यहेज्केल
२६ मग ११ व्या वर्षी, महिन्याच्या पहिल्या दिवशी मला यहोवाकडून एक संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला! यरुशलेमबद्दल सोर नगरी असं म्हणाली:+ ‘बरं झालं! राष्ट्रांचं प्रवेशद्वार मोडण्यात आलं.+ यरुशलेम नगरी उद्ध्वस्त झाली. म्हणून आता सगळं काही माझ्याकडे येईल आणि मी श्रीमंत होईन.’ ३ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘हे सोर! बघ, मी तुझ्या विरोधात उठलोय. समुद्रात जशा मोठ्या लाटा उठतात, तसं मी पुष्कळ राष्ट्रांना तुझ्याविरुद्ध उठवीन. ४ ती राष्ट्रं येतील आणि तुझ्या भिंती पाडून टाकतील. ते तुझे बुरूज जमीनदोस्त करतील.+ मी तुझ्यावरची माती खरडून काढीन आणि तुला उघडा, चकाकणारा खडक करून टाकीन. ५ तू समुद्रातल्या अशा ठिकाणासारखी होशील जिथे मासेमारीचं जाळं सुकवलं जातं.’+
‘कारण मी स्वतः हे बोललोय,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. ‘तू राष्ट्रांसाठी लुटीचा माल बनशील. ६ आणि तुझ्या खेड्यापाड्यातल्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची* तलवारीने कत्तल केली जाईल. मग लोकांना कळून येईल, की मी यहोवा आहे.’
७ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘पाहा! मी उत्तरेकडून बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याला सोरच्या विरोधात आणतोय.+ तो राजांचा राजा असून+ त्याच्याकडे पुष्कळ घोडे,+ युद्धाचे रथ,+ घोडेस्वार आणि अफाट सैन्य आहे. ८ खेड्यापाड्यातल्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या तुझ्या लोकांची तो तलवारीने कत्तल करेल. तुला वेढा घालण्यासाठी तो तुझ्याभोवती मोठी भिंत उभारेल, दगड-मातीचा ढिगारा रचेल आणि तुझ्याविरुद्ध ढालींची मोठी भिंत उभी करेल. ९ तट पाडणाऱ्या यंत्रांनी तो तुझ्या भिंतींना जोरजोराने धडका मारेल आणि आपल्या कुऱ्हाडींनी* तुझे बुरूज पाडून टाकेल. १० त्याच्या घोड्यांची संख्या इतकी अफाट असेल, की त्यांनी उडवलेल्या धुळीने तू झाकली जाशील. सैनिक जसे भिंती तुटलेल्या शहरात धडाधड घुसतात, तसं तो तुझ्या दरवाजातून आत घुसेल. त्या वेळी त्याच्या घोडेस्वारांच्या, युद्ध-रथांच्या आणि त्यांच्या चाकांच्या आवाजाने तुझ्या भिंती हादरून जातील. ११ त्याचे घोडे आपल्या टापांनी तुझे सगळे रस्ते तुडवतील.+ तो तुझ्या लोकांना तलवारीने मारून टाकेल आणि तुझे मोठमोठे खांब जमीनदोस्त करेल. १२ शत्रू तुझी सगळी धनसंपत्ती आणि तुझा सगळा माल लुटतील.+ ते तुझ्या भिंती आणि तुझी सगळी आलिशान घरं पाडून टाकतील. मग ते तुझं लाकडी सामान, तुझे दगड आणि तुझी माती समुद्रात फेकून देतील.’
१३ ‘मी तुझ्या गाण्यांचा आवाज बंद करीन आणि त्यानंतर तुझ्यामध्ये कधीही वीणेचे स्वर ऐकू येणार नाहीत.+ १४ मी तुला उघडा, चकाकणारा खडक करून टाकीन आणि तू अशा ठिकाणासारखी होशील जिथे मासेमारीचं जाळं वाळायला घातलं जातं.+ तू पुन्हा कधीच बांधली जाणार नाहीस, कारण स्वतः मी, यहोवा हे बोललोय,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
१५ सर्वोच्च प्रभू यहोवा सोरला म्हणतो: ‘तू पडशील तेव्हा त्या आवाजाने, मरत असलेल्या लोकांच्या कण्हण्याने आणि तुझ्यामध्ये होणाऱ्या लोकांच्या कत्तलीने द्वीपांचा थरकाप उडणार नाही का?+ १६ समुद्रावरचे सर्व राजकुमार* आपल्या राजासनांवरून खाली येतील आणि आपले सुंदर झगे* आणि भरतकाम केलेली वस्त्रं काढून टाकतील. ते भीतीने थरथर कापतील. ते जमिनीवर बसतील आणि क्षणोक्षणी त्यांचा थरकाप उडेल. ते भयचकित होऊन तुझ्याकडे पाहतील.+ १७ ते तुझ्यासाठी शोकगीत गातील.+ ते तुला म्हणतील:
“हे प्रशंसनीय नगरी! बघ तुझा कसा नाश झालाय!+
समुद्रातून येऊन लोकांनी तुझ्यात वस्ती केली,
तू आणि तुझे लोक समुद्रावर पराक्रम गाजवायचे,+
पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांमध्ये तुम्ही दहशत पसरवायचे!
१८ तू पडशील त्या दिवशी द्वीपांचा थरकाप उडेल,
तुझा नाश होईल तेव्हा समुद्रातली द्वीपं घाबरून जातील.”’+
१९ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मी तुला ओसाड पडलेल्या शहरांसारखं उद्ध्वस्त करीन. तुझ्यावर पाण्याचा जोरदार प्रवाह आणीन आणि तुला खोल पाण्यात बुडवून टाकीन.+ २० मी इतरांना जसं खाली कबरेत आणतो, तसंच मी तुलाही खाली कबरेत आणीन; प्राचीन काळातले मेलेले लोक जिथे आहेत तिथे मी तुला आणीन. मी तुला सगळ्यात खालच्या ठिकाणी राहायला लावीन; प्राचीन काळापासून उद्ध्वस्त अवस्थेत असलेल्या ठिकाणांसोबत आणि जे खाली कबरेत गेलेत त्यांच्यासोबत मी तुला राहायला लावीन;+ म्हणजे तुझ्यात पुन्हा कधीच लोकवस्ती होणार नाही. मग मी जिवंतांच्या देशाचा गौरव करीन.*
२१ मी तुझ्यावर अचानक संकट आणीन आणि तुझं नामोनिशाण मिटवून टाकीन.+ ते तुला शोधतील, पण तू पुन्हा कधीच सापडणार नाहीस,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”