योहान
२१ यानंतर, येशू पुन्हा तिबिर्या समुद्राजवळ आपल्या शिष्यांसमोर प्रकट झाला.* तो अशा प्रकारे प्रकट झाला. २ शिमोन पेत्र, थोमा (ज्याला ‘जुळा’ असे म्हटले जायचे), गालीलमधील काना या ठिकाणी राहणारा नथनेल, जब्दीची मुले आणि त्याचे आणखी दोन शिष्य हे एकत्र जमले होते. ३ शिमोन पेत्र त्यांना म्हणाला: “मी मासे धरायला जात आहे.” ते त्याला म्हणाले: “आम्हीसुद्धा तुझ्यासोबत येतो.” तेव्हा, ते नावेत बसून निघाले; पण, त्या रात्री त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
४ मग, पहाटेच्या सुमारास येशू किनाऱ्यावर येऊन उभा राहिला; पण, तो येशू आहे हे शिष्यांना समजले नाही. ५ तेव्हा, येशू त्यांना म्हणाला: “मुलांनो, तुमच्याजवळ खायला काही आहे का?”* ते म्हणाले: “नाही!” ६ तो त्यांना म्हणाला: “नावेच्या उजवीकडे जाळे टाका म्हणजे तुम्हाला मासे मिळतील.” त्यांनी जाळे टाकले तेव्हा जाळ्यात इतके मासे आले, की त्यांना ते ओढता येईना. ७ मग, ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो शिष्य पेत्रला म्हणाला: “हा तर प्रभू आहे!” हे ऐकताच शिमोन पेत्रने आपले कपडे घातले,* कारण तो उघडाच होता,* आणि त्याने समुद्रात उडी टाकली. ८ पण, इतर शिष्य जाळे ओढतओढत छोट्या नावेतून आले, कारण ते किनाऱ्यापासून फार दूर नाही, तर फक्त तीनशे फुटांच्या* अंतरावर होते.
९ ते किनाऱ्यावर आले तेव्हा त्यांना कोळशांचा विस्तव आणि त्यावर भाकरी व मासे ठेवलेले दिसले. १० येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही नुकतेच धरलेले काही मासे आणा.” ११ तेव्हा, शिमोन पेत्र नावेत चढला आणि त्याने मोठ्या माशांनी भरलेले जाळे ओढून किनाऱ्यावर आणले; त्यात १५३ मासे होते. जाळे माशांनी भरलेले असले, तरी ते फाटले नाही. १२ येशू त्यांना म्हणाला: “या, नाश्ता करा.” पण, त्यांच्यापैकी एकाही शिष्याला, “तू कोण आहेस?” असे विचारण्याचे धाडस झाले नाही, कारण तो प्रभूच आहे हे त्यांना माहीत होते. १३ येशूने येऊन भाकर घेतली आणि त्यांना दिली; मग, त्याने त्यांना मासेही दिले. १४ मेलेल्यांतून उठल्यानंतर शिष्यांसमोर प्रकट होण्याची ही येशूची तिसरी वेळ होती.
१५ त्यांनी नाश्ता केल्यावर, येशू शिमोन पेत्रला म्हणाला: “योहानच्या मुला शिमोन, तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” त्याने उत्तर दिले: “हो प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत आहे.” येशू त्याला म्हणाला: “माझ्या कोकरांना चार.” १६ येशू दुसऱ्यांदा त्याला म्हणाला: “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस का?” त्याने उत्तर दिले: “हो प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत आहे.” येशू त्याला म्हणाला: “माझ्या लहान मेढरांची काळजी घे.” १७ मग, येशू तिसऱ्यांदा त्याला म्हणाला: “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस का?” येशूने तिसऱ्यांदा, “तू माझ्यावर प्रेम करतोस का?” असे विचारले म्हणून पेत्र दुःखी झाला व त्याने उत्तर दिले: “प्रभू, तुला तर सर्वकाही माहीत आहे; माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तू जाणतोस.” येशू त्याला म्हणाला: “माझ्या लहान मेढरांना चार. १८ मी तुला अगदी खरं सांगतो, तरुणपणी तू स्वतः कपडे घालायचा आणि तुला वाटेल तिथे तू जायचा. पण, जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपले हात पुढे करशील आणि दुसरा माणूस तुला कपडे घालेल आणि तुझी इच्छा नसेल तिथे तुला घेऊन जाईल.” १९ पेत्र कोणत्या प्रकारच्या मरणाला सामोरे जाऊन देवाचा गौरव करेल, हे सूचित करण्यासाठी येशू असे म्हणाला. मग त्याने पेत्रला म्हटले: “माझ्यामागे चालत राहा.”
२० पेत्रने वळून पाहिले तेव्हा, ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो शिष्य त्याला मागून येताना दिसला. हा तोच शिष्य होता ज्याने संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी येशूकडे वळून असे विचारले होते: “प्रभू, तुला धरून देणारा कोण आहे?” २१ त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला: “प्रभू, या माणसाचं काय होईल?” २२ येशू त्याला म्हणाला: “मी येईपर्यंत याने राहावं, अशी माझी इच्छा असेल तर तुला त्याचं काय? तू माझ्यामागे चालत राहा.” २३ यावरून बांधवांमध्ये अशी गोष्ट पसरली, की हा शिष्य मरणारच नाही. पण, तो मरणार नाही असे येशू त्याला म्हणाला नाही, तर तो असे म्हणाला: “मी येईपर्यंत याने राहावं अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचं काय?”
२४ हा तोच शिष्य आहे, ज्याने या सर्व गोष्टींबद्दल ही साक्ष दिली आणि त्यानेच या गोष्टी लिहिल्या आहेत; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आपल्याला माहीत आहे.
२५ खरेतर, येशूने केलेल्या आणखी कितीतरी गोष्टी आहेत. त्या सर्व सविस्तर लिहिल्या असत्या, तर मला वाटते त्या गुंडाळ्या या जगात मावल्या नसत्या.