मार्क
७ मग, परूशी आणि यरुशलेमहून आलेले काही शास्त्री येशूच्या भोवती जमले. २ आणि त्याचे काही शिष्य अशुद्ध हातांनी, म्हणजे हात न धुता* जेवत असल्याचे त्यांनी पाहिले. ३ (कारण परूशी आणि सर्व यहुदी, वाडवडिलांच्या परंपरांचे काटेकोर पालन करतात. ते कोपरांपर्यंत हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत ४ आणि बाजारातून आल्यावर स्वतःला पाण्याने शुद्ध केल्याशिवाय ते जेवत नाहीत. तसेच प्याले, घागरी आणि तांब्याची भांडी विधिपूर्वक धुणे,* यांसारख्या इतर अनेक परंपरा त्यांना देण्यात आल्या आहेत आणि ते त्यांचे काटेकोर पालन करतात.) ५ त्यामुळे परूश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले: “तुमचे शिष्य, वाडवडिलांच्या परंपरांचं पालन का करत नाहीत आणि अशुद्ध हातांनी का जेवतात?” ६ तो त्यांना म्हणाला: “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने भविष्यवाणीत जे म्हटलं होतं ते अगदी खरं आहे; त्याने लिहिलं, ‘हे लोक तोंडाने तर माझा आदर करतात, पण यांचं हृदय मात्र माझ्यापासून फार दूर आहे. ७ ते माझी उपासना करत असले, तरी ती व्यर्थ आहे कारण ते मनुष्याच्या आज्ञा, देवाचे सिद्धान्त म्हणून शिकवतात.’ ८ तुम्ही देवाची आज्ञा पाळण्याचे सोडून माणसाच्या परंपरांना धरून बसता.”
९ तो त्यांना असेही म्हणाला: “तुमच्या परंपरांचं पालन करण्यासाठी तुम्ही देवाची आज्ञा चलाखीने टाळता. १० उदाहरणार्थ, मोशेने म्हटले, ‘आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर,’ आणि ‘जो कोणी आपल्या वडिलांशी किंवा आईशी अपमानास्पद बोलतो* त्याला मृत्युदंड दिला जावा.’ ११ पण तुम्ही म्हणता, ‘जर एखादा आपल्या वडिलांना किंवा आईला म्हणतो, की “तुम्हाला उपयोगी पडेल असं जे काही माझ्याकडे आहे ते कुर्बान आहे, (म्हणजे देवाला अर्पण केलेलं आहे), तर यात काहीच गैर नाही.”’ १२ असं म्हणून तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही. १३ आणि अशा रीतीने तुम्ही वर्षानुवर्षं चालू ठेवलेल्या तुमच्या परंपरांमुळे देवाचं वचन तुच्छ लेखता. शिवाय, अशाच आणखी कितीतरी गोष्टी तुम्ही करता.” १४ मग, लोकांना पुन्हा आपल्याजवळ बोलावून तो त्यांना म्हणाला: “तुम्ही सर्व माझं ऐका आणि याचा अर्थ समजून घ्या. १५ अशी कोणतीही बाहेरची गोष्ट नाही, जी माणसाच्या आत जाऊन त्याला अशुद्ध करते; तर, ज्या गोष्टी माणसाच्या आतून निघतात त्याच त्याला अशुद्ध करतात.” १६ *—
१७ मग तो लोकांच्या गर्दीतून निघून काही अंतरावर असलेल्या एका घरात गेला, तेव्हा त्याने दिलेल्या या उदाहरणाविषयी शिष्य त्याला प्रश्न विचारू लागले. १८ त्यामुळे तो त्यांना म्हणाला: “त्यांच्याप्रमाणेच तुम्हालाही समजलं नाही का? बाहेरून माणसाच्या आत जाणारी कोणतीही गोष्ट त्याला अशुद्ध करू शकत नाही हे तुम्हाला माहीत नाही का? १९ कारण ती त्याच्या हृदयात नाही, तर त्याच्या पोटात जाऊन शरीराबाहेर टाकली जाते.” अशा रीतीने त्याने खाण्याच्या सर्व गोष्टी शुद्ध ठरवल्या. २० मग तो म्हणाला: “ज्या गोष्टी माणसाच्या आतून निघतात त्याच गोष्टी त्याला अशुद्ध करतात. २१ कारण आतून म्हणजे माणसाच्या हृदयातून दुष्ट विचार, अनैतिक लैंगिक कृत्ये,* चोऱ्या, खून, २२ व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, फसवणूक, निर्लज्ज वर्तन,* ईर्ष्येने भरलेली नजर, निंदा, गर्व आणि मूर्खपणा या गोष्टी निघतात. २३ या सर्व वाईट गोष्टी माणसाच्या आतून निघतात आणि त्याला अशुद्ध करतात.”
