच पौलला प्रोत्साहन आणि सांत्वन मिळालं. कदाचित तो त्यांच्यापैकी काहींना ओळखतही असावा. पौलने देवाचे आभार का मानले? कारण पौलला माहीत होतं, की निःस्वार्थ प्रेम हे पवित्र शक्‍तीच्या फळांपैकी एक आहे. आणि देवाच्या शक्‍तीनेच त्या बांधवांना असं प्रेम दाखवायला प्रवृत्त केलं होतं. (गलती. ५:२२) आजही पवित्र शक्‍ती ख्रिस्ती बांधवांना एकमेकांसाठी त्याग करण्याची आणि कठीण परिस्थितीला तोंड देणाऱ्‍यांचं सांत्वन करण्याची प्रेरणा देते.​—१ थेस्सलनी. ५:११, १४.

९. पौलला भेटायला आलेल्या बांधवांसारखी मनोवृत्ती आपल्यालाही कशी दाखवता येईल?

९ उदाहरणार्थ, पवित्र शक्‍तीने प्रवृत्त होऊनच अनेक बांधव विभागीय पर्यवेक्षकांचा, मिशनरी बांधवांचा आणि इतर पूर्णवेळेच्या सेवकांचा पाहुणचार करतात. यहोवाची जास्त प्रमाणात सेवा करण्यासाठी या पूर्णवेळेच्या सेवकांपैकी अनेकांनी आपल्या जीवनात बरेच त्याग केले आहेत. स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान मला त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा पाहुणचार करता येईल का? त्यांच्यासोबत सेवेत जाण्यासाठी मला काही योजना करता येतील का?’ असं केल्यामुळे तुम्हाला बरेच आशीर्वाद मिळतील. उदाहरणार्थ, पौल आणि त्याच्या सोबत्यांनी त्यांचे अनेक प्रोत्साहनदायक अनुभव सांगितले असतील, तेव्हा त्यांना भेटायला आलेल्या बांधवांना किती आनंद झाला असेल!​—प्रे. कार्यं १५:३, ४.

“सगळीकडे लोक या पंथाविरुद्ध बोलतात” (प्रे. कार्यं २८:१६-२२)

१०. रोममध्ये पौल कोणत्या परिस्थितीत होता, आणि रोमला आल्यावर लवकरच त्याने काय केलं?

१० प्रवास करणारे ते बांधव शेवटी रोमला पोहोचले. रोममध्ये “पौलला एकटं राहायची परवानगी देण्यात आली. आणि त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी एका सैनिकाला नेमण्यात आलं.” (प्रे. कार्यं २८:१६) जास्त कडक पहारा नसलेल्या कैद्यांवर सहसा फक्‍त एका सैनिकाचा पहारा असायचा आणि कैद्याचे हात साखळीने सैनिकाच्या हाताला बांधलेले असायचे. पण, पौल हा राज्याचा आवेशी प्रचारक होता आणि साखळीने बांधल्यामुळे तो साहजिकच देवाबद्दल बोलायचं थांबवणार नव्हता. त्यामुळे प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी फक्‍त तीन दिवस विश्रांती घेतल्यावर, त्याने रोममधल्या यहुद्यांच्या प्रमुख पुरुषांना आपली ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना साक्ष देण्यासाठी बोलावून घेतलं.

११, १२. यहुदी लोकांशी बोलताना पौलने त्यांच्या मनातली चुकीची मतं दूर करण्याचा कसा प्रयत्न केला?

११ पौल त्यांना म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, आपल्या लोकांविरुद्ध किंवा आपल्या वाडवडिलांच्या रितीरिवाजांविरुद्ध मी काहीही केलेलं नाही. तरीही मला यरुशलेममधून एक कैदी म्हणून रोमी लोकांच्या हाती सोपवण्यात आलं. खरंतर, माझी न्यायचौकशी केल्यावर मृत्युदंड देण्यासारखं काहीच न सापडल्यामुळे त्यांना माझी सुटका करायची होती. पण यहुद्यांनी या गोष्टीला विरोध केला. त्यामुळे मला कैसराकडे न्याय मागण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मला माझ्या देशावर काही आरोप लावायचा होता, म्हणून मी हे केलं, असं नाही.”​—प्रे. कार्यं २८:१७-१९.

