वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ६/१५ पृ. २६-२९
  • खरा न्याय—केव्हा आणि कसा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरा न्याय—केव्हा आणि कसा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • न्यायदोष
  • मानवी त्रुटी असलेल्या—मानवी न्याय यंत्रणा
  • ‘मला, यहोवाला न्याय प्रिय आहे’
  • यहोवाचे अनुकरण करा—न्यायानुसार आणि धार्मिकतेनुसार वागा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवा—खऱ्‍या न्यायाचा आणि धार्मिकतेचा स्रोत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • सर्व राष्ट्रांसाठी लवकरच न्याय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • यहोवा धार्मिकता आणि न्याय यांचा चाहता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ६/१५ पृ. २६-२९

खरा न्याय—केव्हा आणि कसा?

निर्दोष लोकांना खऱ्‍या न्यायाची भीती वाटण्याचे कारणच नाही. किंबहुना, लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करील अशी कायदे यंत्रणा आपल्या देशात असल्यास, नागरिकांनी त्याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. अशा या यंत्रणेत कायदेकानून असतात, हे कायदेकानून अंमलात आणणारी पोलिस यंत्रणा आणि न्याय मिळवून देणारी न्यायालयेही असतात. “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे,” या बायबलच्या आज्ञेनुसार, खरे ख्रिस्ती ज्या न्याय यंत्रणेखाली येतात तिचा ते आदर करतात.—रोमकर १३:१-७.

तथापि, कित्येक देशांच्या न्याय यंत्रणांकडून प्रसंगी नुकसानदायक आणि लाजिरवाण्या चुका देखील घडल्या आहेत.a अपराध्यांना शिक्षा करून निर्दोष लोकांचे संरक्षण करण्याऐवजी कधी कधी, उलट निर्दोष लोकांनाच आपल्या हातून न घडलेल्या अपराधांची शिक्षा भोगावी लागली आहे. इतर काहीजण तुरुंगात काही वर्षे काढतात, आणि मग शिक्षेची मुदत संपण्याआधीच त्यांना तुरुंगातून सुटका दिली जाते; ते खरोखरच दोषी होते की नाही, त्यांना ठोठावण्यात आलेली शिक्षा न्याय्य होती की नाही याविषयी अद्यापि कोणतीच निश्‍चिती नसताना. यामुळे बऱ्‍याच लोकांना प्रश्‍न पडतो, सर्वांना खरा न्याय मिळेल, असे कधी होईल का? होणार असेल, तर मग केव्हा आणि कसे? निरपराध लोकांचे संरक्षण करण्याकरता आपण कोणाकडे भरवशाने पाहू शकतो? आणि अन्यायाला बळी पडलेल्यांना कोणती आशा आहे?

न्यायदोष

जर्मनीमध्ये १९८० च्या दशकांदरम्यान एका महिलेला आपल्या दोन मुलींची हत्या केल्याच्या आरोपावरून जन्मठेप झाली; “युद्धोपरांत काळातील [जर्मनीतल्या] सर्वात खळबळजनक न्यायप्रकरणांपैकी हे एक होते.” पण कितीतरी वर्षे लोटल्यावर तिच्याविरुद्ध असलेल्या पुराव्यांवर पुनर्विचार करण्यात आला आणि या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे ठरवून तिला मुक्‍त करण्यात आले. डी झाईटच्या १९९५ सालच्या वृत्तानुसार, आधी दिलेला निकाल मुळात “एक न्यायसंबंधी चूक” ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा लेख लिहिण्यात आला तोपर्यंत सदर स्त्रीने तुरुंगात नऊ वर्षे काढली होती आणि अद्यापही ती दोषी आहे की निर्दोष याविषयी अनिश्‍चितताच होती.

इंग्लंडमधील बर्मिंघम शहर १९७४ साली, नोव्हेंबर महिन्यात एका संध्याकाळी दोन बॉम्बस्फोटांनी हादरून गेले आणि २१ जण मृत्यूमुखी पडले. क्रिस मलेन्‌ नावाच्या एका संसद सदस्यांच्या शब्दांत, “बर्मिंघमचे रहिवाशी कधी विसरू शकणार नाहीत” अशी ही घटना होती. नंतर, “ब्रिटिश इतिहासातील या सर्वात मोठ्या हत्या प्रकरणी सहा निर्दोष इसमांना न्यायालयाने दोषी ठरवले.” ते दोषी असल्याबद्दलचा निवाडा नंतर रद्द करण्यात आला—पण, तब्बल १६ वर्षे कोठड्यांमध्ये काढल्यानंतर!

कायदेविषयक सल्लागार केन क्रिसपन यांनी एका केसविषयी रिपोर्ट लिहिला होता; त्यांच्या मते “ऑस्ट्रेलियन कायदे इतिहासातील इतर कोणत्याही घटनेने कधी वेधले नसेल इतक्या विलक्षण प्रकारे या केसने तेथील जनतेचे लक्ष वेधले.” एयर्स खडकापाशी कँपिंगकरता गेलेल्या एका कुटुंबाचे मूल बेपत्ता झाले, आणि पुन्हा कधीच सापडले नाही. मुलाच्या आईवर हत्येचा आरोप करून तिला दोषी ठरवण्यात आले आणि जन्मठेप झाली. १९८७ साली तीन वर्षे तुरुंगात काढल्यानंतर, एका अधिकृत चौकशीतून असे दिसून आले की तिच्याविरुद्ध सादर करण्यात आलेला पुरावा तिला दोषी शाबीत करू शकत नव्हता. तिची निर्दोष सुटका करण्यात आली.

दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्‍या एका १८ वर्षीय तरुणीचा १९८६ साली खून झाला. एका मध्यमवयीन इसमावर आरोप करून तो दोषी असल्याचा निवाडा देण्यात आला आणि त्याला मरणदंड ठोठावण्यात आला. मरणदंडाची वाट पाहात सहा वर्षे घालवल्यानंतर त्याचा या गुन्ह्याशी काडीचाही संबंध नव्हता असे शाबीत करण्यात आले.

ही न्यायीक चुकांची तुरळक उदाहरणे आहेत का? युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया लॉ स्कूलचे डेव्हिड रूडॉफस्की सांगतात: “या यंत्रणेत मी २५ वर्षे घालवली आहेत आणि या काळात कितीतरी प्रकरणं पाहिली आहेत. मी तर म्हणेन, की दोषी ठरवण्यात आलेल्यांपैकी मुळात निर्दोष असणाऱ्‍यांची संख्या . . . अंदाजे पाच ते १०% असते.” क्रिसपन एक अस्वस्थ करून सोडणारा प्रश्‍न विचारतात, तो म्हणजे, “आणखीही असहाय निर्दोष लोक तुरुंगांमध्ये असतील का?” पण अशा भयंकर चुका होतातच कशा?

मानवी त्रुटी असलेल्या—मानवी न्याय यंत्रणा

ब्रिटिश कोर्ट ऑफ अपीलने १९९१ साली प्रतिपादन केल्याप्रमाणे, “चुका होणारच नाहीत अशी कोणत्याही मानवी यंत्रणेकडून अपेक्षा करता येत नाही.” कोणतीही न्याय यंत्रणा तितकीच न्याय्य आणि विश्‍वासार्ह असू शकते जितकी तिची रचना करणारी आणि तिला अंमलात आणणारी माणसे असतात. आणि चुका, अप्रामाणिकपणा आणि पक्षपात करण्याकडे माणसाचा स्वभावतःच कल असतो. त्यामुळे माणसाच्या न्याय यंत्रणांमध्येही या त्रुटी दिसून याव्यात यात आश्‍चर्य ते काय? खालील माहिती लक्षात घ्या.

जर्मनीतील एक न्यायाधीश रॉल्फ बेन्डर यांच्या मते, एकूण गुन्हा प्रकरणांपैकी ९५ टक्के प्रकरणांत साक्षीदारांच्या विधानांना पुराव्याइतकेच वजन असते. पण कोर्टात साक्ष देणारे हे साक्षीदार नेहमीच भरवशालायक असतात का? न्यायमूर्ती बेन्डर यांच्या मते, नाही. त्यांच्या अंदाजाप्रमाणे कोर्टात हजर होणाऱ्‍या एकूण साक्षीदारांपैकी निम्मे खोटे बोलतात. काहीसे असेच मत, जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक येथे फौजदारी कायद्याचे अधिकृत प्राध्यापक बेर्न्ट श्‍यूनेमान यांनी देखील मांडले. डी झाईटला दिलेल्या मुलाखतीत श्‍यूनेमान यांनी असे प्रतिपादन केले की साक्षीदारांची विधाने—अविश्‍वासार्ह असली तरीसुद्धा—त्यांस मुख्य पुरावा मानले जाते. “माझ्या मते तरी, न्यायीक चुका होण्यामागचे सहसा कोणते कारण असेल तर हेच की न्यायाधीश साक्षीदारांच्या अविश्‍वासार्ह विधानांवर भरवसा ठेवतात.”

साक्षीदारांकडून चुका होऊ शकतात; तसेच पोलिसांकडूनही. विशेषतः एखाद्या गुन्ह्यामुळे सामान्य जनता संतप्त होते तेव्हा पोलिसांवर गुन्हेगारास अटक करण्याचा दबाव येतो. अशा परिस्थितीत, काही पोलिस बनावटी पुरावा उभा करण्याच्या किंवा एखाद्या संशयिताला मारून मुटकून का होईना गुन्ह्याची कबुली देण्यास भाग पाडण्याच्या मोहात पडतात. बर्मिंघम येथील बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सहा जणांची सुटका झाली तेव्हा दि इंडिपेंडंट दैनिकात हा ठळक मथळा होता: “सहा आरोपींना दोषी ठरवण्याबद्दल भ्रष्टाचारी पोलिस जबाबदार.” द टाईम्सच्या वृत्तानुसार: “कारस्थानी पोलिसांनी लबाडी आणि फसवणूक केली.”

काहीवेळा, विशिष्ट जातीच्या, धर्माच्या किंवा राष्ट्राच्या लोकांबद्दल मन कलुषित असल्यास पोलिस आणि सामान्य लोकही त्या लोकांकडेच संशयाच्या नजरेने पाहतात. यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टनुसार, असे घडते तेव्हा हे गुन्ह्याचे प्रकरण “योग्यायोग्यतेच्या ऐवजी जातीयवादाचे प्रकरण बनते.”

एखादे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर, काय निकाल देण्यात येईल यावर केवळ साक्षीदारांच्या विधानांचाच नव्हे तर वैज्ञानिक पुराव्याचाही प्रभाव पडतो. दिवसेंदिवस अधिकाधिक क्लिष्ट होत चाललेल्या फोरेन्सिक (न्यायवैद्यक) शास्त्रामुळे आता न्यायाधीशांना किंवा ज्यूरी सदस्यांना बलिस्टिक्स, बोटांच्या ठशांची ओळख पटवण्याचे शास्त्र, हस्ताक्षर, रक्‍त गट, केसांचा रंग, कपड्यांचे धागे किंवा डीएनए नमुने अशा निरनिराळ्या गोष्टींच्या आधारावर आरोपी दोषी आहे किंवा निर्दोष आहे हे ठरवावे लागते. एका वकिलाने सांगितल्याप्रमाणे आजकाल कोर्टात “चक्रावून सोडणाऱ्‍या गुंतागुंतीच्या प्रक्रियांविषयी वर्णन करणाऱ्‍या शास्त्रज्ञांचा ताफाच” असतो.

शिवाय, नेचर नावाचे एक नियतकालिक सांगते की फोरेन्सिक शास्त्राच्या पुराव्यांवरून दिलेल्या स्पष्टीकरणावर सर्वच शास्त्रज्ञांचे एकमत होईलच असे नाही. “फोरेन्सिक शास्त्रज्ञांचे कधीकधी आपसात खरोखरच दुमत होते.” खंत वाटते ती याची, की “चुकीच्या फोरेन्सिक पुराव्यामुळे आजवर कितीतरी वेळा निर्दोष लोकांना दोषी ठरविण्यात आले आहे.”

आपण कोठेही राहात असलो तरीसुद्धा, सध्या कार्यरत असलेल्या सर्वच न्याय यंत्रणा माणसाकडून स्वभावतःच होणाऱ्‍या चुकांचे दर्शन घडवतात. मग निर्दोष लोकांचे संरक्षण करण्याकरता कोणावर भरवसा ठेवता येईल? भविष्यात कधीतरी खरा न्याय मिळण्याची आशा आपण करू शकतो का? आणि न्यायीक चुकांना बळी पडलेल्यांकरता काही आशा आहे का?

‘मला, यहोवाला न्याय प्रिय आहे’

तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी एखाद्या न्यायीक चुकीमुळे अन्यायाला बळी पडला असल्यास, यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू यांना तुम्हाला काय सोसावे लागते आहे याची पुरेपूर जाणीव आहे. आजवर सर्वात घोर अन्याय कधी झाला असेल, तर तो येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा झाला. प्रेषित पेत्र सांगतो त्याप्रमाणे, येशूने कोणतेही “पाप केले नाही.” तरीसुद्धा, खोट्या साक्षीदारांनी त्याच्यावर आरोप लावले, त्याला दोषी ठरवण्यात आले आणि मरणदंड देण्यात आला.—१ पेत्र २:२२; मत्तय २६:३, ४, ५९-६२.

आपल्या पुत्राला अशी गैरवागणूक देण्यात आली तेव्हा यहोवाला कसे वाटले असावे याची जरा कल्पना करा! न्याय हा यहोवाच्या प्रमुख गुणांपैकी एक आहे. बायबल आपल्याला सांगते: “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.”—अनुवाद ३२:४; स्तोत्र ३३:५.

यहोवाने इस्राएल राष्ट्राला एक असामान्य न्याय यंत्रणा देऊ केली होती. एखादे खुनाचे प्रकरण सोडवता आले नाही तर त्या मृत्यूचे प्रायश्‍चित्त करण्यासाठी बलिदान दिले जात असे. एखाद्या निर्दोष व्यक्‍तीला दोषी ठरवण्याची जोखीम पत्करून का होईना, पण प्रत्येक गुन्ह्याचे प्रकरण सोडवलेच पाहिजे असा दबाव नव्हता. निव्वळ अप्रत्यक्ष किंवा वैज्ञानिक पुराव्याच्या आधारावर कोणालाही खुनासाठी दोषी ठरवता येत नसे; कमीत कमी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असावेच लागायचे. (अनुवाद १७:६; २१:१-९) या उदाहरणावरून दिसून येते की यहोवाचे आदर्श अतिशय उदात्त आहेत आणि उचितपणे न्याय दिला जावा अशी इच्छा तो बाळगतो. किंबहुना, ‘मला, यहोवाला न्याय प्रिय आहे,’ असे तो स्वतः म्हणतो.—यशया ६१:८.

अर्थात, इस्राएलची न्याय यंत्रणा देखील आपल्यासारख्याच चुका करणाऱ्‍या माणसांच्या हातात होती. कायद्याची अयोग्य अंमलबजावणी करण्याचेही प्रकार घडायचे. म्हणुनच की काय, शलमोन राजाने लिहिले: “एखाद्या प्रांतांत दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व धर्म यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नको.”—उपदेशक ५:८.

आपल्या पुत्राविरुद्ध झालेला अन्याय भरून काढण्यास यहोवा समर्थ होता. याची खात्री असल्यामुळे येशूला ताकद मिळाली आणि “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने . . . वधस्तंभ सहन केला.” त्याचप्रकारे, मशीहाच्या शासनाखाली, जेथे न्याय असेल अशा परादीस पृथ्वीवर राहण्याची आनंददायक आशा आपल्याला आहे; त्यामुळे या जुन्या व्यवस्थीकरणात जेव्हा आपण अन्यायाच्या प्रकारांबद्दल ऐकतो किंवा प्रत्यक्ष अन्याय सोसतो तेव्हा ही आशा आपल्याला देखील ताकद देऊ शकते. यहोवा आपल्या योग्य वेळी भरून काढू शकत नाही असे कोणतेही नुकसान किंवा अन्याय नाही. एखाद्या न्यायीक चुकीमुळे ज्यांना आपले जीवही गमावावे लागतात, अशांचे देखील पुनरुत्थान होऊ शकते.—इब्री लोकांस १२:२; प्रेषितांची कृत्ये २४:१५.

आपल्याला जरी अन्याय सोसावा लागला तरी आपण निदान याचा आनंद मानू शकतो की बऱ्‍याच न्याय यंत्रणांमध्ये असे काही कायदेशीर माध्यम असतात ज्यांकरवी समस्या सोडवता येते. ख्रिस्ती लोक अशा माध्यमांचा उपयोग करू शकतात. तथापि, ते एवढे मात्र लक्षात ठेवतात की: अपरिपूर्ण न्याय यंत्रणा एका अशा मानवी समाजाचे प्रतिबिंब आहेत ज्याची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना होणे आवश्‍यक बनले आहे. आणि देव—हे लवकरच घडवून आणणार आहे.

लवकरच यहोवा या अन्यायी व्यवस्थीकरणाचा नाश करून “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते,” असे एक नवे व्यवस्थीकरण आणेल. तेव्हा आपला निर्माणकर्ता आपला मशिही राजा येशू ख्रिस्त याच्या माध्यमाने न्याय देईल याची आपण पक्की खात्री बाळगू शकतो. लवकरच सर्वांना खरा न्याय प्राप्त होईल! या आशेबद्दल आपण किती कृतज्ञता बाळगू शकतो.—२ पेत्र ३:१३.

[तळटीपा]

a येथे उल्लेखलेल्या प्रकरणांत, अमुक व्यक्‍ती दोषी आहे किंवा निर्दोष आहे असे टेहळणी बुरूज सुचवू इच्छित नाही, तसेच हे नियतकालिक एखाद्या देशाच्या तुलनेत दुसऱ्‍या एखाद्या देशाची न्याय यंत्रणा अधिक चांगली आहे असे सुचवून तिचे समर्थनही करीत नाही. शिवाय, अमुक शिक्षेचा प्रकार दुसऱ्‍या एखाद्या प्रकारापेक्षा अधिक चांगला आहे असेही येथे सुचविण्यात आलेले नाही. सदर लेख लिहितेवेळी ज्ञात होत्या त्याप्रमाणे, केवळ काही वस्तुस्थिती येथे मांडण्यात आलेल्या आहेत.

[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]

अपरिपूर्ण न्याय यंत्रणा जशा भ्रष्ट सरकारांचे, नीतिहीन धार्मिक संस्थेचे आणि विवेकरहित व्यापार व्यवस्थेचे प्रतिबिंब आहेत—तशाच त्या अशा एका मानवी समाजाचेही प्रतिबिंब आहेत, ज्याची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना होणे आवश्‍यक होऊन बसले आहे

[२८ पानांवरील चौकट]

पवित्र शास्त्रवचनांतून सांत्वन

इंग्लंडमध्ये लंडनजवळ असणाऱ्‍या क्रॉयडन येथे १९५२ साली नोव्हेंबर महिन्यात डेरिक बेंट्‌ले आणि क्रिस्टफर क्रेग हे दोन इसम चोरी करण्यासाठी एका गोदामात घुसले. बेंट्‌लेचे वय १९ वर्षे आणि क्रेग याचे १६ वर्षे होते. पोलिसांना बोलावण्यात आले तेव्हा, क्रेगने एका पोलिसाला गोळी झाडून ठार केले. क्रेगला नऊ वर्षे तुरुंगात घालवावी लागली, पण बेंट्‌ले यास मात्र १९५३ साली जानेवारीत खुनाच्या आरोपावर फाशी देण्यात आली.

आपला भाऊ या खून प्रकरणी निर्दोष असल्याचे शाबीत करण्यासाठी बेंट्‌लेची बहीण आयरस ही तब्बल ४० वर्षे झगडली. १९९३ साली सरकारने या शिक्षेविषयी एक क्षमापत्र जाहीर केले आणि कबूल केले की डेरिक बेंट्‌ले यास फाशी देणे अयोग्य होते. सदर प्रकरणाविषयी आयरस बेंट्‌ले हिने लेट हिम हॅव जस्टिस या पुस्तकात लिहिले:

“खुनाची घटना घडली त्याच्या सुमारे वर्षभराआधी त्याची एका यहोवाच्या साक्षीदारासोबत रस्त्यावर गाठ पडली होती. . . . सिस्टर लेन यांचे घर फेयरव्ह्यू रोडवरील आमच्या घराजवळच होते आणि त्या सहसा डेरिकला बायबलच्या गोष्टी ऐकायला आपल्याकडे बोलवायच्या. . . . सिस्टर लेनजवळ या बायबलच्या गोष्टींच्या रेकॉड्‌र्स होत्या, त्या त्यांनी त्याला दिल्या म्हणून बरं झालं [कारण डेरिकला वाचनाचा मनस्वी कंटाळा होता]. . . . तो घरी परतल्यावर त्यांनी काय काय सांगितले ते सर्व मला सांगायचा, मृत्यू झाल्यावर आपण सर्व परत जिवंत होऊ वगैरे.”

आपल्या भावाला फाशी होण्याआधी तो तुरुंगात असताना आयरस बेंट्‌ले त्याला भेटायला गेली. त्याच्या काय भावना होत्या? “सिस्टर लेन यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्या शेवटल्या काही दिवसांत त्याला बरीच मदत मिळाली.”—तिरपे वळण आमचे.

न्यायीक चुकीमुळे तुम्हालाही एखाद्या कठीण परिस्थितीतून जावे लागल्यास बायबलमधील सत्यांचे वाचन करणे आणि त्यावर मनन करणे चांगले राहील. यातून तुम्हाला मोठे सांत्वन मिळेल कारण यहोवा देव ‘करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव आहे व तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो.’—२ करिंथकर १:३, ४.

[२९ पानांवरील चित्र]

एक अतिशय घोर अन्याय, ख्रिस्ताला मरणदंड देण्यात आला तेव्हा घडला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा