इब्री लोकांना पत्र
३ म्हणून, स्वर्गीय आमंत्रणात* भागीदार असलेल्या पवित्र बांधवांनो,+ ज्या प्रेषिताला आणि महायाजकाला आपण जाहीर रीत्या कबूल करतो, त्या येशूबद्दल विचार करा.+ २ जसा मोशे देवाच्या संपूर्ण घरात विश्वासू होता,+ तसाच तोसुद्धा, त्याला नेमणाऱ्या देवाला विश्वासू होता.+ ३ त्याला* मोशेपेक्षा जास्त गौरवाच्या पात्र समजलं जातं,+ कारण जो घर बांधतो त्याचा घरापेक्षा जास्त सन्मान केला जातो. ४ अर्थात, प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं असतं. पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे. ५ मोशे देवाच्या संपूर्ण घरात सेवक या नात्याने विश्वासू राहिला आणि याद्वारे ज्या गोष्टी नंतर सांगितल्या जाणार होत्या त्यांची साक्ष देण्यात आली. ६ पण ख्रिस्त तर देवाच्या घरावर देखरेख करणारा विश्वासू मुलगा होता.+ आणि जर आपण मोकळेपणाने बोलण्याचं धैर्य, आणि जिच्याबद्दल आपण अभिमान बाळगतो ती आशा शेवटपर्यंत दृढपणे टिकवून ठेवली, तर आपण त्याचं घर आहोत.+
७ म्हणून, पवित्र शक्ती* म्हणते त्याप्रमाणे,+ “आज जर तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल. ८ ओसाड रानात तुमच्या पूर्वजांनी मला संताप आणला त्या वेळी, परीक्षेच्या दिवशी केलं, तसं आपलं हृदय कठोर करू नका.+ ९ त्यांनी ४० वर्षांपर्यंत माझी महान कार्यं पाहिली होती, तरीसुद्धा त्यांनी तिथे माझी परीक्षा पाहिली.+ १० म्हणून मला या पिढीचा तिटकारा आला आणि मी म्हणालो: ‘त्यांचं हृदय नेहमीच भरकटतं आणि त्यांनी माझे मार्ग जाणून घेतले नाहीत.’ ११ म्हणून मी माझ्या रागात अशी शपथ घेतली: ‘ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत.’ ”+
१२ बांधवांनो, जिवंत देवापासून स्वतःला दूर केल्यामुळे तुमच्यापैकी कोणामध्येही विश्वास नसलेलं दुष्ट हृदय उत्पन्न होऊ नये म्हणून सांभाळा.+ १३ पण “आज” म्हटलेला काळ जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत+ एकमेकांना प्रोत्साहन देत राहा. हे यासाठी, की तुमच्यापैकी कोणीही पापाच्या फसव्या शक्तीमुळे कठोर बनू नये. १४ कारण जो विश्वास आपल्यामध्ये सुरुवातीला होता, तो जर आपण शेवटपर्यंत टिकवून ठेवला, तरच आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचे भागीदार बनू.+ १५ ज्याप्रमाणे म्हणण्यात आलं आहे: “आज जर तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल. तुमच्या पूर्वजांनी मला संताप आणला त्या वेळी केलं, तसं आपलं हृदय कठोर करू नका.”+
१६ कारण ज्यांनी ऐकूनही त्याला संताप आणला, ते कोण होते? मोशेच्या नेतृत्वाखाली इजिप्तमधून* बाहेर पडलेले सर्वच नव्हते का?+ १७ आणि ४० वर्षांपर्यंत देवाला ज्यांचा तिटकारा आला, ते कोण होते?+ ज्यांनी पाप केलं आणि ज्यांचे मृतदेह ओसाड रानात पडले, तेच नव्हते का?+ १८ आणि तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही, असं त्याने शपथ घेऊन कोणाला सांगितलं? ज्यांनी आज्ञा मोडल्या होत्या, त्यांनाच नाही का? १९ तर आपण पाहू शकतो, की विश्वास नसल्यामुळेच त्यांना देवाच्या विसाव्यात येता आलं नाही.+