यहेज्केल
४८ “देशाच्या जमिनीचे हिस्से वंशांच्या नावांप्रमाणे उत्तरेकडून असे आहेत: दानच्या हिश्शाचा प्रदेश,+ हेथलोनच्या रस्त्याने लेबो-हमाथपर्यंत,*+ आणि पुढे दिमिष्कच्या उत्तरेकडच्या सीमेला लागून असलेल्या हसर-एनानपर्यंत आहे. दानचा हा प्रेदश हमाथच्या+ शेजारी आहे, आणि देशाच्या पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. २ आशेरच्या हिश्शाचा प्रदेश+ दानच्या सीमेला लागून आहे; तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. ३ नफतालीच्या हिश्शाचा प्रदेश+ आशेरच्या सीमेला लागून आहे; तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. ४ मनश्शेच्या हिश्शाचा प्रदेश+ नफतालीच्या सीमेला लागून आहे; तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. ५ एफ्राईमच्या हिश्शाचा प्रदेश मनश्शेच्या सीमेला लागून आहे;+ तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. ६ रऊबेनच्या हिश्शाचा प्रदेश एफ्राईमच्या सीमेला लागून आहे;+ तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. ७ यहूदाच्या हिश्शाचा प्रदेश रऊबेनच्या सीमेला लागून आहे;+ तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. ८ तुम्ही यहूदाच्या सीमेला लागून असलेल्या आणि पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेल्या जमिनीतून काही भाग दान म्हणून वेगळा काढा. त्या भागाची लांबी २५,००० हात* असावी,+ आणि ती पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत इतर वंशांच्या हिश्शाच्या लांबीइतकी असावी. त्या भागाच्या मधोमध मंदिर असेल.
९ तुम्ही यहोवासाठी दान म्हणून वेगळ्या काढलेल्या जमिनीची लांबी २५,००० हात आणि रुंदी १०,००० हात असेल. १० हा भाग याजकांसाठी पवित्र दान म्हणून असेल.+ तो उत्तरेकडे २५,००० हात, पश्चिमेकडे १०,००० हात, दक्षिणेकडे २५,००० हात आणि पूर्वेकडे १०,००० हात असेल. या भागाच्या मधोमध यहोवाचं मंदिर असेल. ११ हा भाग सादोकच्या वंशजांतल्या पवित्र केलेल्या याजकांसाठी असेल.+ कारण, इस्राएली लोक आणि लेवी जेव्हा माझ्यापासून भरकटले होते, तेव्हा ते याजक भरकटले नाहीत आणि त्यांनी माझ्याप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.+ १२ तुम्ही दान दिलेल्या जमिनीचा जो भाग परमपवित्र म्हणून वेगळा काढाल, त्यातला काही भाग त्यांना मिळेल. तो भाग लेव्यांच्या जमिनीच्या सीमेला लागून असेल.
१३ याजकांच्या प्रदेशाला लागूनच, लेव्यांना २५,००० हात लांब आणि १०,००० हात रुंद प्रदेश मिळेल. (त्याची एकूण लांबी २५,००० हात आणि रुंदी १०,००० हात असेल.) १४ जमिनीच्या या सगळ्यात उत्तम भागातला कुठलाही भाग लेव्यांनी विकू नये, त्याची अदलाबदल करू नये किंवा तो दुसऱ्याला देऊ नये. कारण, हा भाग यहोवासाठी पवित्र आहे.
१५ जमिनीचा जो उरलेला भाग २५,००० हात लांबीच्या सीमेला लागून आहे, त्याची रुंदी ५,००० हात आहे. तो शहराचा सार्वजनिक भाग असून+ त्याचा वापर घरांसाठी आणि कुरणांसाठी केला जावा. या भागाच्या मधोमध शहर असेल.+ १६ शहराचं मोजमाप असं असेल: शहराची उत्तरेकडची सीमा ४,५०० हात, दक्षिणेकडची ४,५०० हात, पूर्वेकडची ४,५०० हात आणि पश्चिमेकडची सीमा ४,५०० हात असेल. १७ शहरात कुरणांसाठी असलेली जागा उत्तरेकडे २५० हात, दक्षिणेकडे २५० हात, पूर्वेकडे २५० हात आणि पश्चिमेकडे २५० हात असेल.
