वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • माघार घेऊन स्वतःवर नाश ओढवू नका!
    टेहळणी बुरूज—१९९९ | डिसेंबर १५
    • माघार घेऊन स्वतःवर नाश ओढवू नका!

      “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही.”—इब्री लोकांस १०:३९.

      १. कोणत्या परिस्थितीमुळे प्रेषित पेत्राला भीती वाटली?

      येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना सांगितले, की त्यांची पांगापांग होईल आणि ते सर्व त्याला सोडून जातील, तेव्हा त्यांना धक्काच बसला असेल. आपला परमप्रिय स्वामी येशू, याला आपली इतकी गरज असताना आपण त्याला सोडून जाऊ हे कसे शक्य आहे, असे त्यांना वाटले असेल. म्हणूनच पेत्र आत्मविश्‍वासाने म्हणाला: “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.” पेत्र तसा धैर्यवान, निर्भीड स्वभावाचा माणूस होता. पण येशूला धरून देण्यात आले तेव्हा खरोखरच सर्व प्रेषित वेगवेगळ्या दिशेला निघून गेले; आणि त्यांच्यात पेत्रही होता. नंतर, मुख्य याजक कैफा याच्या घरात येशूची उलटतपासणी चालली असताना पेत्र अंगणात अस्वस्थपणे घुटमळू लागला. रात्र सरत आली तसतशी त्याला भीती वाटू लागली; येशूला आणि आपण त्याच्यासोबत होतो म्हणून आपल्यालाही मृत्युदंड तर दिला जाणार नाही? तिथे उभे असलेल्या काही लोकांनी, पेत्र येशूचा जवळचा माणूस असल्याचे ओळखले तेव्हा तर त्याची भीतीने गाळण उडाली. येशूशी आपला कोणताही संबंध नाही असे त्याने तीन वेळा शपथेवर सांगितले. किंबहुना, त्याने येशूशी ओळखही असल्याचे नाकारले!—मार्क १४:२७-३१, ६६-७२.

      २. (अ) येशूला अटक करण्यात आलेल्या रात्री पेत्राला भीती वाटली तरी तो “माघार घेणाऱ्‍यांपैकी” का झाला नाही? (ब) आपण कोणता निर्धार केला पाहिजे?

      २ ही घटना पेत्राच्या जीवनातली एक कटू आठवण होती; दर वेळी तो क्षण आठवल्यावर त्याला नक्कीच पस्तावा होत असेल. पण त्या रात्री पेत्राने जे केले त्यामुळे तो कायमचाच भित्रा बनला का? प्रेषित पौलाच्या शब्दांत, “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी” तो बनला का? (इब्री लोकांस १०:३९) कोणीही तसे म्हणणार नाही. का? कारण पेत्राला वाटलेली भीती ही त्या क्षणापुरती होती; ती एक लहानशी चूक सोडली, तर त्याच्या सबंध जीवनात त्याने विलक्षण धैर्य आणि दृढ विश्‍वास दाखवला. त्याचप्रकारे, आपल्यापैकीही बऱ्‍याच जणांच्या गतजीवनातल्या अशा काही घटना आहेत, ज्यांची आठवण झाली की आपल्यालाच आपली लाज वाटते; असे क्षण, जेव्हा अनपेक्षितपणे परीक्षाप्रसंगात सापडून आपण इच्छा असूनही, सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू शकलो नाही. (पडताळा रोमकर ७:२१-२३.) पण निराश होण्याचे कारण नाही, अशा या क्षणिक चुकांमुळे आपण “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी” होत नाही. अर्थात, पुढेही कधी असे घडू न देण्याचा दृढसंकल्प आपण केला पाहिजे. का? आणि हे आपल्याला कसे करता येईल?

      माघार घेऊन स्वतःवर नाश ओढवणे म्हणजे काय?

      ३. संदेष्टा एलिया व योना यांनी भीतीमुळे काय केले?

      ३ पौलाने ‘माघार घेणाऱ्‍यांच्या’ संदर्भात लिहिले तेव्हा तो अशा लोकांविषयी बोलत नव्हता, की जे पुरेसे धैर्य नसल्यामुळे क्षणभर थोडे अस्थिर होतात. पेत्राच्या बाबतीत काय झाले होते याची त्याला निश्‍चितच कल्पना होती, आणि अशीच इतरही उदाहरणे त्याला माहीत होती. एलिया हा अतिशय धैर्यवान आणि निर्भीड संदेष्टा असूनही, ईजबेल या दुष्ट राणीने त्याला मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा तो इतका घाबरला की आपला जीव वाचवण्यासाठी तो अक्षरशः पळून गेला. (१ राजे १९:१-४) संदेष्टा योना तर त्याच्याही दोन पावले पुढे गेला. यहोवाने त्याला हिंसाचारासाठी अतिशय कुविख्यात असलेल्या निनवे शहरात जाण्यास सांगितले. पण योना लगेच अगदी विरुद्ध दिशेला ३,५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या तार्शिशला जाणाऱ्‍या जहाजात चढला! (योना १:१-३) तरीसुद्धा या विश्‍वासू संदेष्ट्यांना किंवा प्रेषित पेत्रालाही, माघार घेणाऱ्‍यांपैकी समजणे योग्य ठरणार नाही. का नाही?

      ४, ५. (अ) इब्री लोकांस १०:३९ या वचनात पौलाने “नाश” हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला हे संदर्भावरून आपल्याला कसे कळून येते? (ब) “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही” हे पौलाने कोणत्या अर्थाने म्हटले?

      ४ पौलाने काय म्हटले याकडे नीट लक्ष द्या: “परंतु, ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही.” (तिरपे वळण आमचे.) “नाश” होईल असे पौलाने कोणत्या अर्थाने म्हटले? त्याने या ठिकाणी वापरलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ काहीवेळा कायमचा विनाश असा होतो आणि पौलाने याआधीच्या काही वचनांत जे म्हटले त्याच्याशी हे सुसंगत आहे. त्याने नुकतीच अशी ताकीद दिली होती की: “सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापांबद्दल ह्‍यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही; तर न्यायाची व विरोध्यांस गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच.”—इब्री लोकांस १०:२६, २७.

      ५ त्याअर्थी, “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही” असे पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना म्हटले तेव्हा तो असे म्हणत होता की त्याने आणि त्याचे हे शब्द वाचणाऱ्‍या विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी देखील यहोवापासून कधीही दूर न जाता शेवटपर्यंत त्याची सेवा करण्याचा निर्धार केला होता. असे न केल्यास कायमचा विनाश निश्‍चित आहे. मागे हटून स्वतःवर नाश ओढवून घेणाऱ्‍यांपैकी एक होता यहुदा इस्कर्योत; तसेच, सत्याचा विरोध करणारे इतरही शत्रू होते, ज्यांनी जाणूनबुजून यहोवाच्या आत्म्याविरुद्ध कार्य केले. (योहान १७:१२; २ थेस्सलनीकाकर २:३) हेच ते “भेकड” लोक आहेत, ज्यांचा अग्नीच्या सांकेतिक सरोवरात कायमचा नाश होईल. (प्रकटीकरण २१:८) नाही, अशा लोकांपैकी होण्याची आपल्यापैकी कोणाचीही इच्छा नाही!

      ६. दियाबल सैतान आपल्याला कोणत्या मार्गाने नेऊ इच्छितो?

