वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • uw अध्या. १३ पृ. १०३-१०९
  • यहोवाच्या सिंहासनासमोरचा मोठा लोकसमुदाय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या सिंहासनासमोरचा मोठा लोकसमुदाय
  • उपासनेतील ऐक्य
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘मोठ्या लोकसमुदाया’ला ओळखणे
  • वाचण्याच्या पात्रतेसाठी परिक्षा
  • आध्यात्मिक नंदनवनात राहणे
  • अगणित मोठा लोकसमुदाय
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • पाहा! मोठा लोकसमुदाय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • मोठा लोकसमुदाय पवित्र सेवा करत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
उपासनेतील ऐक्य
uw अध्या. १३ पृ. १०३-१०९

अध्याय १३

यहोवाच्या सिंहासनासमोरचा मोठा लोकसमुदाय

१. (अ) देवाचे ख्रिस्तापूर्वीचे सेवक अथवा १,४४,००० मध्ये गणल्या जाणाऱ्‍या लोकांना त्यांचे प्रतिफळ मिळण्यापूर्वी कशाचा अनुभव घ्यावा लागतो? (ब) परंतु “मोठे संकट” कोसळेल तेव्हा हयात असलेल्या मोठ्या लोकसमुदायाला काय शक्य असेल?

हा बेलापासून बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानापर्यंत यहोवाच्या विश्‍वासू सेवकांनी त्यांच्या जीवनात देवाच्या इच्छेप्रमाणे आचरण करण्याला पहिले स्थान दिले असले तरी, त्या सर्वांना मरावे लागले आणि पुनरूत्थानाची वाट पहावी लागली. ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात असणाऱ्‍या १,४४,००० जणांना देखील त्यांचे प्रतिफळ मिळण्यापूर्वी मेलेच पाहिजे. या उलट, ‘मोठ्या संकटा’तून वाचणारा व न मरता अनंत जीवन प्राप्त करण्याची आशा असलेला मोठा लोकसमुदाय असेल, असे प्रेषित योहानाला दृष्टांतात दाखवले गेले.—प्रकटी. ७:९-१७.

‘मोठ्या लोकसमुदाया’ला ओळखणे

२. प्रकटीकरण ७:९ मधील ‘मोठ्या लोकसमुदाया’ला ओळखण्याची स्पष्ट समज कसकशी आली?

२ अनेक शतकांपर्यंत या ‘मोठ्या लोकसमुदाया’ची ओळख पटली नव्हती. परंतु संबंधित भविष्यवाण्यांची समज उत्तरोत्तर वाढल्याने त्याचा मार्ग तयार झाला. मत्तय २५:३१-४६ मधील दृष्टांतातली “मेंढरे” आणि योहान १०:१६ मध्ये येशूने उल्लेखलेली “दुसरी मेंढरे”, या सध्या हयात असलेल्या व पृथ्वीवरच अनंत काळ राहण्याची संधी मिळणाऱ्‍या व्यक्‍ती होत असे १९२३ मध्ये लक्षात आले. यहेज्केल ९:१-११ मध्ये कारकुनाची दऊत घेतलेल्या माणसाने ज्यांच्या कपाळावर चिन्ह केले असल्याचे वर्णन आहे, तेच लोक मत्तयाच्या २५ व्या अध्यायातील “मेंढरे” असल्याचे १९३१ मध्ये सिद्ध करण्यात आले. मग १९३५ मध्ये प्रकटीकरण ७:९-१७ मधला “मोठा लोकसमुदाय” अथवा “मोठा समुदाय” व शेरडे आणि मेंढरांच्या येशूने दिलेल्या दृष्टांतातली “मेंढरे”, एकच असल्याचे दिसून आले. अशा प्रकारच्या काही व्यक्‍ती पुढे येऊ लागल्याचे १९२३ मध्ये लक्षात आले असले तरी, १९३५ नंतरच त्यांची संख्या भराभर वाढू लागली. आणि आज अक्षरशः लाखो लोक, दैवी कृपा प्राप्त ‘मेंढरां’च्या ‘मोठ्या समुदाया’त गणले जाण्यासाठी झटत आहेत.

३. त्यांनी “राजासनासमोर उभे” राहण्याचा अर्थ ते स्वर्गीय वर्गाचे आहेत असा का होत नाही?

३ प्रकटीकरणाच्या त्याच अध्यायात आधी उल्लेखलेल्या आध्यात्मिक इस्राएलांच्या १,४४,००० सभासदांपासून ‘मोठ्या लोकसमुदाया’तील लोक वेगळे असल्याचे दर्शविले आहे. योहानाने पाहिलेल्या दृष्टांतात, “मोठा लोकसमुदाय” स्वर्गात आहे असे योहानाला दिसले नाही. देवाच्या “राजासनासमोर” (ग्रीकमध्ये: ए․नोʹपी․ऑन टॉऊ थ्रॉʹनॉऊ, “सिंहासनापासून दृष्टीच्या टप्यात”) असावे म्हणून त्यांना स्वर्गात असण्याची गरज नाही. स्वर्गातून तो मानवांना पाहतो, असे आपल्याला सांगणाऱ्‍या देवाच्या केवळ “दृष्टीच्या टप्यात” त्यांचे ठिकाण आहे. (प्रकटी. ७:९; स्तोत्र. ११:४; पडताळा स्तोत्रसंहिता १००:१, २, तसेच लूक १:७४, ७५ व प्रे. कृत्ये १०:३३, किंगडम इंटरलीनियर.) त्याचप्रमाणे मत्तय २५:३१, ३२ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या सिंहासनापुढे (शब्दश: “त्याच्यासमोर”) असण्यासाठी ‘सर्व राष्ट्रांनी’ स्वर्गात असावयाची गरज नाही. प्रकटीकरण ७:४-८ आणि १४:१-४शी तुलना केल्याने “कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय”; हा स्वर्गीय वर्ग नसल्याचे दिसून येते. त्या शास्त्रवचनांमध्ये पृथ्वीवरून स्वर्गात नेण्यात आलेल्या लोकांचा निश्‍चित आकडा सांगितलेला आहे.

४. (अ) ते ज्याच्यापासून वाचतात ते “मोठे संकट” म्हणजे काय? (ब) प्रकटीकरण ७:११, १२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, ‘मोठ्या लोकसमुदाया’ला कोण पाहतात व उपासनेत त्यांच्याशी सहभागी होतात?

४ ‘मोठ्या लोकसमुदाया’ची ओळख करून देताना योहान लिहितो: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत.” ते ज्यातून वाचतील ते खरोखरच पृथ्वीवर अनुभवलेल्या सर्व संकटांपेक्षा मोठे असेल. (प्रकटी. ७:१३, १४; मत्त. २४:२१) त्यांच्या मुक्‍तीसाठी कोण जबाबदार आहे याबद्दल, यहोवाच्या त्या भयंकर दिवसातून वाचलेल्यांना मुळीच संदेह नसेल. आपल्या मुक्‍तीसाठी कृतज्ञतेने ते यहोवा व कोकऱ्‍याला श्रेय देतील तेव्हा, योहानाने दृष्टांतात पाहिल्याप्रमाणे, “आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन.” असे म्हणत स्वर्गातले सर्व विश्‍वासू लोक एकमेव सत्य देवाच्या उपासनेमध्ये त्यांच्या सुरात सूर मिळवतील.—प्रकटी. ७:११, १२.

वाचण्याच्या पात्रतेसाठी परिक्षा

५. (अ) वाचवल्या जाणाऱ्‍या ‘मोठ्या लोकसमुदाया’त सामील होण्यासाठी कशाची गरज आहे, हे आपण कसे ठरवू शकू? (ब) या परिच्छेदाच्या शेवटी असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन, ‘मोठ्या संकटा’तून वाचण्यासाठी कशाची गरज आहे याचा खुलासा करा.

५ यहोवाच्या स्वत:च्या नीतिमान मानकाला अनुसरून ‘मोठ्या लोकसमुदाया’ला वाचवले जाते. जे वाचवले जातील त्यांच्या संदर्भातल्या पवित्रशास्त्रातल्या भविष्यवाण्यांमध्ये, त्यांची ओळख पटवणाऱ्‍या गुणांच्या स्पष्ट सूचनांचा अंतर्भाव आहे. त्यामुळे नीतिमत्वाची आवड असणाऱ्‍यांना वाचवण्याच्या दृष्टीने कार्य करणे शक्य आहे. खालील शास्त्रवचनांचा आपण याआधीही उल्लेख केलेला आहे. परंतु आता आणखीन काही शास्त्रवचनांच्या मदतीने त्यांचे काळजीपूर्वक विश्‍लेषण करा व या भविष्यवाण्यांतील वर्णनात बसण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे याचा विचार करा.