२४ नंतर तो तिथून उठला आणि सोर व सीदोनच्या प्रदेशात गेला. तिथे तो एका घरात गेला आणि आपण इथे आहोत हे कोणालाही कळू नये अशी त्याची इच्छा होती. पण, लोकांना ते कळलेच. २५ इतक्यात एक स्त्री, जिची लहान मुलगी अशुद्ध आत्म्याने पीडित होती, तिने येशूबद्दल ऐकले व ती त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडली. २६ ती स्त्री ग्रीक होती व सूरिया प्रांतातील फेनिके इथे राहणारी होती; आणि ती आपल्या मुलीतून दुरात्म्याला काढून टाकण्याची त्याला सारखीच विनंती करत होती. २७ पण, तो तिला म्हणाला: “आधी मुलांचं पोट भरलं पाहिजे, कारण मुलांसाठी असलेली भाकर घेऊन लहानशा कुत्र्यांपुढे टाकणं योग्य नाही.” २८ पण ती त्याला म्हणाली: “खरं आहे प्रभू, पण मेजाखाली असलेली लहानशी कुत्री मुलांच्या हातातून पडणारे तुकडे खातातच ना.” २९ तेव्हा तो तिला म्हणाला: “तू हे बोललीस, म्हणून जा; तुझ्या मुलीतून दुरात्मा निघून गेला आहे.” ३० मग ती आपल्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले, की तिची मुलगी अंथरुणावर पडलेली आहे व तिच्यातून दुरात्मा निघून गेला आहे.
३१ येशू सोरच्या प्रदेशातून परतला तेव्हा तो सीदोन व दकापलीसच्या* मार्गाने गालील समुद्राकडे आला. ३२ इथे लोकांनी एका बहिऱ्या माणसाला त्याच्याकडे आणले. त्याला स्पष्टपणे बोलता येत नव्हते. येशूने त्या माणसावर हात ठेवावा अशी त्यांनी त्याला विनंती केली. ३३ तेव्हा, त्याने त्याला एका बाजूला, गर्दीपासून दूर नेले. मग, त्याने त्या माणसाच्या कानांत बोटे घातली आणि तो थुंकला आणि त्याने त्याच्या जिभेला स्पर्श केला. ३४ मग, आकाशाकडे पाहून त्याने मोठा उसासा टाकला आणि तो त्याला म्हणाला: “एप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.” ३५ तेव्हा, त्याचे कान उघडले आणि त्याच्या बोलण्यातला दोष जाऊन तो स्पष्टपणे बोलू लागला. ३६ येशूने याविषयी कोणालाही सांगू नका असे त्यांना बजावून सांगितले. पण, तो त्यांना जितके बजावून सांगायचा, तितकाच जास्त ते त्याविषयी गाजावाजा करू लागले. ३७ ते अत्यंत आश्चर्यचकित होऊन म्हणाले: “तो किती अद्भुत गोष्टी करतो! बहिऱ्यांना आणि मुक्यांनाही तो बरं करतो.”