१ करिंथकर
४ प्रत्येकाने आम्हाला ख्रिस्ताचे सेवक* आणि देवाच्या पवित्र रहस्यांचे कारभारी असे समजावे. २ या बाबतीत, कारभाऱ्यांकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी विश्वासू असावे. ३ तुम्ही किंवा कोणा मानवी न्यायाधीशाने* माझा न्याय करावा, या गोष्टीला मी अगदी क्षुल्लक लेखतो. खरेतर, मी स्वतःदेखील आपला न्याय करत नाही. ४ कारण मी काही वाईट केल्याची मला तरी जाणीव नाही. पण एवढ्यावरून मी नीतिमान ठरत नाही, कारण माझा न्याय करणारा यहोवा* आहे. ५ म्हणून नेमलेली वेळ येईपर्यंत, म्हणजे प्रभू येईपर्यंत कशाचाही न्याय करू नका. तो अंधारातल्या गुप्त गोष्टी उजेडात आणेल आणि माणसाच्या हृदयातले हेतू प्रकट करेल आणि तेव्हा, ज्याला त्याला आपल्या योग्यतेनुसार देवाकडून शाबासकी मिळेल.
६ आता बांधवांनो, मी तुमच्या भल्याकरता स्वतःचे व अपुल्लोचे उदाहरण घेऊन या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, यासाठी की आमच्या उदाहरणावरून तुम्ही हा नियम पाळायला शिकावे: “ज्या लिहिण्यात आल्या आहेत, त्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका.” म्हणजे, गर्वाने फुगू नका आणि कोणाचा पक्षपात करू नका. ७ कारण तुला दुसऱ्यापेक्षा वेगळा कोण करतो? खरेतर, तुझ्याजवळ असे काय आहे जे तुला देण्यात आलेले नाही? मग, जर तुला ते देण्यात आले आहे, तर मग तू ते स्वतःच्या बळावर मिळवल्याप्रमाणे बढाई का मारतोस?
८ तुम्ही आधीच तृप्त झाला आहात का? तुम्ही आधीच श्रीमंत झाला आहात का? आमच्या शिवायच तुम्ही राजे म्हणून राज्य करू लागला आहात का? मला तर मनापासून वाटते, की तुम्ही राजे म्हणून राज्य करायला लागला असता तर बरे झाले असते, कारण मग तुमच्यासोबत आम्हीदेखील राजे म्हणून राज्य केले असते. ९ देवाने आम्हा प्रेषितांना, मृत्युदंडास पात्र ठरवलेली माणसे या नात्याने अगदी शेवटी लोकांसमोर आणले आहे, असे मला वाटते; कारण आम्ही जगापुढे, तसेच देवदूत व मानव यांच्यापुढे रंगमंचावरील नाट्यप्रयोगासारखे झालो आहोत. १० आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये बुद्धिमान आहात; आम्ही अशक्त, तर तुम्ही सशक्त आहात; तुमचा आदर, तर आमचा अनादर केला जातो. ११ अगदी या वेळेपर्यंत, आम्ही भुकेले व तहानलेले आहोत, आमच्या अंगावर नीट कपडे नाहीत,* आम्हाला मारहाण होत आहे* आणि आम्ही बेघर आहोत. १२ आम्ही श्रम करतो आणि आमच्या हातांनी कष्ट करतो. आमचा अपमान केला जातो तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ होतो, तेव्हा आम्ही धीराने तो सहन करतो; १३ आमच्यावर खोटे आरोप केले जातात, तेव्हा आम्ही सौम्यपणे उत्तर देतो;* आतापर्यंत, आम्ही जगासाठी केरकचरा* आणि गाळ असे झालो आहोत.
१४ तुम्हाला लाजवण्यासाठी नाही, तर माझी प्रिय मुले म्हणून तुम्हाला सल्ला देण्यासाठी मी या गोष्टी लिहीत आहे. १५ कारण ख्रिस्तामध्ये तुमचे दहा हजार रक्षक* असले, तरी तुमचे अनेक पिता नक्कीच नाहीत; कारण ख्रिस्त येशूमध्ये मी आनंदाच्या संदेशाद्वारे तुमचा पिता बनलो आहे. १६ म्हणून मी तुम्हाला असा आग्रह करतो की तुम्ही माझे अनुकरण करा. १७ याच उद्देशाने मी तीमथ्यला तुमच्याकडे पाठवत आहे, कारण तो प्रभूमध्ये माझे प्रिय व विश्वासू मूल आहे. तो तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये माझ्या कार्य करण्याच्या पद्धतींची* आठवण करून देईल, ज्याप्रमाणे मी सर्व ठिकाणी, प्रत्येक मंडळीत शिकवत आहे.
१८ मी तुमच्याकडे येणारच नाही, असे समजून काही जण गर्वाने फुगले आहेत. १९ पण, यहोवाची* इच्छा असल्यास मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि या गर्वाने फुगलेल्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, त्यांच्याकडे देवाचे सामर्थ्य आहे की नाही हे पाहीन. २० कारण देवाचे राज्य हे बोलण्यातून नाही, तर देवाच्या सामर्थ्यातून दिसून येते. २१ मी तुमच्याकडे छडी घेऊन आलेले तुम्हाला आवडेल, की प्रेमाने व सौम्यतेने आलेले आवडेल?