      ६ पण सैतानाची हीच इच्छा आहे की आपण सत्याच्या मार्गातून माघार घेऊन स्वतःवर नाश ओढवावा. “डावपेच” खेळण्यात अतिशय तरबेज असल्यामुळे त्याला माहीत आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरवात होऊन एक व्यक्‍ती नाशाच्या मार्गाला लागू शकते. (इफिसकर ६:११) त्यामुळे, जर छळ करूनही त्याला खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा विश्‍वास खचवता आला नाही तर तो दुसऱ्‍या काही अप्रत्यक्ष मार्गांनी असे करण्याचा प्रयत्न करतो. यहोवाच्या निर्भीड, आवेशी साक्षीदारांचे कसेही करून तोंड बंद करणे हा त्याचा एकच उद्देश आहे. आता आपण हे पाहू या, की पौलाने ज्या इब्री ख्रिश्‍चनांना पत्र लिहिले होते त्यांच्याविरुद्ध सैतानाने कोणकोणते डावपेच उपयोगात आणले होते.

      माघार घेण्याचा दबाव ख्रिश्‍चनांवर कसा आला

      ७. (अ) जेरूसलेमच्या मंडळीचा काय इतिहास होता? (ब) पौलाच्या वाचकांपैकी काहींची आध्यात्मिक स्थिती कशी होती?

      ७ पुराव्यानुसार पौलाने सा.यु. ६१ च्या सुमारास इब्री बांधवांना पत्र लिहिले होते. जेरूसलेममध्ये असलेल्या या मंडळीला बऱ्‍याच खडतर अनुभवांतून जावे लागले होते. येशूच्या मृत्यूनंतर भयंकर छळाचा डोंब उसळला; बऱ्‍याच ख्रिश्‍चनांना शहर सोडून निरनिराळ्या ठिकाणी जावे लागले. यानंतर काही काळ वातावरण शांत राहिले आणि त्यामुळे ख्रिश्‍चनांच्या संख्येत वाढ होऊ शकली. (प्रेषितांची कृत्ये ८:४; ९:३१) पण यानंतरच्या वर्षांतही अधूनमधून छळ आणि इतर कठीण प्रसंग येतच राहिले. मात्र पौलाने या हिब्रू ख्रिश्‍चनांना पत्र लिहिले तोपर्यंत पुन्हा एकदा, वातावरण आधीपेक्षा शांत झाले होते. अर्थात, या मंडळीवर वेगळ्या प्रकारचे दबाव येत होते. येशूने जेरूसलेमचा नाश होईल असे भाकीत करून आता तीस वर्षे होऊन गेली होती आणि हा उशीर काहींच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता; येशूची भविष्यवाणी आपल्या जिवंतपणी पूर्ण होणार नाही असे त्यांना वाटू लागले होते. शिवाय काही लोक विश्‍वासात अगदीच नवखे असल्यामुळे त्यांना भयंकर छळासारख्या कठीण परीक्षांचा अनुभव नव्हता. धीर धरण्याचा प्रसंगच आलेला नसल्यामुळे त्यांना या गुणाचे महत्त्व ठाऊक नव्हते. (इब्री लोकांस १२:४) निश्‍चितच सैतानाने या सर्व गोष्टींचा फायदा उचलून त्याचे “डावपेच” खेळले असतील. यांपैकी काही “डावपेच” कोणते होते?

      ८. नव्या, अननुभवी ख्रिस्ती मंडळीविषयी बऱ्‍याच यहुद्यांची मनोवृत्ती कशी होती?

      ८ जेरूसलेम आणि यहुदिया येथील यहुदी समाज या नव्या आणि अननुभवी ख्रिस्ती मंडळीला पाण्यात पाहायचा. यहुद्यांचे गर्विष्ठ धर्मपुढारी आणि त्यांचे अनुयायी ख्रिश्‍चनांना कसे हिणवत असतील याची थोडी कल्पना आपल्याला पौलाच्या पत्रावरून येते. ते कदाचित म्हणत असतील: ‘यहुदी धर्माचा त्याग करणाऱ्‍या या उपटसुंभ ख्रिश्‍चन पंथाजवळ आहे तरी काय! आमच्याजवळ पाहा, शतकानुशतके जेरुसलेममध्ये दिमाखाने उभे असलेले भव्य मंदिर आहे, तिथे सेवा करणारा पवित्र महायाजक आहे, त्याच्या हाताखाली काम करणारे याजकही आहेत; आमच्या मंदिरात दररोज यज्ञार्पणे वाहिली जातात. सिनाय पर्वतावर अद्‌भुत चिन्हे दाखवून खुद्द स्वर्गदूतांनी मोशेला दिलेले नियमशास्त्र आमच्याजवळ आहे. हे ख्रिस्ती आमची काय बरोबरी करणार!’ अशा या उपहासाचा ख्रिश्‍चनांवर काय परिणाम झाला? काही इब्री ख्रिश्‍चन या तिरस्कारपूर्ण बोलण्याने हवालदिल झाले होते. पण पौलाचे पत्र अगदी योग्य वेळी आले.

      त्यांनी नाशाकडे कधीही माघार का घ्यायची नव्हती

      ९. (अ) इब्री लोकांस लिहिलेल्या सबंध पत्राचा मुख्य विषय कोणता आहे? (ब) ख्रिस्ती लोक कोणत्या अर्थाने जेरूसलेममधील मंदिरापेक्षा श्रेष्ठ मंदिरात उपासना करीत होते?

      ९ यहुदियातील इब्री ख्रिश्‍चनांनी माघार घेऊन स्वतःवर नाश ओढवून घेणे किती निरर्थक होते हे त्यांना पटवून देण्यासाठी पौलाने त्यांना दोन कारणे सांगितली. यांपैकी पहिले कारण असे की ख्रिस्ती धर्मातली उपासनापद्धत कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. हाच पौलाच्या पत्राचा मुख्य विषय होता, हे या सबंध पत्रातून प्रकर्षाने जाणवते. जेरूसलेमचे मंदिर हे भविष्यात येणाऱ्‍या वास्तविकतेचे अर्थात, त्यापेक्षा कितीतरी पटीने भव्यदिव्य असलेल्या आणि जे ‘हातांनी केलेले नव्हते’ अशा—यहोवाच्या आत्मिक मंदिराचे, केवळ एक प्रतीक होते. (इब्री लोकांस ९:११) आणि ख्रिश्‍चनांना या मंदिरात, म्हणजेच, खऱ्‍या उपासनेच्या आत्मिक व्यवस्थेअधीन सेवा करण्याचा बहुमान लाभला होता. नियमशास्त्राच्या करारापेक्षा श्रेष्ठ अशा कराराधीन ते सेवा करत होते आणि हजारो वर्षांपासून अभिवचन दिलेल्या या नव्या कराराचा मध्यस्थ येशू ख्रिस्त, हा मोशेपेक्षा श्रेष्ठ होता.—यिर्मया ३१:३१-३४.

      १०, ११. (अ) अहरोनाच्या वंशातला नसूनही, येशू आध्यात्मिक मंदिरात महायाजक म्हणून सेवा करण्यास योग्य का होता? (ब) येशू कोणत्या प्रकारे जेरूसलेममधील मंदिरात सेवा करणाऱ्‍या महायाजकापेक्षा श्रेष्ठ होता?

