मार्क
१० तिथून निघून तो यार्देन नदीपलीकडे असलेल्या यहूदीयाच्या सीमेजवळील प्रदेशात आला आणि तिथेसुद्धा लोकांचे समुदाय त्याच्याकडे आले. मग पुन्हा त्याच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे तो त्यांना शिकवू लागला. २ आता परूशी त्याच्याजवळ आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या हेतूने त्यांनी त्याला विचारले, की एखाद्या मनुष्याने आपल्या बायकोला घटस्फोट देणे नियमानुसार योग्य आहे का? ३ त्याने त्यांना विचारले: “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?” ४ ते म्हणाले: “सोडचिठ्ठी देऊन बायकोला घटस्फोट देण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” ५ पण येशू त्यांना म्हणाला: “मोशेने तुमच्या कठोर वृत्तीमुळे तुमच्यासाठी ही आज्ञा लिहिली होती. ६ पण देवाने सृष्टीच्या सुरुवातीपासूनच, ‘त्यांना स्त्री व पुरुष असं निर्माण केलं. ७ म्हणून पुरुष आपल्या आईवडिलांना सोडेल, ८ आणि तो व त्याची पत्नी एकदेह होतील. तेव्हा, यापुढे ते दोन नाहीत तर एकदेह असे आहेत.’ ९ म्हणूनच, देवाने जे जोडलं आहे, ते कोणत्याही मनुष्याने वेगळं करू नये.” १० मग पुन्हा एकदा घरात असताना, शिष्य त्याला याविषयी प्रश्न विचारू लागले. ११ तो त्यांना म्हणाला: “जो कोणी आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो, १२ आणि जर एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला घटस्फोट देऊन दुसऱ्याशी लग्न केलं, तर तीही व्यभिचार करते.”
१३ मग येशूने आपल्या लहान मुलांवर हात ठेवावा म्हणून लोक त्यांना त्याच्याजवळ आणू लागले, पण शिष्यांनी त्यांना रागावले. १४ हे पाहून येशू चिडला आणि त्यांना म्हणाला: “मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका. कारण देवाचं राज्य अशांचंच आहे. १५ मी तुम्हाला खरं सांगतो, जो कोणी एखाद्या लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करत नाही, तो त्यात कधीच जाऊ शकणार नाही.” १६ मग त्याने त्या लहान मुलांना आपल्याजवळ घेतले आणि त्यांच्यावर हात ठेवून तो त्यांना आशीर्वाद देऊ लागला.
१७ तो तिथून जात असताना, एक माणूस धावत आला आणि त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याने त्याला असा प्रश्न विचारला: “हे उत्तम गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?” १८ येशू त्याला म्हणाला: “मला उत्तम का म्हणतोस? कारण देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. १९ तुला तर आज्ञा माहीतच आहेत: ‘खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवणूक करू नको, आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर.’” २० तेव्हा तो माणूस येशूला म्हणाला: “हे गुरू, या सर्व गोष्टी मी लहानपणापासूनच करत आलो आहे.” २१ येशूने प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, “तुझ्यात एकाच गोष्टीची कमी आहे: म्हणून जा आणि जे काही तुझ्या मालकीचं आहे ते विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि ये, माझा शिष्य हो.” २२ पण हे उत्तर ऐकून तो उदास झाला आणि दुःखी होऊन तिथून निघून गेला कारण त्याच्याजवळ बरीच मालमत्ता होती.
२३ मग सभोवती पाहून येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं किती कठीण जाईल!” २४ पण शिष्यांना त्याचे हे शब्द ऐकून आश्चर्य वाटले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मुलांनो, देवाच्या राज्यात जाणं इतकं सोपं नाही! २५ श्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात जाण्यापेक्षा एका उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे.” २६ त्यांना आणखीनच आश्चर्य वाटले आणि ते त्याला* म्हणाले: “मग, कोणाचं तारण होणं शक्य आहे?” २७ येशूने सरळ त्यांच्याकडे पाहून त्यांना म्हटले: “माणसांना हे अशक्य आहे, पण देवाला नाही, देवाला सर्वकाही शक्य आहे.” २८ पेत्र त्याला म्हणाला: “पाहा! आम्ही सर्वकाही सोडून तुझ्यामागे आलो आहोत.” २९ येशू म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी ज्यांनी घरदार, बहीणभाऊ, आईवडील, मुलंबाळं किंवा शेतीवाडी यांचा त्याग केला आहे, त्यांपैकी प्रत्येकाला ३० सध्याच्या काळात छळासोबत शंभरपटीने घरंदारं, बहीणभाऊ, आईवडील, मुलंबाळं व शेतीवाडी, आणि येणाऱ्या जगाच्या व्यवस्थेत* सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. ३१ पण जे पहिले आहेत असे बरेच जण शेवटले असतील आणि जे शेवटले ते पहिले असतील.”
३२ मग ते वर यरुशलेमकडे जात असताना, येशू त्यांच्यापुढे चालत होता. त्याचे शिष्य आश्चर्यचकित झाले होते, तर त्यांच्यामागून येणारे लोक घाबरले होते. तेव्हा पुन्हा एकदा त्याने बारा शिष्यांना बाजूला नेले आणि लवकरच त्याच्यासोबत घडणार असलेल्या गोष्टींविषयी तो त्यांना सांगू लागला: ३३ “पाहा! आपण वर यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या आणि शास्त्र्यांच्या स्वाधीन केलं जाईल. ते त्याला मृत्युदंड सुनावतील आणि विदेश्यांच्या हाती सोपवतील, ३४ आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील आणि त्याला फटके मारतील व त्याला ठार मारतील, पण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल.”
३५ जब्दीची मुले याकोब व योहान यांनी त्याच्याजवळ येऊन म्हटले: “हे गुरू, आम्ही जे काही मागू त्याप्रमाणे तू आमच्यासाठी करावं अशी आमची इच्छा आहे.” ३६ तो त्यांना म्हणाला: “मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?” ३७ ते म्हणाले: “तुझ्या राज्यात* आमच्यापैकी एकाला तुझ्या उजवीकडे आणि दुसऱ्याला तुझ्या डावीकडे बसू दे.” ३८ पण, येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही काय मागत आहात याची तुम्हाला कल्पना नाही. जो प्याला मी पीत आहे तो तुम्हाला पिता येईल का? आणि जो बाप्तिस्मा मी घेत आहे तो तुम्हाला घेता येईल का?” ३९ ते म्हणाले, “हो घेता येईल.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही माझा प्याला जरूर प्याल, आणि जो बाप्तिस्मा मी घेत आहे तोही घ्याल, ४० पण माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसण्याचा अधिकार देणं माझ्या हातात नाही, तर ज्यांच्यासाठी तो राखून ठेवला आहे त्यांनाच तो मिळेल.”
४१ ही गोष्ट बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकली तेव्हा त्यांना याकोब व योहान यांचा खूप राग आला. ४२ पण येशूने त्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले: “विदेश्यांमध्ये ज्यांना राजे म्हणतात ते त्यांच्यावर सत्ता चालवतात आणि महत्त्वाच्या पदांवर असलेले त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हाला माहीत आहे. ४३ पण तुमच्यामध्ये असं असू नये; उलट, ज्या कोणाला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे, ४४ आणि ज्या कोणाला तुमच्यामध्ये प्रमुख व्हायचं असेल त्याने सर्वांचा दास झालं पाहिजे. ४५ कारण, मनुष्याचा पुत्रदेखील सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आणि अनेकांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.”
४६ मग ते यरीहोला आले. नंतर तो, त्याचे शिष्य आणि लोकांचा एक मोठा समुदाय यरीहोतून बाहेर जात असताना बार्तीमय (तीमयचा मुलगा), हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. ४७ नासरेथकर येशू तिथून जात आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला: “हे येशू, दावीदपुत्रा, माझ्यावर दया कर!” ४८ बरेच जण त्याला दटावून गप्प राहायला सांगू लागले, पण तो आणखीनच मोठ्याने ओरडू लागला: “हे दावीदपुत्रा, माझ्यावर दया कर!” ४९ तेव्हा येशू थांबला आणि म्हणाला: “त्याला बोलवा.” म्हणून त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलावून म्हटले: “भिऊ नकोस! ऊठ, तो तुला बोलावत आहे.” ५० तेव्हा आपल्या अंगावरचे वस्त्र टाकून तो ताडकन उठला आणि येशूजवळ गेला. ५१ मग येशू त्याला म्हणाला: “मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा माणूस त्याला म्हणाला: “हे गुरू,* माझी दृष्टी परत येऊ द्या.” ५२ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “जा. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे.” आणि लगेचच त्याची दृष्टी परत आली आणि तो येशूच्या मागे चालू लागला.