२ शमुवेल
११ वर्षाच्या सुरुवातीला,* जेव्हा राजे युद्धाच्या मोहिमांवर जायचे तेव्हा दावीदने यवाबला, त्याच्या सेवकांना आणि इस्राएलच्या संपूर्ण सैन्याला अम्मोनी लोकांचा नाश करायला पाठवलं. त्यांनी जाऊन राब्बा+ शहराला वेढा घातला. पण दावीद मात्र यरुशलेममध्येच राहिला.+
२ एकदा, संध्याकाळच्या वेळी* दावीद आपल्या पलंगावरून उठला आणि राजमहालाच्या छतावर फिरू लागला. तिथून त्याने एका स्त्रीला अंघोळ करताना पाहिलं. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. ३ दावीदने मग तिची चौकशी करायला एका सेवकाला पाठवलं. तेव्हा त्याने येऊन दावीदला सांगितलं: “ती अलीयमची मुलगी+ आणि उरीया+ हित्ती+ याची बायको बथशेबा+ आहे.” ४ मग दावीदने तिला बोलावून आणण्यासाठी आपल्या काही माणसांना पाठवलं.+ ती स्त्री त्याच्याकडे आली तेव्हा त्याने तिच्याशी संबंध ठेवले.+ (आपली अशुद्धता* दूर करण्यासाठी ती स्वतःला शुद्ध करत असताना हे घडलं.)+ त्यानंतर ती स्त्री आपल्या घरी निघून गेली.
५ पुढे त्या स्त्रीला दिवस गेले आणि तिने दावीदला असा निरोप पाठवला: “मी गरोदर आहे.” ६ तेव्हा दावीदने यवाबला संदेश पाठवला: “उरीया हित्तीला माझ्याकडे पाठव.” म्हणून यवाबने उरीयाला दावीदकडे पाठवलं. ७ उरीया आला तेव्हा दावीदने त्याला यवाब व त्याचे सैनिक यांच्याविषयी विचारलं आणि युद्धाबद्दल चौकशी केली. ८ दावीद मग उरीयाला म्हणाला: “आता आपल्या घरी जा आणि आराम कर.” उरीया जेव्हा राजमहालातून बाहेर पडला, तेव्हा राजाकडून त्याला भेट* पाठवण्यात आली. ९ पण उरीया आपल्या घरी गेला नाही. तो आपल्या प्रभूच्या इतर सेवकांसोबत राजमहालाच्या दरवाजाजवळच झोपला. १० “उरीया आपल्या घरी गेला नाही,” असं दावीदला सांगण्यात आलं. तेव्हा तो उरीयाला म्हणाला: “तू नुकताच प्रवासाहून आला आहेस ना? मग तू घरी का गेला नाहीस?” ११ त्यावर उरीया दावीदला म्हणाला: “तिकडे देवाच्या कराराची पेटी+ आणि इस्राएलची व यहूदाची माणसं तंबूंत राहत आहेत; माझे प्रभू यवाब आणि माझ्या प्रभूचे सेवक हे सगळे खुल्या मैदानात तळ ठोकून आहेत. मग अशा वेळी मी खाणंपिणं करायला आणि बायकोसोबत झोपायला घरी कसं जाऊ शकतो?+ तुमची, तुमच्या जिवाची शपथ, मी असं मुळीच करणार नाही!”
१२ मग दावीद उरीयाला म्हणाला: “आजसुद्धा इथेच राहा. मग उद्या मी तुला पाठवून देईन.” म्हणून त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीही उरीया यरुशलेममध्येच राहिला. १३ दावीदने मग त्याला आपल्यासोबत खाणंपिणं करायला बोलावून घेतलं. त्याने त्याला दारू पाजून धुंद केलं. मग संध्याकाळ झाली तेव्हा उरीया बाहेर पडला आणि आपल्या बिछान्यावर आपल्या प्रभूच्या सेवकांजवळ जाऊन झोपला; पण तो आपल्या घरी गेला नाही. १४ सकाळी दावीदने यवाबला एक पत्र लिहिलं आणि ते उरीयाच्या हाती पाठवलं. १५ पत्रात त्याने असं लिहिलं: “युद्धभूमीवर जिथे भयंकर युद्ध चालू असेल तिथे अगदी समोर उरीयाला उभं करा. मग तिथून मागे हटा, म्हणजे उरीयावर वार होऊन तो मारला जाईल.”+
१६ यवाब त्या शहरावर बारीक लक्ष ठेवून होता, आणि शूर योद्धे कोणत्या ठिकाणी तैनात आहेत हे त्याला चांगलं माहीत होतं. म्हणून त्याने उरीयाला त्या ठिकाणी तैनात केलं. १७ शहरातल्या माणसांनी बाहेर येऊन यवाबशी लढाई केली, तेव्हा दावीदचे काही सेवक मारले गेले; त्यांच्यात उरीया हित्ती हासुद्धा होता.+ १८ यवाबने मग दावीदला युद्धाची सगळी बातमी कळवली. १९ त्याने निरोप घेऊन जाणाऱ्या दूताला अशी सूचना दिली: “राजाला युद्धाबद्दलची सगळी माहिती दिल्यावर, २० राजा कदाचित संतापेल आणि तुला म्हणेल, ‘युद्ध करायला तुम्हाला शहराच्या इतक्या जवळ जायची काय गरज होती? ते लोक भिंतीवरून तुमच्यावर बाण सोडतील हे तुम्हाला माहीत नव्हतं का? २१ यरुब्बेशेथचा*+ मुलगा अबीमलेख याला कोणी मारलं?+ एका स्त्रीने तेबेसच्या तटावरून त्याच्यावर जात्याचा वरचा दगड फेकून त्याला मारून टाकलं की नाही? मग तुम्ही कशाला तटाच्या इतक्या जवळ गेलात?’ तेव्हा तू असं म्हण: ‘तुमचा सेवक उरीया हित्ती हासुद्धा मारला गेला.’”
२२ म्हणून तो दूत दावीदकडे गेला, आणि यवाबने त्याला जे काही सांगायला पाठवलं होतं ते सगळं त्याने त्याला सांगितलं. २३ मग तो दूत दावीदला म्हणाला: “शत्रू आमच्यावर प्रबळ ठरले आणि त्यांनी बाहेर मैदानात येऊन आमच्यावर हल्ला केला. पण आम्ही त्यांचा सामना करून त्यांना परत शहराच्या दरवाजापर्यंत रेटलं. २४ आणि तिरंदाजांनी शहराच्या तटावरून तुमच्या सेवकांवर बाण सोडले, तेव्हा राजाचे काही सेवक मारले गेले; त्यात तुमचा सेवक उरीया हित्तीसुद्धा मारला गेला.”+ २५ तेव्हा दावीद त्या दूताला म्हणाला: “यवाबला म्हण: ‘या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नकोस. कारण तलवार कधीही भेदभाव करत नाही, ती कोणाचाही जीव घेते. तेव्हा शहरावर आणखी जोरदार हल्ला कर आणि ते काबीज कर.’+ असं म्हणून यवाबला धीर दे.”
२६ आपल्या नवऱ्याचा मृत्यू झालाय हे ऐकून उरीयाची बायको त्याच्यासाठी शोक करू लागली. २७ तिचा शोक करण्याचा काळ संपला तेव्हा दावीदने लगेच माणसं पाठवून तिला आपल्या घरी आणलं. ती दावीदची बायको झाली+ आणि तिने त्याच्या मुलाला जन्म दिला. पण दावीदने जे काही केलं होतं ते यहोवाच्या नजरेत फार वाईट होतं.+