प्रेषितांची कार्यं
१० कैसरीया इथे कर्नेल्य नावाचा एक माणूस होता. तो सैन्यातल्या इटालियन तुकडीचा* अधिकारी* होता. २ तो एक नीतिमान माणूस असून आपल्या सर्व घराण्यासोबत देवाला भिऊन वागायचा. तो पुष्कळ लोकांना दान करायचा आणि देवाला नेहमी याचना करायचा. ३ दुपारी तीन वाजताच्या सुमारास* त्याला एका दृष्टान्तात देवाचा दूत त्याच्याजवळ येताना स्पष्टपणे दिसला आणि तो त्याला म्हणाला: “कर्नेल्य!” ४ कर्नेल्य घाबरून त्याच्याकडे एकटक पाहू लागला व त्याने त्याला विचारले: “काय प्रभू?” तो त्याला म्हणाला: “तुझ्या प्रार्थनांची व तू केलेल्या दानांची देवाने आठवण केली आहे. ५ म्हणून आता यापो इथे माणसांना पाठवून, पेत्र म्हटलेल्या शिमोन नावाच्या मनुष्याला बोलावून घे. ६ हा मनुष्य चामड्याचे काम करणाऱ्या शिमोनच्या घरी उतरला आहे;* त्याचे घर समुद्राजवळ आहे.” ७ त्याच्याशी बोलणारा देवदूत निघून गेल्यावर लगेच त्याने आपल्या सेवकांपैकी दोन दासांना आणि एका धार्मिक वृत्तीच्या सैनिकाला बोलावले. ८ त्याने त्यांना या सर्व गोष्टी सांगितल्या व यापोला पाठवले.
९ दुसऱ्या दिवशी प्रवास करत ते शहराजवळ आले, तेव्हा पेत्र दुपारी बाराच्या सुमाराला* घराच्या छतावर प्रार्थना करण्यासाठी गेला. १० पण त्याला खूप भूक लागली आणि काहीतरी खावेसे वाटले. जेवण तयार होत असताना त्याला एक दृष्टान्त दिसला ११ आणि त्याला आकाश उघडलेले व चार कोपरे धरून पृथ्वीवर सोडलेल्या एका मोठ्या तागाच्या चादरीसारखे काहीतरी* खाली येताना दिसले; १२ आणि त्यात सर्व प्रकारचे चार-पायांचे प्राणी आणि सरपटणारे प्राणी व आकाशात उडणारे पक्षी होते. १३ मग एक आवाज त्याला म्हणाला: “पेत्र, ऊठ यांना कापून खा!” १४ पण पेत्र म्हणाला: “शक्यच नाही प्रभू, कारण मी आजपर्यंत कधीही दूषित व अशुद्ध असं काहीही खाल्लं नाही.” १५ मग त्याला दुसऱ्यांदा तो आवाज ऐकू आला: “देवाने ज्या गोष्टी शुद्ध केल्या आहेत त्यांना तू दूषित म्हणायचं सोडून दे.” १६ असेच तिसऱ्यांदा घडले आणि लगेच ते पात्र वर आकाशात घेतले गेले.
१७ या दृष्टान्ताचा काय अर्थ असू शकेल याविषयी पेत्र अजूनही विचारात असताना, कर्नेल्यने पाठवलेली माणसे शिमोनचे घर कोठे आहे असे विचारत फाटकाजवळ येऊन थांबली. १८ त्यांनी हाक मारून, पेत्र म्हटलेला शिमोन इथेच उतरला आहे का असे विचारले. १९ पेत्र अजूनही दृष्टान्ताबद्दल विचार करत असताना, आत्म्याने त्याला म्हटले: “पाहा! तीन माणसं तुझ्याविषयी विचारपूस करत आहेत. २० म्हणून ऊठ आणि खाली जा व मनात कोणतीही शंका न आणता त्यांच्यासोबत जा, कारण मीच त्यांना पाठवलं आहे.” २१ तेव्हा पेत्र खाली त्या माणसांकडे गेला आणि म्हणाला: “तुम्ही ज्याला शोधत आहात तो मीच आहे. तुम्ही कशासाठी आला आहात?” २२ ते म्हणाले: “सैन्याचा अधिकारी असलेला कर्नेल्य हा एक नीतिमान आणि देवाला भिऊन वागणारा व सबंध यहुदी राष्ट्रात नावाजलेला मनुष्य आहे. देवाने त्याला एका पवित्र दूताद्वारे, तुम्हाला निरोप पाठवून आपल्या घरी बोलावून घेण्याची आणि तुम्ही जे सांगाल ते ऐकण्याची सूचना दिली.” २३ तेव्हा त्याने त्यांना घरात बोलावले आणि आपले पाहुणे म्हणून त्यांच्या राहण्याची सोय केली.
दुसऱ्या दिवशी तो उठला आणि त्यांच्यासोबत निघाला. यापोचे काही बांधवही त्याच्यासोबत गेले. २४ त्याच्या दुसऱ्या दिवशी तो कैसरीयाला पोचला. कर्नेल्य अर्थातच त्याची वाट पाहत होता आणि त्याने आपल्या नातेवाइकांना व जवळच्या मित्रांना आपल्या घरी बोलावून घेतले होते. २५ पेत्र आत जाताच कर्नेल्य त्याला भेटायला आला आणि त्याच्या पाया पडून त्याने त्याला नमन केले. २६ पण पेत्रने त्याला उठवून म्हटले: “ऊठ, उभा राहा; मीसुद्धा एक माणूसच आहे.” २७ तो त्याच्याशी बोलत बोलत आत गेला तेव्हा त्याला बरेच लोक जमलेले दिसले. २८ तो त्यांना म्हणाला: “नियमानुसार एका यहुद्याने दुसऱ्या जातीच्या माणसाशी व्यवहार करणं किंवा त्याच्याकडे जाणं किती अयोग्य आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. तरीपण, मी कोणत्याही माणसाला दूषित किंवा अशुद्ध म्हणू नये, असं देवाने मला दाखवलं आहे. २९ म्हणूनच, तुम्ही मला बोलावलं तेव्हा मी खरंतर कोणतीच हरकत न घेता आलो. तर आता मी तुम्हाला विचारतो, की तुम्ही मला कशासाठी बोलावलं?”
३० मग कर्नेल्य म्हणाला: “आजपासून बरोबर चार दिवसांआधी, मी दुपारी तीनच्या सुमारास* माझ्या घरी प्रार्थना करत असताना, तेजस्वी वस्त्रे घातलेला एक मनुष्य माझ्यासमोर येऊन उभा राहिला ३१ आणि म्हणाला: ‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना देवाने ऐकली आहे आणि तू केलेल्या दानांची त्याने आठवण केली आहे. ३२ म्हणून, आपल्या माणसांना यापोला पाठव आणि पेत्र म्हटलेल्या शिमोनला बोलावून घे. हा माणूस चामड्याचे काम करणाऱ्या शिमोनच्या घरी उतरला आहे, ज्याचे घर समुद्राजवळ आहे.’ ३३ म्हणून मी लगेच तुम्हाला निरोप पाठवून बोलावून घेतले. आमच्याकडे येऊन तुम्ही आमच्यावर कृपा केली आहे. तर आता, आम्ही सर्व जण देवासमोर हजर आहोत आणि यहोवाने* तुम्हाला जे काही सांगण्याची आज्ञा केली आहे, ते ऐकण्यास उत्सुक आहोत.”
३४ हे ऐकल्यावर पेत्र बोलू लागला: “आता खरोखर मला याची जाणीव झाली आहे, की देव भेदभाव करत नाही, ३५ तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो. ३६ त्याने इस्राएलच्या पुत्रांना घोषित करण्यासाठी एक संदेश पाठवला. जो सर्वांचा प्रभू आहे, त्या येशू ख्रिस्ताद्वारे लाभणाऱ्या शांतीचा हा संदेश होता. ३७ योहानने घोषित केलेल्या बाप्तिस्म्यानंतर, गालीलपासून सुरू होऊन सबंध यहूदीयात घडलेला वृत्तान्त तर तुम्हाला माहीतच आहे: ३८ अर्थात नासरेथच्या येशूविषयीचा वृत्तान्त. त्याला देवाने पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने अभिषिक्त केलं आणि तो चांगली कामं करत आणि सैतानाने* पीडित केलेल्या लोकांना बरं करत सबंध देशभर फिरला, कारण देव त्याच्यासोबत होता. ३९ आणि त्याने यहुद्यांच्या देशात व यरुशलेममध्ये केलेल्या सर्व गोष्टींचे आम्ही साक्षीदार आहोत; पण त्यांनी त्याला वधस्तंभावर* खिळून ठार मारले. ४० देवाने त्याला तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याला लोकांसमोर प्रकट होऊ* दिले. ४१ पण सर्व लोकांसमोर नाही, तर देवाने पूर्वीच नियुक्त केलेल्या साक्षीदारांसमोर, म्हणजे आमच्यासमोर त्याला प्रकट केले. आणि तो मेलेल्यांतून उठल्यावर आम्ही त्याच्यासोबत खातपीत होतो. ४२ तसेच, त्याने आम्हाला लोकांकडे जाऊन असा प्रचार करण्याचा व पूर्ण साक्ष देण्याचा आदेश दिला, की ज्याला देवाने जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी नियुक्त केले तो हाच आहे. ४३ सर्व संदेष्टे त्याच्याविषयी साक्ष देतात की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, त्याला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल.”
४४ पेत्र त्यांच्याशी या गोष्टींविषयी अजून बोलतच होता, तेव्हा वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा आला. ४५ पवित्र आत्म्याचे कृपादान विदेशी लोकांवरही आले आहे हे पाहून, जे सुंता झालेले विश्वासू जन पेत्रसोबत आले होते त्यांना खूप आश्चर्य वाटले. ४६ कारण त्यांनी त्यांना विदेशी भाषांमध्ये बोलताना व देवाची स्तुती करताना ऐकले. तेव्हा पेत्र म्हणाला: ४७ “यांनाही आपल्याप्रमाणे पवित्र आत्मा मिळाला असताना, त्यांना पाण्यात बाप्तिस्मा घेण्यापासून कोण रोखू शकतो?” ४८ असे म्हणून त्याने त्यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याची आज्ञा दिली. मग त्यांनी त्याला काही दिवस आपल्याकडे राहण्याची विनंती केली.