वाचकांचे प्रश्न
गुन्हेगारांसाठी असलेल्या मृत्युदंडाविषयी अर्थात देहान्त शिक्षेविषयी बायबल काय सुचवते?
हे समजण्याजोगे आहे, की प्रत्येक जणाचे जीवनातील अनुभव आणि परिस्थिती यांच्या आधारावर व्यक्तिगत मत असेल. तरी देखील, यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण देहान्त शिक्षेविषयी असलेल्या देवाच्या विचारांशी आपले विचार जुळवून घेतले पाहिजे तसेच या विषयाकडे नेणाऱ्या राजकीय भूमिकांच्या बाबतीत आपण तटस्थ असले पाहिजे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, आपल्या लिखित वचनात देहान्त शिक्षा चुकीची असल्याचे देव सांगत नाही.
आरंभीच्या मानवी इतिहासात, यहोवाने या गोष्टीवरील आपले विचार स्पष्ट केले होते जे आपल्याला उत्पत्तीच्या ९ अध्यायात वाचण्यास मिळतात. संपूर्ण मानवी कुटुंबाचा पूर्वज झालेला नोहा आणि त्याच्या कुटुंबाविषयी तेथे सांगितले आहे. तारवातून बाहेर आल्यानंतर देवाने त्यांना प्राणी खाण्याची परवानगी दिली—प्राणी मारायचे होते, त्यातील रक्त काढायचे होते आणि त्यानंतर त्याचे सेवन त्यांना करायचे होते. त्यानंतर, देवाने उत्पत्ति ९:५, ६ येथे म्हटले: “मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जिवाबद्दल झडती घेईन; प्रत्येक पशूची व मनुष्याची झडती घेईन; प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जिवाबद्दल झडती घेईन. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे.” यास्तव देवाने खुन करणाऱ्यांच्या बाबतीत देहान्त शिक्षा देण्याचा अधिकार दिला होता.
आपले लोक या नात्याने देवाने जेव्हा इस्राएल लोकांशी व्यवहार केला तेव्हा ईश्वरी नियमाच्या विरोधात इतर अनेक अपराधांची शिक्षा मृत्यू होती. गणना १५:३० येथील सामान्य विधानात आपण असे वाचतो: “धिटाईने काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशीय असो किंवा परदेशीय असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा; त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतरच्या काळाबद्दल काय? मानवी शासन अस्तित्वात येण्याचा अधिकार यहोवाने दिला होता हे आपल्याला ठाऊक आहे आणि त्याने त्यांना वरिष्ठ अधिकारी असे संबोधले. खरे तर, अशा अधिकाऱ्यांच्या अंकित राहण्याचा सल्ला ख्रिश्चनांना दिल्यानंतर बायबल असे म्हणते, की “तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करिशील तर त्याची भीति बाळग; कारण तो तरवार व्यर्थ धारण करीत नाही; तर क्रोध दाखविण्याकरिता वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.”—रोमकर १३:१-४.
घोर अपराध करणाऱ्यांचा जीव घेण्याचा अधिकार अशा प्रकारच्या शासनांना आहे, असा याचा अर्थ होतो का? १ पेत्र ४:१५, या वचनातील शब्दांच्यानुसार होय, असे आपल्याला म्हणावे लागेल. “खून करणारा, चोर दुष्कर्मी, किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये.” असे पेत्राने या उताऱ्यात आपल्या बांधवांना आग्रहाने म्हटले. ‘खून करून दुःख भोगू नये,’ याकडे तुम्ही लक्ष दिले का? खुनी मनुष्याला आपल्या अपराधाचे दुःख भोगायला लावण्याचा शासनांना कोणताही अधिकार नसल्याचे पेत्राने सुचविले नाही. उलटपक्षी, खुनी मनुष्याला योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे असे पेत्राने सूचित केले होते. त्या शिक्षेत मृत्युदंडाचा समावेश होणार होता का?
होऊ शकणार होता. प्रेषितांची कृत्ये अध्याय २५ मध्ये असणाऱ्या पौलाच्या शब्दांवरून हे स्पष्ट होते. आपल्या नियमशास्त्राची अवहेलना केल्याचा आरोप यहुद्यांनी पौलावर लावला होता. रोमी सरदाराकडे आपल्या कैद्याला अर्थात पौलाला पाठविण्याविषयी लष्करी अधिकाऱ्याने प्रेषितांची कृत्ये २३:२९ येथे नमूद केले: “त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर ठपका लावण्यात आला होता, परंतु मरणाची किंवा बंधनांची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.” (तिरपे वळण आमचे.) दोन वर्षांनंतर पौलाला सरदार फेस्त याच्यासमोर हजर करण्यात आले. आपण प्रेषितांची कृत्ये २५:८ येथे वाचतो: “पौलाने प्रत्युत्तर केले की, मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.” परंतु शिक्षेबद्दल, देहान्त शिक्षेबद्दल देखील त्याने लिहिलेल्या शब्दांकडे लक्ष द्या. प्रेषितांची कृत्ये २५:१०, ११ येथे आपण वाचतो:
पौलाने म्हटले: “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणहि चांगले जाणता. मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरावयास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकहि जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाहि अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.” (तिरपे वळण आमचे.)
यथायोग्य नियुक्त अधिकाऱ्यासमोर उभा असताना पौलाने हे मान्य केले, की अपराध्याला शिक्षा करण्याचा किंबहुना मरणदंडाची शिक्षा करण्याचा अधिकार कैसराला होता. स्वतःच्या बाबतीत तो दोषी ठरल्यास त्या दोषाची शिक्षा भोगण्यास त्याने विरोध केला नाही. याशिवाय, कैसर केवळ खुनी मनुष्यांनाच देहान्त शिक्षा करू शकतो, असे त्याने म्हटले नाही.
हे मान्य करण्याजोगे आहे, की रोमी न्याय मंडळ परिपूर्ण नव्हते आणि आजच्या मानवी न्यायालय पद्धतींदेखील परिपूर्ण नाहीत. भूतकाळात तसेच आजदेखील अनेक निरपराध लोकांवर दोष लावून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पिलाताने सुद्धा येशूविषयी म्हटले: “त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही; म्हणून मी त्याला फटके मारून सोडून देतो.” होय, शासकीय प्राधिकाराने येशू निरपराध असल्याचे मान्य केले होते तरी देखील या निरपराध मनुष्याला मृत्युदंड देण्यात आला होता.—लूक २३:२२-२५.
अशा प्रकारच्या अन्यायांनी पौलाला आणि पेत्राला अशा प्रकारचा तर्क करण्यास प्रेरित केले नाही, की देहान्त शिक्षा मूलभूतरीत्या नैतिकतेला सोडून आहे. उलटपक्षी देवाचे वचन म्हणते, की जोपर्यंत कैसराचे वरिष्ठ अधिकारी आहेत तोपर्यंत ते ‘वाईट कामे करणाऱ्यांविरुद्ध क्रोध व्यक्त करण्यासाठी तलवार धारण करतात.’ तलवारीचा उपयोग करणे म्हणजे देहान्त शिक्षा देणे, असा अर्थ याठिकाणी आहे. परंतु या जगातील एखाद्या शासनाने खुनी मनुष्यांना मरणदंड देण्याचा अधिकार उपयोगात आणावा की आणू नये हा वादग्रस्त प्रश्न उभा राहतो तेव्हा खरे ख्रिस्ती सावधानपूर्वक तटस्थ राहतात. ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांप्रमाणे ते या विषयावरील कोणत्याही वादविवादात भाग घेत नाहीत.