१८ उरलेल्या भागातला बाकीचा भाग, पवित्र दानाच्या जमिनीला समांतर असेल;+ तो पूर्वेला १०,००० हात आणि पश्चिमेला १०,००० हात असेल. उरलेला भाग पवित्र दानाच्या जमिनीला समांतर असून तिथे जे काही पिकवलं जाईल, ते शहराची सेवा करणाऱ्यांसाठी असेल. १९ इस्राएलच्या वंशातले जे लोक शहराची सेवा करतात, ते इथे शेतीवाडी करतील.+
२० दान केलेला जमिनीचा संपूर्ण भाग चौरस असून त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी २५,००० हात असेल. शहरासोबत तुम्ही हा भाग पवित्र दान म्हणून वेगळा काढावा.
२१ पवित्र दानाच्या जमिनीच्या दोन्ही बाजूंना, तसंच शहराच्या दोन्ही बाजूंना जमिनीचा जो भाग उरेल तो प्रधानासाठी असेल.+ हा भाग, पवित्र दानाच्या जमिनीच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे असलेल्या २५,००० हात लांबीच्या सीमांना लागून असेल. तो त्याच्या शेजारच्या वंशांच्या भागांना समांतर असून प्रधानासाठी असेल. त्या भागाच्या मधोमध, पवित्र दानाची जमीन आणि मंदिर असेल.
२२ लेव्यांची जमीन आणि शहराची जमीन प्रधानाच्या भागाच्या मधे असेल. प्रधानाचा भाग यहूदाच्या आणि बन्यामीनच्या सीमांच्या मधे असेल.+
२३ उरलेल्या वंशांच्या जमिनीचे हिस्से असे आहेत: बन्यामीनचा हिस्सा देशाच्या पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत आहे.+ २४ शिमोनच्या हिश्शाचा प्रदेश बन्यामीनच्या सीमेला लागून आहे;+ तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. २५ इस्साखारच्या हिश्शाचा प्रदेश+ शिमोनच्या सीमेला लागून आहे; तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. २६ जबुलूनच्या हिश्शाचा प्रदेश इस्साखारच्या सीमेला लागून आहे;+ तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे.+ २७ गादच्या हिश्शाचा प्रदेश जबुलूनच्या सीमेला लागून आहे;+ तो पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंत पसरलेला आहे. २८ गादच्या सीमेला लागून असलेली दक्षिणेकडची सीमा, तामारपासून+ मरीबोथ-कादेश+ इथल्या जलाशयांपर्यंत आणि पुढे खोऱ्यापासून*+ महासागरापर्यंत* आहे.
२९ अशा प्रकारे, तुम्ही इस्राएलच्या वंशांना देशाची जमीन वारसा म्हणून वाटून द्यावी+ आणि हेच त्यांचे हिस्से असतील,”+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
३० “शहरात प्रवेश करायचे आणि बाहेर जायचे मार्ग पुढे दिले आहेत. शहराची उत्तरेकडची बाजू ४,५०० हात असेल.+
३१ आणि शहराच्या दरवाजांना इस्राएलच्या वंशांवरून नावं दिली जातील. उत्तरेकडच्या तीन दरवाजांपैकी एक दरवाजा रऊबेनसाठी, एक यहूदासाठी आणि एक लेवीसाठी असेल.
३२ पूर्वेकडची बाजू ४,५०० हात असून तिथे तीन दरवाजे असतील: एक योसेफसाठी, एक बन्यामीनसाठी आणि एक दानसाठी.
३३ दक्षिणेकडची बाजू ४,५०० हात असून तिथे तीन दरवाजे असतील: एक शिमोनसाठी, एक इस्साखारसाठी आणि एक जबुलूनसाठी.
३४ पश्चिमेकडची बाजू ४,५०० हात असून तिथे तीन दरवाजे असतील: एक गादसाठी, एक आशेरसाठी आणि एक नफतालीसाठी.
३५ अशा प्रकारे, शहराच्या चारही बाजूंच्या सीमांचं एकूण माप १८,००० हात असेल. आणि त्या दिवसापासून त्या शहराचं नाव ‘यहोवा तिथे आहे’ असं असेल.”+