अध्याय १०
विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
“तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.”—उपदेशक ४:१२.
१, २. (क) नवदांपत्याविषयी आपल्या मनात काही वेळा कोणते प्रश्न येतात व का? (ख) या अध्यायात आपण कोणत्या चार प्रश्नांची चर्चा करणार आहोत?
लग्नकार्यांना जायला तुम्हाला आवडते का? अनेकांना आवडते, कारण हे सोहळे आनंददायक असतात. नवरा-नवरी छान सजलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यांवरून आनंद ओसंडून वाहत असतो. तो दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा असतो; त्यांच्यापुढे आशा आणि स्वप्नांनी भरलेले भवितव्य असते.
२ तरीपण आज लग्नाबद्दल लोकांच्या मनात पुष्कळ गोंधळ आहे हे आपल्याला कबूल करावे लागेल. एकीकडे आपण नवदांपत्याला उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देतो पण त्याच वेळी आपल्या मनात असे प्रश्न येतात, की ‘यांचा विवाह खरोखरच सुखी होईल का? तो टिकेल का?’ या प्रश्नांची उत्तरे, पती व पत्नी विवाहाविषयी देवाने दिलेल्या सल्ल्यावर भरवसा ठेवून त्याचे पालन करतील किंवा नाही यावर अवलंबून आहेत. (नीतिसूत्रे ३:५, ६) देवाच्या प्रेमात टिकून राहायचे असेल तर पतीपत्नीने देवाने दिलेल्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. आता आपण पुढील चार प्रश्नांची उत्तरे बायबल कसे देते ते पाहणार आहोत: विवाह का करावा? कोणाला जोडीदार म्हणून निवडावे? विवाहासाठी स्वतःला तयार कसे करावे? आणि कोणत्या गोष्टीमुळे एक जोडपे शेवटपर्यंत सुखी राहू शकेल?
विवाह का करावा?
३. क्षुल्लक कारणांसाठी विवाह करणे सुज्ञपणाचे का ठरणार नाही?
३ काहींचे असे म्हणणे आहे, की जोपर्यंत तुम्हाला जीवनात एक जोडीदार मिळत नाही तोपर्यंत तुमचे जीवन आनंदी, समाधानी होत नाही. पण हे मुळीच बरोबर नाही. येशू अविवाहित होता. आणि त्याने अविवाहितपणा एक देणगी आहे असे म्हटले व जे अविवाहित राहू शकतात त्यांना त्याने तसे राहण्याचे उत्तेजन दिले. (मत्तय १९:११, १२) प्रेषित पौलाने देखील अविवाहितपणाच्या फायद्यांची चर्चा केली होती. (१ करिंथकर ७:३२-३८) पण येशू किंवा पौल यांनी, कोणी लग्न करू नये असा नियम बनवला नाही. उलट, ‘लग्न करण्यास मनाई’ करणारी शिकवण ‘भुतांच्या शिक्षणाचा’ भाग आहे. (१ तीमथ्य ४:१-३) परंतु जर कोणी अविवाहित राहिला तर तो यहोवाची सेवा अडथळ्यांविना करू शकतो. यास्तव, इतरांच्या दबावामुळे किंवा इतर क्षुल्लक कारणांसाठी जर कोणी विवाह करत असेल तर ते सुज्ञपणाचे ठरणार नाही.
४. उत्तम विवाहामुळे मुलांच्या पालनपोषणासाठी स्थिर वातावरण कसे निर्माण होते?
४ परंतु, विवाह करण्याकरता काही ठोस कारणे आहेत का? होय आहेत. विवाह देखील आपल्या प्रेमळ देवाकडून एक देणगी आहे. (उत्पत्ति २:१८) त्यामुळे विवाहातही काही फायदे आहेत आणि यांमुळे आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. जसे की, उत्तम विवाह कौटुंबिक जीवनाचा भक्कम पाया ठरू शकतो. मुलांना वाढण्यासाठी स्थिर वातावरणाची गरज आहे. तेथे पालक त्यांना प्रेम, शिस्त व मार्गदर्शन देऊ शकतात. (स्तोत्र १२७:३; इफिसकर ६:१-४) पण, मुलांचे पालन पोषण हेच फक्त विवाहाचे एकमेव कारण नाही.
५, ६. (क) उपदेशक ४:९-१२ नुसार घनिष्ठ मैत्रीचे काही व्यावहारिक फायदे कोणते आहेत? (ख) एक विवाह तीन पदरी दोरीप्रमाणे कसा होऊ शकतो?
५ या अध्यायाच्या मुख्य शास्त्रवचनाचा आणि त्याच्या मागच्या पुढच्या संदर्भाचा जरा विचार करा. “एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यांस ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करिता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.”—उपदेशक ४:९-१२.
६ हे शास्त्रवचन प्रामुख्याने मैत्रीच्या बाबतीत लागू होते. पण विवाहसुद्धा दोन व्यक्तींमधील घनिष्ठ मैत्रीच नाही का? शास्त्रवचनात सांगितल्याप्रमाणे या जवळिकीमुळे एखाद्या जोडप्याला मदत, सांत्वन व संरक्षण मिळते. पतीपत्नीच्या नात्यात आणखी एका गोष्टीची भर पडते तेव्हा त्यांचे विवाह बंधन मजबूत बनते. वचनात सांगितले आहे तसे, दोन पदरी दोरी सहज तुटू शकते. पण दोरी जर तीन पदरी व एकमेकांत गुंफलेली असेल तर ती सहजासहजी तुटत नाही. पती व पत्नी दोघे मिळून जेव्हा यहोवाला संतुष्ट करण्याला पहिले स्थान देतात तेव्हा त्यांचा विवाह हा त्या तीन पदरी दोरीप्रमाणे बनतो. पती व पत्नी हे दोघेही जेव्हा यहोवाची उपासना करतात तेव्हा त्यांचा विवाह मजबूत बनतो.
७, ८. (क) मनात लैंगिक इच्छा तीव्र होतात तेव्हा त्यांवर नियंत्रण करण्यासाठी पौलाने अविवाहित ख्रिश्चनांना कोणता सल्ला दिला? (ख) विवाहाबद्दल कोणता व्यावहारिक दृष्टिकोन बाळगण्यास बायबल आपल्याला मदत करते?
७ केवळ विवाहातच लैंगिक इच्छा योग्यरीत्या तृप्त केल्या जाऊ शकतात. वैवाहिक जोडप्यातील लैंगिक संबंधांमुळे खरा आनंद मिळू शकतो. (नीतिसूत्रे ५:१८) लैंगिक भावना तीव्र असतात तो ऐन तारुण्याचा काळ ओसरून गेल्यावरही एखाद्या अविवाहित व्यक्तीच्या मनात तीव्र लैंगिक इच्छा निर्माण होऊ शकतात. या इच्छांवर तिने नियंत्रण केले नाही तर तिच्या हातून अशुद्ध किंवा अनुचित वर्तन घडू शकते. म्हणून पौल अविवाहित लोकांसाठी हा सल्ला लिहिण्यास प्रेरित झाला होता: “जर त्यांस संयम करिता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.”—१ करिंथकर ७:९, ३६; याकोब १:१५.
८ एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कारणास्तव लग्न केले तरी त्याने अथवा तिने व्यावहारिक असले पाहिजे. पौलाने म्हटले, की लग्न करणाऱ्यांना “हालअपेष्टा भोगाव्या लागतील.” (१ करिंथकर ७:२८) लग्न झालेल्या लोकांसमोर अशा समस्या येतात ज्या लग्न न झालेल्यांना येत नाहीत. पण, समजा तुम्ही लग्न करायचे ठरवता तेव्हा समस्यांचे प्रमाण कमी करून जास्तीतजास्त आनंद कसा मिळवू शकाल? एक मार्ग म्हणजे, योग्य जोडीदार निवडण्याद्वारे.
कोणाला जोडीदार म्हणून निवडावे?
९, १०. (क) सत्यात नसलेल्या लोकांबरोबर विवाह करण्याचे धोके समजावून सांगण्यासाठी पौलाने कोणते उदाहरण दिले? (ख) सत्यात नसलेल्यांबरोबर विवाह न करण्याविषयी देवाने दिलेल्या सल्ल्याकडे जे दुर्लक्ष करतात त्यांना कोणते परिणाम भोगावे लागतात?
९ पौलाला एक महत्त्वाचे तत्त्व लिहिण्याची प्रेरणा झाली होती, ज्याचा अवलंब आपण जोडीदाराची निवड करताना करू शकतो: “विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.” (२ करिंथकर ६:१४) दोन प्राणी जे आकाराने व शक्तीने एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत त्यांना जर नांगराला बांधले तर दोघांनाही त्रास होईल. विवाहाच्या बाबतीतही असेच आहे. यहोवाची उपासना करणाऱ्याचे लग्न, उपासना न करणाऱ्याशी झाले तर त्यांच्या विवाहात सतत खटके उडत राहतील. एका जोडीदाराला यहोवाच्या प्रेमात राहण्याची इच्छा असेल पण दुसऱ्याला या गोष्टीचे महत्त्व कळणार नाही. जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे याबाबतीत त्यांचे एकमत होणार नाही व यामुळे त्यांच्या विवाहात तणाव असेल. म्हणूनच पौलाने ख्रिश्चनांना, “केवळ प्रभूमध्ये लग्न” करा असे आर्जवले.—१ करिंथकर ७:३९.
१० काहीवेळा अविवाहित ख्रिश्चन म्हणतील, की त्यांना सध्या जो एकटेपणा सहन करावा लागतो त्यापेक्षा लग्न करून मोकळे झालेले बरे, मग ते कोणाबरोबरही असो! काही जण तर बायबलचा सल्ला धुडकावून सरळ यहोवाची उपासना न करणांऱ्याबरोबर लग्न करतात. याचेही दुःखद परिणाम होतात. ते अशांबरोबर लग्न करून बसतात ज्यांच्याबरोबर ते जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दलही बोलू शकत नाहीत. आणि यामुळे त्यांना जो एकाकीपणा येतो तो, विवाहाआधी त्यांनी अनुभवलेल्या एकाकीपणापेक्षाही भयंकर असतो. पण असे हजारो अविवाहित ख्रिस्ती बंधूभगिनी आहेत जे विवाहाच्या बाबतीत यहोवाने दिलेल्या सल्ल्यावर भरवसा ठेवतात आणि त्याचे एकनिष्ठपणे पालन करतात. (स्तोत्र ३२:८) एक ना एक दिवशी आपलेही लग्न होईल ही आशा मनात बाळगून ते यहोवा देवाची उपासना करणाऱ्यांपैकी कोणी जोडीदार मिळेपर्यंत अविवाहित राहतात.
११. कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला योग्य जोडीदार निवडण्यास मदत मिळू शकेल? (जोडीदारामध्ये मी कोणते गुण पाहिले पाहिजे? हा चौकोन पाहा.)
११ पण एखादी व्यक्ती यहोवाची उपासना करते म्हणजे ती योग्य जोडीदार आहे, असे म्हणता येत नाही. तुम्हाला जर लग्न करायचे आहे तर असा जोडीदार निवडा ज्याचे व्यक्तिमत्त्व, ज्याची आध्यात्मिक ध्येये तुमच्याशी जुळतात व त्याचेही तुमच्या इतकेच देवावर प्रेम आहे. विश्वासू व बुद्धिमान दासाने याविषयावर पुष्कळ माहिती पुरवली आहे. तेव्हा विवाह यासारखा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी या शास्त्रवचनीय सल्ल्यावर प्रार्थनापूर्वक विचार करा.a—स्तोत्र ११९:१०५.
१२. आज अनेक देशांत विवाहाच्या बाबतीत कोणती पद्धत आहे व बायबलमधील कोणते उदाहरण याबाबतीत मार्गदर्शन देते?
१२ अनेक देशात पालकांनी आपल्या मुलांसाठी जोडीदार निवडण्याची पद्धत आहे. अशा समाजात ही महत्त्वाची निवड करण्याकरता पालकांजवळ जास्त बुद्धी व अनुभव आहे, असे सर्रास समजले जाते. आईवडिलांनी ठरवलेले विवाह, बायबल काळाप्रमाणे सहसा यशस्वी ठरतात. अब्राहामाने आपला मुलगा इसहाक याच्यासाठी बायको शोधून आणण्यासाठी आपल्या सेवकाला पाठवले होते. अब्राहामाचे हे उदाहरण, ज्या देशांत आईवडील आपल्या मुलांचे लग्न जुळवतात त्यांच्याकरता फायदेकारक ठरू शकते. अब्राहामाला, मोठ्या घराण्यातली किंवा समाजात मोठे नाव असलेली मुलगी नको होती. तर त्याला आपल्या मुलासाठी यहोवा देवाची उपासना करणारी बायको हवी होती. अशी मुलगी शोधायला त्याने खूप मेहनत घेतली.b—उत्पत्ति २४:३, ६७.
यशस्वी विवाहासाठी स्वतःला तयार कसे करावे?
१३-१५. (क) नीतिसूत्रे २४:२७ मधील तत्त्व लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणाला कशा प्रकारे मदत करू शकते? (ख) लग्नासाठी स्वतःला तयार करण्यासाठी एक तरुणी काय करू शकते?
१३ तुम्ही जर लग्न करण्याचा खरोखरच विचार करत असाल तर स्वतःला विचारा, ‘मी लग्न करायला खरोखरच तयार आहे का?’ प्रेम, सेक्स, सहजीवन किंवा मुले यांबद्दल तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून नाही. तर, प्रत्येक भावी पतीने व पत्नीने, लग्नानंतर येणाऱ्या विशिष्ट जबाबदाऱ्यांचा विचार केला पाहिजे.
१४ पत्नी शोधणाऱ्या तरुणाने या तत्त्वाचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे: “तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध.” (नीतिसूत्रे २४:२७) या वचनाचा काय अर्थ होतो? हे वचन लिहिले त्या काळात, जर एका मनुष्याला ‘घर बांधायचे’ असेल म्हणजे लग्न करून कुटुंब वाढवायचे असेल तर त्याने आधी स्वतःला हा प्रश्न विचारायचा होता, की ‘माझ्या बायकोची व कालांतराने होणाऱ्या आमच्या मुलांची काळजी घ्यायला मी तयार आहे का?’ त्याला आधी काम करायचे होते, शेती करायची होती किंवा पिकांची काळजी घ्यायची होती. हेच तत्त्व आजही लागू होते. जो मनुष्य लग्न करू इच्छितो त्याने त्याच्यावर येणारी जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे. शारीरिकरीत्या तो जोपर्यंत सुदृढ आहे तोपर्यंत त्याला काम करावे लागेल. बायबलमध्ये म्हटले आहे, की जो मनुष्य आपल्या कुटुंबाच्या शारीरिक, भावनिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण करत नाही तो विश्वास नाकारणाऱ्या माणसापेक्षाही वाईट आहे.—१ तीमथ्य ५:८.
१५ तसेच, लग्न करण्यास तयार असलेल्या स्त्रीने तिच्यावर येणाऱ्या अनेक भारी जबाबदारींसाठी स्वतःला तयार केले पाहिजे. बायबलमध्ये सद्गुणी स्त्रीची प्रशंसा केली आहे कारण तिच्याजवळ, तिच्या पतीला मदत करताना व तिच्या घराण्याची काळजी घेताना लागणारी कौशल्ये व गुण आहेत. (नीतिसूत्रे ३१:१०-३१) जबाबदाऱ्या घेण्याची तयारी नसताना लग्न करणारे स्त्री-पुरुष खरे तर स्वार्थी असतात; आपल्या भावी जोडीदाराला आपण काय देऊ शकतो याचा ते विचार करत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्न करू इच्छिणाऱ्यांनी आपल्या विवाहात देवाच्या तत्त्वांचे पालन करण्यास तयार असले पाहिजे.
१६, १७. लग्नाचा विचार करणाऱ्यांनी शास्त्रवचनातील कोणत्या तत्त्वांवर मनन केले पाहिजे?
१६ लग्नाची तयारी करण्यामध्ये, पती व पत्नी या दोघांना देवाने दिलेल्या भूमिकांवर मनन करणे समाविष्ट आहे. ख्रिस्ती कुटुंबाचा मस्तक बनण्याचा काय अर्थ होतो हे पुरुषाला समजले पाहिजे. मस्तक बनल्याने त्याला जुलूमशहा बनण्याची परवानगी मिळत नाही. तर त्याने मस्तकपण चालवताना येशूचे अनुकरण केले पाहिजे. (इफिसकर ५:२३) तसेच, ख्रिस्ती स्त्रीने पत्नीची सन्मानीय भूमिका समजून घेतली पाहिजे. पतीच्या मस्तकपदाच्या अधीन राहायची तिची तयारी आहे का? (इफिसकर ५:२२) ती तर आधीच यहोवा आणि ख्रिस्त यांच्या अधिकाराच्या अधीन आहे. (१ करिंथकर ११:३) म्हणजे, घरात पतीच्या अधिकाराच्या अधीन राहण्याचा अर्थ एका व्यक्तीच्या अधीन राहणे असा होतो. एका अपरिपूर्ण मनुष्याच्या अधिकाराच्या अधीन राहावे लागते तेव्हा ती सहकार्य व आज्ञाधारकता दाखवेल का? ही गोष्ट तिला पटत नसेल तर तिने लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकावा.
१७ शिवाय, प्रत्येक जोडीदाराने एकमेकांच्या खास गरजा पूर्ण करण्यास तयार असले पाहिजे. (फिलिप्पैकर २:४) पौलाने लिहिले: “तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वत:वर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” देवाच्या प्रेरणेने पौलाला समजून आले, की पुरुषाची एक खास गरज असते. ती म्हणजे, आपली पत्नी आपला गाढ आदर करते ही जाणीव त्याला झाली पाहिजे. आणि स्त्रीची देखील एक खास गरज असते. ती म्हणजे, तिच्या पतीचे तिच्यावर खूप प्रेम आहे ही जाणीव तिला झाली पाहिजे.—इफिसकर ५:२१-३३.
लग्नाच्या इराद्याने केल्या जाणाऱ्या गाठीभेटींच्या वेळी अनेक जोडपी सोबत कोणाला तरी नेतात
१८. लग्नाच्या इराद्याने केलेल्या गाठीभेटींच्या वेळी जोडप्याने संयम का बाळगला पाहिजे?
१८ लग्नाआधीच्या गाठीभेटी हा फक्त मौजमजेचा काळ नसतो. तर या काळात एक पुरुष व स्त्री एकमेकांबरोबर कसे वागायचे ते शिकतात आणि त्यांनी लग्न करणे सुज्ञपणाचे ठरेल किंवा नाही हे पाहतात. या काळात त्यांनी आत्मसंयम बाळगला पाहिजे. एकमेकांच्या जवळ येण्याचा त्यांना तीव्रपणे मोह होऊ शकतो; आणि असे आकर्षण अगदी सर्वसामान्य आहे. पण, या दोघांचे एकमेकांवर खरोखरच प्रेम असेल तर ते असे काहीही करणार नाहीत ज्यामुळे त्यांच्या प्रिय व्यक्तीचा यहोवा देवासोबतचा नातेसंबंध धोक्यात येईल. (१ थेस्सलनीकाकर ४:६) तेव्हा, तुम्ही जर असे एकमेकांना भेटत असाल तर संयम बाळगा. मग तुमचे लग्न झाले किंवा झाले नाही तरी, या गुणाचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल.
एक जोडपे शेवटपर्यंत सुखी कसे राहू शकेल?
१९, २०. विवाहाविषयी आज जगातील लोकांच्या दृष्टिकोनापेक्षा ख्रिश्चनांचा दृष्टिकोन वेगळा का असला पाहिजे? उदाहरण देऊन सांगा.
१९ एक विवाहित जोडपे जर शेवटपर्यंत सुखी राहू इच्छिते तर त्यांनी विवाहातील वचनबद्धतेविषयी योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे. कादंबऱ्यांचा व चित्रपटांचा गोड शेवट विवाहाने झाल्याचे दाखवला जातो. आणि लोकांना असेच पाहायला आवडते. वास्तविक जीवनात मात्र, विवाह हा शेवट नाही तर यहोवाने उद्देशलेल्या चिरकालिक नातेसंबंधाची सुरुवात आहे. (उत्पत्ति २:२४) पण आजच्या जगातील लोकांचा हा दृष्टिकोन नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. काही समाजांमध्ये लोक, लग्नाविषयी बोलताना, “गाठ बांधणे” असा शब्दप्रयोग वापरतात. विवाहाविषयीच्या सर्वसामान्य दृष्टिकोनाला हा शब्दप्रयोग किती अचूकपणे लागू होतो हे कदाचित त्यांना कळत नाही. का कळत नाही? कारण, त्यांच्या मते चांगली गाठ घट्टही बसते व गरज पडल्यास अगदी सहजरित्या सोडवताही येते.
२० आज बहुतेक लोक वैवाहिक बंधनाला तात्पुरते समजतात. त्यांच्या गरजा पूर्ण होतील असा समज करून ते लगेच लग्नाला तयार होतात पण जेव्हा त्यांच्या लग्नात काही समस्या निर्माण होतात तेव्हा ते मोडण्याचीही त्यांची तयारी असते. पण बायबलमध्ये विवाहासारख्या बंधनासाठी दोरी किंवा दोराचे उदाहरण वापरले आहे हे लक्षात ठेवा. समुद्रात जाणाऱ्या जहाजांसाठी बनवले जाणारे दोर, कायम टिकावेत, कितीही मोठे वादळ आले तर त्यात तग धरून राहावेत या हेतूने मजबूत बनवले जातात. तसेच, विवाहसुद्धा टिकून राहण्याकरता बनवण्यात आला आहे. येशूने काय म्हटले होते ते आठवा. “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्तय १९:६) तुम्ही जर लग्न केले तर तुम्ही देखील विवाहाबद्दल हाच दृष्टिकोन बाळगला पाहिजे. या वचनबद्धतेमुळे विवाह एका ओझ्यासमान होतो का? नाही.
२१. पती व पत्नीने एकमेकांविषयी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे व असे करण्यास कोणती गोष्ट त्यांना मदत करेल?
२१ पतीपत्नीने एकमेकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे. प्रत्येकाने जर एकमेकांच्या चांगल्या गुणांवर व प्रयत्नांवर आपले लक्ष केंद्रित केले तर त्यांचे वैवाहिक जीवन आनंददायक व तजेलादायक बनेल. पण, एका अपरिपूर्ण सोबत्याबद्दल असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे वास्तवाशी जुळणारा आहे का? यहोवाच्या बाबतीत पाहता, त्याच्या अपेक्षा कधीच अवास्तविक नसतात; तरीपण आपल्याबद्दल त्याने सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा अशीच आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो. स्तोत्रकर्त्याने असे विचारले होते: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तोत्र १३०:३) पतीपत्नीने एकमेकांबद्दल असाच सकारात्मक व क्षमाक्षील दृष्टिकोन बाळगला पाहिजे.—कलस्सैकर ३:१३.
२२, २३. अब्राहाम व सारा आजच्या विवाहित जोडप्यांसाठी एक उत्तम उदाहरण कसे आहेत?
२२ विवाह जसजसा अनेक वर्षे टिकतो तसतसा तो आनंद व समाधान देतो. बायबल आपल्याला अब्राहाम व सारा यांच्या वैवाहिक जीवनाविषयी सांगते, ते दोघेही म्हातारे झाले होते तरीही त्यांचा विवाह टिकून होता. त्यांच्या वैवाहिक जीवनातही त्यांना अनेक हालअपेष्टांचा व समस्यांचा सामना करावा लागला होता. कदाचित साठीत असलेल्या साराला जेव्हा ऊर देशातील तिचे ऐशोआरामाचे घर सोडून संपूर्ण आयुष्य तंबूत राहावे लागणार हे समजले तेव्हा तिला कसे वाटले असेल याचा विचार करा. तिने तिच्या नवऱ्याच्या मस्तकपदाला अधीनता दाखवली. ती खऱ्या अर्थाने अब्राहामाची सहचारिणी व साहाय्यक होती. त्याचे निर्णय सफल होण्यास तिने त्याला आदरपूर्वक सहकार्य दिले. आणि तिची अधीनता वरवरची नव्हती. अगदी ‘मनातल्या मनातही’ ती त्याला धनी म्हणायची. (उत्पत्ति १८:१२; १ पेत्र ३:६) अब्राहामाबद्दल तिला अंतःकरणापासून आदर वाटत होता.
२३ याचा अर्थ असा होत नाही की अब्राहाम व सारा यांचे प्रत्येक गोष्टीत एकमत होते. एकदा तिने अब्राहामाला एक गोष्ट सुचवली व त्यामुळे त्याला ‘फार वाईट वाटले.’ पण, यहोवाने अब्राहामाला साराचे म्हणणे ऐकावयास सांगितले. यामुळे, संपूर्ण कुटुंबाचे कल्याण झाले. (उत्पत्ति २१:९-१३) आज नवविवाहित जोडपी आणि अनेक वर्षांपासून विवाहित असलेली जोडपी अब्राहाम व साराच्या उदाहरणातून बरेच काही शिकू शकतात.
२४. कोणत्या प्रकारच्या विवाहांमुळे यहोवा देवाचा सन्मान होतो व का?
२४ ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये हजारो आनंदी विवाहित जोडपी आहेत. या विवाहात पत्नी आपल्या पतीचा गाढ आदर करते, पती आपल्या पत्नीवर जिवापाड प्रेम करून तिचा सन्मान करतो आणि ते दोघे मिळून सर्व गोष्टीत यहोवाच्या इच्छेला प्रथम स्थान देतात. तुमचे यंदा कर्तव्य असेल तर आपला जोडीदार सुज्ञपणे निवडा, विवाहासाठी स्वतःला तयार करा आणि यहोवा देवाचा सन्मान होईल असा शांतीमय, प्रेमळ विवाह टिकवून ठेवण्याकरता प्रयत्न करा. असे झाले तर तुमचा विवाह तुम्हाला नक्कीच देवाच्या प्रेमात टिकून राहायला मदत करेल.
a यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाचा अध्याय दोन पाहा.
b काही विश्वासू कुलपित्यांच्या अनेक पत्नी होत्या. यहोवाने बहुपत्नीकत्वाच्या या प्रथेला काही काळ अनुमती दिली. त्याने या प्रथेची सुरुवात केली नाही पण काही नियमांद्वारे त्यावर नियंत्रण केले. पण ख्रिश्चनांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आज यहोवा आपल्या उपासकांमध्ये या प्रथेला अनुमती देत नाही.—मत्तय १९:९; १ तीमथ्य ३:२.