१ राजे
१८ काही काळानंतर, म्हणजे तिसऱ्या वर्षी+ एलीयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: “अहाबकडे जा, कारण मी जमिनीवर पाऊस पाडणार आहे.”+ २ म्हणून मग एलीया अहाबकडे जायला निघाला. त्या वेळी शोमरोनमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता.+
३ इकडे, अहाबने आपल्या राजमहालाची व्यवस्था पाहणाऱ्या ओबद्याला बोलावून घेतलं. (ओबद्या हा यहोवाला फार भिऊन वागायचा. ४ ज्या वेळी ईजबेल+ यहोवाच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, त्या वेळी ओबद्याने एका गुहेत ५० आणि दुसऱ्या गुहेत ५० अशा १०० संदेष्ट्यांना लपवलं होतं आणि त्यांना अन्नपाणी पुरवलं होतं.) ५ मग अहाब ओबद्याला म्हणाला: “जा आणि संपूर्ण देशातले पाण्याचे झरे व ओढे पाहून ये. कदाचित आपल्या घोड्यांसाठी आणि खेचरांसाठी आपल्याला पुरेसं गवत मिळेल, म्हणजे आपली सगळीच जनावरं मरणार नाहीत.” ६ मग कोण कुठल्या प्रदेशातून जाईल हे ठरवून त्यांनी आपसात देश वाटून घेतला. अहाब एका मार्गाने गेला आणि ओबद्या दुसऱ्या मार्गाने गेला.
७ ओबद्या आपल्या मार्गाने जात असताना, एलीया त्याला भेटायला आला. ओबद्याने त्याला लगेच ओळखलं, आणि त्याला दंडवत घालून तो म्हणाला: “माझे प्रभू, तुम्ही एलीयाच आहात ना?”+ ८ त्यावर तो म्हणाला: “हो मीच आहे. जा आणि तुझ्या प्रभूला सांग: ‘एलीया आलाय!’” ९ पण ओबद्या त्याला म्हणाला: “मी असं काय पाप केलंय, म्हणून तुम्ही तुमच्या या सेवकाला अहाबच्या हाती मरायला देत आहात? १० तुमच्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ! असं एकही राज्य किंवा देश नाही जिथे माझ्या प्रभूने तुम्हाला शोधायला माणसं पाठवली नव्हती. आणि ‘तो इथे नाही’ असं म्हणणाऱ्या राज्याला आणि देशाला त्यांनी अशी शपथ घ्यायला लावली, की ‘आम्हाला तो सापडत नाही.’+ ११ आणि आता तुम्ही म्हणत आहात: ‘जा आणि तुझ्या प्रभूला सांग: “एलीया आलाय!”’ १२ मी इथून गेल्यावर यहोवाची पवित्र शक्ती* तुम्हाला कोणत्या ठिकाणी घेऊन जाईल+ माहीत नाही. आणि मी जर अहाबला जाऊन सांगितलं आणि त्यांना तुम्ही सापडले नाहीत, तर ते नक्कीच माझा जीव घेतील. पण तुमचा हा सेवक तर लहानपणापासून यहोवाचं भय बाळगत आलाय. १३ ईजबेल यहोवाच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, त्या काळात मी काय केलं हे माझ्या प्रभूच्या कानावर आलं नाही का? त्या वेळी मी कशा प्रकारे यहोवाच्या १०० संदेष्ट्यांना ५०-५० च्या गटांत गुहांमध्ये लपवलं आणि त्यांना अन्नपाणी पुरवत राहिलो हे तुम्ही ऐकलं नाही का?+ १४ आणि आता तुम्ही म्हणत आहात, की ‘जा आणि तुझ्या प्रभूला सांग: “एलीया आलाय!”’ ते तर नक्कीच मला मारून टाकतील.” १५ पण एलीया म्हणाला: “ज्या जिवंत देवाची मी सेवा करतो,* त्या सैन्यांच्या देवाची, यहोवाची शपथ! आज मी नक्कीच त्याला जाऊन भेटेन.”
१६ म्हणून मग ओबद्या अहाबकडे गेला आणि त्याने ही गोष्ट त्याला सांगितली. तेव्हा अहाब एलीयाला भेटायला निघाला.
१७ एलीयाला पाहताच अहाब म्हणाला: “तूच ना तो, इस्राएलवर भयंकर संकट आणणारा?”
१८ त्यावर तो म्हणाला: “इस्राएलवर संकट आणणारा मी नाही, तर तू आणि तुझ्या वडिलांचं घराणं आहे. कारण तुम्ही यहोवाच्या आज्ञा पाळण्याचं सोडून दिलं आणि बआल दैवतांच्या मागे लागलात.+ १९ आता सर्व इस्राएलला कर्मेल डोंगरावर+ माझ्याकडे बोलव. शिवाय, ईजबेलच्या मेजावर जेवणाऱ्या बआलच्या ४५० संदेष्ट्यांना आणि पूजेच्या खांबाची*+ उपासना करणाऱ्या ४०० संदेष्ट्यांनाही बोलावून घे.” २० म्हणून अहाबने सर्व इस्राएली लोकांना तसा निरोप पाठवला आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमा केलं.
२१ मग एलीया सगळ्या लोकांकडे येऊन म्हणाला: “तुम्ही आणखी किती दिवस दोन मतांमध्ये डगमगत राहणार?*+ जर यहोवा खरा देव असेल, तर त्याची उपासना करा;+ पण जर बआल खरा देव असेल, तर त्याच्यामागे जा!” त्यावर लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. २२ एलीया मग त्या लोकांना म्हणाला: “यहोवाच्या संदेष्ट्यांपैकी मी एकटाच उरलो आहे.+ पण बआल दैवताचे ४५० संदेष्टे आहेत. २३ आता आम्हाला दोन गोऱ्हे* द्या. त्यांपैकी बआलच्या संदेष्ट्यांनी हवा तो गोऱ्हा निवडून घ्यावा आणि त्याचे तुकडे करून ते लाकडांवर ठेवावेत; पण त्यांनी त्याला अग्नी लावू नये. मग मी दुसरा गोऱ्हा तयार करून लाकडांवर ठेवीन; पण त्याला अग्नी लावणार नाही. २४ मग तुम्ही तुमच्या देवाचं नाव घेऊन त्याचा धावा करा,+ आणि मी यहोवाचं नाव घेऊन त्याचा धावा करीन. मग जो देव अग्नी पाठवून उत्तर देईल, तो दाखवून देईल की तोच खरा देव आहे.”+ त्यावर सगळे लोक त्याला म्हणाले: “ठीक आहे.”
२५ एलीया मग बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला: “तुम्ही संख्येने जास्त आहात. म्हणून आधी तुम्ही गोऱ्हा निवडून तयार करा. मग तुमच्या देवाच्या नावाचा धावा करा; पण बलिदानाला अग्नी लावू नका.” २६ म्हणून त्यांनी एक गोऱ्हा निवडला आणि तो तयार केला. मग सकाळपासून अगदी दुपारपर्यंत बआलच्या नावाचा धावा करत ते असं म्हणत राहिले: “हे बआल! आमचं ऐक!” पण कोणताही आवाज आला नाही, किंवा कोणीही उत्तर दिलं नाही.+ त्यांनी जी वेदी बांधली होती तिच्याभोवती ते उड्या मारत राहिले व नाचत राहिले. २७ मग दुपारच्या वेळी एलीया त्यांची थट्टा करत म्हणू लागला: “आणखी मोठ्याने ओरडून त्याचा धावा करा! देव आहे ना तो!+ कदाचित तो विचारांत मग्न असेल, किंवा शौचाला गेला असेल.* किंवा मग तो गाढ झोपेत असेल; कोणीतरी त्याला जागं केलं पाहिजे!” २८ ते मोठमोठ्याने ओरडून धावा करत होते आणि आपल्या प्रथेप्रमाणे अंगावर खंजिरांनी आणि भाल्यांनी वार करून घेत होते; रक्तबंबाळ होईपर्यंत ते असं करत राहिले. २९ दुपार टळून संध्याकाळी अन्नार्पणाची वेळ झाली, तरी ते वेड्यासारखं वागत राहिले.* पण कोणताही आवाज आला नाही, किंवा कोणीही उत्तर दिलं नाही; त्यांच्याकडे लक्ष देणारा कोणीही नव्हता.+
३० मग एलीया सर्व लोकांना म्हणाला: “माझ्याकडे या.” म्हणून सगळे लोक त्याच्याकडे गेले. मग यहोवाची जी वेदी पाडण्यात आली होती ती त्याने दुरुस्त केली.+ ३१ आणि, “तुझं नाव इस्राएल असेल” असं यहोवाने ज्याला वचन दिलं होतं,+ त्या याकोबच्या मुलांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे एलीयाने १२ दगड घेतले. ३२ त्या दगडांपासून त्याने यहोवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी एक वेदी बांधली.+ मग त्या वेदीभोवती त्याने एक मोठा खड्डा खोदला; दोन सेया मापं* बियांची पेरणी करायला जमिनीचा जितका तुकडा लागतो, तितका मोठा तो खड्डा होता. ३३ त्यानंतर त्याने वेदीवर लाकडं रचली. मग गोऱ्हा कापून त्याचे तुकडे लाकडांवर ठेवले.+ नंतर तो म्हणाला: “चार मोठी मडकी भरून पाणी आणा, आणि ते होमार्पणावर आणि लाकडांवर ओता.” ३४ मग तो म्हणाला: “पुन्हा तसंच करा.” तेव्हा त्यांनी तसंच केलं. तो परत त्यांना म्हणाला: “आता तिसऱ्यांदा तसंच करा.” म्हणून तिसऱ्यांदाही त्यांनी तसंच केलं. ३५ तेव्हा ते पाणी वेदीच्या चारही बाजूंनी वाहू लागलं; शिवाय त्याने तो खड्डाही पाण्याने भरून घेतला.
३६ मग संध्याकाळी अन्नार्पण वाहण्याची वेळ झाली,+ तेव्हा एलीया संदेष्टा पुढे आला आणि म्हणाला: “हे यहोवा! अब्राहाम,+ इसहाक आणि इस्राएलच्या देवा!+ आज दाखवून दे की इस्राएलमध्ये तूच देव आहेस; आणि मी तुझा सेवक आहे व तुझ्या सांगण्यावरूनच मी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत.+ ३७ हे यहोवा! माझं ऐक, मला उत्तर दे! म्हणजे हे यहोवा, तूच खरा देव आहेस आणि तूच या लोकांची मनं आपल्याकडे वळवत आहेस हे या लोकांना कळेल.”+
३८ तेव्हा यहोवाकडून अग्नी उतरला आणि त्याने होमार्पण, लाकडं, दगड व माती भस्म केली+ आणि खड्ड्यातलं पाणीही आटवून टाकलं.+ ३९ सगळ्या लोकांनी हे पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेच जमिनीवर पडून दंडवत घातला आणि ते म्हणाले: “यहोवाच खरा देव आहे! यहोवाच खरा देव आहे!” ४० मग एलीया त्यांना म्हणाला: “पकडा बआलच्या संदेष्ट्यांना! त्यांच्यापैकी एकालाही निसटून जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी लगेच त्यांना पकडलं. एलीयाने मग त्यांना कीशोनच्या ओढ्याजवळ+ आणून त्यांची कत्तल केली.+
४१ नंतर एलीया अहाबला म्हणाला: “वरती जा आणि खाणंपिणं कर, कारण मुसळधार पावसाचा आवाज ऐकू येतोय.”+ ४२ म्हणून अहाब खाणंपिणं करायला वरती गेला. इकडे, एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला. तिथे तो गुडघ्यांवर बसला आणि त्याने आपलं डोकं गुडघ्यांजवळ नेलं.+ ४३ मग तो आपल्या सेवकाला म्हणाला: “वरती जा, आणि समुद्राकडे नजर टाक.” म्हणून त्याने वरती जाऊन पाहिलं आणि तो म्हणाला: “तिथे काहीच दिसत नाही.” एलीयाने त्याला सात वेळा म्हटलं: “परत जाऊन बघ.” ४४ सातव्या वेळी त्याचा सेवक त्याला म्हणाला: “पाहा! माणसाच्या हाताएवढा लहानसा ढग समुद्रातून वर येताना दिसतोय.” त्यावर एलीया म्हणाला: “जा आणि अहाबला सांग, ‘रथ जोडून खाली जा! नाहीतर मुसळधार पावसामुळे तू अडकून राहशील!’” ४५ यादरम्यान आकाशात काळे ढग जमले, वारा सुटला व जोरदार पाऊस पडू लागला;+ आणि अहाब रथात बसून इज्रेलला+ जाऊ लागला. ४६ पण यहोवाने एलीयाला शक्ती दिली, तेव्हा एलीया आपला झगा कमरेला बांधून इतक्या वेगाने धावू लागला, की तो अहाबच्या पुढे निघून इज्रेलपर्यंत गेला.