१२ त्या यहुदी लोकांना “बांधवांनो” असं म्हणून पौलने त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवली. त्यांच्या मनात त्याच्याबद्दल काही चुकीची मतं असतील, तर ती दूर व्हावीत अशी त्याची इच्छा होती. (१ करिंथ. ९:२०) तसंच, आपण आपल्या या यहुदी बांधवांवर दोष लावण्यासाठी नाही, तर कैसराला न्याय मागण्यासाठी रोमला आलो आहोत हे त्याने स्पष्ट केलं. पण पौल न्याय मागण्यासाठी कैसरापुढे हजर होणार आहे ही गोष्ट रोमच्या यहुद्यांना माहीत नव्हती. (प्रे. कार्यं २८:२१) यहूदीयात राहणाऱ्‍या त्यांच्या यहुदी बांधवांनी त्यांना ही गोष्ट का कळवली नव्हती? एका संदर्भ ग्रंथात असं म्हटलं आहे, की “पौलचं जहाज हे कदाचित हिवाळा संपल्यावर रोमला पोहोचणाऱ्‍या पहिल्या जहाजांपैकी एक असावं; आणि यरुशलेमच्या यहुदी अधिकाऱ्‍यांनी पाठवलेली माणसं किंवा पौलबद्दल माहिती देणारं पत्र अजून रोमला पोहोचलं नसावं.”

१३, १४. पौलने देवाच्या राज्याबद्दल बोलायला कशी सुरुवात केली, आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?

१३ मग पौलने देवाच्या राज्याबद्दल बोलायला सुरुवात केली. तो सुरुवातीलाच एक असं वाक्य बोलला ज्यामुळे त्याच्या यहुदी पाहुण्यांची उत्सुकता नक्कीच जागृत झाली असेल. तो म्हणाला: “याच कारणामुळे, मी तुमची भेट घेऊन तुमच्याशी बोलायची विनंती केली. कारण इस्राएलने ज्याची आशा धरली होती, त्याच्यामुळेच आज मी या साखळीने बांधलेलो आहे.” (प्रे. कार्यं २८:२०) ही आशा मसीहा आणि त्याच्या राज्याशी संबंधित होती आणि ख्रिस्ती मंडळीतले बांधव याच आशेबद्दल घोषणा करत होते. यहुदी वडील पौलला म्हणाले: “या बाबतीत तुझे विचार तुझ्याकडूनच ऐकणं आम्हाला योग्य वाटतं. कारण सगळीकडे लोक या पंथाविरुद्ध बोलतात, हे आम्हाला माहीत आहे.”​—प्रे. कार्यं २८:२२.

१४ आपल्याला जेव्हा कधी आनंदाच्या संदेशाबद्दल लोकांना सांगण्याची संधी मिळते, तेव्हा आपण ऐकणाऱ्‍यांना विचार करायला लावतील अशा शब्दांचा आणि प्रश्‍नांचा वापर करण्याद्वारे पौलचं अनुकरण करू शकतो. हे आपण कसं करू शकतो याबद्दल जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका, परमेश्‍वर की सेवा स्कूल से फायदा उठाइए  आणि वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा  या साहित्यांमध्ये आपल्याला चांगला सल्ला मिळेल. बायबल अभ्यासासाठी तयार केलेल्या या प्रकाशनांचा तुम्ही चांगला उपयोग करत आहात का?

“अगदी पूर्णपणे साक्ष” देण्याबद्दल आपल्यासाठी उदाहरण (प्रे. कार्यं २८:२३-२९)

१५. पौलने दिलेल्या साक्षीमधून शिकण्यासारख्या कोणत्या चार खास गोष्टी आहेत?

१५ ठरलेल्या दिवशी रोममधले यहुदी, पौल राहत असलेल्या ठिकाणी “आणखी मोठ्या संख्येने” आले. “सकाळपासून संध्याकाळपर्यंत [पौलने] त्यांना देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष देऊन समजावून सांगितलं. तसंच, त्यांना येशूबद्दल खातरी पटवून देण्यासाठी त्याने मोशेच्या नियमशास्त्रातून आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांतून बरेच पुरावे दिले.” (प्रे. कार्यं २८:२३) पौलने दिलेल्या साक्षीमधून शिकण्यासारख्या चार खास गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, त्याने देवाच्या राज्याकडे लक्ष वेधलं. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याने ऐकणाऱ्‍यांना खातरी पटेल असे “पुरावे दिले.” तिसरी गोष्ट, त्याने शास्त्रवचनांच्या आधारावर तर्क केला. आणि चौथी गोष्ट म्हणजे, त्याने “सकाळपासून संध्याकाळपर्यंत” साक्ष देऊन निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवली. खरंच, पौलने आपल्यासाठी किती चांगलं उदाहरण मांडलं आहे! पौलने दिलेल्या साक्षीमुळे कोणता परिणाम झाला? लूक सांगतो, की “काही लोकांनी विश्‍वास ठेवला” तर काहींनी ठेवला नाही. त्या लोकांमध्ये आपसातच मतभेद झाल्यामुळे ते “निघून जाऊ लागले.”​—प्रे. कार्यं २८:२४, २५क.

१६-१८. रोममधल्या यहुद्यांनी चांगला प्रतिसाद दिला नाही तेव्हा पौलला आश्‍चर्य का वाटलं नाही, आणि लोक आपला संदेश ऐकत नाहीत तेव्हा आपण कशी मनोवृत्ती दाखवली पाहिजे?

१६ ही प्रतिक्रिया पाहून पौलला आश्‍चर्य झालं नाही. कारण असं होईल हे बायबलच्या भविष्यवाणीत आधीच सांगण्यात आलं होतं आणि याआधीही पौलला अनेकदा लोकांकडून हीच प्रतिक्रिया मिळाली होती. (प्रे. कार्यं १३:४२-४७; १८:५, ६; १९:८, ९) म्हणून पौलने त्याचं ऐकून घ्यायला तयार नसलेल्या आणि जायला निघालेल्या त्या लोकांना म्हटलं: “पवित्र शक्‍तीने यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या वाडवडिलांना जे म्हटलं ते योग्यच होतं: ‘या लोकांकडे जाऊन त्यांना सांग: “तुम्ही ऐकाल तर खरं, पण तुम्हाला अर्थ कळणार नाही. आणि तुम्ही पाहाल तर खरं, पण तुम्हाला दिसणार नाही. कारण या लोकांची मनं कठोर झाली आहेत.”’” (प्रे. कार्यं २८:२५ख-२७) त्या लोकांच्या मनात जणू एक भिंत तयार झाली होती आणि त्यामुळे ते राज्याच्या संदेशाला प्रतिसाद देत नव्हते. (प्रे. कार्यं २८:२७) खरंच ही किती दुःखाची गोष्ट होती!

१७ पण यहुदी लोकांनी पौलचा संदेश ऐकला नसला, तरी विदेशी लोक “नक्कीच तो ऐकतील” असं पौल शेवटी म्हणाला. (प्रे. कार्यं २८:२८; स्तो. ६७:२; यश. ११:१०) याबद्दल प्रेषित पौल अगदी आत्मविश्‍वासाने बोलू शकत होता, कारण त्याने कित्येक विदेश्‍यांना राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद देताना पाहिलं होतं.​—प्रे. कार्यं १३:४८; १४:२७.

१८ जेव्हा लोक राज्याचा संदेश ऐकून घ्यायला नकार देतात तेव्हा पौलप्रमाणेच आपणही या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नये. कारण आपल्याला आधीच हे माहीत आहे की फार कमी लोक या संदेशाला प्रतिसाद देऊन जीवनाच्या मार्गावर येतील. (मत्त. ७:१३, १४) पण, चांगल्या मनोवृत्तीचे लोक खरी उपासना करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा आपण आनंदाने आपले बांधव म्हणून त्यांचं स्वागत केलं पाहिजे.​—लूक १५:७.

“देवाच्या राज्याचा प्रचार” (प्रे. कार्यं २८:३०, ३१)

१९. पौलने आपल्या परिस्थितीचा कसा फायदा घेतला?

