-
यहोवाचा दिवस काय प्रकट करेल?टेहळणी बुरूज—२०१० | जुलै १५
-
-
२ पेत्राने लिहिले, “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.” (२ पेत्र ३:१०) येथे उल्लेख केलेले “आकाश” व “पृथ्वी” कशास सूचित करतात? “सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील” याचा काय अर्थ होतो? आणि “पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील” असे पेत्राने कोणत्या अर्थाने म्हटले? या प्रश्नांची उत्तरे मिळवल्याने निकट भविष्यात घडणार असलेल्या भयप्रेरक घटनांसाठी स्वतःला तयार करण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.
कोणते आकाश व पृथ्वी नाहीशी होईल?
३. दुसरे पेत्र ३:१० यात ज्या ‘आकाशाचा’ उल्लेख केला आहे ते कशास सूचित करते आणि ते कशा रीतीने नाहीसे होईल?
३ बायबलमध्ये “आकाश” हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरण्यात येतो, तेव्हा तो सहसा प्रजेवर वर्चस्व करणाऱ्या राजकीय शक्तींना सूचित करतो. (यश. १४:१३, १४; प्रकटी. २१:१, २) त्याअर्थी, ‘आकाश नाहीसे होईल’ या वाक्यांशातील आकाश, अधार्मिक समाजावर सत्ता चालवणाऱ्या मानवी शासनाला सूचित करते. हे आकाश “मोठा नाद करीत” नाहीसे होईल यावरून त्याचा किती झटक्यात सर्वनाश होईल हे सूचित होते.
४. “पृथ्वी” काय आहे आणि तिचा कशा प्रकारे नाश केला जाईल?
४ “पृथ्वी” देवापासून दुरावलेल्या मानवांच्या जगाला सूचित करते. नोहाच्या काळातही अशा प्रकारचे जग अस्तित्वात होते आणि देवाच्या आज्ञेने त्या जगाचा जलप्रलयात नाश झाला. “आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.” (२ पेत्र ३:७) जलप्रलयाने सर्व अधार्मिक जनांचा एकाच वेळी अंत केला होता. पण येणारा नाश हा ‘मोठ्या संकटादरम्यान’ टप्प्याटप्प्याने होईल. (प्रकटी. ७:१४) मोठ्या संकटाच्या पहिल्या टप्प्यात, देव या जगाच्या राजकीय शासकांना ‘मोठ्या बाबेलीचा’ नाश करण्यास प्रवृत्त करेल आणि अशा रीतीने खोट्या धर्मांनी बनलेल्या त्या कलावंतिणीबद्दल आपली घृणा व्यक्त करेल. (प्रकटी. १७:५, १६; १८:८) यानंतर, मोठ्या संकटाच्या शेवटल्या टप्प्यात म्हणजेच हर्मगिदोनाच्या लढाईत यहोवा स्वतः सैतानाच्या जगाचे जे काही उरले असेल त्याचा सर्वनाश करेल.—प्रकटी. १६:१४, १६; १९:१९-२१.
“सृष्टितत्त्वे . . . लयास जातील”
५. लाक्षणिक मूलतत्त्वांत कशाकशाचा समावेश होतो?
५ ही ‘लयास जाणारी सृष्टितत्त्वे’ काय आहेत? “सृष्टितत्त्वे” असे भाषांतर केलेल्या शब्दासाठी मूळ भाषेत “मूलतत्त्वे” या अर्थाचा शब्द वापरण्यात आला होता. एका बायबल शब्दकोशानुसार “मूलतत्त्वे” या शब्दाचा अर्थ “प्राथमिक तत्त्वे” किंवा “मूळ घटक” असा होतो. या शब्दकोशानुसार हा शब्द “वर्णमालेतील अक्षरांच्या संदर्भात वापरला जात असे, जी भाषेची मूलतत्त्वे असतात.” त्याअर्थी, पेत्राने ‘मूलतत्त्वांचा’ उल्लेख केला तेव्हा तो या अधार्मिक जगाची ओळख करून देणाऱ्या मनोवृत्तींबद्दल, मार्गांबद्दल आणि ध्येयांबद्दल बोलत होता. या ‘मूलतत्त्वांत’ “जगाचा आत्मा” देखील समाविष्ट आहे, जो ‘आज्ञा मोडणाऱ्या लोकांत कार्य करतो.’ (१ करिंथ. २:१२; इफिसकर २:१-३ वाचा.) हा आत्मा, आपण श्वास घेतो त्या हवेप्रमाणे सैतानाच्या सबंध जगाला व्यापतो. तो लोकांना आपल्या विचारांत, योजनांत, तसेच वागण्याबोलण्यात “अंतरिक्षातील राज्याचा अधिपति” असणाऱ्या सैतानाच्या गर्विष्ठ व विद्रोही मानसिकतेचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करतो.
६. जगाचा आत्मा कोणत्या गोष्टींतून दिसून येतो?
