२ इतिहास
२८ आहाज+ हा राजा बनला तेव्हा तो २० वर्षांचा होता. त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. पण आपला पूर्वज दावीद याने जसं यहोवाच्या नजरेत योग्य ते केलं, तसं त्याने केलं नाही.+ २ याउलट, तो इस्राएलच्या राजांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालला.+ इतकंच नाही तर त्याने बआल दैवतांच्या धातूच्या मूर्तीही* बनवल्या.+ ३ तसंच, त्याने ‘हिन्नोम वंशजांच्या खोऱ्यात’* बलिदानांचं हवन केलं* आणि आपल्या स्वतःच्या मुलांचा अग्नीत होम केला.+ यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांमधून घालवून दिलं होतं, त्यांच्या घृणास्पद चालीरितींचं+ त्याने अशा प्रकारे अनुसरण केलं. ४ शिवाय, तो उच्च स्थानांवर,*+ टेकड्यांवर आणि प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली बलिदानं अर्पण करत राहिला आणि बलिदानांचं हवन करत राहिला.+
५ म्हणून त्याच्या देवाने, यहोवाने त्याला सीरियाच्या राजाच्या हाती दिलं.+ सीरियाच्या लोकांनी आहाजला हरवलं आणि त्याच्या पुष्कळ लोकांना बंदी बनवून दिमिष्कला नेलं.+ तसंच, देवाने त्याला इस्राएलच्या राजाच्याही हवाली केलं. इस्राएलच्या राजाने त्याला हरवून त्याच्या लोकांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. ६ रमाल्याहचा मुलगा पेकह+ याने एका दिवसात यहूदाच्या १,२०,००० शूर योद्ध्यांना मारून टाकलं. कारण यहूदाने आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याला सोडून दिलं होतं.+ ७ जिख्री नावाच्या एका एफ्राईमी योद्ध्याने राजाचा मुलगा मासेया याला मारून टाकलं. तसंच, राजमहालाची व्यवस्था पाहणारा अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल असलेला एलकाना यांनाही त्याने मारून टाकलं. ८ शिवाय, इस्राएली लोकांनी यहूदामधल्या आपल्या २,००,००० भाऊबंदांना बंदी बनवून नेलं; त्यांच्यामध्ये स्त्रिया, मुलं आणि मुली होत्या. यासोबतच, त्यांनी तिथे बरीच लूटमार केली आणि लुटीचा माल शोमरोनला नेला.+
९ पण तिथे ओदेद नावाचा यहोवाचा एक संदेष्टा होता. तो शोमरोनात परत येणाऱ्या सैन्यासमोर गेला आणि त्यांना म्हणाला: “पाहा! तुमच्या पूर्वजांच्या देवाचा, यहोवाचा क्रोध यहूदावर भडकला होता. म्हणून त्याने त्यांना तुमच्या हाती दिलं.+ पण तुम्ही इतक्या रागाने आणि निर्दयीपणे त्यांची कत्तल केली, की ती गोष्ट देवाच्या नजरेतून सुटली नाही. १० आणि आता तर तुम्ही यहूदाच्या व यरुशलेमच्या लोकांना आपले दास-दासी बनवायचाही विचार करताय!+ पण, तुम्ही स्वतःसुद्धा तुमचा देव यहोवा याच्यासमोर दोषी नाहीत का? ११ आता माझं ऐका! तुम्ही तुमच्या भाऊबंदांमधून ज्यांना बंदी बनवून आणलंय, त्यांना परत पाठवून द्या. कारण यहोवाचा क्रोध तुमच्यावर खूप भडकलाय.”