१९ लूक आपल्या अहवालाचा शेवट या प्रोत्साहनदायक शब्दांनी करतो: “भाड्याने घेतलेल्या घरात [पौल] आणखीन दोन वर्षं राहिला. तिथे त्याच्याकडे येणाऱ्‍या सगळ्यांचं तो आनंदाने स्वागत करायचा. तो त्यांना देवाच्या राज्याचा प्रचार करायचा आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अगदी मोकळेपणाने शिकवायचा.” (प्रे. कार्यं २८:३०, ३१) खरंच, पाहुणचार, विश्‍वास आणि आवेश दाखवण्याच्या बाबतीत पौलचं किती चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे!

२०, २१. रोममधल्या पौलच्या सेवेमुळे कोणाकोणाला फायदा झाला?

२० पौलने आपल्या घरात स्वागत केलेल्यांपैकी एक होता अनेसिम. हा माणूस कलस्सैहून पळून आलेला एक दास होता. पौलने अनेसिमला ख्रिस्ती बनण्यासाठी मदत केली आणि यामुळे अनेसिम त्याचा “विश्‍वासू आणि प्रिय भाऊ” बनला. इतकंच काय, तर “मी ज्याचा . . . वडील बनलो, त्या माझ्या लेकरासाठी” विनंती करतो, असंही पौलने अनेसिमबद्दल लिहिलं. (कलस्सै. ४:९; फिले. १०-१२) खरंच, अनेसिममुळे पौलला किती दिलासा मिळाला असेल!a

२१ पौलच्या चांगल्या उदाहरणामुळे इतरांनाही फायदा झाला. फिलिप्पैकरांना त्याने लिहिलं: “आता बांधवांनो, तुम्हाला हे माहीत असावं अशी माझी इच्छा आहे, की माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे खरंतर आनंदाच्या संदेशाच्या वाढीला हातभारच लागला आहे. कारण, मी ख्रिस्तासाठी तुरुंगात आहे ही गोष्ट सम्राटाच्या अंगरक्षक दलातल्या सगळ्यांना आणि इतर लोकांनाही समजली आहे. मी तुरुंगात असल्यामुळे प्रभूमध्ये असलेल्या बहुतेक बांधवांचं मनोबल वाढलं आहे आणि ते आता आणखीनच धैर्याने आणि निर्भयपणे देवाचं वचन सांगत आहेत.”​—फिलिप्पै. १:१२-१४.

२२. रोममध्ये कैदेत असताना पौलने त्या वेळेचा कसा उपयोग केला?

२२ रोममध्ये कैदेत असताना, पौलने त्या वेळेचा फायदा घेऊन काही महत्त्वाची पत्रं लिहिली. ही पत्रं आता ख्रिस्ती ग्रीक शास्त्राचा भाग बनली आहेत.b पहिल्या शतकातल्या ज्या ख्रिश्‍चनांना ही पत्रं लिहिण्यात आली, त्यांना त्यांचा फायदा झाला. आपल्यालासुद्धा पौलच्या पत्रांचा फायदा होतो. कारण, देवाच्या प्रेरणेने त्यांत दिलेले सल्ले, जितके त्या काळात उपयोगी, तितकेच ते आजही आहेत.​—२ तीम. ३:१६, १७.

रोममध्ये पहिल्यांदा कैदेत असताना लिहिलेली पौलची पाच पत्रं

प्रेषित पौलच्या पत्रांपैकी पाच पत्रं, त्याने रोममध्ये पहिल्यांदा कैदेत असताना, इ.स. ६०-६१ च्या आसपास लिहिली. फिलेमोन  या बांधवाला लिहिलेल्या पत्रात पौलने त्याला सांगितलं, की त्याच्या घरून पळून गेलेला दास अनेसिम आता ख्रिस्ती बनला आहे. पौलनेच अनेसिमला विश्‍वासात यायला मदत केली होती आणि ‘पूर्वी निरुपयोगी’ असलेल्या या दासाला तो एक ख्रिस्ती भाऊ या नात्याने त्याच्या मालकाकडे परत पाठवत होता.​—फिले. १०-१२, १६.