      १० ख्रिश्‍चनांचा महायाजक येशू ख्रिस्त हा यहुद्यांच्या महायाजकापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ होता. तो अहरोनाच्या कुळातून आलेला नव्हता. उलट तो “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे” महायाजक होता. (स्तोत्र ११०:४) मलकीसदेकाच्या पूर्वजांची कोठेही नोंद नव्हती, तो प्राचीन काळात शालेमचा राजा होता आणि महायाजक देखील. त्यामुळे येशूच्या भविष्यातील भूमिकेला त्याने अगदी योग्यपणे सूचित केले; कारण येशूला मिळालेले याजकपद कोणा अपरिपूर्ण मानवी पूर्वजामुळे नव्हे तर कितीतरी पटीने श्रेष्ठ असणाऱ्‍या यहोवा देवाने वाहिलेल्या शपथेमुळे मिळाले होते. मलकीसदेकाप्रमाणे येशू हा केवळ महायाजक नव्हे तर एक अविनाशी राजा देखील आहे.—इब्री लोकांस ७:११-२१.

      ११ शिवाय, जेरूसलेमच्या मंदिरातल्या महायाजकाप्रमाणे येशूला दर वर्षी बलिदाने देण्याची गरज नव्हती. त्याने एकदाच सर्वकाळासाठी स्वतःचे परिपूर्ण जीवन बलिदान म्हणून दिले. (इब्री लोकांस ७:२७) मंदिरात वाहिली जाणारी सर्व बलिदाने येशूने वाहिलेल्या बलिदानाच्या केवळ प्रतिरूपांप्रमाणे होती. त्याच्या परिपूर्ण बलिदानामुळे विश्‍वास धरणाऱ्‍या सर्वांना आपल्या पापांची खरी क्षमा मिळाली. पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना आठवण करून दिली की हा महायाजक तोच येशू आहे ज्याला जेरूसलेमचे हे ख्रिस्ती बांधव ओळखत होते, आणि तो कधीही बदलणार नाही. तो नम्र अंतःकरणाचा, कृपाळू असून “आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी [त्याला] सहानुभूति” वाटते. हे शब्द खरोखर दिलासा देणारे होते. (इब्री लोकांस ४:१५; १३:८) त्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना ख्रिस्ताच्या महायाजक पदाखाली सहयाजक म्हणून सेवा करण्याचा बहुमान मिळणार होता! मग माघार घेऊन, भ्रष्ट झालेल्या यहुदी धर्माच्या “दुर्बळ व निःसत्व” गोष्टींकडे परत जाण्याचा विचारही करण्यात काय अर्थ होता?—गलतीकर ४:९.

      १२, १३. (अ) कधीही माघार न घेण्याचे कोणते आणखी एक कारण पौलाने दिले? (ब) गतकाळात धीराने तोंड दिलेले परीक्षाप्रसंग आठवून इब्री ख्रिश्‍चनांना कशाप्रकारे नाशाकडे कधीही माघार न घेण्याचे प्रोत्साहन मिळाले असेल?

      १२ माघार घेऊन स्वतःवर नाश न ओढवून घेण्याचे आणखी एक कारण पौलाने या इब्री ख्रिश्‍चनांना सांगितले. ते असे, की आजवर आलेल्या सर्व परीक्षाप्रसंगांना त्यांनी धीराने तोंड दिले होते. पौलाने त्यांना लिहिले: “पूर्वकाळचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली.” त्याने त्यांना आठवण करून दिली की कशाप्रकारे विटंबना व संकटे सोसताना त्यांचा लोकांपुढे “तमाशा झाला.” त्यांच्यापैकी काहींना बंदिवास सहन करावा लागला; तेव्हा त्यांच्या इतर बांधवांनी त्यांचे दुःख आपले समजून त्यांना आधार दिला होता. खरोखर, या सर्व संकटांना दृढ विश्‍वासाने व धीराने तोंड देऊन त्या इब्री ख्रिश्‍चनांनी आपल्याकरता एक आदर्श घालून दिला आहे. (इब्री लोकांस १०:३२-३४) पण पौलाने त्यांना ते दुःखाचे दिवस “आठवा” [“आठवत राहा,” NW] असे का म्हटले? त्या आठवणींनी त्यांचे धैर्य खचले नसते का?

      १३ नाही. उलट, ‘पूर्वीचे दिवस आठवल्यामुळे’ इब्री ख्रिश्‍चनांना याची आठवण झाली असेल की कशाप्रकारे यहोवाने त्यांना प्रत्येक परीक्षाप्रसंगात टिकून राहण्यास मदत केली होती. आणि यहोवाच्या मदतीनेच त्यांनी आजवर सैतानाच्या कित्येक हल्ल्यांना तोंड दिले होते. पौलाने त्यांना लिहिले: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री लोकांस ६:१०) होय, यहोवा त्यांची सर्व विश्‍वासू कार्ये विसरला नव्हता; त्याच्या अनंत स्मृतिकोशात ती जणू जपून ठेवलेली होती. येशूने स्वर्गात संपत्ती साठवा असे सांगितले होते, त्याची येथे आठवण होते. या संपत्तीला चोरांची भीती नाही; शिवाय, तिला कसर लागणार नाही की गंज चढणार नाही. (मत्तय ६:१९-२१) किंबहुना एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने माघार घेऊन स्वतःच नाश ओढवून घेतला तरच ही संपत्ती नष्ट होऊ शकते. अशाप्रकारे माघार घेणे म्हणजे स्वर्गात साठवलेली सगळी संपत्ती आपल्याच हाताने उधळून लावण्यासारखे होईल. या मार्गावर कधीही न जाण्याचे किती जोरदार कारण पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना दिले! इतकी वर्षे विश्‍वासूपणे सेवा केल्यावर सगळे श्रम मातीत मिळवण्यात काय अर्थ? शेवटपर्यंत धीर धरणेच सर्वात चांगले आणि योग्यही आहे.

      आपणही कधीच नाशाकडे माघार घेऊ नये

      १४. आपल्या समोर येणारी कोणती आव्हाने पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांवर आलेल्या परीक्षांसारखी आहेत?

      १४ आज देखील खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कधीही माघार घेण्याचा विचार करू नये. आणि यासाठी तितकीच सबळ कारणे आहेत. एक तर, आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे की शुद्ध उपासनेच्या रूपात यहोवाने आपल्याला एक महान आशीर्वाद दिला आहे. अर्थात, पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांप्रमाणे आपल्या काळातही अधिक सुस्थापित धर्मांचे सदस्य गर्विष्ठपणे त्यांच्या मोठमोठ्या धार्मिक वास्तू आणि अतिप्राचीन परंपरांचा दाखला देऊन आपल्याला तिरस्काराची वागणूक देतात; आपला उपहास करतात. पण यहोवाकडून आपल्याला ही खात्री आहे की त्याला आपली उपासना स्वीकार्य आहे. किंबहुना, पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनाही अनुभवायला मिळाले नाही असे अद्‌भुत आशीर्वाद आज आपण अनुभवत आहोत. तुम्ही म्हणाल, ‘हे कसे शक्य आहे?’ कारण त्या ख्रिश्‍चनांच्या काळात तर आध्यात्मिक मंदिराची स्थापना झाली होती. सा.यु. २९ मध्ये ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाल्यावर तो या आध्यात्मिक मंदिराचा महायाजक बनला. त्यांच्यापैकी काहींनी आपल्या डोळ्यांनी देवाच्या पुत्राला पाहिले होते आणि त्याने केलेले चमत्कार देखील त्यांनी पाहिले होते. येशूच्या मृत्यूनंतरही चमत्कार होत राहिले. अर्थात, भाकीत केल्याप्रमाणे कालांतराने अशाप्रकारची चमत्कार करण्याची दाने संपुष्टात आली.—१ करिंथकर १३:८.