६ त्यामुळे, ज्यांची बुद्धी व अंतःकरण कळत नकळत जगाच्या या आत्म्याने दूषित झाले आहे, ते सैतानाची विचारसरणी व मनोवृत्ती प्रतिबिंबित करतात. परिणामस्वरूप, ते देवाची इच्छा काय आहे याची पर्वा न करता आपल्या मनात येईल तसे वागतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून गर्विष्ठपणा किंवा स्वार्थीपणा दिसून येतो. अधिकाराविरुद्ध बंड करण्याची वृत्ती त्यांच्यात असते. आणि ते अगदी स्वैरपणे ‘देहाच्या व डोळ्यांच्या वासनेच्या’ आहारी जातात.—१ योहान २:१५-१७ वाचा.a
७. आपण ‘आपल्या अंतःकरणाचे रक्षण’ का केले पाहिजे?
७ तर मग, मित्र निवडताना, वाचनाचे साहित्य किंवा मनोरंजन निवडताना, तसेच इंटरनेटवर कोणत्या वेबसाईट्स पाहाव्यात हे ठरवताना देवाच्या सुज्ञ मार्गदर्शनाचे पालन करण्याद्वारे ‘आपल्या अंतःकरणाचे रक्षण’ करणे किती महत्त्वाचे आहे! (नीति. ४:२३) प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सै. २:८) यहोवाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे या सल्ल्याचे पालन करणे अधिकच निकडीचे ठरते, कारण देवाच्या क्रोधाग्नीचा तो दिवस येईल तेव्हा सैतानाच्या जगाची सर्व “मूलतत्त्वे” “तप्त” होऊन विरून जातील. त्या अग्नीपुढे टिकाव धरण्याची क्षमता त्यांमध्ये नाही हे त्या दिवशी सिद्ध होईल. यावरून मलाखी ४:१ यातील शब्दांची आपल्याला आठवण होते: “भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांस जाळून टाकील.”
“पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील”
८. “पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील” याचा काय अर्थ होतो?
८ “पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील” असे जे पेत्राने म्हटले त्याचा काय अर्थ होतो? पेत्र असे सांगत होता, की यहोवा मोठ्या संकटात सैतानाच्या जगाचा पर्दाफाश करेल. सैतानाचे जग हे देवाच्या व त्याच्या राज्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे ते नाशास पात्र आहे हे यहोवा सर्वांपुढे प्रकट करेल. त्या काळाविषयी भाकीत करताना यशया २६:२१ असे म्हणते: “परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाश्यांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रगट करील, वधिलेल्यांस ती यापुढे झाकून ठेवावयाची नाही.”
९. (क) आपण कोणत्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे आणि का? (ख) आपण काय उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि का?
९ यहोवाचा दिवस येईल तेव्हा, ज्यांच्या बुद्धीवर व अंतःकरणावर या दुष्ट जगाचा व त्याच्या आत्म्याचा प्रभाव पडला आहे त्यांचे खरे स्वरूप प्रकट होईल. ते एकमेकांना जिवे मारण्यासही कमी करणार नाहीत. किंबहुना, आजच्या जगात अतिशय लोकप्रिय असलेले निरनिराळ्या प्रकारचे हिंसक मनोरंजन जणू लोकांचे मन त्या काळाकरता तयार करत आहे, जेव्हा “प्रत्येकाचा हात त्याच्या शेजाऱ्याच्या हाताविरुद्ध उठेल.” (जख. १४:१३, पं.र.भा.) तर मग अशी कोणतीही गोष्ट जिच्यामुळे आपल्यामध्ये गर्विष्ठपणा किंवा हिंसाचाराची आवड यांसारखे देवाला घृणास्पद वाटणारे गुण उत्पन्न होतील—मग ती चित्रपटाच्या, पुस्तकांच्या, व्हिडिओ गेम्सच्या किंवा इतर माध्यमांच्या रूपात असो—अशा सर्व गोष्टींपासून आपण दूर राहणे किती महत्त्वाचे आहे! (२ शमु. २२:२८; स्तो. ११:५) त्याऐवजी, आपण देवाच्या आत्म्याचे फळ उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू या. कारण, देवाच्या क्रोधाचा अग्नी सैतानाच्या दुष्ट जगावर येईल तेव्हा हे गुण सैतानाच्या जगातील मूलतत्त्वांप्रमाणे भस्म होणार नाहीत, तर ते अविनाशी ठरतील.—गलती. ५:२२, २३.
-
-
यहोवाचा दिवस काय प्रकट करेल?टेहळणी बुरूज—२०१० | जुलै १५
-
-
यहोवाच्या महान दिवसाकरता स्वतःस तयार करा
१२. यहोवाचा दिवस येईल तेव्हा जगातील लोकांना धक्का का बसेल?
१२ पौल व पेत्र या दोघांनीही यहोवाचा दिवस ‘रात्री चोर येतो तसा’ अगदी अनपेक्षितपणे येईल असे भाकीत केले होते. (१ थेस्सलनीकाकर ५:१, २ वाचा.) त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहणारे खरे ख्रिस्ती देखील त्याच्या अकस्मात येण्याने चकित होतील. (मत्त. २४:४४) पण जगातील लोक फक्त चकित होणार नाहीत. पौलाने लिहिले: “शांति आहे, निर्भय आहे असे ते [यहोवापासून दुरावलेले लोक] म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात् वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात् नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.”—१ थेस्सलनी. ५:३.
-