१ करिंथकर
१४ एकमेकांसोबत प्रेमाने वागण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करा; पण, त्याच वेळी आध्यात्मिक कृपादाने आणि खासकरून भविष्यवाणी करण्याचे कृपादान मिळवण्याचा प्रयत्न करत राहा.* २ कारण अन्य भाषेत बोलणारा मानवांशी नाही, तर देवाशी बोलतो; तो देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने पवित्र रहस्ये सांगत असला, तरी कोणालाही ती समजत नाहीत. ३ पण, भविष्यवाणी करणारा आपल्या बोलण्याने इतरांची उन्नती करतो आणि त्यांना प्रोत्साहन व सांत्वन देतो. ४ अन्य भाषेत बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, तर भविष्यवाणी करणारा संपूर्ण मंडळीची उन्नती करतो. ५ खरे पाहता, तुमच्यापैकी सर्वांनीच अन्य भाषा बोलाव्यात अशी माझी इच्छा आहे; तरी तुम्ही भविष्यवाणी केल्यास ते अधिक चांगले राहील असे मला वाटते. कारण अन्य भाषेत बोलणारा, मंडळीची उन्नती व्हावी म्हणून भाषांतर करत नसेल, तर भविष्यवाणी करणारा त्याच्याहून श्रेष्ठ आहे. ६ आता बांधवांनो, मी जर तुमच्याकडे येऊन अन्य भाषांमध्ये बोलू लागलो, पण देवाने प्रकट केलेल्या गोष्टी, ज्ञान, भविष्यवाणी किंवा शिक्षण यांबद्दल बोललो नाही, तर त्याचा काय फायदा?
७ बासरी किंवा वीणा यांसारख्या वाद्यांचेच उदाहरण घ्या. प्रत्येक स्वर स्पष्टपणे निघाल्याशिवाय, बासरीवर किंवा वीणेवर काय वाजवले जात आहे हे कोणाला कसे कळेल? ८ युद्धाचा इशारा देण्यासाठी कर्णा वाजवणाऱ्याने जर तो नीट वाजवला नाही, तर युद्धासाठी कोण तयार होईल? ९ त्याचप्रमाणे जर तुम्ही सहज समजेल अशा भाषेत बोलला नाहीत, तर तुम्ही काय म्हणत आहात हे कोणाला कसे कळेल? उलट, ते वाऱ्याशी बोलण्यासारखे ठरेल. १० तसे पाहिल्यास जगात अनेक भाषा आहेत, पण त्यांपैकी एकही अर्थहीन नाही. ११ कारण मी जे बोलत आहे त्याचा अर्थच मला समजत नसेल, तर ज्याच्याशी मी बोलत आहे, त्याच्यासाठी मी एखाद्या विदेश्यासारखा असेन आणि माझ्याशी बोलणाराही माझ्यासाठी विदेश्यासारखा असेल. १२ तर मग, आत्म्याची कृपादाने मिळवण्यास उत्सुक असलेले तुम्हीसुद्धा, मोठ्या प्रमाणात अशी कृपादाने मिळवण्याचा प्रयत्न करा ज्यांमुळे मंडळीची उन्नती होईल.
१३ म्हणून, अन्य भाषेत बोलणाऱ्याने आपण जे सांगत आहोत त्याचे भाषांतर करता यावे म्हणून प्रार्थना करावी. १४ कारण, जेव्हा मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, तेव्हा आत्म्याचे कृपादान मिळाल्यामुळे मी ती प्रार्थना करत असतो, पण माझ्या बुद्धीला त्याचा अर्थ समजत नाही. १५ तर मग, काय करावे? मी आत्म्याच्या कृपादानामुळे प्रार्थना करेन, पण त्यासोबतच माझ्या बुद्धीला समजेल अशा रीतीने ती करेन. तसेच, मी आत्म्याच्या कृपादानामुळे स्तुतीगीते गाईन, पण ती माझ्या बुद्धीला समजतील अशा रीतीने गाईन. १६ नाहीतर, केवळ आत्म्याच्या कृपादानामुळे तू उपकारस्तुती केली, तर तुमच्यामध्ये असलेला सामान्य माणूस तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेला “आमेन” कसा म्हणेल? कारण प्रार्थनेत तू काय म्हणतोस हे त्याला समजत नाही. १७ तू अतिशय चांगल्या प्रकारे उपकारस्तुती करत असशील, पण त्यामुळे दुसऱ्याची उन्नती होत नाही. १८ मी तुमच्या सर्वांपेक्षा जास्त भाषा बोलू शकतो, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. १९ असे असले तरी, एखाद्या मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माझ्या बुद्धीला समजतील असे पाच शब्द बोलणे मी पसंत करेन, जेणेकरून मला त्यांतून इतरांना काही शिकवता येईल.*
२० बांधवांनो, समजण्याच्या बाबतीत लहान मुलांसारखे होऊ नका, तर वाईट गोष्टींच्या बाबतीत लहान मुलांसारखे व्हा; आणि समजण्याच्या बाबतीत प्रौढांसारखे व्हा. २१ नियमशास्त्रात असे लिहिले आहे: “‘मी या लोकांशी विदेश्यांच्या भाषांत आणि परक्यांच्या बोलींत बोललो, तरी ते माझे ऐकणार नाहीत,’ असे यहोवा* म्हणतो.” २२ त्यामुळे अन्य भाषा, विश्वासात असलेल्यांसाठी नाही, तर विश्वासात नसलेल्यांसाठी एक चिन्ह आहेत; पण, भविष्यवाणी मात्र विश्वासात नसलेल्यांसाठी नाही, तर विश्वासात असलेल्यांसाठी आहे. २३ त्यामुळे, संपूर्ण मंडळी एका ठिकाणी एकत्र जमली आणि सर्व जण अन्य भाषा बोलू लागले, तर तिथे येणारे सामान्य लोक किंवा विश्वासात नसलेले लोक, तुम्हाला वेडे म्हणणार नाहीत का? २४ पण, तुम्ही सर्व भविष्यवाणी करत असताना एखादा विश्वासात नसलेला किंवा सामान्य माणूस तिथे आला, तर तुमच्या सर्वांच्या बोलण्यामुळे तो स्वतःचे बारकाईने परीक्षण करायला आणि स्वतःमध्ये सुधारणा करायला प्रवृत्त होईल. २५ मग, त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टींची त्याला जाणीव होईल आणि तो दंडवत घालून देवाची उपासना करेल व म्हणेल: “देव खरोखर तुमच्यामध्ये आहे.”
२६ तर मग बांधवांनो, आपण काय करावे? तुम्ही एकत्र येता तेव्हा कोणाला एखादे स्तोत्र गायचे असते, कोणाला शिक्षण द्यायचे असते, कोणाला देवाने प्रकट केलेल्या गोष्टी सांगायच्या असतात, कोणाला अन्य भाषेत बोलायचे असते, तर आणखी कोणाला भाषांतर करायचे असते. पण, सर्व गोष्टी उन्नतीसाठी होऊ द्या. २७ कोणाला अन्य भाषेत बोलायचे असेल, तर असे दोघे किंवा जास्तीत जास्त तिघे असावेत; आणि त्यांनी एकेक करून बोलावे व कोणीतरी त्यांच्या बोलण्याचे भाषांतर करावे. २८ पण, भाषांतर करणारा कोणी नसेल, तर त्यांनी मंडळीत शांत राहावे आणि मनातल्या मनात देवाशी बोलावे. २९ भविष्यवाणी करणाऱ्यांपैकी दोघा किंवा तिघांनी बोलावे आणि बाकीच्यांनी त्याचा अर्थ शोधून काढावा. ३० पण, तिथे बसलेले असताना एखाद्याला देवाने काही प्रकट केले, तर जो बोलत आहे त्याने शांत राहावे. ३१ कारण, एकेक करून तुम्ही सर्व जण भविष्यवाणी करू शकता, जेणेकरून सगळेच शिकतील व त्यांना प्रोत्साहन मिळेल. ३२ संदेष्ट्यांना आत्म्याचे जे कृपादान मिळाले आहे, त्यावर त्यांनी नियंत्रण ठेवावे. ३३ कारण देव अव्यवस्थेचा नाही, तर शांतीचा देव आहे.
पवित्र जनांच्या सर्व मंडळ्यांमध्ये जशी रीत आहे त्याप्रमाणे, ३४ स्त्रियांनी मंडळ्यांमध्ये शांत राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. उलट त्यांनी अधीनता दाखवावी, जसे नियमशास्त्रातसुद्धा म्हटले आहे. ३५ त्यांना काही प्रश्न असल्यास, त्याबद्दल त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे.
३६ देवाचे वचन तुमच्यापासून आले आहे का? किंवा ते फक्त तुम्हालाच देण्यात आले आहे का?
३७ जर कोणाला वाटत असेल, की आपण संदेष्टे आहोत किंवा आपल्याला आत्म्याचे कृपादान मिळाले आहे, तर ज्या गोष्टी मी तुम्हाला लिहीत आहे त्या प्रभूच्या आज्ञेनुसार आहेत हे त्याने मान्य करावे. ३८ पण, जर कोणी ही गोष्ट नाकारली, तर त्यालाही नाकारले जाईल.* ३९ तर माझ्या बांधवांनो, भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न करत राहा; त्याच वेळी, अन्य भाषा बोलण्यासही मनाई करू नका. ४० पण, सर्व गोष्टी योग्य पद्धतीने व सुव्यवस्थितपणे* होऊ द्या.