गणना
१ मग, इस्राएली लोक इजिप्त* देशातून बाहेर आल्यावर दुसऱ्या वर्षातल्या, दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी,+ सीनायच्या ओसाड रानामध्ये+ भेटमंडपात+ यहोवा* मोशेशी बोलला. तो म्हणाला: २ “इस्राएली लोकांपैकी* सर्व पुरुषांची त्यांच्या घराण्यांप्रमाणे, त्यांच्या कुळांप्रमाणे आणि नावांप्रमाणे एकेक करून मोजणी कर.*+ ३ तू आणि अहरोन, इस्राएलमध्ये सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या+ सर्व पुरुषांची त्यांच्या तुकड्यांप्रमाणे* नोंदणी कर.
४ प्रत्येक वंशातल्या एका माणसाला आपल्यासोबत घे; तो त्याच्या कुळाचा प्रमुख असावा.+ ५ जे पुरुष तुझ्यासोबत उभे राहतील त्यांची नावं अशी: रऊबेन वंशातल्या शदेयुरचा मुलगा अलीसूर;+ ६ शिमोन वंशातल्या सुरीशादैचा मुलगा शलूमियेल;+ ७ यहूदा वंशातल्या अम्मीनादाबचा मुलगा नहशोन;+ ८ इस्साखार वंशातल्या सुवारचा मुलगा नथनेल;+ ९ जबुलून वंशातल्या हेलोनचा मुलगा अलीयाब+ १० योसेफच्या मुलांपैकी: एफ्राईम+ वंशातल्या अम्मीहूदचा मुलगा अलीशामा आणि मनश्शे वंशातल्या पदाहसुरचा मुलगा गमलियेल; ११ बन्यामीन वंशातल्या गिदोनीचा मुलगा अबीदान;+ १२ दान वंशातल्या अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर;+ १३ आशेर वंशातल्या आक्रानचा मुलगा पगीयेल;+ १४ गाद वंशातल्या दगुवेलचा मुलगा एल्यासाप;+ १५ नफताली वंशातल्या एनानचा मुलगा अहीरा;+ १६ सर्व इस्राएली लोकांपैकी ज्यांना बोलवण्यात आलं आहे, त्यांची ही नावं आहेत. हे पुरुष आपापल्या वाडवडिलांच्या वंशांचे प्रधान+ आणि इस्राएली लोकांच्या हजारांच्या गटांचे प्रमुख आहेत.”+
१७ तेव्हा मोशे आणि अहरोन यांनी, नावाने निवडण्यात आलेल्या या पुरुषांना आपल्यासोबत घेतलं. १८ दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी सर्व इस्राएली लोकांना एकत्र केलं. मग त्यांनी २० वर्षं व त्यापेक्षा जास्त वयाच्या+ पुरुषांची त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे एकेक करून नोंदणी केली. १९ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच, त्याने सीनायच्या ओसाड रानात त्यांची नोंदणी केली.+
२० रऊबेनच्या मुलांची, म्हणजेच इस्राएलच्या प्रथमपुत्राच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. २१ रऊबेनच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ४६,५०० इतकी होती.
२२ शिमोनच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. २३ शिमोनच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ५९,३०० इतकी होती.
२४ गादच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. २५ गादच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ४५,६५० इतकी होती.
२६ यहूदाच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. २७ यहूदाच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ७४,६०० इतकी होती.
२८ इस्साखारच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. २९ इस्साखारच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ५४,४०० इतकी होती.
३० जबुलूनच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. ३१ जबुलूनच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ५७,४०० इतकी होती.
३२ एफ्राईमपासून झालेल्या, योसेफच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. ३३ एफ्राईमच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ४०,५०० इतकी होती.
३४ मनश्शेच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. ३५ मनश्शेच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ३२,२०० इतकी होती.
३६ बन्यामीनच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. ३७ बन्यामीनच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ३५,४०० इतकी होती.
३८ दानच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. ३९ दानच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ६२,७०० इतकी होती.
४० आशेरच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. ४१ आशेरच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ४१,५०० इतकी होती.
४२ नफतालीच्या वंशजांची+ नोंदणी त्यांच्या नावाप्रमाणे, घराण्याप्रमाणे आणि कुळांप्रमाणे करण्यात आली. सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची एकेक करून मोजणी करण्यात आली. ४३ नफतालीच्या वंशातून नोंदणी केलेल्यांची संख्या ५३,४०० इतकी होती.
४४ मोशे, अहरोन, तसंच आपापल्या कुळाचे प्रमुख असलेले इस्राएलचे १२ प्रधान यांनी मिळून या सर्वांची नोंदणी केली. ४५ इस्राएलमध्ये सैन्यात भरती होण्यासारख्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची त्यांच्या कुळांप्रमाणे नोंदणी करण्यात आली. ४६ नोंदणी करण्यात आलेल्यांची एकूण संख्या ६,०३,५५० इतकी होती.+
४७ पण लेव्यांची+ त्यांच्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे इतरांसोबत नोंदणी करण्यात आली नाही.+ ४८ यहोवाने मोशेला सांगितलं: ४९ “लेवीच्या वंशजांची नोंदणी करू नकोस आणि इतर इस्राएली लोकांमध्ये त्यांची मोजणी करू नकोस.+ ५० तू लेव्यांना साक्षपेटीचा+ मंडप, तसंच त्याची सगळी भांडी आणि त्याचं इतर सर्व सामान यांवर नियुक्त कर.+ ते उपासना मंडप आणि त्याची सगळी भांडी उचलून नेण्याचं काम करतील.+ ते उपासना मंडपात सेवा करतील+ आणि त्याच्या चारही बाजूला त्यांचे तंबू असतील.+ ५१ जेव्हा जेव्हा उपासना मंडप दुसरीकडे हलवायचा असेल, तेव्हा तेव्हा लेव्यांनी तो काढावा;+ आणि जेव्हा तो पुन्हा उभा करायचा असेल, तेव्हा लेव्यांनीच तो उभा करावा. दुसरा कोणीही* उपासना मंडपाच्या जवळ आला, तर त्याला ठार मारलं जावं.+
५२ प्रत्येक इस्राएली माणसाने त्याला नेमून दिलेल्या छावणीतच आपला तंबू उभा करावा. प्रत्येक माणसाला त्याच्या तीन वंशांच्या गटाच्या*+ तुकड्यांप्रमाणे* छावणी नेमून दिली जावी. ५३ आणि लेव्यांनी साक्षपेटीच्या मंडपाच्या चारही बाजूला आपले तंबू ठोकावेत, म्हणजे इस्राएली लोकांविरुद्ध देवाचा क्रोध भडकणार नाही.+ साक्षपेटीच्या मंडपाची काळजी घेण्याची* जबाबदारी लेव्यांची असेल.”+
५४ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी या सर्व गोष्टी केल्या. त्यांनी अगदी तसंच केलं.