योहान १०:१६ मध्ये उल्लेखलेली “दुसरी मेंढरे”

एखाद्या व्यक्‍तीने येशूची वाणी खरोखरच ऐकण्याचा अर्थ काय? (योहा. १०:२७; मत्त. ९:९; इफिस. ४:१७-२४)

आपला “एक मेंढपाळ” या नात्याने येशूला आपण मानतो, हे आपण कसे दाखवू शकू? (मत्त. २३:१०, ११)

येशूने दिलेल्या शेरडे व मेंढरांच्या दाखल्यातील “मेंढरे” (मत्त. २५:३१-४६)

यांनी ज्यांना चांगले वागवले ते येशूचे “बांधव” कोण? (इब्री. २:१०, ११; ३:१)

कोणत्या कठीण परिस्थितीत, येशूच्या पृथ्वीवरील बांधवांशी आपला संबंध असल्याचे त्यांनी दाखवावे अशी अपेक्षा केली जाते? आणि कोणत्या कामात ते निष्ठेने मदत करतात? (प्रकटी. १२:१२, १७; मत्त. २४:१४; २८:१९, २०)

कारकुनाची दऊत बाळगलेल्या माणसाने वाचण्यासाठी चिन्ह केलेल्या व्यक्‍ती (यहे. ९:१-११)

नमूनेवजा यरूशलेम अथवा ख्रिस्ती-धर्मजगतात केल्या जात असलेल्या घृणित गोष्टींशी आपण सहमत नसल्याचे ते कसे दाखवतात? (प्रकटी. १८:४, ५)

ढोंग करणाऱ्‍या ख्रिस्ती लोकांपासून ते भिन्‍न असल्याचे दाखवणाऱ्‍या व वाचण्यासाठी पात्र ठरवणाऱ्‍या ‘चिन्हा’त, कशाचा अंतर्भाव आहे? (१ पेत्र ३:२१; मत्त. ७:२१-२७; योहा. १३:३५)

६. ‘मोठ्या लोकसमुदाया’चे योहानाने केलेले वर्णन, त्यांना वाचवण्याचे कारण समजण्यास आपल्याला कशी मदत करते?

६ प्रकटीकरण ७:९-१५ येथील ‘मोठ्या लोकसमुदाया’चे वर्णन अधिक महत्त्वाच्या तपशीलाची भर घालते. ‘मोठ्या संकटा’नंतर ‘मोठ्या लोकसमुदाया’तले लोक कसे दिसतील हे आपल्याला सांगताना, कोणत्या कारणांमुळे ते वाचले याकडेही ती शास्त्रवचने आपले लक्ष वेधतात.

७. ‘मोठ्या संकटा’पूर्वी त्यांनी काय केले, व ते कसे सूचित केले आहे?

७ सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांमधून ते आलेले असले तरी विश्‍वाचा सार्वभौम सत्ताधीश या नात्याने यहोवाला मान्यता देत, एकतेने ते “राजासनासमोर उभे” असलेले दाखवले आहेत. त्यांच्या जीवन-मार्गाने ते त्याच्या शासनाचे एकनिष्ठ समर्थक असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत” या गोष्टीवरून, देवाचा कोकरा या नात्याने पापक्षालनाची कुवत असलेल्या, येशूच्या बलिदानाची त्यांना असलेली गरज त्यांनी जाणली आहे असे सूचित होते. (योहा. १:२९; १ योहा. २:२) त्या बलिदानाच्या आधारे विश्‍वासाने त्यांनी देवाला स्वत:चे समर्पण केले आहे. त्याचे प्रतीक म्हणून पाण्यात बुडवून बाप्तिस्मा घेतला असून त्यांच्या पांढऱ्‍या झग्यांनी चित्रित केल्याप्रमाणे, आता देवापुढे ते शुद्ध लौकिक अनुभवत आहेत. देवाच्या पुत्रावरील त्यांचा विश्‍वास जाहीर रीतीने प्रकट करण्यास ते कचरलेले नाहीत. (मत्त. १०:३२, ३३) या सर्व गोष्टींशी सुसंगत, ‘अहोरात्र देवाची सेवा’ करणाऱ्‍या उपासकांच्या रूपात, ते देवाच्या मंदिरात, वा विश्‍वाच्या उपासना-गृहात, असल्याचे दाखवले आहे. खऱ्‍या उपासनेचे एकनिष्ठ समर्थक व त्याच्या राज्याची घोषणा करणारे म्हणून त्यांनी स्वत:ची नोंद केली आहे.—यश. २:२, ३.

