मार्क
१६ शब्बाथाचा दिवस संपल्यावर, मग्दालीया मरीया, याकोबची आई मरीया आणि सलोमी यांनी त्याच्या शरीराला लावण्यासाठी सुगंधी मसाले विकत घेतले. २ मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी सूर्य उगवण्याच्या सुमारास, पहाटेच त्या कबरेजवळ* आल्या. ३ त्या एकमेकींना म्हणत होत्या, “कबरेच्या तोंडावरून आपल्यासाठी दगड बाजूला कोण लोटेल?” ४ पण त्यांनी वर पाहिले तेव्हा कबरेच्या दारावरचा दगड आधीच लोटण्यात आला आहे असे त्यांना दिसले. खरेतर तो दगड खूप मोठा होता. ५ त्या आत गेल्या, तेव्हा पांढरा झगा घातलेला एक तरुण उजव्या बाजूला बसलेला त्यांना दिसला. त्याला पाहून त्यांना धक्काच बसला. ६ पण तो त्यांना म्हणाला: “भिऊ नका. ज्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला, त्या नासरेथच्या येशूला तुम्ही शोधत आहात ना? त्याला उठवण्यात आलं आहे. तो इथे नाही. पाहा, त्याला इथेच ठेवण्यात आलं होतं. ७ तेव्हा, आता जाऊन त्याच्या शिष्यांना व पेत्रला सांगा, की ‘तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही त्याला तिथे पाहाल.’” ८ मग त्या बाहेर येऊन कबरेपासून पळाल्या. त्या थरथर कापत होत्या आणि अतिशय चकित झाल्या होत्या. पण, त्यांनी कोणालाही काहीच सांगितले नाही, कारण त्या फार घाबरल्या होत्या.*