योहान
५ यानंतर यहुद्यांचा एक सण असल्यामुळे येशू वर यरुशलेमला गेला. २ तिथे मेंढरे-फाटकाजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथजथा म्हटले जाते. या तळ्याभोवती खांबांच्या रांगा असलेले वरांडे आहेत. ३ या वरांड्यांवर कित्येक आजारी, आंधळे, पांगळे आणि वाळलेल्या* हातापायांचे लोक पडून असायचे. ४ *— ५ तिथेच अडतीस वर्षांपासून आजारी असलेला एक माणूस होता. ६ येशूने त्या माणसाला पाहिले. तो बऱ्याच काळापासून आजारी आहे हे त्याला माहीत होते. म्हणून तो त्याला म्हणाला: “तुला बरं व्हायचं आहे का?” ७ आजारी माणसाने उत्तर दिले: “पाणी हलत असताना मला तळ्यात उतरवण्यासाठी कोणीही माझ्यासोबत नाही. मी पाण्यापर्यंत पोचण्याआधीच दुसरा कोणीतरी माझ्यापुढे जाऊन पाण्यात उतरतो.” ८ येशू त्याला म्हणाला: “ऊठ! आपली चटई* उचलून चालू लाग.” ९ तेव्हा तो माणूस लगेचच बरा झाला आणि आपली चटई* उचलून चालू लागला.
तो शब्बाथाचा दिवस होता. १० त्यामुळे यहुदी लोक त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणू लागले: “आज शब्बाथ आहे. कायद्यानुसार तुझं चटई* उचलणं योग्य नाही.” ११ पण तो त्यांना म्हणाला: “ज्याने मला बरं केलं त्यानेच मला सांगितलं, की ‘तुझी चटई* उचलून चालू लाग.’” १२ त्यांनी त्याला विचारले: “‘चटई* उचलून चालू लाग,’ असं तुला सांगणारा तो माणूस कोण आहे?” १३ पण आपल्याला बरे करणारा कोण आहे हे त्या माणसाला माहीत नव्हते, कारण येशू तिथे जमलेल्या लोकांच्या गर्दीत दिसेनासा झाला होता.
१४ यानंतर येशूला तो माणूस मंदिरात भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला: “बघ, तू बरा झालास. आता तुला याहीपेक्षा वाईट काही होऊ नये म्हणून यापुढे पाप करू नको.” १५ तो माणूस तिथून निघून गेला आणि आपल्याला बरे करणारा येशू आहे, हे त्याने यहुद्यांना जाऊन सांगितले. १६ त्यामुळे यहुदी येशूचा छळ करू लागले, कारण तो शब्बाथाच्या दिवशी या गोष्टी करत होता. १७ पण त्याने त्यांना उत्तर दिले: “माझा पिता आतापर्यंत काम करत आहे आणि मीसुद्धा काम करत राहतो.” १८ यामुळे यहुदी त्याला ठार मारण्याचा आणखीनच प्रयत्न करू लागले, कारण शब्बाथ मोडण्यासोबतच देवाला आपला पिता म्हणून तो देवाची बरोबरी करत आहे असे त्यांना वाटले.
१९ म्हणून येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, की पुत्र स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करू शकत नाही; तर, जे काही तो पित्याला करताना पाहतो तेच तो करतो. कारण पिता जे काही करतो तेच पुत्रदेखील करतो. २० पित्याला पुत्राबद्दल जिव्हाळा आहे आणि तो स्वतः जे काही करतो ते तो पुत्राला दाखवतो. शिवाय, तुम्हाला आश्चर्य वाटावं म्हणून तो याहीपेक्षा मोठी कार्ये त्याला दाखवेल. २१ कारण ज्या प्रकारे पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो, त्याच प्रकारे पुत्रदेखील त्याची इच्छा असेल त्याला जिवंत करतो. २२ कारण पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर त्याने न्याय करण्याचं काम सर्वस्वी पुत्रावर सोपवलं आहे, २३ यासाठी की ज्याप्रमाणे सर्व जण पित्याला सन्मान देतात, त्याचप्रमाणे सर्वांनी पुत्रालाही सन्मान द्यावा. जो कोणी पुत्राला सन्मान देत नाही, तो त्याला पाठवणाऱ्या पित्यालाही सन्मान देत नाही. २४ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, की जो कोणी माझं ऐकून मला पाठवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल. त्याच्यावर न्यायदंड येणार नाही. तो मरणाला पार करून जीवनात गेला आहे.
२५ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, की अशी वेळ येत आहे, खरंतर आलीच आहे, जेव्हा मेलेले लोक देवाच्या पुत्राची हाक ऐकतील आणि ज्यांनी त्याचं ऐकलं आहे ते जिवंत होतील. २६ कारण ज्याप्रमाणे पित्याजवळ जीवन देण्याचं सामर्थ्य आहे,* त्याचप्रमाणे त्याने पुत्रालाही इतरांना जीवन देण्याचं सामर्थ्य दिलं आहे. २७ आणि पित्याने त्याला न्याय करण्याचा अधिकार दिला आहे कारण तो मनुष्याचा पुत्र आहे. २८ याविषयी आश्चर्य करू नका, कारण अशी वेळ येत आहे जेव्हा स्मारक कबरींमध्ये* असलेले सर्व जण त्याची हाक ऐकून २९ बाहेर येतील आणि ज्यांनी चांगली कामे केली, ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी* तर जे वाईट कामे करत राहिले, ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. ३० मी स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करू शकत नाही. तर, जे मी ऐकतो त्यानुसारच न्याय करतो आणि मी केलेला न्याय खरा* आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो.
३१ जर मी एकट्यानेच स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी ठरणार नाही. ३२ माझ्याविषयी साक्ष देणारा आणखी एक जण आहे, आणि तो माझ्याविषयी जी साक्ष देतो ती खरी आहे, हे मला माहीत आहे. ३३ तुम्ही योहानकडे माणसं पाठवली आणि त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. ३४ खरंतर, माणसाने दिलेल्या साक्षीची मला गरज नाही, पण तुमचं तारण व्हावं म्हणून मी या गोष्टी बोलत आहे. ३५ तो माणूस प्रकाश देणारा, जळता दिवा होता आणि त्याच्या प्रकाशात काही काळ आनंद करण्याची तुमची इच्छा होती. ३६ पण योहानने दिली त्यापेक्षाही प्रभावी अशी साक्ष माझ्याजवळ आहे; कारण, मी जी कार्ये करतो, अर्थात जी कार्ये करायला पित्याने मला नेमलं, ती कार्येच याची साक्ष देतात की मला पित्याने पाठवलं आहे. ३७ आणि ज्या पित्याने मला पाठवलं त्याने स्वतःच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही कधीही त्याचा आवाज ऐकला नाही किंवा त्याचं स्वरूप पाहिलं नाही, ३८ आणि त्याचं वचन तुमच्यात टिकून राहत नाही, कारण त्याने ज्याला पाठवलं त्याच्यावरच तुमचा विश्वास नाही.
३९ तुम्ही शास्त्रवचनांत शोध घेता कारण शास्त्रवचनांद्वारे तुम्हाला सर्वकाळाचं जीवन मिळेल असं तुम्हाला वाटतं; हीच* माझ्याविषयी साक्ष देतात. ४० आणि तरीसुद्धा, जीवन मिळावं म्हणून माझ्याकडे येण्याची तुमची इच्छा नाही. ४१ मला माणसांनी केलेली प्रशंसा नको आहे, ४२ पण तुमच्यामध्ये देवाचं प्रेम नाही हे मला माहीत आहे. ४३ मी माझ्या पित्याच्या नावाने आलो आहे, पण तुम्ही मला स्वीकारत नाही. जर दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला असता, तर तुम्ही त्याला स्वीकारलं असतं. ४४ तुम्ही कसा काय विश्वास ठेवाल? कारण, जो एकच देव त्याच्याकडून गौरव मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही एकमेकांकडून गौरव मिळण्याची अपेक्षा करता. ४५ मी पित्यासमोर तुम्हाला दोष लावीन असं समजू नका; कारण तुम्ही ज्याच्यावर भरवसा ठेवला आहे तो मोशे तुम्हाला दोष लावतो. ४६ खरंतर, तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिलं होतं. ४७ पण जर त्याने लिहिलेल्या गोष्टींवरच तुमचा विश्वास नाही, तर मग मी जे सांगतो त्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवाल?”