कलस्सैकर  यांना लिहिलेल्या पत्रात, अनेसिम हा “तुमच्यातलाच एक” आहे असं पौल त्यांना सांगतो. (कलस्सै. ४:९) वर उल्लेख केलेली ही दोन्ही पत्रं, तसंच पौलने इफिसकर  यांना लिहिलेलं पत्रही पोहोचवण्याचा मान अनेसिम आणि तुखिक नावाच्या बांधवांना मिळाला.​—इफिस. ६:२१.

फिलिप्पैकर यांना लिहिताना, पौल आपल्या “तुरुंगवासातल्या” बंधनांचा उल्लेख करतो आणि पत्र पोहोचवणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल, म्हणजेच या वेळी एपफ्रदीत याच्याबद्दल लिहितो. फिलिप्पैकरांनी एपफ्रदीतला पौलची सेवा करण्यासाठी पाठवलं होतं. पण एपफ्रदीत हा इतका आजारी पडला की तो जवळजवळ मरायला टेकला होता. तसंच, तो “आजारी पडल्याचं” फिलिप्पैकरांना “कळल्यामुळे” तो फार निराशही झाला होता. म्हणून, पौलने “अशा माणसांची नेहमी कदर करत जा,” असं त्यांना सांगितलं.​—फिलिप्पै. १:७; २:२५-३०.

इब्री लोकांना  पत्र हे यहूदीयातल्या इब्री ख्रिश्‍चनांना उद्देशून लिहिण्यात आलं होतं. या पत्राच्या लेखकाचा त्यात स्पष्ट उल्लेख नसला, तरी पुराव्यावरून दिसून येतं की याचा लेखक पौलच होता. कारण, लिहिण्याची शैली अगदी पौलसारखीच आहे. पौल इटलीहून बांधवांना नमस्कार सांगतो आणि तीमथ्य, जो त्याच्यासोबत रोममध्ये होता त्याचाही उल्लेख करतो.​—फिलिप्पै. १:१; कलस्सै. १:१; फिले. १; इब्री १३:२३, २४.

२३, २४. पौलप्रमाणे आज अनेक ख्रिश्‍चनांना तुरुंगात टाकण्यात आल्यावरही त्यांनी आनंदी राहण्याचा कसा प्रयत्न केला आहे?

२३ पौलची सुटका नेमकी केव्हा झाली हे प्रेषितांची कार्यं पुस्तकात सांगितलेलं नाही. पण तो जवळजवळ ४ वर्षं कैदेत राहिला असावा. यातली दोन वर्षं त्याने कैसरीयात आणि दोन वर्षं रोममध्ये कैदेत काढली असावीत.c (प्रे. कार्यं २३:३५; २४:२७) पण त्या काळात त्याने नेहमी सेवेतला आपला आनंद टिकवून ठेवला आणि देवाच्या सेवेत त्याला जे काही करता येईल ते त्याने केलं. त्याच प्रकारे आजही यहोवाच्या सेवकांपैकी बऱ्‍याच जणांना त्यांच्या विश्‍वासामुळे तुरुंगात टाकण्यात आलं आहे; तरी, हे बांधव आनंदी राहण्याचा आणि प्रचार करत राहण्याचा प्रयत्न करतात. अडॉल्फो याचंच उदाहरण पाहा. ख्रिस्ती तटस्थतेमुळे स्पेनच्या या भावाला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. एक अधिकारी त्याला म्हणाला: “तुझं आम्हाला खरंच आश्‍चर्य वाटतं. आम्ही खरंतर तुला खूप त्रास दिला. पण तुला जितका त्रास दिला, तितकाच तू जास्त आनंदी दिसतोस आणि नेहमी प्रेमानेच बोलतोस.”

२४ काही काळानंतर अधिकारी अडॉल्फोवर इतका भरवसा ठेवू लागले की तुरुंगातल्या त्याच्या खोलीचं दारही ते उघडंच ठेवायचे. त्याच्याकडे येणारे सैनिक त्याला बायबलबद्दल प्रश्‍न विचारायचे. एक पहारेकरी तर अडॉल्फोच्या खोलीत जाऊन बायबल वाचायचा आणि त्याला कोणी पाहू नये म्हणून अडॉल्फो बाहेर नजर ठेवायचा. म्हणजे, कैदीच सैनिकावर “पहारा” द्यायचा! अशा विश्‍वासू साक्षीदारांचं अनुकरण करून आपणही कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा “आणखीनच धैर्याने आणि निर्भयपणे देवाचं वचन” सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

२५, २६. पौलने ३० वर्षांपेक्षा कमी काळात कोणती आश्‍चर्यकारक भविष्यवाणी पूर्ण होताना पाहिली, आणि आपल्या काळातही ती कशी पूर्ण होत आहे?