१२ मग एफ्राईमच्या काही प्रमुखांनी, म्हणजे यहोहानानचा मुलगा अजऱ्या, मशिल्लेमोथचा मुलगा बरेख्या, शल्लूमचा मुलगा यहिज्कीया आणि हदलाईचा मुलगा अमासा यांनी युद्धावरून परत येणाऱ्या सैन्याला अडवलं, १३ आणि ते त्यांना म्हणाले: “बंदिवानांना इथे आणू नका, नाहीतर आपण यहोवापुढे दोषी ठरू. तुम्ही जे काही करायचा विचार करताय, त्यामुळे आपल्या पापात आणि दोषात आणखी भर पडेल. कारण आपल्यावर आधीच खूप मोठा दोष आहे आणि देवाचा क्रोध इस्राएलवर भडकलाय.” १४ म्हणून मग शस्त्रधारी सैनिकांनी बंदिवानांना अधिकाऱ्यांच्या आणि संपूर्ण मंडळीच्या हवाली केलं. तसंच, त्यांनी लुटीचा सगळा मालही त्यांना देऊन टाकला.+ १५ मग ज्या माणसांना नेमण्यात आलं होतं, त्यांनी येऊन बंदिवानांना आपल्या ताब्यात घेतलं. आणि त्यांच्यापैकी ज्यांच्या अंगावर कपडे नव्हते त्या सर्वांना त्यांनी लुटीच्या मालातून कपडे दिले; त्यांनी त्यांना कपडे, पायात घालायचे जोडे, अन्नपाणी आणि अंगाला लावायला तेल दिलं. नंतर त्यांच्यापैकी कमजोर असलेल्यांना त्यांनी गाढवांवर बसवलं आणि सगळ्या बंदिवानांना खजुराच्या झाडांच्या शहरात, म्हणजे यरीहोत आपल्या भाऊबंदांकडे आणलं. मग ते परत शोमरोनला निघून गेले.
१६ त्या वेळी आहाज राजाने अश्शूरच्या राजांकडे मदत मागितली.+ १७ शिवाय, अदोमच्या लोकांनी परत एकदा येऊन यहूदावर हल्ला केला आणि तिथल्या लोकांना बंदी बनवून नेलं. १८ पलिष्टी लोकांनीही+ यहूदाच्या शेफीला+ आणि नेगेब प्रदेशांतल्या शहरांवर हल्ले केले. त्यांनी बेथ-शेमेश,+ अयालोन,+ गदेरोथ ही शहरं काबीज केली. तसंच त्यांनी सोखो, तिम्ना+ आणि गिम्जो या शहरांवर व त्यांच्या आसपासच्या नगरांवरही हल्ले केले. आणि ते तिथे राहू लागले. १९ इस्राएलचा राजा आहाज याच्यामुळे यहोवाने यहूदाला नमवलं. आहाजने यहूदाच्या लोकांना मोकळं सोडलं होतं आणि म्हणून लोक यहोवाशी आणखी अविश्वासूपणे वागले होते.
२० शेवटी अश्शूरचा राजा तिग्लथ-पिल्नेसर+ याने आहाजला मदत करण्याऐवजी त्याच्यावर हल्ला करून त्याला संकटात टाकलं.+ २१ आहाजने यहोवाच्या मंदिरात, राजमहालात आणि अधिकाऱ्यांच्या घरांत जे काही होतं ते सगळं+ घेऊन अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिलं होतं. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. २२ आणि आपल्या संकटाच्या काळात तर आहाज राजा यहोवाशी आणखीनच अविश्वासूपणे वागला. २३ दिमिष्कच्या ज्या दैवतांनी त्याला हरवलं होतं,+ त्यांनाच तो बलिदानं अर्पण करू लागला.+ कारण तो म्हणाला: “सीरियाच्या लोकांचे देव त्यांना मदत करतात. तेव्हा मीसुद्धा त्यांना बलिदानं अर्पण करीन, म्हणजे ते मला मदत करतील.”+ पण ती दैवतं त्याच्या आणि संपूर्ण इस्राएलच्या नाशाचं कारण ठरली. २४ पुढे, आहाजने खऱ्या देवाच्या मंदिरातली भांडी गोळा केली आणि त्यांचे तुकडे-तुकडे केले.+ तसंच, त्याने यहोवाच्या मंदिराचे दरवाजे बंद करून टाकले+ आणि यरुशलेमच्या चौकाचौकांत स्वतःसाठी वेदी बांधल्या. २५ शिवाय, इतर दैवतांना बलिदानांचं हवन करण्यासाठी त्याने यहूदाच्या सगळ्या शहरांत उच्च स्थानंही बांधली.+ आणि असं करून त्याने आपल्या पूर्वजांच्या देवाचा, यहोवाचा क्रोध भडकवला.
२६ आहाजबद्दलची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सगळं यहूदाच्या आणि इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ २७ मग आहाजचा मृत्यू झाला* आणि त्याला यरुशलेम शहरात दफन करण्यात आलं. पण त्यांनी त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन केलं नाही.+ मग त्याच्या जागी त्याचा मुलगा हिज्कीया हा राजा बनला.