८. या माहितीचा फायदा आपल्याला होण्यासाठी, आपण काय केले पाहिजे?

८ या भविष्यसूचक चित्रांचा तपशील तुम्हाला लागू होतो का? येथे वर्णन केलेल्या गोष्टींशी तुमचे जीवन अधिक सुसंगत करण्यासाठी तुम्हाला काही मार्ग अनुसरण्याची गरज आहे का? तसे करण्याची वेळ आता आहे!

आध्यात्मिक नंदनवनात राहणे

९. “मोठा लोकसमुदाय” सध्याही उपभोगत असलेल्या आध्यात्मिक आशीर्वादांचे वर्णन योहान कसे करतो?

९ “मोठ्या लोकसमुदाया”चा भाग म्हणून वाचण्याची आशा असलेल्यांपैकी, तुम्ही एक आहात का? यहोवाच्या नीतिमान मार्गाशी तुम्ही स्वत:ला जुळवून घेतले असल्यास, यथार्थतेने आध्यात्मिक नंदनवन म्हटल्या गेलेल्या वचनदत्त परिस्थितीचा उपभोग तुम्ही घेऊ लागलेले आहात. प्रेषित योहानाला सांगितले गेले: “ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेही होणार नाहीत; त्यांस सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही; कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटी. ७:१६, १७) हे तुमच्या बाबतीत कसे खरे ठरले आहे?

१०. (अ) आध्यात्मिक अर्थाने “मोठा लोकसमुदाय” यापुढे ‘भुकेला व तान्हेला होणार नाही’ हे कसे खरे आहे? (ब) तुम्ही हे अनुभवले आहे का?

१० उत्तम मेंढपाळ, येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ देखरेखीखाली येण्यापूर्वी तुम्हाला नीतिमत्वाची भूक व तहान लागली होती का? (पडताळा मत्तय ५:६.) तसे असल्यास, त्याच्या पुत्रामार्फत फक्‍त यहोवाच पुरवू शकेल अशा गोष्टीची तीव्र इच्छा तुम्हाला होती. यहोवाच्या नीतिमान मार्गांबद्दल—दुष्टांना नष्ट करण्याचा त्याचा उद्देश, तरीही आदामाच्या वंशजांचा उद्धार शक्य करण्यातली त्याची कृपा याविषयी—तुम्हाला माहिती झाली तेव्हा, आयुष्यात प्रथमच तुम्हाला खरोखरचे समाधान वाटले यात संशय नाही. त्याच्या संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्‍या, देवाच्या वचनातील आध्यात्मिक अन्‍न व पाण्याने तुम्हाला सतत समाधान दिले आहे. (यशया ६५:१३, १४) आणि ख्रिस्तामार्फत तुम्ही देवाला स्वत:चे समर्पण केले असल्यास तुमच्या जीवनाला आता खरा उद्देश प्राप्त झाला आहे. (पडताळा योहान ४:३२-३४.) तुमच्यापुढे नंदनवन पृथ्वीवर अनंत जीवनाची आशा आहे, कारण कोकरा ‘मोठ्या लोकसमुदाया’ला “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍याजवळ नेईल.”

११. (अ) ‘यापुढे सूर्य अथवा कोणतीही उष्णता त्यांना बाधणार नाही’ हे कोणत्या रीतीने खरे आहे? (ब) याचे तुम्हाला किती महत्त्व वाटते?