      १५. आज खरे ख्रिस्ती कोणत्या भविष्यवाणीच्या पूर्णतेच्या काळात जगत आहेत, आणि याचा आपल्या उपासनेवर कोणता परिणाम झाला आहे?

      १५ पण आज आपण यहेज्केलच्या ४०-४८a अध्यायांतील मंदिराच्या बहुव्यापक भविष्यवाणीची अतिशय अर्थसूचक पूर्णता होत असलेल्या काळात जगत आहोत. या भविष्यवाणीत सांगितल्यानुसार शुद्ध उपासनेकरता देवाने केलेल्या व्यवस्थेची पुनर्स्थापना झालेली आपण पाहिली आहे. देवाच्या आध्यात्मिक मंदिराचे शुद्धीकरण झाले असून सर्व प्रकारची अशास्त्रीय धार्मिक तत्त्वे, चालीरिती आणि मूर्तिपूजा यांपासून ते मुक्‍त झाले आहे. (यहेज्केल ४३:९; मलाखी ३:१-५) या शुद्धीकरणामुळे आपल्याला कोणकोणते फायदे झाले आहेत याचा विचार करा.

      १६. पहिल्या शतकातले ख्रिश्‍चन काय घडत असल्यामुळे निरुत्साही झाले होते?

      १६ पहिल्या शतकात संघटित ख्रिस्ती मंडळीचे भविष्य अंधकारमय दिसत होते. येशूने भाकीत केले होते की नुकतीच पेरणी केलेल्या गव्हाच्या शेतात कोणी भरमसाट निदण पेरावे तशी ख्रिस्ती मंडळीची स्थिती होईल. किंबहुना एक वेळ अशी येईल जेव्हा गहू आणि निदण सारखेच दिसू लागेल. (मत्तय १३:२४-३०) आणि असेच झाले. पहिल्या शतकाच्या समाप्तीपर्यंत ख्रिस्ती धर्मात गैरशास्त्रीय शिकवणुकींच्या शिरकावाला प्रतिकार करणारा वयोवृद्ध प्रेषित योहान हा एकटाच उरला होता; आणि एव्हाना धर्मत्याग चांगलाच फोफावला होता. (२ थेस्सलनीकाकर २:६; १ योहान २:१८) सर्व प्रेषितांचा मृत्यू झाल्यावर काही काळातच ख्रिस्ती धर्मात वेगळा पाळक वर्ग निर्माण झाला; स्वतःचा वेगळेपणा दाखवण्यासाठी खास प्रकारचा पोषाख घालणारे हे पाळक चर्चच्या सदस्यांवर अत्याचार करायचे. पाहता पाहता धर्मत्यागाचे विष सर्वत्र पसरू लागले. विश्‍वासू ख्रिश्‍चन हे सर्व पाहून किती हताश झाले असतील याची कल्पना करा! अलीकडेच स्थापित झालेली खरी उपासना अशी भ्रष्ट होताना पाहून त्यांना निश्‍चितच अतिशय मनःस्ताप झाला असेल. आणि विशेष म्हणजे ख्रिस्ताने मंडळीची स्थापना करून एक शतकही पूर्ण झाले नसताना हे सर्व घडले.

      १७. आधुनिक काळात ख्रिस्ती मंडळी, पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीपेक्षा कोणत्या अर्थाने अधिक काळ टिकून राहिली आहे?

      १७ आता याच्याच विरोधातील परिस्थिती विचारात घ्या. आज, प्रेषितांच्या मृत्यूपर्यंत जितका काळ गेला त्यापेक्षा कितीतरी अधिक काळापर्यंत शुद्ध उपासना टिकून राहिली आहे. १८७९ साली या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला तेव्हापासून यहोवाने आपली उपासना उत्तरोत्तर शुद्ध करून आपल्याला आशीर्वादित केले आहे. १९१८ साली यहोवा व ख्रिस्त येशू यांनी आध्यात्मिक मंदिराचे शुद्धिकरण करण्यासाठी त्यात प्रवेश केला. (मलाखी ३:१-५) १९१९ पासून, यहोवा देवाची उपासना करण्यासाठी असणाऱ्‍या व्यवस्थेत अधिकाधिक शुद्धता आणली गेली. बायबलच्या भविष्यवाण्या आणि तत्त्वांविषयीची आपली समज अधिकाधिक स्पष्ट होत गेली आहे. (नीतिसूत्रे ४:१८) याचे श्रेय कोणाला जाते? अपरिपूर्ण मनुष्यांना निश्‍चितच नाही. केवळ यहोवा आणि मंडळीचे मस्तक असणारा त्याचा पुत्रच या भ्रष्ट काळातील धर्मभ्रष्टतेपासून आपल्या लोकांचे रक्षण करू शकत होते. म्हणूनच, आज आपल्याला खऱ्‍या उपासनेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल यहोवाचे आभार मानण्यास आपण कधीही विसरू नये. तसेच, कधीही नाशाकडे माघार न घेण्याचा आपण अगदी पक्का निर्धार करू या!

      १८. कधीही नाशाकडे माघार न घेण्याचे कोणते कारण आपल्याजवळ आहे?

      १८ इब्री ख्रिश्‍चनांप्रमाणे, आपल्याजवळही आणखी एक कारण आहे की ज्यामुळे आपण कधीही भ्याडपणे माघार घेऊ नये; आणि ते असे की आपणही आजवर कित्येक परीक्षाप्रसंगांना धीराने तोंड दिले आहे. आपल्यापैकी काहींनी अलीकडेच यहोवाची सेवा करण्याचे सुरू केले आहे, तर काहींनी कितीतरी दशकांपासून यहोवाची सेवा केली आहे, पण आपण सर्वांनीच विश्‍वासू ख्रिस्ती कार्यांची संपत्ती साठवली आहे. आपल्यापैकी काहींनी तुरुंगवास, सरकारी प्रतिबंध, क्रूर वागणूक किंवा आर्थिक नुकसान अशा वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये छळही सोसला आहे; तर इतरांना त्यांच्या कुटुंबीयांकडून विरोध, तिरस्कार, उपहास आणि अनास्थेची वागणूक सहन करावी लागली. या सर्व प्रकारच्या आव्हानांना, परीक्षांना आपण सर्वांनी धीराने तोंड दिले आणि विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत राहिलो. आणि असे केल्यामुळे यहोवाच्या अनंत स्मृतीकोशात आपणही विश्‍वासू सेवेची संपत्ती साठवली आहे. तेव्हा, येथपर्यंत आल्यावर आता माघार घेऊन पुन्हा या भ्रष्ट जुन्या व्यवस्थेत परतण्याची ही निश्‍चितच वेळ नाही! आपल्याच हातांनी आपल्या सर्व परिश्रमांवर पाणी सोडणे शहाणपणाचे ठरेल का? खासकरून आज, जेव्हा नाश यायला “अगदी थोडा वेळ राहिला आहे”?—इब्री लोकांस १०:३७.

      १९. पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

      १९ होय, “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी” कधीही न होण्याचा आपण निर्धार करू या! उलट आपण “विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी” होऊ या. (इब्री लोकांस १०:३९) या विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे आणि आपल्या ख्रिस्ती बांधवांनाही असे करण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो? आमचा पुढचा लेख या विषयावर प्रकाश टाकेल.

  • विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आपण होऊ या
    टेहळणी बुरूज—१९९९ | डिसेंबर १५
    • विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आपण होऊ या

      “आपण . . . जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आहो.”—इब्री लोकांस १०:३९.

