२ शमुवेल
१ शौलचा मृत्यू झाला होता. आणि दावीद अमालेकी लोकांना हरवून* सिक्लागमध्ये+ परत आला होता. त्याला तिथे येऊन दोन दिवस झाले होते. २ मग तिसऱ्या दिवशी, शौलच्या छावणीतून एक माणूस तिथे आला. त्याने आपले कपडे फाडले होते आणि डोक्यात धूळ टाकली होती. तो दावीदसमोर आला तेव्हा त्याने जमिनीवर पडून त्याला दंडवत घातला.
३ दावीदने त्याला विचारलं: “तू कुठून आलास?” त्यावर तो म्हणाला: “मी इस्राएलच्या छावणीतून पळून आलोय.” ४ तेव्हा दावीदने त्याला विचारलं: “काय झालं तिकडे? सांग मला.” त्यावर तो म्हणाला: “लोकांनी युद्धातून पळ काढला आणि बरेच लोक मारले गेले. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान हेसुद्धा मारले गेले.”+ ५ मग दावीदने खबर घेऊन आलेल्या त्या तरुण माणसाला विचारलं: “शौलचा आणि योनाथानचा मृत्यू झालाय हे तुला कसं कळलं?” ६ त्यावर त्या तरुणाने म्हटलं: “मी सहजच गिलबोवाच्या+ डोंगरावर फिरत होतो. तेव्हा मी पाहिलं, की शौल आपल्या भाल्याच्या आधाराने उभा आहे, आणि रथांनी व घोडेस्वारांनी त्याला जवळजवळ घेरलंच आहे.+ ७ त्याने मागे वळून पाहिल्यावर त्याला मी दिसलो. त्याने मला बोलावलं तेव्हा मी म्हणालो: ‘मी काय करू तुझ्यासाठी?’ ८ त्याने मला विचारलं: ‘तू कोण आहेस?’ मी म्हणालो: ‘मी अमालेकी+ आहे.’ ९ मग तो म्हणाला: ‘इकडे ये आणि मला मारून टाक. कारण मला असह्य वेदना होत आहेत, तरी माझा जीव काही जात नाही.’ १० म्हणून मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला मारून टाकलं.+ कारण, एवढा जखमी होऊन पडल्यावर तो काही वाचणार नाही हे मला माहीत होतं. मग मी त्याच्या डोक्यावरचा मुकुट आणि हातावरचा बाजूबंद काढून घेतला आणि ते घेऊन मी इथे तुमच्याकडे, माझ्या प्रभूकडे आलो.”
११ हे ऐकून दावीदने दुःखाने आपले कपडे फाडले आणि त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या माणसांनीही तसंच केलं. १२ त्यांनी शौल, त्याचा मुलगा योनाथान, यहोवाचे* लोक आणि इस्राएलचं घराणं+ या सर्वांसाठी संध्याकाळपर्यंत मोठमोठ्याने रडून शोक आणि उपास केला.+ कारण ते सर्व तलवारीने मारले गेले होते.
१३ त्यानंतर, दावीदने खबर घेऊन आलेल्या त्या माणसाला विचारलं: “तू कुठला आहेस?” तो म्हणाला: “मी एका विदेश्याचा, एका अमालेकी माणसाचा मुलगा आहे.” १४ तेव्हा दावीद त्याला म्हणाला: “यहोवाच्या अभिषिक्ताला मारून टाकायला तुला भीती कशी वाटली नाही?”+ १५ मग दावीद आपल्या एका माणसाला बोलावून म्हणाला: “हो पुढे आणि मारून टाक त्याला.” म्हणून त्याने त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकलं.+ १६ दावीद त्याला म्हणाला: “तुझ्या मृत्यूसाठी तूच जबाबदार आहेस.* कारण, ‘यहोवाच्या अभिषिक्ताला मीच मारून टाकलं,’ असं म्हणून तू स्वतःच स्वतःविरुद्ध साक्ष दिलीस.”+
१७ मग दावीदने शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्यासाठी एक शोकगीत गायलं.+ १८ आणि ते शोकगीत यहूदातल्या लोकांना शिकवलं जावं असंही त्याने सांगितलं. “धनुष्य,” असं म्हटलेलं हे शोकगीत याशारच्या पुस्तकात+ लिहिलेलं आहे. ते असं:
१९ “हे इस्राएला! तुझं सौंदर्य तुझ्या उच्च स्थानी मारलं गेलं.+
पराक्रमी शूर कसे मरून पडलेत!
२० गथमध्ये हे सांगू नका;+
अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका.
नाहीतर पलिष्ट्यांच्या मुली हर्षित होतील;
त्या बेसुंती* माणसांच्या मुली आनंदोत्सव करतील.
२१ हे गिलबोवाच्या+ डोंगरांनो,
तुमच्यावर ना दव पडो, ना पाऊस,
ना पवित्र दानांसाठी तुमच्या शेतांत उपज येवो.+
कारण शूरवीरांची ढाल तिथे अशुद्ध झाली;
शौलची ढाल आता तेलाने अभिषिक्त होणार नाही.
२२ शत्रूंचं रक्त सांडल्याशिवाय,
शूरवीरांची चरबी भेदल्याशिवाय,
योनाथानचं धनुष्य परत येत नसे,+
आणि विजय मिळवल्याशिवाय शौलची तलवार म्यानात जात नसे.+
२३ शौल आणि योनाथान,+ आयुष्यभर लोकांचे प्रिय व आवडते* राहिले.
मरतानाही त्यांची ताटातूट झाली नाही.+
२४ हे इस्राएलच्या मुलींनो, शौलसाठी शोक करा,
त्याने तुम्हाला लाल रंगाच्या भरजरी कपड्यांनी सजवलं,
तुमच्या कपड्यांवर त्याने सोन्याचे दागिने घातले.
२५ पाहा, युद्धात पराक्रमी शूर कसे मरून पडलेत!
तुझ्या उच्च स्थानी योनाथान मरून पडलाय!+
२६ योनाथान, माझ्या भावा! तुला गमावल्यामुळे मी अतिशय दुःखी झालोय.
फार प्रिय होतास तू माझ्यासाठी.+
माझ्यावरचं तुझं प्रेम, मला स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही अधिक होतं.+
२७ पाहा, पराक्रमी शूर कसे मरून पडलेत,
युद्धाची शस्त्रं कशी नष्ट झाली आहेत!”