२५ प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या अहवालाच्या शेवटी आपण कैदेत असलेल्या ख्रिस्ताच्या एका प्रेषिताचं वर्णन वाचतो. त्याला भेटायला येणाऱ्‍या सर्वांना तो “देवाच्या राज्याचा प्रचार” करत होता. खरंच, या रोमांचक पुस्तकाचा हा शेवट अगदी योग्य वाटतो! पहिल्या अध्यायात आपण ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना दिलेली ही आज्ञा वाचली होती: “पवित्र शक्‍ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत माझ्याबद्दल साक्ष द्याल.” (प्रे. कार्यं १:८) आता, ३० वर्षांच्या आतच राज्याचा संदेश “आकाशाखालच्या सबंध सृष्टीत” घोषित करण्यात आला होता.d (कलस्सै. १:२३) देवाच्या सामर्थ्यशाली शक्‍तीचा पाठिंबा असल्याचा हा किती मोठा पुरावा!​—जख. ४:६.

२६ आज, ख्रिस्ताच्या बांधवांपैकी पृथ्वीवर असलेल्यांना आणि दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेल्या त्यांच्या सोबत्यांना त्याच पवित्र शक्‍तीचा पाठिंबा आहे. पवित्र शक्‍तीच्या मदतीमुळेच हे सर्व बांधव, जवळजवळ २४० देशांत “देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष” देत आहेत! (योहा. १०:१६; प्रे. कार्यं २८:२३) तुम्हीही या कार्यात पूर्ण उत्साहाने सहभाग घेत आहात का?

इ.स. ६१ नंतर पौलचं जीवन

कदाचित इ.स. ६१ मध्ये पौलला सम्राट नीरो याच्यापुढे हजर करण्यात आलं असावं. नीरोने त्याला निर्दोष घोषित केलं. यानंतर पौलने काय केलं याबद्दल आपल्याजवळ फारशी माहिती नाही. त्याच्या आधीच्या योजनेप्रमाणे जर तो स्पेनला गेला असेल, तर तो कदाचित याच काळात गेला असावा. (रोम. १५:२८) इ.स. ९५ च्या आसपास रोमच्या क्लेमेंटने असं लिहिलं, की पौलने “पश्‍चिमेच्या टोकापर्यंत प्रवास केला.”

पौलची सुटका झाल्यानंतरच्या काळात त्याने तीन पत्रं लिहिली. पहिलं आणि दुसरं तीमथ्य आणि तीत याला पत्र, ही ती पत्रं होती. या पत्रांवरून आपल्याला कळतं की तो क्रेत, मासेदोनिया, निकपलिस आणि त्रोवस इथेही गेला होता. (१ तीम. १:३; २ तीम. ४:१३; तीत १:५; ३:१२) ग्रीसमधल्या निकपलिसमध्येच त्याला कदाचित पुन्हा अटक करण्यात आली असावी. काहीही असो, इ.स. ६५ च्या सुमाराला तो पुन्हा रोममध्ये कैदेत होता. पण या वेळी नीरोने दया दाखवली नाही. इ.स. ६४ मध्ये रोम शहरात लागलेल्या आगीसाठी ख्रिस्ती लोकच जबाबदार असल्याचा नीरोने खोटा आरोप लावला; आणि त्यांचा क्रूरपणे छळ करायला सुरुवात केली, असं रोमन इतिहासकार टॅसिटस सांगतो.

तीमथ्यला लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात, लवकरच आपला मृत्यू होणार आहे हे माहीत असल्यामुळे पौलने तीमथ्य आणि मार्क यांना लवकरात लवकर आपल्याकडे येण्याची विनंती केली. लूक आणि अनेसिफर यांनी खूप धैर्य दाखवून आपला जीव धोक्यात घातला आणि पौलचं सांत्वन केलं. (२ तीम. १:१६, १७; ४:६-९, ११) त्या काळात आपण ख्रिस्ती आहोत असं कोणी जाहीरपणे कबूल केलं, तर त्याला अटक होण्याची आणि यातनादायक मृत्युदंड दिला जाण्याची भीती होती. इ.स. ६५ मध्ये तीमथ्यला शेवटलं पत्र लिहिल्यावर काही काळातच पौल शहीद झाला असावा असं दिसतं. पौलच्या मृत्यूनंतर तीन वर्षांतच नीरोचाही भयानक रितीने मृत्यू झाला.

आनंदाच्या संदेशाची “घोषणा आकाशाखालच्या सबंध सृष्टीत”

इ.स. ६१ च्या आसपास, प्रेषित पौल अजून रोममध्ये कैदी असताना त्याने लिहिलं, की आनंदाच्या संदेशाची “घोषणा आकाशाखालच्या सबंध सृष्टीत करण्यात आली” आहे. (कलस्सै. १:२३) पौलच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?

आनंदाचा संदेश किती दूरपर्यंत पोहोचला होता हे सांगण्यासाठी पौलने असं म्हटलं असावं. उदाहरणार्थ, इ.स.पू. चौथ्या शतकात ॲलेक्झांडर द ग्रेट याने आशियात, भारताच्या सीमेपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. इ.स.पू. ५५ मध्ये ज्युलियस सीझर याने ब्रिटनवर आक्रमण केलं होतं आणि क्लॉडियसने त्या बेटाचा दक्षिण भाग जिंकून इ.स. ४३ मध्ये त्याला रोमन साम्राज्यात सामील केलं होतं. पूर्वेकडच्या देशांबद्दलही लोकांना माहीत होतं, कारण तिथून उत्तम प्रतीचं रेशीम आणलं जायचं.

मग आनंदाच्या संदेशाची घोषणा ब्रिटन, चीन आणि पूर्वेकडच्या देशांतही झाली होती का? असं वाटत नाही. खरंतर, पौलने कलस्सैकरांना पत्र लिहिलं तेव्हा, इ.स. ५६ मध्ये त्याने स्वतः स्पेनमधल्या प्रचार न झालेल्या क्षेत्रात हे कार्य करण्याची जी इच्छा व्यक्‍त केली होती, ती अजून पूर्ण झाली नव्हती. (रोम. १५:२०, २३, २४) पण, इ.स. ६१ च्या आसपास राज्याचा संदेश अनेक दूरदूरच्या प्रदेशांत पोहोचवण्यात आला होता. कमीतकमी, इ.स. ३३ मध्ये ज्यांचा बाप्तिस्मा झाला ते यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेले लोक ज्या-ज्या देशात राहत होते, त्या-त्या देशात राज्याचा संदेश घोषित करण्यात आला होता. तसंच, येशूचे प्रेषित ज्या देशांमध्ये गेले तिथेही या संदेशाची घोषणा झाली होती.​—प्रे. कार्यं २:१, ८-११, ४१, ४२.

a खरंतर, अनेसिमला आपल्याजवळ ठेवून घेण्याची पौलची इच्छा होती. पण यामुळे रोमचा कायदा मोडला गेला असता. तसंच, अनेसिमचा मालक असलेला ख्रिस्ती बांधव फिलेमोन याच्याविरुद्धही हा अन्याय ठरला असता. म्हणून अनेसिम फिलेमोनकडे परत गेला. त्याने आपल्यासोबत पौलने लिहिलेलं एक पत्रही नेलं. या पत्रात पौलने फिलेमोनला असं प्रोत्साहन दिलं, की त्याने आपल्या दासाचं एक ख्रिस्ती बांधव म्हणून स्वागत करावं.​—फिले. १३-१९.

b “रोममध्ये पहिल्यांदा कैदेत असताना लिहिलेली पौलची पाच पत्रं” ही चौकट पाहा.

c “इ.स. ६१ नंतर पौलचं जीवन” ही चौकट पाहा.

d “आनंदाच्या संदेशाची घोषणा ‘आकाशाखालच्या सबंध सृष्टीत’” ही चौकट पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा