तुमच्या विवाह शपथेप्रमाणे आचरण ठेवणे!
लग्नाचा दिवस हा आनंदाचा दिवस असतो. तो एक गंभीर प्रसंग देखील असतो. वधू आणि वर एक गंभीर वचन देतात ज्याचा परिणाम त्यांच्या उर्वरित जीवनांवर होणार असतो. त्या विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले या गंभीर वचनाचे साक्षीदार असतात, पण यहोवा देव हा सर्वात प्रमुख साक्षीदार आहे.
बायबल, विशिष्ट रीतीरिवाज किंवा खास प्रकाराच्या विवाह समारंभाची अपेक्षा करत नाही. तरीही, विवाहाचा ईश्वरी उगम लक्षात घेता, एका धार्मिक विधीदरम्यान विवाह शपथांद्वारे तो चालीरीतींना अनुसरून यथाशास्त्र करण्यात येतो. काही वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार पुढील विवाह शपथेचा उपयोग करत आहेत: “मी —— , —— माझी/माझा विवाह (पत्नी/पती) म्हणून, देवाच्या विवाह व्यवस्थेप्रमाणे आम्ही दोघेही पृथ्वीवर एकत्र राहू तोपर्यंत ख्रिस्ती (पत्नी/पती) यासाठी पवित्र शास्त्रवचनांमध्ये दिलेल्या ईश्वरी नियमानुरूप प्रेम करण्यास व जतन करण्यास (वधू: व सखोल आदर दाखवण्यास) स्वीकारतो/स्वीकारते.”a
विचार करण्याजोगे काही
तुम्ही विवाह करण्याच्या बेतात असल्यास, लग्नाच्या दिवसाआधी या शपथेच्या गांभिर्याचा आणि अर्थाचा विचार करणे अतिशय मौल्यवान असेल. शलमोन म्हणाला: “बोलण्याची घाई करू नको; देवासमोर कोणताहि उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको.” (उपदेशक ५:२) तुम्ही आधीच विवाहित असल्यास काय? मग, यहोवासमोर तुम्ही दिलेल्या गंभीर वचनाच्या महत्त्वावर मनन केल्याने तुम्हाला लाभ प्राप्त होईल. तुम्ही त्याप्रमाणे आचरण करत आहात का? ख्रिस्ती लोक स्वतःच्या वचनांकडे गांभिर्याने पाहतात. शलमोन पुढे म्हणाला: “जो नवस [शपथ] तू केला असेल त्याची फेड कर. नवस [शपथ] करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोललो असे दिव्यदूतासमोर म्हणू नको.”—उपदेशक ५:४-६.
या विवाह शपथेच्या एकेक वाक्यांशाचा विचार केल्याने, या गंभीर वचनबद्धतेची तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.
“मी — , — . . . स्वीकारतो”: हे या शपथेचे सुरवातीचे शब्द आहेत. लग्न करण्याच्या तुमच्या निर्णयासाठी तुम्ही व्यक्तिगत जबाबदारी स्वीकारता हे यावरून ठळकपणे दाखवले जाते.
ख्रिस्ती व्यवस्थेमध्ये विवाह करण्याचे कोणतेही शास्त्रवचनीय बंधन नाही. येशू ख्रिस्त स्वतः, अविवाहित राहिला आणि ज्यांना सडेपण “स्वीकारता येते” त्यांनी तसेच राहावे अशी त्याने शिफारस केली. (मत्तय १९:१०-१२) दुसऱ्या बाजूला पाहता, येशूचे बहुतेक प्रेषित विवाहित पुरुष होते. (लूक ४:३८; १ करिंथकर ९:५) विवाह करण्याचा निर्णय हा व्यक्तिगत आहे हे स्पष्ट आहे. कोणाही मनुष्याला दुसऱ्या व्यक्तीला विवाह करण्यास बळजबरी करण्याचा शास्त्रवचनीय अधिकार नाही.
यास्तव, विवाह करण्याची निवड करण्यास तुम्ही जबाबदार आहात. संभवतः, तुम्ही ज्याच्याशी विवाह करत आहात त्या व्यक्तीची निवड तुम्हीच केलेली असावी. “मी — , — . . . स्वीकारतो” असे म्हणून तुम्ही विवाहाची शपथ घेता तेव्हा, तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या सद्गुणांसह—पण त्याच्या किंवा तिच्या दुर्गुणांसह देखील स्वीकारता.
कालांतराने, कदाचित, तुमच्या सोबत्याच्या व्यक्तिमत्त्वाचे असे गुण तुम्हासमोर येतील ज्यांचा तुम्ही विचारही केला नव्हता. अधूनमधून नाउमेदी घडेल बायबल म्हणते, “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) म्हणून तुमच्या विवाह सोबत्याशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला अनेक तडजोडी करण्याची आवश्यकता भासेल. हे कठीण असेल, आणि काही वेळा प्रयत्न करणे सोडून द्यावेसे तुम्हाला वाटेल. परंतु, विवाहाची शपथ यहोवाच्या उपस्थितीत घेतली जाते हे लक्षात ठेवा. तो तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करू शकतो.
“माझी/माझा विवाह (पत्नी/पती) म्हणून”: हव्वेचे आदामाशी लग्न करून देण्यात आले त्या अगदी पहिल्या विवाहातच यहोवा देवाने म्हटले, की ‘त्या दोघांनी एकदेह व्हावे.’ (उत्पत्ति २:२४; मत्तय १९:४-६) अशाप्रकारे, दोन मानवांमधील सर्वात जवळचा नातेसंबंध म्हणजे वैवाहिक बंधन होय. विवाह तुम्हाला एक नवीन नात्यात एकवटतो. तुम्ही कोणीतरी तुमची “विवाहित पत्नी” अथवा “विवाहित पती” व्हावा म्हणून तिचा किंवा त्याचा स्वीकार करता. हा संबंध इतर कोणत्याही नातेसंबंधाप्रमाणे नाही. इतर नातेसंबंधांमध्ये ज्या कृतींनी थोडेच नुकसान होते त्याच कृती विवाह व्यवस्थेत तीव्र दुखापत करू शकतात.
उदाहरणार्थ, इफिसकर ४:२६ मध्ये आढळणारा सल्ला पाहा. तेथे बायबल म्हणते: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” कदाचित नातेवाईक व मित्रांसोबत तुमच्या समस्या जितक्या लवकर सोडवल्या पाहिजेत तितक्या लवकर सोडवल्या नसतील. परंतु, तुमचा सोबती इतर कोणताही नातेवाईक किंवा मित्र यांपेक्षा जवळचा आहे. तुमच्या सोबत्याशी समस्या लवकर न सोडवल्याने, तुम्हामधील खास नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो.
तुमचा सोबती आणि तुम्हामधील एखादे दुमत, निरंतर क्रोध किंवा मनःस्तापास कारणीभूत ठरण्यास तुम्ही वाव देता का? गैरसमजुती आणि अस्वस्थ करणाऱ्या परिस्थिती अनेक दिवसांपर्यंत राहतात का? तुमच्या शपथेप्रमाणे आचरण ठेवण्याकरता, अडचणी उद्भवतात तेव्हा तुमच्या सोबत्याशी सलोखा न राखता एकही दिवस जाऊ देऊ नका. याचा अर्थ, क्षमा करणे आणि विसरणे तसेच स्वतःच्या चुका आणि अपराध मान्य करणे असा होतो.—स्तोत्र ५१:५; लूक १७:३, ४.
“प्रेम करण्यास”: होणारा पती त्याच्या वधूला ‘प्रेम व जतन’ करण्याची शपथ घेतो. या प्रेमात ज्यामुळे ते संभवतः एकत्र आले त्या प्रणयाचाही समावेश होतो. परंतु प्रणय केवळ पुरेसा नाही. एखादा ख्रिस्ती त्याच्या किंवा तिच्या सोबत्याला ज्या प्रेमाची शपथ देतो ते गहन आणि विस्तीर्ण आहे.
इफिसकर ५:२५ म्हणते: “पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा.” दोन विरुद्धलिंगी व्यक्तींमधील प्रणयाच्या प्रकारासारखे येशूचे मंडळीविषयीचे प्रेम असू शकत नाही. या शास्त्रवचनात उपयोगात आणलेल्या “प्रीति करा” आणि “प्रीति केली” या संज्ञा अ·गाʹपे या शब्दातून येतात जे तत्त्वांनी मार्गदर्शित असलेल्या प्रेमास सूचित करते. बायबल येथे, पतींना त्यांच्या पत्नींविषयी निरंतर, अढळ व टिकाऊ प्रेम दाखवण्याची आज्ञा देत आहे.
“तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो” केवळ अशाप्रकारची ती भावना नव्हे. पती स्वतःपेक्षाही अधिक आपल्या पत्नीचे हित करावयास पाहतो आणि पत्नी तिच्या पतीवर त्याचप्रकारे प्रेम करते. (फिलिप्पैकर २:४) तुमच्या सोबत्याबद्दल गाढ प्रेम विकसित केल्याने तुमच्या विवाह शपथेप्रमाणे आचरण करण्यास तुम्हाला मदत मिळेल.
“जतन करण्यास”: एका शब्दकोशानुसार, ‘जतन करणे’ म्हणजे, ‘प्रिय समजणे, एखाद्याविषयी संवेदनशील किंवा प्रेम असणे.’ तुम्ही शब्दांनी तसेच कृतींनी तुमचे प्रेम व्यक्त केले पाहिजे! पत्नीला विशेषतः तिच्या पतीने सतत प्रेम प्रदर्शित करावे असे वाटत असते. तिचा पती तिच्या शारीरिक गरजांची नीट काळजी घेईल, पण इतकेच पुरेसे नाही. पुरेसे अन्न आणि आरामदायी घर असणाऱ्या पण आपल्या विवाहित सोबत्याने बेपर्वाई दाखवल्याने किंवा दुर्लक्ष केल्यामुळे अतिशय दुःखी असलेल्या पत्नी आहेत.
दुसऱ्या बाजूला पाहता, ज्या पत्नीला प्रेम आणि जतन केले जात असल्याचे माहीत आहे ती निश्चितच आनंदी असू शकते. अर्थात, पतीबद्दलही तेच म्हटले जाऊ शकते. खरी प्रीती, प्रेमाच्या खऱ्या वक्तव्यांनी अधिक वाढते. गीतरत्नात, मेंढपाळ प्रियकर उद्गारतो: “अगे माझे भगिनी, माझे वधू! तुझे प्रेम किती मनोरम आहे! तुझे प्रेम द्राक्षारसाहून किती तरी मधुर आहे! तुझ्या उटण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्याहून मधुर आहे!”—गीतरत्न ४:१०.
“व सखोल आदर दाखवण्यास”: सर्व शतकांदरम्यान असे पुरुष अस्तित्वात राहिले आहेत ज्यांनी स्त्रियांशी दुर्व्यवहार केला व त्यांची मानहानी केली आहे. आज देखील, जगाचे आरोग्य (इंग्रजी) या नियतकालिकानुसार, “स्त्रियांविरुद्ध हिंसा प्रत्येक देशात आणि प्रत्येक सामाजिक व आर्थिक वर्गात घडते. अनेक संस्कृतींमध्ये, पत्नीला मारहाण करणे पुरुषाचा हक्क मानला जातो.” कदाचित, अशा वर्तनाबद्दल अनेक पुरुष दोषी नसतील. तरीही, स्त्रियांशी निगडित असलेल्या बाबींबद्दल अनेक पुरुष मनापासून आस्था दाखवण्यास उणे पडतात असे दिसून येते. परिणामस्वरूप, अनेक स्त्रियांनी पुरुषांविषयी नकारात्मक दृष्टिकोन विकसित केला आहे. काही पत्नींना असे म्हणताना ऐकले आहे, “मी माझ्या पतीवर प्रेम करते, पण मी त्यांचा आदर करूच शकत नाही!”
तथापि, जी पत्नी आपल्या पतीचा आदर करण्याचा प्रयत्न करते—मग तो अधूनमधून तिच्या अपेक्षांना पूर्ण करत नसला तरीही तिला यहोवा देव मौल्यवान समजतो. त्याला देवाने प्रदान केलेली नेमणूक किंवा स्थान आहे हे ती ओळखते. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२३) म्हणून, तिच्या पतीसाठी खोल आदर, ती यहोवाला देत असलेल्या उपासनेचा आणि त्याला आज्ञाधारक असण्याचा भाग आहे. देव, ईश्वरी स्त्रियांच्या आज्ञाधारकतेकडे दुर्लक्ष करत नाही.—इफिसकर ५:३३; १ पेत्र ३:१-६; पडताळा इब्रीयांस ६:१०.
विवाहात, परस्परांसाठी आदर असला पाहिजे, आणि तो अपेक्षा किंवा मागणी करण्याऐवजी मिळवला पाहिजे. उदाहरणार्थ, विवाह व्यवस्थेत, मार्मिक अथवा मन दुखावणारे भाष्य यांस कोणतेही स्थान नाही. तुमचा पती किंवा तुमची पत्नी यांविषयी मानहानीकारक टीका करणे प्रेमळपणाचे किंवा आदरणीय होणार नाही. इतरांना तुमच्या सोबत्याच्या उणिवा प्रकट केल्याने किंवा चार लोकांसमोर त्याविषयी बोलल्याने कोणतीच चांगली गोष्ट साध्य होऊ शकत नाही. विनोद करताना देखील या बाबतीत एखादी व्यक्ती घोर अनादर प्रदर्शित करू शकते. इफिसकर ४:२९, ३२ मधील शब्द पती-पत्नी अशा दोघांनाही लागू होतात. तेथे बायबल असे म्हणते: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, . . . एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा.”
तुमच्या विवाह शपथेचा प्रमुख साक्षीदार यहोवा आहे हे कधीही विसरू नका. या गंभीर वचनाप्रमाणे आचरण ठेवा आणि तुमचा विवाह यहोवा देवाची स्तुती आणि गौरव होण्याचा स्रोत ठरेल!
“पवित्र शास्त्रवचनांमध्ये दिलेल्या ईश्वरी नियमानुरूप”: आपल्याला निवड आणि कृती यांचे स्वातंत्र्य असावे अशी देवाची इच्छा आहे. वैवाहिक जीवनावर नियंत्रण करणाऱ्या नियमांच्या सर्वंकष यादीचे ओझे तो आपल्यावर लादत नाही. तरीपण, आपल्याच भल्यासाठी त्याने काही मार्गदर्शन दिले आहे.
आज, विवाहासंबंधी छापील साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे आणि अनेक लोकांची स्वतःची मतप्रणाली देखील आहे. पण सावध असा! विवाहासंबंधी वितरण करण्यात येणारी पुष्कळशी माहिती बायबलच्या विरोधात आहे.
तसेच विविध जोडप्यांच्या परिस्थिती वेगवेगळ्या असतात हे देखील जाणून घ्या. एका प्रकारे, विवाहित जोडपी हिमाच्या भुरभरीत किसासमान असतात; ती दुरून सारखीच दिसतील पण वास्तविक पाहता प्रत्येक जोडपे अतुल असते, बाकी जोडप्यांपेक्षा वेगळे असते. जगातील इतर कोणतेही विवाहित जोडपे, तुमचा सोबती व तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या जोडीची हुबेहूब नकल नाही. यास्तव, इतरांचे व्यक्तिगत दृष्टिकोन स्वीकारण्यात घाई करू नका. प्रत्येक विवाहाला लागू होणारे कोणतेही मानव-निर्मित सूत्र नाही!
त्याउलट, बायबलच्या सर्व आज्ञा खऱ्या आणि व्यवहार्य आहेत. प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण, ह्यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६; स्तोत्र ११९:१५१) तुम्ही बायबल वाचले आणि तुमच्या दैनिक जीवनात मार्गदर्शक म्हणून त्याच्या शिकवणुकींचा स्वीकार केला, तर तुम्ही तुमच्या विवाह शपथेप्रमाणे आचरण ठेवू शकाल.—स्तोत्र ११९:१०५.
“आम्ही दोघेही पृथ्वीवर एकत्र राहू तोपर्यंत”: हे दीर्घकालीन एकत्रितपणाला सूचित करते. “पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील” अशी आज्ञा देव करतो. (उत्पत्ति २:२४) तुम्ही एकत्र असावे अशी यहोवाची इच्छा आहे. एकत्र मिळून देवाची सेवा करा. एकत्र मिळून त्याच्या वचनाचा अभ्यास करा. वेळ काढून एकत्र फिरायला जा, बसा आणि जेवा. एकत्र मिळून जीवनाचा आनंद लुटा!
काही जोडपी प्रत्येक दिवशी केवळ एकमेकांशी बोलण्याकरता देखील वेळ बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात. विवाहाच्या अनेक वर्षांनंतरही हा एकत्रितपणा वैवाहिक आनंदाकरता आवश्यक आहे.
“देवाच्या विवाह व्यवस्थेप्रमाणे”: ज्या यहोवा देवाने विवाह व्यवस्था स्थापन केली त्याच्याकडील विवाह हे एक दान आहे. (नीतिसूत्रे १९:१४) त्याची व्यवस्था अनुसरण्यात उणे पडल्यास, तुमचा वैवाहिक आनंदच नव्हे, तर निर्माणकर्त्यासोबतचा तुमचा नातेसंबंध देखील धोक्यात येईल. दुसऱ्या बाजूला पाहता, पती-पत्नीने यहोवाच्या व्यवस्थेला आज्ञाधारकता प्रदर्शित करून त्याच्यासोबत चांगला नातेसंबंध विकसित केल्यास, इतरांशी तसेच एकमेकांशी देखील त्यांचे नातेसंबंध शांतीमय असतील.—नीतिसूत्रे १६:७.
[तळटीपा]
a काही ठिकाणी, स्थानिक नियमांनुरूप असण्यासाठी या शपथेमध्ये फेरबद्दल केलेल्या आवृत्तीचा उपयोग करण्याची आवश्यकता असेल. (मत्तय २२:२१) तथापि, बहुतांश देशांत, ख्रिस्ती जोडपी वरील शपथेचा उपयोग करतात.
[२२ पानांवरील चित्रं]
एक प्रकारे, विवाहित जोडपी हिमाच्या भुरभुरीत किसासमान असतात. दुरून सर्व सारखेच दिसतील, पण वास्तविक पाहता प्रत्येक जोडपे अतुलनीय असते
[Credit Line]
Snow Crystals/Dover