११ त्याच्यावर भरवसा ठेवणारी “मेंढरे” या नात्याने ‘मोठ्या लोकसमुदायातील’ लोकांना देखील उत्तम मेंढपाळ संरक्षण देतो व सुरक्षितपणे मार्गदर्शन करतो. त्यामुळे लाक्षणिक अर्थाने, ‘यापुढे सूर्य अथवा कोणतीही उष्णता त्यांना बाधणार नाही.’ याचा अर्थ असा नव्हे की ‘मोठ्या लोकसमुदाया’तील असल्यामुळे, जगाकडून तुमचा छळ होणार नाही. तर, देवाच्या अवकृपेच्या जाज्वल्य उष्णतेपासून तुम्ही सुरक्षित आहात, असा त्याचा मथितार्थ आहे. आणि दुष्टांवर दैवी प्रकोपाचा वर्षाव होईल तेव्हा, तुम्हाला हानी पोहोचणार नाही. हा अनुग्रहपूर्ण संबंध अंनत काळ चालू शकेल.—यहे. ३८:२२, २३; पडताळा स्तोत्रसंहिता ११:६; ८५:३, ४.

१२. सध्याही तुमच्या डोळ्यांचे सर्व अश्रु कसे पुसले गेले आहेत?

१२ तुम्ही खरोखरच ‘मोठ्या लोकसमुदाया’तले असाल तर, हर्ष करण्यासाठी तुम्हाला किती अद्‌भुत कारणे आहेत! दुर्जन संपूर्णपणे नाहीसे केलेले पाहण्याची व तुमचे स्वत:चे मन व शरीर खरोखरच पापाच्या सर्व परिणामांपासून मुक्‍त होण्याची आश्‍चर्यकारक आशा तुम्हाला आहे. तसेच आता देवाविषयीच्या अज्ञानामुळे लोकांना अनुभवावे लागणारे दु:ख तुम्हाला भोगावे लागत नाही. यहोवा ज्यांचा देव आहे अशांचा आनंद तुम्हाला कळू लागला आहे. (स्तोत्र. १४४:१५ब) अशा रीतीने, “देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील” या अभिवचनाची पूर्णता तुम्ही आताच अनुभवू लागलेले आहात.

१३. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या कारकिर्दीत, आध्यात्मिक नंदनवनाच्या आनंदात कशाने भर पडेल?

१३ ‘मोठ्या लोकसमुदाया’प्रमाणे आध्यात्मिक नंदनवन देखील या व्यवस्थेच्या अंतामधून वाचेल. तुम्ही त्यांच्यातले असाल तर, ख्रिस्ताच्या हजार वर्षाच्या कारकीर्दीत तुम्ही नेहमी उत्तम गोष्टींच्या आध्यात्मिक मेजवानीचा आस्वाद घ्याल. देवाच्या, अपयशी न होणाऱ्‍या उद्देशाची गौरवी सिद्धता होताना तुम्ही पाहाल तेव्हा, स्वत: देवाबद्दल तुमचे ज्ञान सखोल होईल. खऱ्‍या उपासनेमध्ये तुमच्याशी मिलाप होण्यासाठी, मृतांतून येणाऱ्‍या वाढत्या संख्येच्या लोकांचे स्वागत करण्यात तुम्ही सहभागी व्हाल तेव्हा तुमचा आनंद वृद्धिंगत होईल. तेव्हा दिलेले शारीरिक आशीर्वाद, स्वत: यहोवाच्या प्रेमाची अभिव्यक्‍ती असल्याचे जाणल्यामुळे, देवाच्या सर्व एकनिष्ठ सेवकांना विशेष करून बहुमोल वाटतील.—यश. २५:६-९; याको. १:१७.

पुनरावलोकन चर्चा

• पवित्र शास्त्र ‘मोठ्या लोकसमुदाया’चा कसा व कोणत्या असामान्य घटनांशी संबंध लावते?

• दैवी अनुग्रह प्राप्त झालेल्या त्या ‘मोठ्या लोकसमुदाया’त अंतर्भाव व्हावा अशी आपली खरोखर इच्छा असल्यास, आपण आता काय केले पाहिजे?

• आध्यात्मिक नंदनवनाचे आशीर्वाद तुम्हाला किती महत्त्वाचे वाटतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा