१ योहान
२ माझ्या मुलांनो, मी तुम्हाला या गोष्टी यासाठी लिहीत आहे, की तुम्ही पाप करू नये. आणि तरीसुद्धा एखाद्याच्या हातून पाप घडलेच, तर पित्याजवळ आपल्यासाठी एक साहाय्यक* आहे, अर्थात येशू ख्रिस्त, जो नीतिमान आहे. २ आणि तो आपल्या पापांसाठी दिलेले प्रायश्चित्ताचे बलिदान आहे, ज्याद्वारे देवासोबत आपला समेट होतो; पण फक्त आपल्याच पापांसाठी नाही, तर सबंध जगाच्या पापांसाठी. ३ आणि जर आपण त्याच्या आज्ञांचे पालन करत राहिलो, तर यावरूनच आपल्याला कळते, की आपल्याला त्याची ओळख झाली आहे. ४ “मला त्याची ओळख झाली आहे,” असे जो कोणी म्हणतो, पण त्याच्या आज्ञांचे पालन करत नाही, तो खोटे बोलतो आणि त्या मनुष्यात सत्य नाही. ५ पण, जो कोणी त्याच्या शिकवणींचे पालन करतो त्याचे देवावर खरोखर प्रेम असल्याचे दिसून येते. यावरूनच आपल्याला कळते की आपण त्याच्या ऐक्यात आहोत. ६ आपण त्याच्यासोबत ऐक्यात आहोत असे जो कोणी म्हणतो त्याचे हेच कर्तव्य आहे, की जसा येशू जगला,* तसेच त्यानेही जगले* पाहिजे.
७ प्रिय मुलांनो, मी तुम्हाला जी आज्ञा लिहीत आहे, ती नवीन नाही तर तुम्हाला सुरुवातीपासून देण्यात आलेली जुनीच आज्ञा आहे. ही जुनी आज्ञा म्हणजे तुम्ही पूर्वी ऐकलेले वचन आहे. ८ तरीपण, मी तुम्हाला एक नवीन आज्ञा लिहीत आहे, जी ख्रिस्ताने आणि तुम्हीही पाळली, आणि आता अंधार नाहीसा होत आहे आणि खरा प्रकाश चमकू लागला आहे.
९ आपण प्रकाशात आहोत असे जो कोणी म्हणतो आणि तरीपण आपल्या भावाचा द्वेष करतो, तो अजूनही अंधारातच आहे. १० जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात टिकून राहतो आणि तो कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाही.* ११ पण, जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे आणि अंधारात चालत आहे, आणि आपण कुठे जात आहोत हे त्याला कळत नाही, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केले आहेत.
१२ माझ्या मुलांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण त्याच्या* नावामुळे देवाने तुमच्या पापांची क्षमा केली आहे. १३ वडील जनांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण जो सुरुवातीपासून आहे त्याची तुम्हाला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे. मुलांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण देव, जो आपला पिता त्याची तुम्हाला ओळख झाली आहे. १४ वडील जनांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण जो सुरुवातीपासून आहे त्याची तुम्हाला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही खंबीर आहात आणि देवाचे वचन तुमच्यामध्ये टिकून राहते आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.
१५ जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका. जर कोणाचे जगावर प्रेम असेल, तर पित्याचे प्रेम त्याच्यामध्ये नाही; १६ कारण जगातल्या सर्व गोष्टी—शरीराची वासना, डोळ्यांची वासना आणि आपल्या धनसंपत्तीचा दिखावा*—या पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. १७ शिवाय, जग आणि त्याची वासना नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. पण, जो देवाच्या इच्छेनुसार वागतो तो सर्वकाळ टिकून राहतो.
१८ मुलांनो, हा शेवटला काळ आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहे; आतासुद्धा बरेच ख्रिस्तविरोधी आले आहेत आणि यावरूनच आपल्याला कळते की हा शेवटला काळ आहे. १९ ते आपल्यातूनच बाहेर निघाले, पण ते आपल्यातले* नव्हते; कारण जर ते आपल्यातले असते, तर ते आपल्यासोबत टिकून राहिले असते. पण ते बाहेर गेले, यासाठी की सर्वच जण आपल्यातले नाहीत हे दिसून यावे. २० आणि जो पवित्र, त्याने तुमचा अभिषेक केला आहे आणि तुम्हा सर्वांजवळ ज्ञान आहे. २१ तुम्हाला सत्य माहीत नसल्यामुळे नाही, तर तुम्हाला ते माहीत असल्यामुळे मी लिहीत आहे, कारण सत्यापासून कोणतीही खोटी गोष्ट निघू शकत नाही.
२२ येशू हा ख्रिस्त आहे ही गोष्ट जो नाकारतो तो जर खोटारडा नाही, तर मग कोण आहे? हाच तो ख्रिस्तविरोधी आहे, जो पित्याला आणि पुत्राला नाकारतो. २३ जो कोणी पुत्राला नाकारतो त्याच्याजवळ पितादेखील नाही. पण जो कोणी पुत्राला स्वीकारतो त्याच्याजवळ पितादेखील आहे. २४ तुमच्याबद्दल बोलायचे तर जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे ते तुमच्यामध्ये टिकून राहिले पाहिजे. जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे, ते जर तुमच्यामध्ये टिकून राहिले, तर तुम्हीसुद्धा पुत्रासोबत आणि पित्यासोबत ऐक्यात राहाल. २५ शिवाय, त्याने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाचे वचन दिले आहे.
२६ जे तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या संदर्भात मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे. २७ आणि तुमच्याबद्दल बोलायचे तर, देवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे* तुमचा अभिषेक केला आहे आणि हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये टिकून राहतो. तुम्हाला कोणीही शिकवण्याची गरज नाही; तर तुमचा अभिषेक करण्याद्वारे तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवत आहे. तुमचा हा अभिषेक खोटा नाही, तर खरा आहे. त्याद्वारे तुम्ही जसे शिकला आहात, तसे ज्याने तुमचा अभिषेक केला आहे, त्याच्या ऐक्यात टिकून राहा. २८ तर आता माझ्या मुलांनो, त्याच्या ऐक्यात टिकून राहा, म्हणजे जेव्हा त्याला प्रकट केले जाईल तेव्हा आपल्याला मनमोकळेपणाने बोलण्याचे धैर्य असेल आणि त्याच्या उपस्थितीदरम्यान आपल्याला त्याच्यापुढे लज्जित व्हावे लागणार नाही. २९ तो नीतिमान आहे हे जर तुम्हाला माहीत आहे, तर तुम्हाला हेदेखील माहीत आहे, की जो कोणी नीतिमानपणे वागत राहतो तो त्याच्यापासून जन्मला आहे.