      १. यहोवाच्या प्रत्येक विश्‍वासू सेवकाचा विश्‍वास बहुमोल आहे असे का म्हणता येते?

      पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही राज्य सभागृहात जाल तेव्हा आपल्या भोवती असलेल्या सर्व यहोवाच्या उपासकांकडे पाहून थोडा विचार करा. हे सर्वजण किती वेगवेगळ्या प्रकाराने यहोवाला विश्‍वासू राहतात याचा विचार करा. त्यांच्यात तुम्हाला काही वयोवृद्ध बांधव दिसतील ज्यांनी कितीतरी तपे यहोवाची सेवा केली आहे; तरुण मुलेमुली जे दररोज आपल्या सोबत्यांच्या दबावाला, थट्टेला तोंड देतात; पालक, जे आपल्या मुलांनी देवाला भिऊन चालावे म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी सतत झटतात. शिवाय, मंडळीत वडील आणि सेवा सेवक म्हणून अनेक जबाबदाऱ्‍या पार पाडणारे बांधवही तुम्हाला दिसतील. होय, सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करून यहोवाची सेवा करत राहणारे प्रत्येक वयोगटांतील आध्यात्मिक भाऊबहिणी तुम्हाला दिसतील. यांपैकी प्रत्येक बांधवाचा विश्‍वास किती मोलाचा आहे!—१ पेत्र १:७.

      २. इब्री लोकांस पत्र यातील १० व्या आणि ११ व्या अध्यायातील पौलाचे मार्गदर्शन आपल्याकरता उपयोगी का आहे?

      २ विश्‍वासाचे महत्त्व प्रेषित पौलाने जितके जाणले तितके अपरिपूर्ण मानवांपैकी कदाचित कोणीही जाणले नसेल. पौलाने तर हे देखील ओळखले होते की विश्‍वासामुळेच ‘जिवाचे तारण’ होते. (इब्री लोकांस १०:३९) पण पौलाला याची जाणीव होती की या अविश्‍वासू जगात खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या विश्‍वासाची परीक्षा होईल. त्यामुळे जेरुसलेम व यहुदिया येथील इब्री ख्रिश्‍चनांबद्दल पौलाला अतिशय काळजी वाटत होती कारण त्यांना आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी अक्षरशः झगडावे लागत होते. इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात १० व्या आणि ११ व्या अध्यायातील काही भागांवर विचार करताना, पौलाने कशाप्रकारे या इब्री ख्रिश्‍चनांचा विश्‍वास मजबूत करण्याचा प्रयत्न केला याकडे आपण लक्ष देऊ. तसेच, आपण कशाप्रकारे आपला स्वतःचा आणि इतरांचाही विश्‍वास अधिक बळकट करू शकतो याकडेही आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करू.

      एकमेकांवर विश्‍वास दाखवा

      ३. पौलाला आपल्या ख्रिस्ती भाऊ बहिणींबद्दल आत्मविश्‍वास होता हे इब्री लोकांस १०:३९ या वचनातील त्याच्या शब्दांवरून कशाप्रकारे दिसून येते?

      ३ हा वृत्तान्त वाचताना पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पौलाची आपल्या वाचकांबद्दल असलेली भरवशाची मनोवृत्ती. त्याने लिहिले: “परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आहो.” (इब्री लोकांस १०:३९) पौलाने आपल्या विश्‍वासू ख्रिस्ती सहकाऱ्‍यांविषयी नकारात्मक नव्हे, तर अतिशय सकारात्मक विचार केला. शिवाय, त्याने “आपण” असे म्हटले याकडेही लक्ष द्या. पौल स्वतः धार्मिक होता, पण म्हणून मी या लोकांपेक्षा फारच धार्मिक आहे अशा अविर्भावात पौलाने स्वतःला आपल्या वाचकांपेक्षा वरचढ केले नाही. (पडताळा उपदेशक ७:१६.) उलट त्याने स्वतःलाही त्यांच्यात सामील केले. आपल्यासोबत आपले विश्‍वासू ख्रिस्ती वाचक देखील सर्व अडथळ्यांना निर्भयपणे तोंड देऊन, कोणत्याही परिस्थितीत नाशाकडे माघार न घेता विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी असल्याचे शाबीत करतील असा आत्मविश्‍वास त्याने व्यक्‍त केला.

      ४. पौलाला आपल्या सहविश्‍वासू बांधवांविषयी वाटणाऱ्‍या आत्मविश्‍वासामागे कोणती कारणे होती?

      ४ पौलाला आपल्या बांधवांविषयी इतका आत्मविश्‍वास का होता? इब्री ख्रिश्‍चनांच्या दोषांकडे तो मुद्दाम दुर्लक्ष करीत होता का? नाही, असे म्हणता येणार नाही. कारण त्याने या इब्री ख्रिश्‍चनांचे आध्यात्मिक दोष सुधारण्यासाठी त्यांना अगदी सुस्पष्ट मार्गदर्शन दिले होते. (इब्री लोकांस ३:१२; ५:१२-१४; ६:४-६; १०:२६, २७; १२:५) पण तरीसुद्धा पौलाला आपल्या बांधवांवर विश्‍वास होता आणि याची दोन खास कारणे होती. (१) पौल यहोवाचे अनुकरण करीत होता. त्यामुळे यहोवा ज्या दृष्टीने आपल्या लोकांना पाहतो त्याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहण्याचा पौलानेही प्रयत्न केला. म्हणजेच त्याने केवळ त्यांच्या दोषांवर लक्ष केंद्रित न करता त्यांच्या चांगल्या गुणांकडे पाहिले, भविष्यात योग्य निर्णय घेऊन ते आपल्या दोषांवर मात करतील असा विश्‍वास त्याने व्यक्‍त केला. (स्तोत्र १३०:३; इफिसकर ५:१) (२) पौलाला पवित्र आत्म्याच्या शक्‍तीवर पूर्ण विश्‍वास होता. जो ख्रिस्ती यहोवाला विश्‍वासू राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, त्याच्यासमोर कोणतेही अडथळे येवोत किंवा मनुष्याच्या स्वाभाविक पापी वृत्तीमुळे त्याच्यात कोणतेही दोष असोत, यहोवा त्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देईल याविषयी पौलाला कोणतीच शंका नव्हती. (२ करिंथकर ४:७; फिलिप्पैकर ४:१३) त्याअर्थी, पौलाने आपल्या ख्रिस्ती भावांबद्दल आणि बहिणींबद्दल बाळगलेला आत्मविश्‍वास योग्यच होता; वास्तविकतेकडे डोळेझाक करून बाळगलेला निराधार आत्मविश्‍वास नव्हता. उलट या विश्‍वासाला बायबलचा आधार होता.

      ५. पौलाने आपल्या बांधवांविषयी जो आत्मविश्‍वास बाळगला, त्याचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो, आणि असे केल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून येतील?

      ५ निश्‍चितच पौलाने दाखवलेल्या आत्मविश्‍वासाचा अनेकांवर चांगला परिणाम झाला असेल. जेरुसलेम व यहुदिया येथील मंडळ्यांना तर खासकरून पौलाच्या शब्दांतून अतिशय प्रोत्साहन मिळाले असेल. गर्विष्ठ यहुदी विरोधकांकडून सतत उपहासाची व अनास्थेची वागणूक सहन करणाऱ्‍या इब्री ख्रिश्‍चनांना पौलाच्या शब्दांतून, विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी होण्याचा संकल्प करण्याचे प्रोत्साहन मिळाले. आज आपणही एकमेकांना अशाचप्रकारे मदत करू शकतो का? दुसऱ्‍यांचे दोष, त्यांचे वाईट गुण आपल्याला फार सहज दिसून येतील. (मत्तय ७:१-५) पण केवळ चुकाच पाहण्याऐवजी, हा बांधव किंवा ही बहीण कशाप्रकारे आपल्या विश्‍वासात टिकून आहे याची जर आपण दखल घेतली आणि कदर बाळगली तर आपण एकमेकांना अधिक मदत करू शकतो. आपण आपल्या बांधवांना असे प्रोत्साहन देतो तेव्हा त्यांचा विश्‍वास अधिक बळकट होऊ शकतो.—रोमकर १:११, १२.

      देवाच्या वचनाचा योग्य वापर

      ६. इब्री लोकांस १०:३८ मध्ये आपण पौलाचे जे शब्द वाचतो ते त्याने कोठून उद्धृत केले होते?

      ६ पौलाने आणखी एका मार्गाने आपल्या सहविश्‍वासू बांधवांचा विश्‍वास बळकट केला, आणि तो म्हणजे शास्त्रवचनांचा परिणामकारक वापर करून. उदाहरणार्थ त्याने लिहिले: “माझा नीतिमान मनुष्य विश्‍वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही.” (इब्री लोकांस १०:३८) या ठिकाणी पौलाने संदेष्टा हबक्कुक याचे शब्द उद्धृत केले.a पौलाच्या वाचकांना, अर्थात इब्री ख्रिश्‍चनांना संदेष्ट्यांच्या पुस्तकांची चांगली माहिती असल्यामुळे हे शब्द त्यांच्या परिचयाचे असावेत. सा.यु. ६१ च्या सुमारास जेरुसलेम आणि आसपासच्या परिसरांत वसलेल्या ख्रिश्‍चनांचा विश्‍वास दृढ करण्याचा पौलाचा मुख्य उद्देश लक्षात घेता, त्याने हबक्कुकचे उदाहरण अगदी अचूक निवडले. असे का म्हणता येईल?

      ७. हबक्कूकची भविष्यवाणी केव्हा लिहिण्यात आली आणि त्या काळी यहुदात कोणती परिस्थिती होती?

      ७ सा.यु.पू. ६०७ साली म्हणजे, जेरुसलेमचा नाश होण्याच्या वीसएक वर्षांआधी हबक्कूकने हे पुस्तक लिहिले होते. दृष्टान्तात हबक्कूकला खास्द्यांचे (किंवा, बॅबिलोनी लोकांचे) “उग्र व उतावळे राष्ट्र” यहूदावर झडप घालून जेरुसलेमचा नाश करीत आहे आणि अनेक राष्ट्रांना गिळंकृत करीत आहे असे दिसले. (हबक्कूक १:५-११) पण हे महासंकट येण्याविषयी, यशयाच्या काळात म्हणजे कमीतकमी शंभर वर्षांआधीच भाकीत करण्यात आले होते. हबक्कूकच्या काळात योशिया या चांगल्या राजाची जागा यहोयाकिम याने घेतली आणि यहुदात पुन्हा एकदा अधर्म फोफावला. यहोयाकिम राजा यहोवाचे नाव घेणाऱ्‍यांचा छळ करत असे, इतकेच नव्हे तर त्यांना जिवे देखील मारत असे. (२ इतिहास ३६:५; यिर्मया २२:१७; २६:२०-२४) म्हणूनच संदेष्टा हबक्कूक याने व्याकूळ होऊन यहोवाचा धावा केला: “हे परमेश्‍वरा, मी किती वेळ ओरडू?”—हबक्कूक १:२.

      ८. हबक्कूकचे उदाहरण पहिल्या शतकातल्या आणि आजच्याही ख्रिश्‍चनांकरता कशाप्रकारे उपयुक्‍त होते?

      ८ जेरुसलेमचा नाश व्हायला आणखी किती काळ उरला आहे हे हबक्कूकला ठाऊक नव्हते. त्याचप्रमाणे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना देखील यहुदी व्यवस्थीकरणाचा नाश केव्हा होईल हे ठाऊक नव्हते. आज आपल्यालाही सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाविरुद्ध यहोवाचा न्यायदंड बजावण्यात येईल “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी” ठाऊक नाही. (मत्तय २४:३६) म्हणूनच, यहोवाने हबक्कूकला काय उत्तर दिले आणि त्यात त्याने कोणत्या दोन गोष्टी हबक्कूकला सांगितल्या याकडे लक्ष द्या. पहिले म्हणजे, यहोवाने त्याला आश्‍वासन दिले की जेरुसलेमचा नाश अगदी योग्य वेळी होईल. देवाने त्याला सांगितले की मनुष्याच्या दृष्टिकोनातून नाश यायला विलंब होत असल्याचे भासत असले तरीसुद्धा “त्याला, विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) दुसरी गोष्ट म्हणजे “धार्मिक तर आपल्या विश्‍वासाने वाचेल,” याचीही यहोवाने हबक्कूकला आठवण करून दिली. (हबक्कूक २:४) ही किती सुस्पष्ट, सुंदर सत्ये आहेत. अंत केव्हा येईल हे सर्वात महत्त्वाचे नाही, पण आपण शेवटपर्यंत विश्‍वासू राहू की नाही हे सर्वात महत्त्वाचे आहे.

      ९. यहोवाचे आज्ञाधारक सेवक (अ) सा.यु.पू. ६०७ साली आणि (ब) सा.यु. ६६ सालानंतर कशाप्रकारे आपल्या विश्‍वासूपणामुळे वाचले? (क) विश्‍वास दृढ करणे इतके महत्त्वाचे का आहे?

      ९ सा.यु.पू. ६०७ साली जेरुसलेमचा नाश झाला तेव्हा यिर्मया, त्याचा चिटणीस बारूख, एबद-मलेख आणि रेखाब्यांच्या विश्‍वासू घराण्याने हबक्कूकला यहोवाने दिलेल्या अभिवचनाची पूर्तता पाहिली. जेरुसलेमच्या भयंकर विनाशातून ते ‘वाचले.’ का? कारण त्यांच्या विश्‍वासूपणाचे यहोवाने त्यांना प्रतिफळ दिले. (यिर्मया ३५:१-१९; ३९:१५-१८; ४३:४-७; ४५:१-५) तसेच पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी देखील पौलाच्या मार्गदर्शनाकडे लक्ष देऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला; असे आपण म्हणू शकतो, कारण सा.यु. ६६ साली जेव्हा रोमी सैन्याने जेरुसलेमवर चढाई केली आणि मग कारण नसताना माघार घेतली तेव्हा त्यांनी येशूच्या ताकिदीनुसार तेथून पळ काढला. (लूक २१:२०, २१) ते देखील आपल्या विश्‍वासूपणामुळे वाचले. त्याचप्रमाणे, आपण अंत येईपर्यंत विश्‍वासू राहिलो तर आपण देखील वाचू. आपला विश्‍वास आताच बळकट करणे किती महत्त्वाचे आहे, नाही का?

      विश्‍वासू लोकांचे प्रेरणादायी वर्णन

      १०. पौलाने मोशेच्या विश्‍वासाचे कसे वर्णन केले आणि या बाबतीत आपण मोशेचे अनुकरण कसे करू शकतो?

      १० इब्री ख्रिश्‍चनांचा विश्‍वास भक्कम करण्यासाठी पौलाने त्यांना अतिशय प्रेरणादायक उदाहरणे देखील सांगितली. इब्री लोकांस पत्र यातला ११ वा अध्याय वाचताना, बायबलमधल्या विश्‍वासू लोकांच्या उदाहरणांचे पौल कशाप्रकारे भावनोद्दीपक वर्णन करतो याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ मोशेबद्दल तो म्हणतो, की “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस ११:२७) दुसऱ्‍या शब्दांत, मोशेच्या नजरेत यहोवा इतका वास्तविक होता, की तो अदृश्‍य देवालासुद्धा जणू पाहू शकत होता. आज आपल्याविषयी देखील असेच म्हणता येईल का? यहोवाशी जवळचा नातेसंबंध असला पाहिजे, वगैरे बोलणे सोपे आहे पण हा नातेसंबंध बांधणे आणि दिवसेंदिवस तो अधिक मजबूत करणे तितके सोपे नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि हेच प्रयत्न आपण केले पाहिजेत! आपण कोणतेही निर्णय घेताना, अगदी लहानसहान वाटणारे निर्णय घेताना देखील यहोवाची आठवण करतो, इतका तो आपल्याला वास्तविक वाटतो का? इतका मजबूत आपला विश्‍वास असेल, तर आपण कितीही भयंकर विरोधाचा सामना करू शकू.

      ११, १२. (अ) हनोखाच्या विश्‍वासाची कोणत्या परिस्थितीत परीक्षा झाली असावी? (ब) हनोखाला कोणते प्रतिफळ मिळाले आणि त्याला यामुळे कशाप्रकारे प्रोत्साहन मिळाले?

      ११ हनोखाचेही विश्‍वासू उदाहरण लक्षात घ्या. हनोखला ज्या विरोधाला तोंड द्यावे लागले त्याची कल्पना करणे आज आपल्यासाठी कठीण आहे. त्याच्या काळातल्या अधर्मी लोकांविरुद्ध यहोवाच्या न्यायाचा झोंबणारा संदेश त्याला घोषित करायचा होता. (यहूदा १४, १५) या विश्‍वासू पुरुषावर निश्‍चितच अतिशय भयंकर आणि क्रूर छळ आला असेल, म्हणूनच यहोवाने त्याला ‘लोकांतरी नेले.’ म्हणजेच, त्याच्या शत्रूंनी त्याचा घात करण्याआधी यहोवाने त्याला जिवंत अवस्थेतून मृत्यूच्या निद्रावस्थेत नेले. त्यामुळे आपणच घोषित केलेल्या भविष्यवाणीची पूर्तता हनोखाला पाहायला मिळाली नाही. पण, त्याला दुसरे प्रतिफळ मिळाले, जे एका दृष्टीने कितीतरी पटीने श्रेष्ठ होते.—इब्री लोकांस ११:५; उत्पत्ती ५:२२-२४.

      १२ पौल याचा खुलासा करतो: “लोकांतर होण्यापूर्वी [हनोखाविषयी] साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.” (इब्री लोकांस ११:५) याचा काय अर्थ होतो? मृत्यू होण्याआधी हनोखाला काहीतरी दृष्टान्त झाला असावा. पृथ्वीवर येणार असलेल्या ज्या परादीसमध्ये हनोखाचेही पुनरुत्थान होईल, त्या परादीसचा दृष्टान्त कदाचित त्याला झाला असेल. एवढे मात्र निश्‍चित आहे की, यहोवाने हनोखाच्या विश्‍वासूपणावर आपण संतुष्ट असल्याचे त्याला प्रकट केले. हनोखाने यहोवाचे मन आनंदित केले होते. (पडताळा नीतिसूत्रे २७:११.) हनोखाच्या जीवनाचा वृत्तान्त हृदयस्पर्शी आहे, नाही का? तुम्हाला असे विश्‍वासू जीवन जगायची इच्छा आहे का? मग या विश्‍वासू लोकांची उदाहरणे वास्तविक आहेत या जाणिवेने त्यांवर लक्षपूर्वक विचार करा. दररोज, यहोवावर पूर्ण विश्‍वास ठेवून चालण्याचा निर्धार करा. आणखी एक गोष्ट नेहमी आठवणीत असू द्या. यहोवाचे विश्‍वासू लोक, देवाच्या अभिवचनांच्या पूर्तीची अंतिम तारीख किंवा कालमर्यादा लक्षात ठेवून त्याची सेवा करत नाहीत. उलट, सदासर्वदा यहोवाची सेवा करण्याचा आपला निर्धार आहे! असे केल्यामुळे आपण या दुष्ट जगातही सर्वात उत्तम जीवन जगू शकतो आणि येणाऱ्‍या देवाच्या राज्यातही उत्तम जीवन मिळण्याची आशा करू शकतो.

      विश्‍वासात मजबूत होणे

      १३, १४. (अ) इब्री लोकांस १०:२४, २५ या वचनांतील पौलाचे शब्द आपल्या सभांना अधिक आनंददायक बनवण्यास कसे सहायक ठरू शकतात? (ब) ख्रिस्ती सभांचा मुख्य उद्देश कोणता आहे?

      १३ पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना विश्‍वास मजबूत करण्यासाठी अनेक उपयोगी सूचना दिल्या. यांपैकी दोनच सूचना आपण आता लक्षात घेऊ. इब्री लोकांस १०:२४, २५ ही वचने आपल्या परिचयाची असतीलच; येथे पौलाने ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन दिले आहे. पण देवाच्या प्रेरणेने हे मार्गदर्शन करताना, पौलाने केवळ सभांना जाऊन दर्शकाची भूमिका घेण्यास सांगितले नाही, हेही लक्षात घ्या. उलट या सभांमध्ये बांधवांना एकमेकांशी ओळख वाढवण्याची, देवाची सेवा आणखी उत्साहाने करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन व प्रोत्साहन देण्याची संधी असते असे पौल म्हणतो. आपण सभांमध्ये केवळ घेण्यासाठी नव्हे, तर देण्यासाठी जातो. यामुळे आपल्या सभांमध्ये अधिक आनंदाचे वातावरण राहते.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

      १४ पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण यहोवा देवाची उपासना करण्याकरता ख्रिस्ती सभांना जातो. प्रार्थना करताना आणि गीत गाताना आपण त्यात सामील होतो, सभा चालली असताना लक्षपूर्वक ऐकतो आणि आपल्या उत्तरांतून आणि नेमलेले भाग सभेत सादर करताना यहोवाला स्तुतीरूपी “ओठांचे फळ” अर्पण करतो; हे सर्व आपल्या उपासनेचे पैलू आहेत. (इब्री लोकांस १३:१५) सभांना जाण्याचे मुख्य उद्देश लक्षात ठेवून प्रत्येक सभेत त्यानुसार कार्य केल्यास आपला विश्‍वास निश्‍चितच दर वेळी अधिक मजबूत होईल.

      १५. पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना आपल्या सेवेत टिकून राहण्याचे प्रोत्साहन का दिले आणि तेच मार्गदर्शन आज आपल्याकरताही का उपयुक्‍त आहे?

      १५ विश्‍वास मजबूत करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे प्रचार कार्य. पौलाने लिहिले: “आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्‍वसनीय आहे.” (इब्री लोकांस १०:२३) एखादी गोष्ट हातून सुटून जाण्याचा धोका असतो तेव्हा आपण दृढ धरण्याचा सल्ला देतो. इब्री ख्रिश्‍चनांनी त्यांची ख्रिस्ती सेवा सोडून द्यावी म्हणून सैतान त्यांच्यावर सतत दबाव आणत होता आणि आज देखील देवाच्या लोकांवर तो असाच दबाव आणत आहे. या दबावाला आपण कसे तोंड द्यावे? पौलाने काय केले याकडे लक्ष द्या.

      १६, १७. (अ) पौल सेवेकरता कशाप्रकारे धैर्यवान झाला? (ब) विशिष्ट पद्धतीने ख्रिस्ती सेवा करायला भीती वाटत असल्यास आपण काय करावे?

      १६ थेस्सलनीकाकर ख्रिश्‍चनांना पौलाने लिहिले: “तुम्हास कळल्याप्रमाणे पूर्वी फिलिप्पैत दुःख भोगल्यावर आणि गांजणूक सोसल्यावर आम्ही मोठ्या कष्टांत असता देवाचे शुभवर्तमान तुम्हांजवळ सांगायला आपल्या देवामध्ये धैर्यवान झालो.” (१ थेस्सलनीकाकर २:२, पं.र.भा.) पौल व त्याच्या सोबत्यांना फिलिप्पै येथे कोणत्या प्रकारची “गांजणूक” सहन करावी लागली? काही विद्वानांच्या मते पौलाने वापरलेला ग्रीक शब्द हा अपमानास्पद, लाजिरवाण्या किंवा अत्याचारी वागणुकीच्या संदर्भात वापरला जातो. फिलिप्पै येथील अधिकाऱ्‍यांनी त्यांना मारहाण केली, त्यांना तुरुंगात टाकले व त्यांचे पाय खोड्यात अडकवले. (प्रेषितांची कृत्ये १६:१६-२४) या दुःखदायक अनुभवाचा पौलावर कसा परिणाम झाला? त्याच्या मिशनरी दौऱ्‍यातील पुढच्या शहरात, अर्थात थेस्सलनीका येथे तो गेला तेव्हा तो घाबरलेला आहे किंवा ख्रिस्ती सेवेतून माघार घेत आहे असे तिथल्या बांधवांना जाणवले का? नाही, उलट तो ‘धैर्यवान झाला.’ आपल्या भीतीवर मात करून तो धैर्याने प्रचार करत राहिला.

      १७ हे धैर्य पौलाला कोठून मिळाले? आपोआपच त्याच्या मनात निर्माण झाले का? नाही, तो म्हणतो की आम्ही “आपल्या देवामध्ये धैर्यवान झालो.” बायबल अनुवादकांसाठी असलेल्या एका संदर्भग्रंथानुसार या विधानाचे असेही भाषांतर करता येते, की “देवाने आमच्या मनातून भीती काढून टाकली.” त्यामुळे, जर तुम्हालाही सेवाकार्य करण्यास थोडी भीती वाटत असेल, किंवा एखाद्या विशिष्ट मार्गाने प्रचार करायला तुम्हाला भीती वाटत असेल तर मग तुम्ही देखील यहोवाला हीच प्रार्थना करू शकता. तुमच्या मनातून भीती काढून टाकण्याची आणि धैर्याने प्रचार कार्य करण्यास मदत करण्याची तुम्ही त्याला विनंती करू शकता. शिवाय, तुमच्याकडूनही तुम्ही काही प्रयत्न करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला व्यापारी क्षेत्रात किंवा रस्त्यावर उभे राहून किंवा अनौपचारिकरित्या किंवा फोनवरून साक्ष द्यायला भीती वाटत असेल, तर त्या विशिष्ट मार्गाने प्रचार करण्यात निपुण असलेल्या बांधवासोबत तुम्ही सेवेला जाण्याची व्यवस्था करू शकता. त्या बांधवाची हरकत नसल्यास सुरवातीला तोच बोलण्यात पुढाकार घेऊ शकतो. तो बोलत असताना तुम्ही मात्र बारकाईने निरीक्षण करून बरेच काही शिकू शकता. यानंतर स्वतःही त्यांच्यासारखे बोलण्याचे धैर्य करा.

      १८. आपण धैर्याने सेवा केल्यास आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?

      १८ तुम्ही धैर्यवान झाल्यास किती चांगले परिणाम मिळतील याचा विचार करा. हिम्मत न हारता किंवा निरुत्साही न होता जेव्हा तुम्ही आपले प्रयत्न सुरू ठेवता तेव्हा साहजिकच इतरांना सत्य सांगण्याचे अनेक चांगले अनुभव तुम्हाला येतील; विचार करा, जर तुम्ही धैर्यच केले नाही तर हे सर्व चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील का? (पृष्ठ २५ पाहा.) शिवाय, तुम्हाला कठीण वाटणारे काम केल्याने यहोवाला आनंदित केल्याचे समाधान तुम्हाला लाभेल. तसेच तुमच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी स्वतः यहोवा तुम्हाला मदत करत आहे, तुमच्यावर आशीर्वाद देत आहे हे तुम्हाला जाणवेल. विशेष म्हणजे तुमचा विश्‍वास मजबूत होईल. तुमचा स्वतःचा विश्‍वास मजबूत झाल्याशिवाय तुम्ही इतरांचा विश्‍वास मजबूत करू शकणार नाही.—यहूदा २०, २१.

      १९. ‘विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना’ कोणते अद्‌भुत प्रतिफळ मिळेल?

      १९ आपला स्वतःचा आणि इतरांचाही विश्‍वास दिवसेंदिवस अधिक मजबूत करण्याचा सदोदीत प्रयत्न करत राहा. देवाच्या वचनाचा परिणामकारक पद्धतीने उपयोग केल्याने, बायबलमधल्या विश्‍वासू पुरुषांची उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर उभी करून त्यांवर बारकाईने विचार केल्याने, ख्रिस्ती सभांची चांगली तयारी व त्यांत सहभाग घेतल्याने आणि प्रचार कार्याची बहुमोल कामगिरी प्रामाणिकपणे पूर्ण केल्याने तुम्ही आपला आणि इतरांचाही विश्‍वास मजबूत करू शकता. हे सर्व केल्यास, तुम्ही खात्री बाळगू शकता की तुम्हीही “विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी” आहात. आणि आठवणीत असू द्या की याच विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना अतिशय अद्‌भुत प्रतिफळ मिळेल. कारण हे लोक “जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी” आहेत.b तेव्हा आपल्या विश्‍वासात अधिकाधिक उन्‍नती करा. यहोवा तुम्हाला सदैव आपल्या छत्रछायेत ठेवो!

      [तळटीपा]

      a पौलाने हबक्कुक २:४ हे वचन सेप्ट्युजिंट नावाच्या भाषांतरातून घेतले; या भाषांतरात, “कोणी जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही” हा वाक्यांश आढळतो हे विशेष लक्षात घेण्याजोगे आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही इब्री हस्तलिखितात हा वाक्यांश आढळत नाही. काही भाष्यकारांचे असे मत आहे की सेप्ट्युजिंट हे आता उपलब्ध नसलेल्या जुन्या इब्री हस्तलिखितांतून केलेले भाषांतर असल्यामुळे त्यात हा वाक्यांश असावा. अर्थात, पौलाने देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने या वचनाचा आपल्या पत्रात समावेश केला आणि म्हणून हे मार्गदर्शन देवाकडून आहे यात कोणतीही शंका नाही.

      b यहोवाच्या साक्षीदारांचे २००० सालचे वार्षिक वचन: “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही . . . तर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आहो.”—इब्री लोकांस १०:३९.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा